Wednesday, 13 November 2013

समुद्रकिनारा (भाग ६)

नेत्राने फ़ाईल पुन्हा एकदा सेव्ह केली. आज तिलापण मनापासून आनंद झाला होता. हे एकमेव काम होतं जे तिच्या मनासारखं झालं होतं. साराने एंटरटेनमेंट बीटमधे तिला हात दिला नव्हता, पण साराच काय अजून पण कुणी पण तिला हात देत नव्हतं. लाईफ़स्टाईल, ट्रॅवल, टीवी, आर्ट वगैरे ग्लॅमरस बीट्स राहू देत पण बीएमसी, रेल्वे, लीगल, एवीएशन बीटवाले सुद्ध तिला उभं करत नव्हते. बिचारी हेल्थवाली रश्मी अधूनमधून तिला सोबत घेऊन जायची, पण नेत्राची त्या सरकारी दवाखान्यामधे कसल्यातरी घाणेरड्या बातम्या गोळा करत फ़िरायची अजिबात इच्छा नसायची. त्यापेक्षा डेस्कवर बसून आलेल्या प्रेस रीलीज एडिट करायचं काम परवडलं. 

गेल्या आठवड्यात चार दिवसांची रजा टाकून ती आणि अभिजीत व्हेकेशनला गेले होते. ऑफ़िसमधे कुणी विचारलं तर ती “गोव्याला गेलो होतो” एवढंच सांगायची, प्रत्यक्षात मात्र भलतीकडेच जाऊन तिने इन्व्हेस्टिगेशन जर्नालिझममधे आपलं कसब दाखवलं होतं. जेवढा आपण विचार केला होता, त्याहून मोठी स्टोरी तिला मिळाली होती. 

परत एकदा सर्व वाचून तिने खात्री केली. एकही चूक राहता कामा नये, तिने स्वत:लाच बजावलं, घड्याळात पाहिलं तर पहाटेचे चार वाजून पस्तीस मिनिटे झाली होती. अजून दोन मिनीटं!! मेलबॉक्स ओपन करून त्यामधे तिने दोनच ओळींचं मेल लिहिलं.. प्लीज फ़ाईन्ड अटॅच्ड फ़ाईल वगैरे... आणि आता टाईप केलेली फ़ाईल अटॅच केली.. घड्याळाने चार सदतीस दाखवल्याबरोबर तिने त्या मेलच्या सेन्ड बटणवर क्लिक केलं. व्हूश्श करून ते मेल ताबडतोब निघून गेलं. अगदी निर्जरामातेंमहाराजांनी तिच्यासाठी मुद्दाम काढून दिलेल्या खास मुहूर्तावर. 

सारा व्ही के, उर्फ़ सरस्वती विश्वनाथ केळकर ही आहे तुमच्या लाईफ़ची खरी कहाणी. लोकांना काय वाट्टेल ते सांगून उल्लू बनवता काय? 

धवन उद्या ऑफ़िसमधे हे मेल उघडून बघेल तेव्हा त्याची पहिली प्रतिक्रिया काय होइल याबद्दल विचार करत नेत्राने पीसी बंद केला. 


शॉट रेडी व्हायला अजून अर्धा तास होता, वीर आणि राजन दोघंही व्हॅनमधे बसून पुढच्या प्रोजेक्टबद्दल बोलत होते. एवढ्यात व्हॅनचा दरवाजा खटखटवला. 
“क्या रे? इतनी जल्दी शॉट रेडी हो गया?” राजनने दरवाजा उघडत विचारलं. बाहेर स्पॉटसोबत राकेश उभा होता. “वीर है क्या? रोहित सर मिलना चाहते है. बाहेर कारमधे वाट बघतायत. वीर येइल का तिकडे?” त्याने विचारलं. 
“इधरही भेज दे रोहित कपूरको” राजन काही बोलायच्या आत वीर लगेच म्हणाला. राकेश अचंब्याने तिथेच उभा राहिला,  त्याच्यासाठी हे बहुधा अनपेक्षित असावं. 
“त्यांना इकडे घेऊन ये. मी बाहेर येणार नाही,” वीरने परत सांगितलं. ते ऐकल्यावर नाईलाजाने गेल्यासारखा राकेश परत गेला. 
“हा रोहित कपूर तुला भेटायला का येतोय?” राजनने तो गेल्या गेल्या विचारलं. “त्या प्रोजेक्टबद्दल तू त्याला नाही सांगितलं होतंस ना?”

