ही कथा
माहेर मासिकाच्या फेब्रूवारी २०११ अंकात प्रसिद्ध झाली होती. इथे पुनर्प्रकाशित करण्याची परवानगी दिल्याबद्दल माहेर मासिकाचे आभार.
=================================================
रात्रीचे
नऊ वाजले असावेत. खरंतर मला भूक लागली होती पण माझ्या टीममेट्सचे ड्रिंक राऊंड्स
अजून काही संपले नव्हते. हॉटेलमधल्या त्या मंद प्रकाशात मला का कुणास ठाऊक अजूनच
उदास वाटत होत.. तसं उदास व्हायचं काहीच कारण नव्हतं. पण तरीही..
"रिया, चल ना." मी पुन्हा एकदा
रियाला आवाज दिला. कुणाशी तरी फोनवर बोलण्यात ती गुंग झाली होती. हातानेच खूण करून
तिने मला "दोन मिनिटे" असे सांगितले.
मी परत
निवांत बसून राहिले. पुन्हा एकदा काहीतरी आठवल्यासारखं झालं. सतत आपण काहीतरी
आठवतोय, काहीतरी स्मृतीमधून वर यायचा प्रयत्न करतेय पण काय ते नक्की
आठवत नव्हतं.
रियाचं
फोनवर बोलणं अजून चालूच होतं. घड्याळात साडेनऊ वाजले होते. मी पण माझा मोबाईल चेक
केला. मला कुणाचाच फोन किंवा मेसेज आलेला नव्हता. पण सतत मला कोणतरी काहीतरी
सांगणार आहे असं वाटत होतं.
तेवढ्यात
आशिष कसल्यातरी स्टार्टरची प्लेट घेऊन आला. "किती वेळ चालणार रे तुमचं? म्हणून मला तुमच्या टीमसोबत यायला आवडत नाही. माझ्या
रूममेट्स बरोबर अॅट लिस्ट मूव्ही बघायला तरी गेले असते" मी चीडून म्हणाले.
त्याने
तोंडभरून काहीतरी खाल्ल्याने तो काय बोलला ते मला समजलं नाही पण बहुतेक "डीनर
आपटलं की आपण पण मूव्हीलाच जाऊया" असं म्हणाला असावा. आता जेवायला अकरा
वाजल्यावर याला थेटर झाडायला तरी कुणी आत घेइल का? पण नाही, बोलायचं म्हणून काहीतरी बोलायचं.
मी
पुन्हा रियाला हाक् मारली. तिने फोन बंद केला. मी म्हटलं "चल जेवू या..
वाटल्यास नंतर टाईमपास करू"
ती
माझ्याकडे जरा निरखून बघत होती.
"तू आज जरा वेगळी दिसतेयस."
"म्हणजे कशी?" गेले आठ
तास ही माझ्याचबरोबर ऑफिसमधे होती मग आता तिला मी वेगळी कशी आणि काय दिसतेय?
"तू केसाना ऑइल लावलं आहेस का?"
मी सहज
केसातून हात फिरवला, सकाळी तर चांगले शांपू कंडिशन
वापरले होते. मग आता कसे तेलकट झाले? मग अचानक
आठवलं, आज घरातला शांपू संपला म्हणून नुसतेच धुतले ना केस.. पण मग
सकाळी इतके कोरडे कसे वाटत होते केस? आणि
केसाना शांपूचा वास कसा काय येतोय??? तशी मी
अत्यंत टापटीपीची व्यक्ती आहे. मला ग्लॅमरस रहायला भयंकर आवडतं. आत्ताच मी
ऑफिसपार्टीला सुद्धा चांगला डीझायनर ड्रेस, गुचीची
बॅग, कॅटवॉकचे शूज आणि शनेल कोकोचे परफ्युम लावून आलेय. मेकपमधे
तर मी इंडियन ब्रँड वापरतच नाही. शांपूसुद्धा नाही.. मग आता रिया असं का विचारतेय?
काहीतरी
आठवतय... पण नक्की काय ते समजत नाही. मी रियाला काहीच उत्तर दिलं नाही. तिने पण
विषय सोडून दिला.
आम्ही
दोघीजणी डायनिंग एरियामधे आलो. ऑफिसमधले तुरळक लोक इथे दिसत होते. बाकीचे सर्व
अजून बारमधेच. आम्ही प्लेट्स घेऊन बुफे वाढून घ्यायला सुरूवात केली.
