Wednesday, 30 October 2019

पिच्चर देखेंगे क्या?


"तुम्ही सिनेमा का बघता?" मास मिडीयाच्या कोर्समधे विचारलेला हा असाच एक प्रश्न. कुणी म्हणे टाईमपास, कुणी म्हणे कलासक्तता, कुणी म्हणे मनोरंजन. माझ्या मते, तरी मला आवडतं सिनेमा बघायला म्हणूनच मी बघते. त्यासाठी कसल्याच लेबलची आवश्यकता मला वाटत नाही. बरं सिनेमा पहायचा म्हणजे तो उच्च अभिरूचीसंपन्न वगैरे हवा अशी माझी अपेक्षा कधीच नसते. उलट सिनेमा जितका जास्त फालतू, तितका तो बघण्याची मजा अजून जास्त. Happy
आम्ही उत्तम सिनेमा बनवला आहे, कलेचा स्वतंत्र अविष्कार आहे, तो जर फ्लॉप गेला तर "प्रेक्षकांना सिनेमा बघता येत नाही" असा पवित्रा घेणार्‍या लोकांपेक्षा हा "सिनेमा बॉक्स ऑफिसवर गल्ला कमवावा" या एकमेव उदात्त हेतूने बनवलेला आहे असे स्पष्ट म्हणणार्‍या लोकांचे सिनेमा मला जास्त भावतात. मी पैसे देऊन तिकीट काढलय तर माझे पैसे वसूल होइल इतकं मनोरंजन सिनेमाने केलंच पाहिजे एव॑ढीच माफक अपेक्षा. कितीही भंकस सिनेमा असला तरी तो एंजॉय करण्याची सहनशक्ती देवाने माझ्यात दिली आहे. वारंवार अनेक आचरट सिनेमा पाहूनपाहून मी ती शक्ती वाढवली आहे.
मुळात थेटरमधे जाऊन सिनेमा बघणं हा एक स्वतंत्र अनुभव असतो. तुम्ही सिनेमा कुठे बघणार? इथपासून त्या अनुभवाला सुरूवात होते. छोट्याशा गावातलं सिंगल स्क्रीन थेटर की आलिशान एसी लावलेलं मल्टिप्लेक्स, ढेकणयुक्त खुर्च्या की सोफ्यासारख्या रेलून बसण्यासारख्या खुर्च्या, इंटर्व्हलमधे बादलीभर पॉपकॉर्न खाणार की तेलकट गारढोण सामोसे खाणार यावरसुद्धा सिनेमाच्या बघण्याची गंमत असते. सिनेमा कुठलाही असो, तो मोठ्या पडद्यावर बघणं हाच सर्वात महत्त्वाचा भाग. थेटरात बघितलेल्या प्रत्येक सिनेमासोबत माझ्या कित्येक आठवणी निगडीत आहेत.
असेच हे काही किस्से चित्रपटगृहामधे बघितलेल्या सिनेमाचे.
तसा मी सिनेमा बघते लहानपणापासून. लहानपणची सिनेमाची अगदी हृद्य म्हणावी आठवण म्हणजे अनिरूद्धबरोबर पाहिलेले काही कानडी सिनेमा. त्यावेळेला असेन मी पाचसहा वर्षाची. अनिरूद्ध नात्याने माझा मावसमामा होता. पण वयामधे एक ते दोन वर्षाचं अंतर असल्याने आम्ही अख्ख्या धारवाडभर भाऊ- बहिणीसारख्या टवाळक्या करायचो. एका कानडी सिनेमामधे शंकराचा एक भक्त आपले दोन्ही डोळे काढून पिंडीवर ठेवतो असा एक अंधुकसा सीन मला आजही आठवतो. अंधुकसा आठवतो कारण नंतरच्या शॉटमधे त्या भक्ताचे रक्ताळलेले डोळे दाखवल्याबरोबर मी माझे डोळे बंद केले होते. कुठे शंकराची डोळे दाखवलेली पिंड असेल तर हमखास मला हा शॉट डोळ्यासमोर तरळतोच.