“समजेल आपल्याला. गेले दोन तीन महिने फोन वर मीटींग करू या म्हणत होता, मी काहीच उत्तर दिलं नाही म्हणून आज डायरेक्ट सेटवर आलाय बहुतेक.”
“त्या पॉलिटिकल पार्टीच्या रॅलीआधी तू त्याला स्वत:हून फोन केला होतास ना? त्याबद्द्लच काही....” 
“लेट्स सी!” वीर हसत म्हणाला. 

“वीर, आपल्याला आता काही मीडीया प्रॉब्लेम्स नको आहेत. तुझं ते लग्नाची अनाऊन्समेंट वालं आता कुठे पब्लिकच्या डोक्यातून बाहेर पडतंय. आणि आता आपला रीलीज आहे दोन महिन्यामधे. थोडं सबुरीने...”
“रीलॅक्स!” वीर राजनच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला. “तुझा कसलाही त्रास मी वाढवून ठेवत नाही. चिंता करू नकोस.”

एकाच शहरांत, एकाच क्षेत्रात असूनदेखील वीर आणि रोहित क्वचित एकमेकाच्या समोर आलेले असतील. असं सेटवर वगैरे तर पहिल्यांदाच. याआधी वीर जेव्हा कधी रोहितला भेटला तेव्हा रसिका सोबत होती आणि वीर खूप लहान होता. वीरने इण्डस्ट्रीमधे काम करायला सुरूवात केल्यावर तर मुद्दम रोहितला टाळायचाच. ज्या पार्टीला रोहित येणार असेल तिथे वीर जायचा नाही. 

तेवढ्यात व्हॅनचा दरवाजा परत वाजला. बाहेर रोहित कपूर उभा होता. राजनने लगेच प्रोफ़ेशनल लूक धारण केला, मनातून तो रोहित कपूरचा कितीही तिरस्कार करत असला तरीही आता मात्र तोंडभर हसून 
“आईये सर! वेलकम सर!!” म्हणाला. 

रोहित थोड्याशा साशंकतेने तिथे उभा होता. शब्दांमधलं वेलकम त्यांच्या मनामधे नक्कीच नव्हतं. 
“हॅलो वीर!” त्याने हलकेच आवाज दिला. 

वीर काही न बोलता त्याच्याकडे बघत उभा होता. राजनसारखा त्याला त्याचा तिरस्कार लपवायची गरज भासली नाही.. त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होता. वीरकडे बघताच रोहितच्या मनामधे पुन्हा एकदा स्वत:बद्दल नकळत का होइना, घृणा दाटून आली. पंचवीस वर्षापूर्वी जेव्हा रसिका परोपरीने त्याला फोन करून, प्रत्यक्ष भेटून सांगत होती की हे तुझंच आहे, तेव्हा आपला विश्वास का बसला नाही? नाही!! आपला विश्वास होता, पण तरी आपण तो मानला नाही. त्यावेळेला आपण कच खाल्ली. रसिका आपल्याशी खोटं बोलणार नाही हे चांगलंच जाणून होतो, तरीदेखील हे होणारं बाळ आपलं नाहीच असं ठासून सांगितलं. स्वत:ला आणि रसिकाला. या अफ़ेअरबद्दल मीडीयाला फ़ार थोडं माहित होतं. आपलं रसिकावर प्रेम होतं का नाही ते अजून माहित नाही, पण तिच्यासकट तिच्या मुलाची जबाबदारी स्विकारायची आपली हिंमत नव्हती. तिला गर्भपातासाठी पैसे दिले. कुणापुढे काही बोललीस तर याद राख अशी धमकी दिली.. रसिकाचं करीअर तेव्हा कुठे सुरू होत होतं. पण ते सर्व सोडून  एके दिवशी ती नंतर कुठेतरी निघून गेली, तिने लंडनमधल्या डॉक्टरशी लग्न केल्याच्या बातम्या आल्या. नंतर तीनेक वर्षानी ती परत आली. लंडनमधल्या नवर्‍याला सोडून. सोबत तिचा मुलगा होता. मुलाचं बर्थ सर्टिफ़िकेटवर नाव वीर रसिका कपूर होतं. रोहितला आता कसल्याच पुराव्याची गरज राहिली नाही. रसिकाने कुणाशी लग्न केलं नव्हतंच, त्या सर्व अफ़वा होत्या हेही त्याला समजलं. पण फ़ार उशीरा.... 