"रिया, तुला काय वाटतय?" मी सकाळपासून रियाला विचारेन विचारेन म्हणत असतानाच प्रश्न
आता विचारला. ऑफिसच्या अॅन्युअल मीटिंगमधे प्रमोशन लेटर्स मिळणार होती. रिया एच
आरमधे असल्याने तिला काहीतरी माहित असेलच की. असं विचारणं योग्य नाही हे पटत होतं.
पण तरी मला धीर धरवत नव्हता.
तितक्यात
आम्ही ज्या टेबलवर बसलो होतो, तिथे वेटर सॉफ्ट ड्रिंक्स घेऊन
आला.
"खरं सांगू.. मला नक्की माहित नाही. पण तुझे रेटिंग चांगले
होते. आता बॉस लोकानी काही झोल घातला असेल तर डोंट नो. पण तू डिझर्विंग आहेस हे
नक्की" ते काय मलाही माहित होतंच की. ऑफिसमधे अठरा वीस तास बघून काम करायचे.
गेल्या पाच सहा वर्षात माझ्या नावाचा मी ऑफिसमधे दबदबाच तयार केला होता. मी नक्की
काय काम करायचे हे मी अजून ठरवलं नव्हतं पण काहीतरी महत्त्वाचं काम असणार हे
नक्की. इतक्यात माझ्या ग्लासमधे कोल्ड्रिक ओतताना वेटरने माझ्याकडे एक तुच्छ्
कटाक्ष टाकला.
"डिझर्विंग आणि ही? घरातलं
एक काम धड करता येत नाही. दोन वर्षात कधी मला पूर्ण स्वैपाक करून वाढता आला नाही
आणि म्हणे प्रमोशन हवं. आधी घर सांभाळायला शिका." आणि तो निघून गेला.
माझ्या
हातातला घास तसाच राहिला. रियाचं आमच्या दोघांकडे लक्षच नव्हतं. मला क्षण दोन क्षण
काहीच समजलं नाही. तितक्यात डोक्यात वीज चमकली. हा वेटर माझा नवराच होता!! पण तो
तर वेटरचं काम करत नाही. तसं तो कुठलंच काम धड करत नाही. बायकोला मारहाण करणे
सोडून.
"रिया, मला आता आठवलं. मी इथे मस्तपैकी
जेवत बसलीये, पण बाळाला काहीच भरवलं नाही. झोपलं
असेल गं ते. आता उठल्यावर मला शोधत बसेल. माझा नवरा पण नाहिये घरात."
रियाचा
चेहरा अचानक भूत बघत असल्यासारखा झाला. "बरी आहेस ना तू? अगं, तुझं लग्न कुठे झालय अजून?"
मीच
थबकले. खरंच अजून माझं लग्न कुठे झालय? आणि बाळ?? काय बडबडत होते मी? तो वेटर
काय तरी दुसरंच म्हणाला असेल. मी तर ऑफिसमधे काम करते. एखाद्या झुरळाला झटकावं तसा
मी वेटरचा विचार मनातून काढून टाकला. हां.. आता आठवलं. काल ती कसलीतरी सीरीयल बघत
झोपले होतेना. ते स्वप्नात दिसतय बहुतेक.
रिया
अजूनच संशयाने माझ्याकडे बघत होती. "अगं, मला खूप
भूक लागली ना की असं काहीतरी बडबडायची सवय आहे. पोटात भूक असली की माझा ब्रेन
अजिबात काम करत नाही. ते सर्व जाऊ दे."
"नाही, असं कसं जाऊ दे? हे बघ, मला नक्की सांग. काय होतय तुला? तू बर्याचदा अशी बडबडतेस. तुला काही मानसिक त्रास वगैरे
होतोय का?" रिया माझ्याकडे अगदी सहानुभूतीने बघत होती.
एकदा
वाटलं, सरळ सांगून टाकावं हिला. किती दिवस लपवणार तिच्यापासून. आणि
तिच्याचपासून का. प्रत्येकापासून किती लपवणार? सगळाच
वैताग आहे.