पण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या हिशोबाने सिनेमा पहायची माझी आवड किती उच्च आहे याची चुणूक मी त्या वयापासूनच दाखवली होती. तेव्हा अनिरूद्ध आणि मी हट्ट करून रूप की रानी चोरों का राजा बघायला गेलो होतो. आज आठवणीच्या पेशींना कितीही साद घातली तरी या सिनेम्यातला एकही सीन आठवत नाही. गाण्यामधे ट्युबलाईट घेऊन नाचतानाचा एक शॉट आहे इतकंच काय ते आठवतय. पण हा सिनेमा बघायचाच म्हणून घरामधे केलेला हट्ट, रडारड मात्र अगदी स्पष्ट आठवते. त्यानंतर हा सिनेमा केबलवर पण लागलेला पाहिला नाही. हा सिनेमा पाहिलेला अजून कुणी अस्तित्वात आहे का तेही माहित नाही. पण तेव्हा आम्ही हट्ट करून हा सिनेमा बघायला गेलो होतो. त्यानंतर सुट्टीला कधीही धारवाडला गेलो की आमचे सर्व नातेवाईक आम्हाला मुद्दाम रूपकाराजा चोरोंकी रानी म्हणून चिडवायचे. धारवाड सोडून रत्नागिरीला आल्यावर मात्र सिनेमा बघणे बर्‍यापैकी बंद झाले.
रत्नागिरीमधे पब्लिकला सिनेमा बघायचे वेड अजिबात नव्हते. आजही नाही. सिनेमा थेटरात जाऊन बघायचा म्हणजे तो सुपरहिट असला पाहिजे. बायकानी थेटरात जाऊन बघायचा सिनेमा म्हणजे माहेरची साडी टाईपच असला पाहिजे. त्यावेळेला इतर रोमिओ पब्लिक थेटरापासून लांब असणार. असले सिनेमा सोडून इतर वेळेला राधाकृष्ण आणि श्रीराम ही दोन थेटर म्हणजे "आपल्यासारख्यानी जायचं ठिकाण आहे का?" त्यामुळे सिनेमा थेटरात बघणं बंद. एक तर अजूनही सिनेमा तिथे देशभरात प्रसिद्ध झाल्यावर एक दोन आठवड्यानंतर लागतो. तोपर्यंत वर्तमानपत्रातल्या रीव्ह्युनी अथवा पायरेटेड सिनेमाच्या कृपेने आम्हाला सिनेमाची स्टोरी कळायची. मग थेटरात जाऊन बघण्यापेक्षा घरीच व्हीडीओ किंवा सीडीवर बघू असा सुज्ञ विचार सर्वजण करत असतात. म्हणून मला शाळकरी वयात सिनेमा हा टीव्ही आणि व्हीडीओच्या माध्यमातून जास्त भेटला. हम आपके है कौन हा सुपरडुपर हिट सिनेमादेखील आम्ही (पायरेटेड) व्हीडीओवरच पाहिला. नंतर जेव्हा थेटरला लागला तेव्हा अख्ख्या कॉलनीतल्या बायका जाऊन हा सिनेमा पाहून आल्या होत्या. जाताना "कस्सं हुइल नी काय हुईल?" हा मंत्र जपत. जणूकाही दंगलग्रस्त भागामधे टेहळणी करायला चालल्या होत्या. व्हीडीओवर मी या सिनेमाची कैक पारायणं केली. माझ्याकडे हम आपके है कौनचे तब्बल ६७ फोटो होते. तेव्हा हे फोटो एक रूपयाला मिळायचे. बरं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे, हा सिनेमा पाहण्याआधीपासूनच सलमान हा माझा आवडता हीरो होता, सध्याही आहे आणि कायमच राहील. उसके जैसे हीरो और कोइ नही होणा... त्यामुळे सलमानचे मी यच्चयावत सर्व सिनेमा पारायणं करून करून पाहिले आहेत. अगदी सूर्यवंशीपासून ते हेल्लो ब्रदर ते एक था टायगरपर्यंत.
शाळेत असताना टीव्हीमुळे बरेच जुने आणि वेगवेगळे सिनेमा बघायला मिळाले. खास करून कृष्णधवल सिनेमा. देव, राज, शम्मी यांची भुरळ त्याच काळातली. त्याच दरम्यान रेडीओच्या माध्यमातून सिनेसंगीताची जादू कळायला लागली. पुढे कॉलेजमधे असताना युवावाणीसाठी काम करत असताना या संगीताने मला पारच वेडावून लावलं. आकाशवाणीने हे संगीतदालन माझ्यासाठी अगदी मनमोकळेपणाने उघडलं. एसडी, रोशन, जयदेव, नौशाद, ओपी, आरडी, रफी, लता, आशा, किशोर, साहीर गुलझार, खय्याम या सर्वानी मला अलिबाबाच्या गुहेत नेऊन सोडलं. अद्याप तिथेच कैद आहे. सुटका व्हावी अशी इच्छादेखील नाही. हे सर्व कृष्णधवल सिनेमा एकदातरी मोठ्या पडद्यावर पहायची इच्छा आहे. रंगीत मुगलेआझम बघताना देवाकडे हेच मागणं मागितलं होतं.