आणि आता तोच वीर त्याच्यासमोर उभा होता.  त्याच्या चेहर्‍यावरचा राग संताप हे सगळं रोहितने सहन केलं असतं. पण वीरच्या चेहर्‍यावर याहून वेगळं काहीतरी होतं. किळस... आपल्याच जन्मदात्याची किळस. 
व्हॅनच्या त्या  चिमुकल्या जागेत राजन काही न उमजून तिथेच उभा राहिला. वीरच्या प्रत्येक बिझनेस मीटींगला तो हजर असायचाच. पण आता आपण थांबावं की जावं हे त्याला समजत नव्हतं. 
वीरला त्याची चुळबुळ लक्षात आली असावी. “राजन, शॉट रेडी झाला की लगेच निरोप पाठव. माझ्यामुळे शूटला उशीर नको.” वीरचं ते बोलणं बरोबर समजून राजन “बाय रोहित सर!” म्हणत व्हॅनबाहेर पडला.
“राजन, ज्युस आणि थोडी सॅन्डविचेस पाठवून दे माझ्यासाठी. तुम्ही काय घेणार? इथे हार्ड ड्रिंक्स मिळत नाहीत शूटच्या वेळेत.” रोहितला वाक्यामधला तिरकसपणा चांगला लक्षात आला.. तरी शांतपणे “ज्युस चालेल, शुगरफ़्री” एवढंच तो म्हणाला.  

पुढे गेलेला राजन मागे गेला आणि व्हॅनच्या एका कोपर्‍यामधे पडलेली बॅग उचलून घेऊन बाहेर गेला. 
तेवढा वेळ रोहित वीरकडे नुसता बघत राहिला. पंचवीस वर्षानी “कशावरून हे माझंच आहे?” या रसिकाला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर त्याच्यासमोर होतं. निसर्ग कधीकधी खाडकन कानाखाली वाजवतो ती अशी. आपल्यासमोर पंचवीस वर्षापूर्वीचा रोहित कपूरच पुन्हा उभा ठाकल्यासारखं वाटलं त्याला. 

“बोला!” वीर म्हणाला. 

“खूप दिवसापासून तुला भेटायचं होतं. मागे तू स्वत:हून फोन केलास तेव्हापासून. पण नंतर तू माझे कॉल घेइनास... मग मी पण फ़ॉरेन् टूरवर होतो.”

“हं!! त्या दिवशी मी फोन केला होता कारण तुम्हाला अथवा इतर कुणाला नसली तरी मला रसिकाची काळजी आहे. तिचं फ़िल्मी करीअर उद्ध्वस्त झालं तसं पोलिटिकल करीअर मी खराब करू देणार नाही. आणि तुझ्यामुळे तर बिल्कुल नाही” वीर अचानक एकेरीवर आलेला रोहितच्या लक्षात आलं. 

“मी काही तिचं वाईट व्हावं म्हणून त्या रॅलीमधे गेलो नव्हतो, तुला माहित आहे माझे प्रोजेक्ट संपत आलेत, वय दिसतंय चेहर्‍यावर. आता एक तर कॅरेक्टर रोल्स करायचे नाहीतर राजकारणात जायचं” 

“प्लीज... माझ्यासमोर ना खरंच तुझी ऍक्टिंग नकोय. ओळखून आहे मी तुला” वीर संतापाने म्हणाला. “तू काय चीज आहेस ना त्याचा अस्सल नमुना म्हणून मी इथे उभा आहे. दिसतोय ना मी तुला? रसिकाशी तू संबंध ठेवले होतेस, त्यातून मी जन्मलेला. तेव्हा तुझं लग्न झालं होतं. रसिकाला सांगितलंस की घटस्फ़ोट घेशील. त्यानंतर काय घडलं ते मी तुला परत सांगायची गरज नाही... त्यावेळेला रसिका एकटी होती. फ़िल्म्समधे आल्यापासून तिच्या घरच्यांनी संबंधच तोडले तिच्याशी. पण आता ती एकटी नाही. मी आहे तिच्यासोबत. आणि आता तिला तुझ्याक्डून काहीही त्रास होऊ देणार नाही मी.”