पण काय
सांगायचं? हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिलाच. मला सतत असं वाटत राहतं
की माझं लग्न झालय, मला एक सहा सात महिन्याचं बाळ
आहे (मुलगा की मुलगी ते आत्ता या क्षणी आठवत नाहिये पण काहीतरी आहे हे नक्की), माझा नवरा मला खूप मारतो, असं मला
वाटत असतं. पण हे सांगून तिचा विश्वास बसणार आहे का? काही
झालं तरी ते एच आर मधे काम करते. उद्या माझं मानसिक संतुलन ठिक नाही म्हणून तिने
रिपोर्ट पाठवला तर...
त्याबरोबर
मी एक आवंढा गिळला. अजून एक दोन तीन दिवसात प्रमोशनचे लेटर मिळतील, तेवढ्यात रियाला असलं काहीतरी सांगणं म्हणजे स्वतःच्याच
पायावर मोठ्ठा धोंडा पाडून घेणं. आणि ती तरी माझ्यावर का विश्वास ठेवेल? कोण तरी माझ्यावर विश्वास का ठेवेल?
"तसं काही नाही गं. खूप काम करते ना म्हणून थोडेसे टेन्शन
आल्यासारखे वाटते., आय थिंक आय डीझर्व अ
व्हेकेशन" मी विषय बदलत म्हटलं.
"मला खूप दिवसापासून तुला एक विचारायचं आहे. विचारू?" रिया हातातला पाण्याचा ग्लास खाली ठेवत ठेवत म्हणाली.
"विचार ना!"
"तुला रितेश कसा वाटतो?"
रियाच्या
तोंडून हा प्रश्न ऐकताना माझ्याच हृदयाचा एक ठोका चुकला. रितेश म्हणजे... माझा
डार्लिंग.. तो मला खूप आवडतो.. हे मी अजून कुणालाच सांगितलेले नव्हते. रितेश एच आर
मधेच कामाला आहे. तिथे या रियाने पटवले की काय??? छे.. असे
होणारच नाही. मी आयुष्यात आतापर्यंत कधीच हरलेली नाही. रियाने जर त्याला भुरळ
घातलीच असेल तर त्या भुरळीचं झुरळ केल्याखेरीज मी गप्प राहणार नाही.
वरकरणी
तोंडावर हसू आणत मी विचारले.
"का गं?"
"माहित नाही, पण त्यानेच मला तुला असं
विचारायला सांगितलं."
ओह!!
म्हणजे मला वाटलं तसं नव्हतं तर.... रितेश अजून माझाच होता. मी त्याला माझ्याशिवाय
दुसर्या कुणाचा होऊच देणार नाही.
रिया
माझ्याकडे बघून हसत होती. बहुतेक माझ्या मनातले भाव माझ्या चेहर्यावर उतरले...
"त्याला भेटायचय तुला... आता.. तो बघ तुझ्या पाठच्या टेबलवर
बसलाय. बोलावू त्याला इकडे?"
मी पाठी
वळून बघितलं. रितेश, माझ्या स्वप्नाचा राजा तिथेच
बसला होता. आज त्याच्या मनात काय आहे ते जाणून घ्यायचं. आपल्या मनात काय आहे ते
त्याला बिनदिक्कत सांगायचं, मी माझ्याच मनाशी ठरवलं.
++++++++++++++++++++++++++++++++
दारावरची
बेल टणाटण वाजत होती.
त्या
आवाजाने बाळ रडायला लागलं. ती धडपडत उठली. घड्याळात पाहिलं तर साडेनऊ वाजून गेले
होते. नवरा दरवाजा उघडल्या उघडल्याच ओरडायला लागला.
"आधी तिच्या नरड्यात काहीतरी घाल. घरी आलो नाही तर रडणं
चालू"
तिने
धावत बाळाला उचलून घेतले. "अहो, कितीदा
सांगितलय तुम्हाला दरवाजा हळू वाजवा. इतका वेळ झोपली होती, आता तुम्ही आलात आणि उठली."
बाळाला
मांडीवर घेत तिने बाळाला शांत करत होती तेव्हा. नवर्याने पिशवीतून दारूची बाटली
काढली आणि त्याच्या नेहमीच्या जागी ठेवली, हे तिने
पाहिलं.
"भाजी नाही आणली?" त्याच्या
बाटलीकडे बघत रागानेच विचारले. उत्तर काय असेल ते तिलाही ठाऊकच होते.
"विसरलो." त्याने निर्ढावलेल्या आवाजात सांगितले.