टीनएजचे वारे अंगात भिनलं आणि आमची प्रस्थापित व्यवस्थेविरूद्ध बंडखोरी चालू झाली. अकरावीला कॉलेजमधे लेक्चर चुकवण्याचं थ्रिल अनुभवायचं म्हणून सिनेमा बघायला गेलो. तो सिनेमा होता बॉबी देओल आणि प्रीटी झिंटाचा सोल्जर. त्यानंतर मी आणि आमच्या अजून एक दोन मित्र मैत्रीणीनी दर शुक्रवारी सिनेमा बघायचाच असं व्रत घेऊन सिनेमा बघायला सुरूवात केली. शुक्रवारी सकाळी वर्तमानपत्रामधे नविन सिनेमा लागलाय का त्याची खात्री करायची. मग कॉलेजला गेल्यागेल्या हळूचकन एकमेकाना "आज पिच्चर देखेंगे क्या?" असं विचारायचं. त्यातही आजूबाजूला "घरी जाऊन चहाडी करू शकतील" टाईप पब्लिक असलं की आम्ही कोडवर्डमधे फक्त "पीडीके?" इतकंच विचारायचो. कुठलाही सिनेमा असू दे, आम्ही बघायला जायचोच. अपवाद अर्थात जंगली जवानी टाईप पिक्चर्सचा. असे सिनेमा जास्तकरून गाडीतळवरच्या एका चित्रपटगृहात लागायचे. नुकतंच ते चित्रपटगृह पाडून तिथे मंगल कार्यालय उभं राहिलेलं बघितलं. Proud
आमचं कॉलेज पण या सिनेमाव्रताला अनुकूल होतं. अकरावीला शुक्रवारी आमचं प्रॅक्टिकल नसायचं. सलग संस्कृत आणि इंग्लिशची लेक्चर्स असायची. ती अटेंड केली काय आणि चुकवली काय फारसा फरक पडायचा नाही. त्यामुळे बारा ते तीन हा आमचा फिल्लमटाईम झाला होता. इतरांसाठी सिनेमा बघणे हा टाईमपास असेल, माझ्या दृष्टीने मात्र त्याहून जास्त होतं. एखादं व्यसन जडत होतं. सिनेमाची भाषा समजत होती. त्याचदरम्यान या क्षेत्राबद्दलचं वाचन पण वाढलं होत... कुठेतरी मनाशी आपण याच क्षेत्रात करीअर करावं हे ठरत होतं. त्यावेळेला मी आणि माझा एक मित्र सिनेमामधे इफ देन एल्सचा खेळ पण खेळायचो. असं घडलं असतं तर काय झालं असतं मग पुढे काय केलं असतं इत्यादि वर आमच्या चर्चा दिवसेंदिवस चालायच्या.. म्हणजे समजा, कुछ कुछ होता है मधे काजोलचं लग्न आधीच झालेलं असतं तर... मग स्टोरीमधे सलमानला मरावं लागलं असतं किंवा शाहरूख काजोलशी लग्न करताना रानी मुखर्जी अचानक भूत म्हणून समोर आलीतर... पुढे काय? मास कॉममधे आल्यावर समजलं की अशा चर्चाना ब्रेन स्टॉर्मिंग म्हणतात. आमच्या मजेदार कथाकल्पनांनी आम्ही तसेपण कित्येकांचे मेंदू भरकटवत बसायचो.