वीरच्या या अचानक बोलण्याने रोहित थोडासा बिचकलाच. “वीर.... तू फोनवर मला वेगळंच बोलला होतास?” 
वीर छद्मीपणे हसला. “ओह येस्स... तुझं करीअर संपल्यातच जमा आहे, तरीपण मी मुद्दाम तुला सांगितलं की जर तू या पोलिटिकल पार्टीमधे एंटर करायचा नाद सोडलास तर तुझ्या त्या ड्रीम प्रोजेक्टमधे मी काम करेन. तुझ्या मुलाचा रोल. जस्ट इमॅजिन. फ़ायनान्सर उड्या मारत येतील. ब्रॅन्ड्स तर आपल्या दोघांना साईन करायला आता तयार आहेत. गेस व्हॉट!!! मी खोटं बोललो. तू जिथे उभा आहेस, त्या जागेच्या आसपास जरी आलो तरी मला घाण वाटते, इन फ़ॅक्ट आता तू बाहेर गेलास की मी अंघोळ करेन बहुतेक. मग तुझ्यासोबत एक अख्खा पिक्चर करणं... बाप रे! शक्यच नाही मला” 

“म्हणजे तू मला चक्क फ़सवलंस त्या दिवशी. इतकं गोड बोलून मी तुमचाच मुलगा आहे, तुमच्यासोबत काम करणं हे स्वप्न आहे वगैरे ते सगळं खोटं बोललास. वीर?”

“दिसायला जरी तुझ्यासारखा झालो असतो तरी ऍक्टिंगचे जीन्स आईकडून आलेत माझ्यामधे. त्यामुळे उत्तम अभिनय करू शकतो. गेल्या काही वर्षातले हिट्स सांगतातच म्हणा ते.”

“हे करून काय मिळालं तुला? पोलिटिक्समधे तर मी आतापण एन्ट्री करेन”

“रोहित, स्वत:च्या विश्वातून बाहेर येऊन बघत जा कधीतरी..  इलेक्शनच्या तिकीटांचं डीक्लेअर झालं मागच्या आठवड्यात. रसिका एलेक्शन लढवतेय-  पुण्यामधून. मराठी सीरीयल्समधली तिची लोकप्रियता बघता तिला निवडणूक काहीच जड नाही.  पण तुझं काय? आता जरी तू पार्टीमधे गेलास, तिच्या किंवा दुसर्या कुठल्याही...तरी प्रचारासाठी हात जोडून उभं रहाण्याखेरीज कसलंच काम नाही तुला. स्टेट एलेक्शन तर अजून चार वर्षांनी आहेत. पण बीएमसी पुढल्या वर्षी आहेत. हां, तिथे तिकीट मिळेल कदाचित तुला..” 

रोहित स्वत:शीच हसला. “रोहित, तेरा बेटा तुझसे सवाई निकला,” उघडपणे मात्र तो म्हणाला, “वीर, हे ठिक केलं नाहीस तू. तुझ्या भरवश्यावर मी काम चालू केलं होतं. मेगा प्रोजेक्ट आहे तो. न्युकमर्स फ़ुकट काम करायला तयार आहेत. हॉलीवूडचा ऍक्शनवाला आणतोय मी इथे. तुझं करीअर किती पुढे जाईल याचा विचार कर. आपल्यामधे पर्सनल जे काही आहे ते बाजूला ठेव, आणि फ़क्त आणि फ़क्त कमर्शिअल इंटरेस्टने याचा विचार कर.”

“जसा तू माझा केला होतास? तुझ्या सासर्‍याच्या प्रॉड्क्शन हाऊसचे चार पिक्चर करत होतास, म्हणून तुझ्या बायकोला सोडणं शक्य नव्हतं तुला. तुझ्या कमर्शीअल इंटरेस्टने विचार केलास आणि रसिकाला रस्त्यावर सोडलंस... बरोबर ना?” 