"आता स्वैपाक काय करू?" आज सकाळी
निघताना भाजीसोबतच शांपू आणि फिनाईलची बाटली सांगितली होती, नवरा आणणार नाही माहित असूनही. उद्या सकाळी समोरच्या
दुकानदाराकडून पुन्हा एकदा एक रूपयाचे पाकिट आणून केस धुवून टाकावे लागतील. आज
नुसत्याच पाण्याने केस धुतले तरी अजून तेलकट वाटतच होते.
हे
रोजचंच झालय नवर्याचं. घरामधे महिन्याला किराणा आणायचा तोही लिमिटेड, त्यामधे जास्त किमतीची एकही वस्तू आणायची नाही. बाळाची औषधं
जास्त आणायची नाहीत. भाजी जास्त आणायची नाही. जास्त स्वैपाक बनवायचा नाही. जास्त
जगायचं नाही. जास्त मरायचं नाही. आहे तितकंच आणि तेवढंच रहायचं. या दीड खोल्यामधे
रमलेला तिचा संसार. ती स्वतःशीच चरफडली. कुठले इंपोर्टेड शांपू आणि काय... तिच्या
डोळ्यासमोर रितेशचा चेहरा तरळून गेला. स्वत:शीच ती खुदकन हसली.
"येडाचे झटके आलेत का तुला?" नवर्याने
दरडावून विचारले. ती जरा जरी हसली तरी त्याला अजिब्बात सहन व्हायचे नाही.
"बाळाला खेळवतेय." ती त्याच्याकडे न बघताच म्हणाली.
जोजवून जोजवून बाळाला झोपवलं आणि मग ती उठून स्वैपाकाला लागली. नवरा उशीरा आला की
स्वैपाकाला पण उशीर व्हायचाच. भाजीचा पत्ता नव्हताच, आजपण
बटाटे चिरले आणि फोडणीत घातले, डाळ भाताचा कूकर लावला. कणिक
भिजवत होती तेव्हाच बाळ परत जागं होऊन रडायला लागलं. स्वत:च्या फाटक्या गाऊनला हात
पुसत ती बाहेर आली. बाळाने सगळ्या अंथरूणभर शी करून ठेवली होती.
"आहो, हाक तरी मारायची मला. किमान
उचलून तरी घ्यायची तिला"
"च्यायची, तुझीच अवलाद आहे ती. घाण करून
ठेवती. आधी ते सर्व साफ कर. वास मारतोय घरभर" नवर्याचे आतापर्यंत तीन चार
पेग मारून झाले असावेत हे त्याच्या आवाजावरून तिला समजलं.
काही न
बोलता तिने अंथरूण नेऊन मोरीमधे टाकले. पाण्यात भिजवले. बाळाला स्वच्छ पुसून
घेतले.
"जरा लक्ष ठेवा, आता
पालथं पडून पुढे सरकते ती" नवर्याने ऐकून न ऐकल्यासारखं केलं. ती आतल्या
स्वैपाकघर नामक छोट्याशा खोलीत आली.
काय झालं
असेल्?रितेशला पण ती आवडत असेल का? तिने
आत्ताच बोलायला नको त्याच्याशी. जरा धीर धरायला हवा. किमान प्रमोशनचे लेटर
मिळेपर्यंत तरी. तिने स्वतःशीच ठरवलं.
नवरा
वचावचा करत पोट फुटेस्तोवर गिळला. उरलंसुरलं तिने खाऊन घेतलं. तेव्हा नवरा बहुतेक
डाराडूर झोपला होता. मोरीमधे तिने बाळाचे अंथरूण स्वच्छ धुवून वाळत घातलं. तिचा
गाऊन चप्प भिजून गेला होता. दोरीवरचा दुसरा गाऊन काढून तो अंगात घातला आणि आधीचा
गाऊन पुन्हा धुवून वाळत घातला. सकाळी हा गाऊन सुकेपर्यंत तिला बिन अंघोळीचं रहावं
लागणार होतं.
चुळबूळ
करणार्या बाळाला तिने छातीशी घेतलं. पाच दहा मिनिटात बाळ झोपून गेलं. मग ती
अंथरूणावर पडली तरी तिला झोप लागेना. किती तरीवेळ ती विचार करत पडली होती. काय
मिळालं असेल तिला प्रमोशन? की नुसता पगार वाढला असेल? नुसता पगार वाढला तर काय उपयोग? सोबत्त हुद्दा पण वाढायला नको का? खरंतर नवरा यायच्या आत आपण रियाला काय ते विचारून घ्यायला
हवं होतं. आज केला तसा टाईमपास रोज करून चालणार नाही.