अकरावी बारावीमधे लेक्चर्स चुकवून पाहिलेल्या सिनेमाची ही यादी:
आ अब लौट चले, बडे दिलवाला, बादशाह, बिवी नं १, दहक, दाग द फायर, दिल क्या करे, हम आपके दिल मे रहते है, हूतूतू, हम साथ साथ है, हम तुमपे मरते है, जानम समझा करो, कौन, खूबसुरत, मस्त, संघर्ष, सरफरोश, शूल, ये सिलसिला है प्यार का, ताल, वास्तव, होगी प्यार की जीत, लव्ह यु हमेशा, आंटी नं १, अचानक, कुछ् कुछ होता है, बडे मिया छोटे मिया, दुल्हेराजा, गुलाम, प्यार किया तो डरना क्या, जब प्यार किसीसे होता है. असोका, चोरी चोरी चुपके चुपके, जोडी नं१, कसूर, दुष्मन, मेजरसाब आणि....
हम दिल दे चुके सनम!!!! हा सिनेमा बघायला आम्ही जवळ जवळ दहा बारा जण गेलो तेच मुळी मस्ती करायला. कारण थेटरमधे सिनेमा यायच्याआधी आम्ही व्हिडीओवर सिनेमा बघितला होता. माझं सलमानप्रेम तेव्हा अगदी ऐन भरात होतं. (अजूनही आहे. सलमान इज अ सुपरस्टार!) त्यामुळे सिनेमाच्या शेवटी शेवटी जेव्हा सलमान ब्रिजवरून "नंदिनी आय लव्ह यु" हे ओरडत येतो तेव्हा आमच्या ग्रूपमधली सर्व मुलंमुली "इधर है रे. छोड वो चुडैल अ‍ॅशको. इधर बैठी है नंदिनी" ओरडत होती. अख्खं थेटर दणाणून सोडलं होतं. मी पण अगदी तारस्वरामधे आय लव्ह यु सलमान ओरडत होते. आज आठवलं तरी हसू येतं. पण ते दिवसच तसे भारावलेले होते. "यडपटच आहे ती अ‍ॅश. त्या भिक्कार अजयबरोबर रहायचं होतं तर इतक्या लांब यायचं कशाला? तिथे गुजरातमधेच रहायचं ना. गुजरात इटली विमान खर्च तरी वाचला असता." अशा प्रश्नापेक्षा पडद्यावरचा सलमान अतिभावत होता.. त्यानंतर सोमवार ते शनिवार सलग मी हा सिनेमा पाहिला. नंतर डीव्हीडी विकत आणली. तिची तर अनंत पारायणे केली. अजूनही करतच असते. Happy
हम आपके दिल मे रहते है बघत असताना काजोल आणि अनिल कपूरच्या सुहागरातचा सीन चालू होता. तेवढ्यात पिटातल्यापैकी कुणाला तरी साप दिसला. पडद्यावर नव्हे, थेटरात. तो जोरजोरात साप साप साप ओरडत पळाला. तो पळाला म्हणून आजूबाजूचे पळाले. ते पळाले म्हणून अख्खं थेटर पळालं. दिवे लागले. कुणाला साप दिसतोय का हे बघायचा प्रयत्न केला. आता प्रेक्षकापैकी बहुतेकानीच "माझ्या स्वतःच्या डोळ्यानी साप बघितला" हे सांगायची स्पर्धा चालू झाली. मग तो दहा फूटच होता, काळाकाळा नागच होता इत्यादि वार्ता चालू झाल्या. शेवटी अगदी अर्ध्यापाऊण तासानंतर सिनेमा परत चालू झाला. मग बरेच दिवस आम्ही "साप" हा विषय आला की "हम आपके थेटर मे रहते है" अशी टिप्पणी जोडायचो.
प्रीटी झिंटाच्या संघर्षसाठी आम्हाला उशीर झाल्याने तिकीट अगदी पिटातलं मिळालं होतं. पण हा सिनेमा मला त्याच दिवशी बघायचाच होता. तनुजा चंद्रा ही स्त्री सिनेमा डायरेक्ट करतेय ही बाब मला त्यावेळेला खूप अप्रूपाची वाटत होती. त्यामधे आशुतोष राणा साडी नेसून येतो आणि बोंब ठोकतो असा अगदी भयानक सीन आहे.. तेव्हा सोबतची एक मुलगी घाबरून इतक्या जोरात किंचाळली की थेटरचा मॅनेजर ताबडतोब धावत आत आला. फिल्मचं प्रोजेक्शन पण थांबवलं गेलं. त्याला वाटलं कुणी काय केलंच की काय हिला. नंतर भितीदायक पिक्चरच्या वेळेला तिला आम्ही न्यायचोच नाही. उगा ही ओरडायची आणि इतर पब्लिक आम्हाला शिव्या घालणार. मला तर हॉरर सिनेमाला पण कित्येकदा हसू येतं. पण कौन बघताना मला खरोखर भिती वाटली होती. भिती म्हणण्यापेक्षा "पुढे काय?" या प्रश्नने जास्त भंडावून सोडले होते. नखं कुरतडायची जन्मजात सवय आहे म्हणून नाहीतर या सिनेमाला मी नेल बाईटिंग एस्क्पीरीअन्स जरूर म्हटले असते.