“तुला अजून त्याच एका गोष्टीवर बोलायचं आहे का? हो. मी सोडलं रसिकाला. त्या क्षणाला मी डिव्होर्स घेऊ शकत नव्हतो, आणि तिला ऍबॉर्शन करायला सांगून पण ऐकत नव्हती. परोपरीने विनवलं तिला. पण तिने ऐकलं नाही माझं, कायम स्वत:चंच खरं केलं. पण आज तिने जे काही केलं त्याचा मला कायम अभिमान वाटलाय”

“अभिमान? अभिमान वाटण्यासारखं काय केलं तिने? इंडस्ट्रीच्या  सुपरस्टारचा मुलगा एकटीने वाढवला. तो पण कुमारी माता म्हणून? तेदेखील तुझ्या नजरेसमोर? मला दूर लंडनमधे वगैरे वाढवणं फ़ार सोपं होतं तिला. इथल्यासारखं प्रेशर नव्हतं तिथे. तिथे काम पण मिळत होतं तिला. पण तरी हट्टाने इथेच परत आली. म्हणून तुला तिचा अभिमान वाटतो?” 

“वीर... प्लीज!! तुझा राग, तुझा संताप, तुझा हा तिरस्कार हे सगळं मला मान्य आहे. मी आहे तुझा दोषी. समाजासमोर, जगासमोर नाही तर किमान माझ्यासाठी तरी मी तुला माझं मानायला हवं होतं. रसिकाला त्यावेळेला सोडणं ही माझी फ़ार मोठी चूक होती. अशी चूक जिने मलाच माझ्या नजरेत कायमचं गुन्हेगार बनवलंय. पण कधीतरी थंडपणे तू या गोष्टीचा विचार कर. माझ्या ठिकाणी तू असतास तर काय केलं असतंस? आता या क्षणी मी काय करायला हवंय? नक्की काय केल्याने तुझ्या किंवा रसिकाच्या नजरेमधे मी थोडंतरी स्थान मिळवू शकेन”

“तर मग परत माझ्या अथवा रसिकाच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नका. जेवढा लांब रहाल आमच्यापासून तेवढे उत्तम!”

रोहित क्षीण हसला. “वीर, रसिकाने माझ्यासाठी तिचे दरवाजे कधीच बंद केलेत. मला जेव्हा समजलं की ती परत आली, तू माझा मुलगा आहेस तेव्हापासून तिला कितीवेळा भेटलोय आणि कितीवेळा तिची माफ़ी मागितली, ते मलाच माहिती. पण तिने तर मला कधीच नजरेसमोर उभं केलं नाही. मला ती सजा मान्य आहे, पण मला तिचा अभिमान तुझ्यासाठी वाटतो. तुझ्यासारखा मुलगा तिने एकटीने घडवला, जगातली सगळी सुखं माझ्या घरी असताना मला ते शक्य झालं नाही. मीडीयामधे वाचलंच असशील राहीबद्दल-माझ्या मुलीबद्दल..... पण त्याच्या अगदी उलट तू आहेस, रसिकासारखाच शांत, समंजस आणि मुख्य म्हणजे कामाबद्दल निष्ठा असणारा”

“माझे आदरस्त्कार संपले असतील आणि दुसरं काहीच बोलण्यासारखं नाही तर निघालात तरी चालेल” वीर हातातलं पुस्तक उघडून खुर्चीत बसत म्हणाला. 

रोहित त्याच्या बाजूला येऊन बसला. “कितीही अपमान केलेस तरी मी सहन करणार आहे. मी रोहित कपूर, अख्खी इंडस्ट्री ज्याच्या इशार्‍यांवर डोलते तो आजच काय पण यापुढेही तू काहीही बोललास तर तुझ्याकडून तू काही म्हणालास तरी ऐकून घेणार आहे.
” 
“पण  मला तुम्हाला काही म्हणायचंच नाहीये. तुम्ही आज कितीही ऐकून घेतलंत, कितीही सहन केलंत तरी गेलेले दिवस परत येणार नाहीत. मी पंधरा वर्षाचा होतो, तेव्हा मला माझ्या बापाबद्दल एका तिर्‍हाईत व्यक्तीकडून समजलं, इतके दिवस ज्याचे सिनेमे टाळ्या वाजवत शिट्या वाजवत पाहिले तो माणूस माझा बाप आहे, हे पचायला किती कष्ट झाले असतील ते मला विचारा. आणि आडनिड्या वयातल्या मुलाला या अशा परिस्थितीत सांभाळण्यासाठी रसिकाला किती त्रास झाला असेल ते तिला विचारा. आयुष्यात बाप नाही हे फ़ार लहानपणापासून माहित होतं मला, पण माझ्या बापाने जन्माआधीच मला मारायला पैसे दिले होते, हा फ़ार मोठा धक्का होता माझ्यासाठी. आईबाप काय, जगातल्या प्रत्येक नात्यावरचा विश्वास उडाला होता माझा. जगात खरी नाती दोनच. एक नर आणि मादी!! तुमच्यामुळे हे सत्य मला समजलं” वीर भडाभडा बोलत होता, किती दिवसापासूनची साचलेली मळमळ बाहेर टाकत. बोलता बोलता तो थांबला. आयुष्याच्या त्या वळणावर जर सारा भेटली नसती तर!! तर काय झालो असतो आपण? विचारानेच त्याच्या अंगावर शहारा आला. समोर रोहित कपूर अपराधी चेहरा घेऊन उभा होता. पुन्हा एकदा वीरच्या नसानसांतून तिरस्कार सरसरला. “तुमच्या मुली जेव्हा वाढदिवसाला फ़ॉरीनच्या गाड्या उडवत होत्या, त्यांना घेऊन जेव्हा तू जग भटकत होतास तेव्हा मी सेकंड क्लास लोकलने कॉलेजला जात होतो, कॉलेजनंतर कुणाकुणाकडे तरी एडी म्हणून काम करत होतो.”