कुशीवर
वळून तिने डोळे मिटले. डोळ्यासमोर तो अंधारलेला बार, तिचे
हसणारे खिदळणारे मित्र मैत्रीण, अत्यंत सुंदर असलेली ती असं
सगळं तरळायला लागलं.जाहेरातीतल्या बायकासारखी ती पण रोज ऑफिसला जायची, पैसे कमवायची. हवे तसे पैसे उधळायची. तिच्या डोळ्यासमोर तिचे
स्वतःचे विश्व पुन्हा चालू झाले.
बाळाच्या
पलिकडे झोपलेला नवरा अजून जागाच होता. त्याने एक दोनदा तिला हाक मारली. पण
तिच्याकडून काहीच उत्तर आलं नाही तसा तो अंथरूणातून उठला. मोरीमधे नळ बारीक ठिबकत
होता, तो बंद केला. तिने दिवा तसाच चालू ठेवला होता तो विझवला.
रात्री बाळ उठलं तर दिसायला हवं म्हणून छोटा झेरो बल्ब चालू केला. बाळाच्या
डोक्यावर हात ठेवला. मागे तीन महिन्यापूर्वी बाळाला उलटी जुलाबाचा त्रास झाला आनी
तेव्हापासून ते बाळ सुकतच चालले होते. आता तर अगदी अशक्त आणि खुरटलेलं दिसायचं
बाळ. किती तरीवेळा त्याने बायकोला दुसर्या डॉक्टरला दाखवू म्हटलं होतं. पण
आताच्याच डॉक्टरचा हातगुण चांगला आहे असं तिचं मत होतं.
त्याने
बायकोकडे एक नजर टाकली. दोन्ही पाय कुशीत घेऊन ती झोपली होती. चेहर्यावर
दिवसभराचा शीण दिसत होता. अस्ताव्यस्त पसरलेले केस. चांगले कमरेच्याखाली लांब होते
तिचे केस. काळेभोर एखाद्या नागबनासारखे दिसायचे ते केस.
तो
अंथरूणावर बसला. हलकेच तिच्या केसांतून हात फिरवत. तिला उठवावं, आपल्या कुशीत घ्यावं असं खूप वाटून गेलं त्याला. अवघी वर्षं
दीडवर्षापूर्वी केवड्याच्या पावलांनी ही त्याच्या आयुष्यात आली. त्याने
इंजीनीअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला. आणि इथे मुंबईमधे ही नोकरी मिळाली. पगार तसा
जास्त नव्हता पण गावातल्या आईवडलाना तेव्हढा पगार म्हणजे कितीतरी वाटला होता. अजून
तीन चार वर्षें नोकरी करून मग लग्न करायचा त्याचा विचार होता. पण आईला आता कधी
एकदा लग्न करेन याचं अशी घाई लागली होती. त्याच्या॑ नकळत त्यानी बाजूच्याच गावातली
मुलगी पसंत करून साखरपुडा पण केला.
मुलगी
दिसायला छान आणि एकदम हुशार. कॉलेजच्या दुसर्या
वर्गात शिकणारी. घरचं सगळं काम येणारी. आईबाबानी स्वतःच्या अनुभवाच्या फूटपट्ट्या
लावून हीच मुलगी त्याच्यासाठी योग्यच आहे हे आपापसात ठरवून टाकलं. अर्थात
तिच्यामधे खोट काढण्यासारखी काहीच गोष्ट नव्हती. पण त्याचं काय?
मुलगा
इंजीनीअर. भरपूर पगार, मुंबईत खोली अशा गुणविशेषानी ती
भुललीच नव्हती. तिला अजून शिकायचं होतं. नोकरी करायची होती, पैसे कमवायचे होते. तिची स्वतःची अशी काही स्वप्ने होती. या
सर्व स्वप्नाचा बळी देत ती त्याच्या आयुष्यात आली. मात्र इथे आली तीच मुळात करपून
गेल्यासारखी. लग्नाआधी हसण्यतून चांदणं सांडायची. त्याच्या घरात आल्यावर मात्र
तिचं हसणं हरवतच गेलं. सुरूवातीला कित्येकदा ती त्याच्यावर चिडायची, तिच्या आयुष्याची वाट लागली असं म्हणायची. पण नंतर ती
निर्जीव प्रेतासारखी वावरायची. सगळी कामं करायची, बाळाचं
सर्व काही करायची पण ती इथे असून मात्र इथे नसल्यासारखी वागायची.