त्यानंतर बीसीएला गेल्यावर सिनेमा थेटरमधे पाहण्याचे वेड थोडे कमी झाले कारण तेव्हा सीडी आल्या होत्या. अगदी १०० रूपयांत मिळणार्‍या या सीडीमुळे सिनेमा घरीच हवा तितका बघता येऊ लागला. तरीपण एखादा चांगला सिनेमा रीलीज झाला की आम्ही तो बघायला जातच असू. दिल चाहता है रीलीज झाला होता तेव्हाची गोष्ट. कॉलेजच्या मुलीनी जाऊन बघण्यासारखा सिनेमा आहे याची सर्वाच्या पालकानी खात्री करून मग इतर सर्व मैत्रीणीना परमिशन मिळाली होती. शुक्रवारच्या पहिल्याच शोला आम्ही चौदा मैत्रीणी मिळून गेलो होतो. पाहतो तर काय.. तोबा गर्दी. आणि ती पण सगळीच कॉलेजकुमार आणि कुमारींचीच. सिनेमा चालू व्हायला अर्धापाऊण तास असताना आम्ही थेटरबाहेर उभं राहून गप्पा मारत होतो. बघतो तर काय.. फिनोलेक्स इंजीनीअरिंग कॉलेज, पॉलीटेक्निक, गोजो आणि आमचं कॉलेज. सगळीच ओळखीची मंडळी. मग आमचा तिथल्या तिथे "आपण याला/हिला ओळखलंत का?" हा गेम चालू झाला. "अगं तो बघ, तिकडे येलो शर्टमधे उभा आहे तो. ती ही आहे ना तिचा आधीचा बॉयफ्रेंड" "अय्या, हा चम्या काय करतोय इथे?" "ई.. ही शाळेत असताना किती स्मार्ट होती आता चक्क ढापणी झालीये" "आईशप्पत!! हा चंपट या हिरॉइनबरोबर फिरतोय? काय पाहिलं तिच्यात?" अशा अनेक कमेंट्स चालू होत्या. थेटर म्हणजे कॉलेजकट्टा झाला होता. सिनेमा चालू झाला आणि एक गोष्ट स्पष्ट झाली. ती म्हणजे आपण याआधी असा सिनेमा पाहिला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हा सिनेमा फक्त आणि फक्त आपल्यासाठीच निर्माण झालेला आहे. यातल्या प्रत्येक गोष्टीला त्यादिवशी अख्ख्या थेटरमधून भरभरून दाद मिळत होती. दिल चाहता है आमच्या तरूणाईचं प्रदर्शन होतं. नेहमीच्या ठराविक चौकटी मोडून केलेला विचार होता. साधीसरळ कथा होती. आणि मुख्य म्हणजे यामधे प्रेमकथेपेक्षा जास्त महत्त्व त्या तिघांच्या मैत्रीला होतं. गाणी तर धमाल होतीच. "कोइ कहे कहता रहे" च्या वेळेला तर थेटरचा डिस्कोथेक झाला होता. त्या वयामधे हा सिनेमा आम्हाला अगदी "आमचाच सिनेमा" वाटला. याआधी आणि यानंतर कित्येक सिनेमा थेटरमधे पाहिले पण हा अनुभव केवळ लाजवाब होता. परत कधीही अनुभवायला न मिळणारा. तसा सिनेमा परत बनेल कदाचित. पण तो माहौल परत मिळणे अशक्य.