“तू फ़ार कष्ट घेतलेस, मेहनत घेतलीस हे माहित आहे मला” रोहित त्याच्या खांद्यावर हात ठेवत सावकाश म्हणाला. 

“त्या मेहनतीबद्दल माझी तक्रार नाही. किंबहुना, मी आज जे काही आहे ते माझ्या या मेहनतीमुळे आणि रसिकाने दिलेल्या संस्कारांमुळेच. पण म्हणून तुम्ही जे काही वागलात ते मी विसरू शकत नाही. बाप असून अनाथ म्हनून वाढणं. नंतर सतत... नंतर काय आजही, बास्टर्ड म्हणत जगणं... आता मोठा स्टार झालो... कुणी तोंडावर बोलत नाही, पण तरी नजरेत असतंच कायम ते. ते सगळं सहन करण.... फ़ार कठिण आहे. तुम्हाला त्याची कधीच कल्पना येणार नाही!”

रोहितने वीरला जवळ घेतलं. “वीर, आय ऍम सॉरी. तुझ्यावर खूप अन्याय केलाय मी. तुला मी माझं नाव दिलं नाही, प्रेम दिलं नाही. आता मला माझी ही चूक निस्तारू दे. मी जगासमोर कबूल करेन, की तू माझा आहेस. मला फ़क्त एक संधी दे, तुझ्या आयुष्याचा छोटासा भाग होण्याची.” 

वीर उठून उभा राहिला. “ते य जन्मांत तरी शक्य नाही. मी काय वाट्टेल ते करेन, पण रसिकाला दु:ख होइल असं कधीच वागणार नाहीआणि तुम्ही माझ्यापेक्षा जास्त तिचे गुन्हेगार आहात, माझ्यापेक्षा जास्त अन्याय तिच्यावर झालाय, पण जरी तिने माफ़ केलं तरीही….”

एवढ्यात दरवाज्यावर टकटक झाली. 

“कम इन” वीर म्हणाला. राजन आला होता. “वीर, शॉट रेडी आहे. येतोस की थांबायला सांगू?”

“नको. आलोच मी पण. टच अप साठी लेनीला बोलावून घे आधी. नाईस मीटींग यु.” वीरने औपचारिकपणे रोहितसोबत हात मिळवला. रोहितचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसेना, इतका वेळ भावनेच्या वेगामधे अनावर होत बोलणारा वीर आता अचानक व्यावसायिक बनला होता. मग इतका वेळ वीर अभिनय करत होता की तो आता करतोय? 

“तुला भेटून मला तर फ़ार आनंद झाला वीर. तुझी प्रगती अशीच होत राहू देत. निघतो मी आता. कधीही काहीही वाटलं तर मला बिनधास्त येऊन भेट. हा प्रोजेक्ट शक्य नाही झाला तरी भविष्यात कधीतरी आपण काम करूच एकत्र.” रोहितदेखील तितक्याच औपचारिकपणे म्हणाला. 


तो व्हॅनमधून बाहेर पडताना वीरने हाक मारली. रोहित मागे फ़िरल्यावर वीर म्हणाला. “मिस्टर कपूर,  तुम्हाला एक बातमी द्यायची होती. खरंतर तुम्हाला रीतसर निमंत्रण नंतर येइलच. पण तरी आताच सांगावंसं वाटलं म्हणून..”