तिला
रिझवण्यासाठी त्याने कितीतरी प्रयत्न केले. पण तिने कधीच दाद दिली नाही. त्याने
आतापर्यंत चुकून एकदाही तिच्यावर हात उचलला नव्हता, पण ती
कित्येकदा त्याला "मारहाण करता ते सहन करतेच ना" हे म्हणायची. खरंतर
त्याला तिला शिकवायचं होतं, त्यासंबंधी चौकशी पण त्याने
करून ठेवली होती. त्याच दरम्यान तिला दिवस गेले आणि सर्वच राहून गेलं. बाळ थोडं
मोठं झालं की मग डिग्रीची फायनल दे असे त्याने तिला सांगितले होते. ती कुत्सितपणे
हसून "आता काय उपयोग त्या डिग्रीचा?" असं
म्हणायची. तिच्यातला विक्षिप्तपणा रोज वाढतोय असं त्याला वाटायचं. पण त्यावर उपाय
काय ते समजत नव्हतं. तिला थोडे दिवस गावी सोडून यावं असं त्याने ठरवलं होतं. पण ती
जायला बिल्कुल तयार नव्हती. कसंही करून तिला परत हसतं खेळतं करायचं हे त्याने
ठरवलं.
विचाराची
साखळी तोडत तो अंथरूणात आडवा पडला. उद्या काहीही करून हिच्यासाठी कायम म्हणत असते
तसला त्या टीव्हीतला शांपू आणायचाच असा त्याने निश्चय केला. फक्त त्या शांपूचं नाव
काय ते तिलाच विचारून घ्यायला पाहिजे.
तितक्यात
बाळ उठलं. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून ती पण जागी झालीच. तसंच झोपेतच तिने बाळाचं
दुपटं बदललं. बाळाला जोजवलं आणि हळूवारपणे झोपवलं.
नवरा
उठून बसला होता. "पाणी देशील?" त्याने
विचारलं.
ती उठून
स्वयंपाकघरात गेली. पाण्याचा पेला आणून दिला. आणि ती आडवी पडली.
"ऐक ना," तो काहीतरी
म्हणायचं म्हणून म्हणाला.
"ऊ?" तिने डोळे बंद ठेवूनच विचारलं.
"ऑफिसमधल्या त्या सावंतानी पुन्हा विचारलं आज मला. दुपारी चार
ते सहा. त्याच्या दोन मुलं शिवाय आजूबाजूची चार पाच अशी मिळून येतील इकडे. सगळे
पाचवी-सातवीचेच आहेत. जमेल का तुला?"
ती जागी
होऊन बसली. नवरा गेले महिनाभर तिला या शिकवणीसाठी विचारत होता. तसं तिला शिकवण्या
घेण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नव्हता. तशी ती शाळेत असताना हुशारच होती. दहावीला तर
बोर्डात आलेली. बारावीला अवघ्या काही मार्कासाठी बोर्डातला नम्बर चुकला.
"नंतर सांगते." तिने कूस वळवून म्हटले.
शिकवण्या
म्हणे. महिन्याला हजारोनी पगार घेणारी मी. काही शेकड्या रूपयासाठी दोन दोन तास घसा
फोडत बसू? हे वाक्य तिच्या ओठांवर आलं होतं. पण तिने ते आवरलं. मागे
एकदा असंच काहीतरी ती बोलली होती आणि नवरा कितीतरी वेळ तिला कायतरी बडबडत होता. तो
काय बोलत होता याच्याकडे तिने लक्ष दिलंच नव्हतं. फक्त आपण नोकरी करतो ही गोष्ट
त्याला आवडत नाही, तेव्हा त्याच्यासमोर याविषयी
कधीच बोलायचे नाही, हे तिने मनोमन ठरवून टाकले
होते.