कॉलेजमधे आम्ही बर्‍याचदा वाढदिवसाच्या पार्टीला म्हणून एखाद्या हॉटेलमधे जाऊन पावभाजी खाणे आणि एखादा सिनेमा दाखवणे यालाच सेलीब्रेशन म्हणायचो. आमच्या ग्रूपमधे मी जशी सलमानवेडी होती तशा अजूनही काही जण होते. शाहरूख, आमिर, अजय देवगण, अक्षय कुमार असे नेहमीचे हीरो होतेच पण एकीला चंद्रचूडसिंग अति आवडायचा. तिच्या वाढदिवसाला तिने आम्हाला ये सिलसिला है प्यार का हा सिनेमा दाखवला होता. (म्हणजे जेव्हा हा सिनेमा रीलीज झाला तेव्हा तिने वाढदिवस साजरा केला.) या कन्यकेने देव आनंदचे एक गाणे बघून "अगदी चंद्रचूडसारखा दिसतो ना?" असे जगप्रसिद्ध उद्गार काढले होते. चंद्रचूडने ऐकले असावेत ते बहुतेक, नंतर "शर्म के मारे" होऊन त्याने सिनेमामधे काम करणंच बंद केलं. तर एकीने "कभी कपूर (तुषार) कभी देशमुख (रितेश)" असं ठरवलं होतं. आम्ही तिला अजूनही के३डी म्हणूनच हाक मारतो. मित्रांपैकी अंजली जठार, निशा कोठारी आणि अँजला झवेरीचे एक एक फॅन होते आमच्याकडे.
कॉलेजमधे असताना मी रत्नागिरी टाईम्समधे फ्रीलान्सिंग करत होते. खर्‍या अर्थाने फ्रीलान्सिंग. एकदम चकटफू काम. तेव्हा अधूनमधून कधीतरी "तेरे नाम" "कोइ मिल गया" सारख्या सिनेमाचं परीक्षण लिहत होते. त्यामुळे "लिहायचं आहे म्हणून सिनेमा बघायला जात आहे." असं बाणेदार उत्तर कित्येकदा आईवडलांना दिलं होतं. Happy
नंतर कॉलेज संपलं आणि पीजीसाठी रत्नागिरी सोडून मुंबईला आले. मुंबईला मास कम्युनिकेशनचा कोर्स करताना प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचीच एक वेगळी नजर मिळाली. सिनेमातरी त्याला अपवाद कसा असेल? या कोर्समधे जागतिक आणि उत्तम सिनेमाची ओळख झाली. कॅसाब्लांका, रीक्वीरीअल ऑफ अ ड्रीम, साऊंड ऑफ म्यूझिक, डॉ. झिवागोसारख्या सिनेमामुळे माझा फिल्लमपणा अधिक गहरा झाला. अर्थात म्हणून तद्दन फालतू कमर्शीअल सिनेमा आवडेनासा झाला असे नाही. उलट मसाला बॉलीवूड मूव्हीज जास्त आवडायला लागल्या असंच मी म्हणेन. रत्नागिरीमधे असताना जितके सिनेमा पाहिले नसतील तितके मुंबईला आल्यावर बघितले.
त्यावर्षी श्वासला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता म्हणून आमच्या मॅडमनी तो सिनेमा आम्हाला थेटरमधे नेऊन दाखवण्याचे ठरले. वर्गामधे आम्ही तीनच मराठी मुली होतो. इतर अ-मराठी मुलीनी याला विरोध केला. पण आमच्या लेक्चरर काही बधल्या नाहीत. बाकीच्या मुली किरकिरत का होइना पण सिनेमाला आल्या (न येऊन सांगतील कुणाला? असाईनमेंट लिहायची होती) त्यातल्या एका मुलीने तर तिकीट काढल्यावर पण "मला सिनेमा समजला नाही तर मी उठून निघून जाईन" अशी धमकी मॅडमना दिली होती. प्रत्यक्षात सिनेमा पूर्ण संपेपर्यंत तर थांबली होतीच शिवाय नंतर सिनेमा संपताना अगदी मुसमुसत पण होती. मी थेटरमधे पाहिलेला हा पहिला मराठी सिनेमा.
याच कोर्समधे सलिम खान, महेश भट्ट, अन्वेषा भट्टाचार्य (बासुदांची मुलगी) यासारख्या दिग्गजांकडून सिनेमा समजावून घेतला. डेव्हिड धवनच्या संकलन स्टुडिओमधे सिनेमा कसा "बनवायचा" याचे धडे घेतले. कोर्सच्या इंटर्नशिपमधे शादी नं.१ या सिनेमासाठी आणि एका टीव्ही सीरीयलसाठी असिस्टंट डिरेक्टरचं काम पण केलं. इतके दिवस सिनेमा नुस्ता एका प्रेक्षकाच्या नजरेने पाहिला होता. आता पहिल्यांदा पलिकडे जाऊन विचारपण केला जात होता. याच क्षेत्रात पाय रोवायचे हे जवळजवळ ठरलंच होतं पण... पण आमचं घोडं परत अडलंच. पत्रकारिता आणि चित्रपट या दोन क्षेत्रामधे पत्रकारितेचा विजय झाला आणि आम्ही चित्रपट क्षेत्राला राम राम ठोकला. (काय तरी वाक्य आहे!!!!)