“कशाबद्दल?” 

“मी लग्न करतोय, येत्या महिन्याभरामधे.” हे म्हणताना तो रोहितकडे न बघता व्हॅनच्या कोपर्‍यात का बघत होता ते मात्र रोहितला समजलं नाही. पण तरी ती बातमी ऐकून त्याला हायसं वाटलं. वीरचं एका नॉन फ़िल्मी मुलीबरोबर अफ़ेअर आहे, एवढंच त्याला माहित होतं. मध्यंतरी तो एका तमिळ मुलीशी लग्न करणार असल्याचंही त्याला माहित होतंच. 

“अभिनंदन” रोहित मनापासून म्हणाला आणि त्याने वीरला मिठी मारली. 

“इतके दिवस कुणालाच माहित नाही पण आता तिचं नाव तरी सांग मला. साऊथ इंडस्ट्रीमधली आहे ना ती?” 
“नाही, इथलीच आहे, पण तुम्ही ओळखता तिला. इन फ़ॅक्ट, आज किंवा उद्या तुम्ही भेटणार आहात तिला. तिच्या मागे तुमचा राकेश तिला गंगाजमना म्हणतो.” 

“म्हणजे, ती जर्नालिस्ट? सारा!!! साराच ना?” 

“बरोबर, माझं तिच्यावर खूप प्रेम आहे आणि लवकरच मी तिच्यासोबत माझ्या आयुष्याची गाठ बांधणार आहे. इन्व्हिटेशन पाठवेनच मी तुम्हाला” वीर हसत आणि जरा जास्तच मोठ्या आवाजात म्हणाला. बोलताना त्याची एक नजर त्या व्हॅनच्या कोपर्‍यात होतीच. 

रोहित स्वत:च्या कारमधे बसल्यावर देखील वीरने त्याच्या लग्नाविषयी अचानक का सांगितलं आणि सांगताना तो इतका खुशीत का होता याबद्दलच विचार करत होता. एकंदरीत वीरच्या भेटीमधल्या अनेक अविश्वसनीय गोष्टींपैकी हा भाग त्याला अधिक कोड्यात टाकणारा वाटत होता.  आपला प्रोजेक्ट वीरने करायला नकार दिला याहीपेक्षा त्याला वीरच्या लग्नाचंच त्याला जास्त कौतुक वाटत होतं. 

“डोन्ट वरी सर, आप कोशीश करेंगे तो मान जायेगा एक दिन! बंदा अच्छा है दिलका” राकेश म्हणाला, “और खून कभीभी खूनको पहचानता है” राकेश तिथे नसला तरी एकंदर रोहित आणि वीरच्या दिलजमाईची मीटींग चांगली गेली असावी याचा त्याला अंदाज आला होता. 

“वो सब ठिक है, राकेश! पण उद्या माझा इन्टरव्ह्यु कुणासोबत शेड्युल्ड आहे का?”

“येस्स. सारा व्ही के. अपनी गंगाजमना सर. उसका जैसा चाहिये वैसा ऍंगल नही दिया तो मेरेको तो रूलाके रख देगी. कल उसको हम वो प्रोड्युसर के शाणपट्टीका ऍन्गल देनेवाले है. क्यु सर?”

“आज रात्री त्या ज्वेलरी डीझायनर... काय नाव आहे त्याचं... राजवानला बोलावून घे. अर्जंट काम आहे म्हणून सांग”

“ओके सर!” 

“सारा आल्यावर तिला गिफ़्ट द्यायचं आहे. काहीतरी चांगलं आणि युनिक!” रोहित स्वत:शीच बोलत असल्यासारखा म्हणाला. 

नक्की काय चाललंय ते काही न समजून राकेश गप्प बसून राहिला.  


सारा लॅपटॉपवर ग्रॅन्ड थेफ़्ट ऑटो खेळत होती. दरवाजा उघडल्याचा आवाज आला तसं साराने मान वर करून पाहिलं. वीर आला होता. 

“हाय..” त्याने जवळ येऊन तिचा कीस घेतला. “आज लवकर आलीस.”