नवरा
झोपून गेला. तिची झोप मात्र उडाली ती उडालीच. कधीतरी त्याला समजेलच ना? कधीतरी त्याला कुणीतरी सांगेल. मग आपणच का सांगू नये अस
विचार कितीतरी वेळ तिच्या मनात घर करून राहिला होता. मध्यरात्र टळून गेली तेव्हा
कुठे तिचा डोळा लागला.
सकाळी
साडेपाचचा अलार्म झाला तशी ती पुन्हा उठली. बाळ आणि नवरा उठायच्या आत तिने अंघोळ
आटपली. भांडी घासून घेतली आणि नवर्याचा डबा बनवायला लागली. तोपर्यंत नवर्याने
उठून स्वतःचं सगळं आवरलं होतं. तीन तीनदा तिला हाक मारून तो काहीतरी विचारत होता.
पण तिने त्याकडे लक्ष दिलंच नाही. ऐकून न ऐकल्यासारखं केलं. हल्ली त्याचा आवाज
ऐकला तरी तिला संताप यायचा. मनातल्या मनात शिव्याची लाखोली वाहत ती चटचट काम
आवरायला लागली.
बाळ
उठेपर्यंत तिचं दिवसाभराचं सगळं काम करून झालं होतं. बाळाची शू काढून कपडे बदलले.
तिनं त्याला गरम पाण्याने पुसून घेतलं आणि थोडी खिमटी भरवली. सकाळी तिच्या नवरा
बहुतेक चांगल्या मूडमधे असावा कारण त्याने स्वतःहून बाळाला उचलून घेतलं. तोपर्यंत तिने
कचरा फरशी वगैरे करून घेतलं.
"सकाळच्या वेळेला कशाला इतके काम करतेस? जरा विश्रांती घे. दुपारी बाळ झोपलं की कर ना" नवर्याने
तिला म्हटलं. तिला कधी एकदा नवरा घराबाहेर जातोय असं झालं होतं.
तिने
कचरा पिशवीत भरला आणि पिशवी दरवाज्याबाहेर ठेवली. तोंडातून एक शब्द न काढता तिचं
काम चालूच होतं. दहा वाजले तसा नवरा कामावर निघून गेला. जाताना त्याने तिला पुन्हा
एकदा काहीतरी विचारलं किंवा सांगितलं. पण तिचं आता लक्षच नव्हतं.
लहानपणी
तिला तळ्यात मळ्यात हा खेळ फार आवडायचा. एकदा इकडे एकदा तिकडे. कुठेही गेलं तरी
तीच ती. आतापण हाच खेळ. फक्त एके ठिकाणी तिची मर्जी चालायची. एके ठिकाणी नाही.
थोडे दिवस गेले तर दोन्ही ठिकाणी तिचीच मर्जी चालली असती.
दुपट्यावर
खेळणार्या बाळाकडे तिने एकदा बघितलं. बाळाला डॉक्टरानी उलटीसाठी दिलेले ड्रॉप्स
बाळाला उलटी होत नसताना दिले तर ते सलग सहा-सात तास झोपतं हे तिला फारच सोयीचं
झालं होतं. नाहीतर आधी अधेमधे रडणारे बाळ सतत तिचा खेळ मोडायचं. आता तिला कुणाचीच
आडकाठी नव्हती.
अर्थात
थोड्या दिवसानी या औषधापेक्षा दुसरे काहीतरी करून बाळाचा अडथळा तिला दूर करावा लागणार होता. ते कसं करायचं याचाच विचार ती इतका वेळ
करत होती. पण आता बास झाले ते विचार. बास झालं या घरासाठी मरणं. बास झाली या दीड
खोलीतल्या संसाराची वणवण.
आज
प्रमोशन लेटर घ्यायचेच, रितेश(हे नाव तिला फारसं आवडलं
नव्हतं, बदलावं का?" असा
विचार मनात येऊन गेलाच) कायमचा आपल्या आयुष्यात आणायचाच, हे तिनेच मनाशी ठरवलं.
आज
पुन्हा एकदा कुणाची तरी बायको किंवा आई म्हणून न जगता "मी" म्हणून
जगायचं होतं.
आता ती
पुन्हा एकदा स्वतःच्या जगात जायला सिद्ध झाली होती.
(समाप्त)
Each mind has division
ReplyDeleteMakes every provision
Thoughts need revision
At times welcome diversion.
Chhan!
ReplyDelete