मी पत्रकार म्हणून काम सुरू केलं ती तारीख होती २६ जुलै २००५. अस्सल मुंबईकर हा दिवस कधीही विसरणार नाही. मला त्यादिवशी संध्याकाळी सातनंतर यायची ड्युटी होती त्यामुळे हॉस्टेलमधल्या काही मुली मिळून आम्ही मैने प्यार क्यु किया हा सिनेमा ईरॉसला तीन ते सहा बघायला गेलो होतो. सिनेमा बघताना बाहेर काय रामायण घडलय याची कल्पनाच नव्हती. सिनेमा बघून बाहेर पडलो तेव्हा भूक लागली म्हणून चर्चगेट स्टेशनला खादंती करायला गेलो. तिथे लोकाची गर्दीच गर्दी उसळलेली. वेस्टर्न लाईन बंद झाली होती, बर्‍याच ठिकाणी पाणी तुंबलं होतं इत्यादि इत्यादि. तिथून व्हीटी स्टेशनला गेलो तर तिथेपण तितकीच गर्दी. सेंट्रल लाईन पण बंद झाली होती. हार्बर लाईन टूकूटूकू चालू होती. इतर मैत्रीणीनी गपगुमान लोकल पकडली आणि डॉकयार्डला निघून गेल्या. अस्मादिक नरिमन पॉइंटला ऑफिसात रवाना. दुसर्‍या दिवशी सकाळपर्यंत तिथेच मुक्काम ठोकून. पण नंतर एकदा डेव्हीड धवन भेटल्यावर त्याना हा किस्सा जरूर सांगितला होता. त्याचबरोबर सलमान खान तुमच्या सिनेमामधे असेल तर पावसाचे गाणे अवश्य ठेवा, पांढर्‍या शर्टमधे भिजलेला सलमान अशक्य... दिसतो अशा आगाऊ सूचना पण करून टाकली होती Proud डील्युजच्या कव्हरेजपेक्षा आम्हाला भिजलेला सलमान अतिप्रिय.
पत्रकारितेमधे आल्यावर चित्रपटक्षेत्राशी एका वेगळ्याच कोनातून परिचय झाला. ज्युनिअर असल्याने आणि मी काम करत असलेलं वर्तमानपत्र टाईम्ससारखं नसल्याने तमाम पेज३ पार्टीज, प्रीमीअर आणि तत्सम गोष्टी कव्हर करायला माझी पिटाळणी व्हायची. बरेचसे सिनेस्टार-टीव्हीस्टार ओळखीचे झाले. ग्लॅमर जगाच्या अनेक खासमखास गॉसिप समजायला लागल्या. एरॉसच्या प्रीव्ह्यु थेटरमधे बसून सिनेमा बघायची आमंत्रणं मिळू लागली. द मास्क २ आणि किंगकाँग (नविन) हे दोनच सिनेमा मी प्रीव्ह्युमधे पाहिले. नंतर पुन्हा कधी जायची हिंमत झाली नाही. Proud आजूबाजूला "चित्रपट समीक्षक" ही जमात बसलेली असताना मी कुठलाच सिनेमा एंजॉय करू शकणार नाही.
ऑफिसमधल्या कलिग्जसोबत तेव्हा आमचा फ्रायडे नाईट मूव्ही नाईट असा सिलसिला चालू झाला होता. एरव्ही आठवड्यातून कधीही सुट्टी असली की सिनेमावारी ठरलेली असायचीच. यादरम्यान किती सिनेमा पाहिले त्याची गणतीच नाही. त्यामधे कळसाध्याय गाठला तो रामगोपाल वर्मा की आगने. हा सिनेमा माझ्या हृदयातल्या अत्यंत सर्द आणि दर्दभर्‍या आठवणीपैकी एक आहे. इतके सिनेमा पाहिलं पण या सिनेमाइतका संताप आजवर कधीच झाला नाही. सिनेमा टाकाऊ होता यात वादच नाही.. पण शोलेच्या नावावर इतका गलथानपणा.. आजवर कितीही बेकार सिनेमा असला तरी अर्ध्यावरून उठून जाऊया असा विचार मनात कधी आला नाही... हा सिनेमा बघताना मात्र "बास हा बाष्कळपणा" असे म्हणण्याची वेळ जरूर आली होती. ज्याचे सिनेमा एकेकाळी श्वास रोखून धरत बघितले त्याने असे सिनेमा बनवावा?
आजा नचलेच्या वेळेला अचानक काहीतरी राडा होऊन चक्क पोलिस संरक्षणामधे सिनेमा बघायला लागला होता. कारण अगदीच क्षुल्लक होतं. या असल्या राड्यामधे निर्मात्याचं अथवा वितरकाचं किती नुकसान झालं असेल याचा विचार कधीच कोण करताना दिसत नाही. आम्ही बघत होतो तो शो संपल्यावर तर थेटरमधून सर्वच शो उतरवले गेले. आजा नचले फार ग्र्रेट होता अशातला भाग नाही पण त्यामधे एक वेगळा प्रयोग मात्र केलेला होता. प्रेक्षकापर्यंत सिनेमा॑ किमान पोचायला तरी हवा होता.
तारे जमीनपर बघताना मला आईची आठवण येऊन रडू आलं होतं. सोबत आलेल्या कलिग्जनी इंटरव्हलमधे डोळे लाल झालेले बघून "क्या हुवा?" हे विचारलं तर लेन्स का कुछ प्रॉब्लेम हो गया असं उगाच सांगितलं होतं, शो सुटला तेव्हा बर्‍याच जणांच्या लेन्सचा प्रॉब्लेम झालेला होता.
स्पायडरमॅन २ मधे स्पायडीचा मित्र मरतानाचा सीन आहे तेव्हा माझा एक मित्र अगदी सॅड आवाजात "ये दोस्ती हम नही तोडेंगे" गायला लागला होता. त्या सीनला ते गाणंपण एकदम "अ‍ॅप्ट" होतं. पूर्ण थेटरभर तेव्हा हशा उसळला होता. त्यानंतर हॉलीवूड बघताना मधेमधे येणारं बॉलीवूड शोधायचा एक छंद लागलेला. बाकी, हल्ली हॉलीवूड सिनेमा हा बॉलीवूडची जास्त कॉपी करतोय असे माझे मत!!! Proud
मुंबई सोडून मंगळूरला आल्यावर सिनेमा बघणे बर्‍यापैकी कमी झाले, उगाच कुठलाही सिनेमा बघायचाच आहे म्हणून उठसूठ असेल तो सिनेमा बघणे बंद झाले. इथे निवडक हिंदी सिनेमा रीलीज होतात त्यामुळे ठराविक सिनेमा बघावे लागतात. आणि मुंबईमधे सिनेमा बघण्याची जी मजा आहे ती मंगळूरात अजिबात नाही. आता तर मंगळूर पण सोडून निघालो. नविन गाव, नविन राज्य, ते पण कुठलं? तर अस्सल सिनेमावेडाचं.. रजनीकांतचं.
सिनेमा बघायचा म्हणजे कसा? शिट्या मारत, टाळ्या पिटत, हीरोला चीअर करत, हीरॉइनच्या कपड्यांवर मेकपवर टीका करत, व्हिलनला शिव्या घालत, गाण्यांवर ठेका धरत, रटाळ विनोदाला हासत, मधेच बटाटेवडे नायतर पॉपकॉर्न चघळत, कोल्ड्रिंक सुर्र सुर्र करत पित, जाहिरातींच्या जिंगल्स गुणगुणत असा बघावा. कारण शेवटी मी एक भारतीय प्रेक्षक आहे. मनोरंजन हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. कुणी कितीही अभिरूचीसंपन्न सिनेमा बनवला तरी त्याची खरी कदर होते ती बॉक्स ऑफिसवरच. कलेक्शनचे आकडे हीच सिनेमाच्या यशाची एकमेव व्याख्या. आणि इथल्या सिनेमाचे मायबाप फक्त आणि फक्त प्रेक्षक.
आणि माझ्यासारख्या प्रेक्षकांच्या जीवावरच तर ही अख्खी इंडस्ट्री उभी आहे.

No comments:

Post a Comment