“हो, तुला मेसेज केला होता की मी घरी आले म्हणून. ”

“पाहिला नाही... सॉरी! मी शॉवर घेऊन येतो. आणि ते गेम्स खेळताना ढापणं लावत जा, नंबर वाढवायचा आहे का?”

“डिनर करणार आहेस का? गरम करू?” वीरच्या ओरडण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत तिने विचारलं. 

“नको. शूटवर झालंय.”

साराचा मोबाईल वाजला. देशमुख सरांचा मेसेज “उद्या सकाळी दहा वाजता ऑफ़िसला ये. डेस्कवर येऊ नकोस. ऍडमिन डीपार्टमेंटला ये” या मेसेजचा अर्थच तिला कितीवेळ समजेना. आपलं ड्युटी टायमिंग दुपारी तीनचं असताना दहा वाजता कशाला बोलावलं असेल? ते पण ऍडमिन डीपार्ट्मेंटला? काही मोठी स्टोरी वगैरे असती तर सरांनी फोन करून सांगितलं असतं. इतक्या रात्री कशाला मेसेज केला असेल? आता सरांना फोन करून विचारावं का? रात्रीचे बारा वाजून गेलेत म्हणून ती गप्प राहिली. 

“आजचा दिवस फ़ार इंटरेस्टींग होता” वीर तिच्या बाजूला येऊन बसत म्हणाला, “ठेव तो मोबाईल आणि मी काय गंमत सांगतो ते ऐक.”  

“सांग! कारण, आज माझा दिवस एकदम रूटिन होता. बोरिंग!!” तिने मोबाईल बाजूला ठेवला आणि त्याच्या कुशीत शिरली. 

“आज मला भेटायला साक्षात सुपरस्टार रोहित कपूर आला होता. ते पण माझ्या सेटवर!” वीर म्हणाला. 

वीर जे म्हणत होता त्यावर तिचा विश्वासच बसेना, पण रोहित कपूर वीरला भेटला याहीपेक्ष जास्त आश्चर्य वाटलं ते वीर जितक्या सहजपणे ही गोष्ट सांगत होता त्याचं. या आधी रोहित कपूरचं नाव घेतलं तरी वीरचा संताप खवळायचा. 

“काय झालं मग? ते मागे एका प्रोजेक्टसंदर्भात बोलत होतात, त्यासाठीच का?” 

“ते तर होतंच. ऍक्चुअली मी मागे त्याला खोटंच सांगितलं होतं, मी तुझ्यासोबत प्रोजेक्ट चालू करेन, तू फ़ायनान्स आणि क्रू ची तयारी कर. म्हणून तर त्याने त्या दिवशी इलेक्शनला आणि  रॅलीमधे यायला नकार दिला. त्याला वाटलं हा इतका बडा प्रोजेक्ट करायचा तर एलेक्शनचं झंझट नको... पण पार यडा बनला आज तो..”

“मग काय झालं? सविस्तर सांग..”

“का? तू बातमी बनवून छापणार आहेस?”

“काहीही बडबडू नकोस. पण तुला हवं असेल तर छापेन. बातमीमधे दम आहे” ती हसस्त म्हणाली. 

“मग सांगू कशाला? तूच बघ ना”. 

“म्हणजे?”

“रोहित कपूर मला व्हॅनिटीमधे भेटायला आला होता, तेव्हा मी राजनला ज्युस आणि सॅन्डविच आणायला सांगितलं होतं.” वीर मिश्किलपणे हसत म्हणाला. 

“वीर?” सारा जवळ जवळ ओरडलीच. “तू तुझी आणि रोहित कपूरची भेट कॅमेर्‍यामधे रेकॉर्ड केलीस?” 
“हो! ही टेप फ़ार डेंजर आहे. यामधे रोहित कपूरने सरळ सरळ म्हटलंय की तो माझा बाप आहे. आणि माझ्या जन्माच्या आधी तो त्याच्या बायकोला डिवोर्स द्यायचा विचार करत होता.” वीर तिच्या हातात छोटी व्हीडीओ टेप देत म्हणाला, “ही टेप तुला माझ्याकडून गिफ़्ट. सध्यातरी ही एकच कॉपी आहे. पण नंतर मला दुसरी कॉपी बनवून दे”


“वीर, डू यु रीअलाईझ तू माझ्या हातात एक अतिब्रेकिंग न्युज देतोयस? चुकूनपण ही टेप दुसर्या एखाद्या मीडीयावाल्याचा हातात पडली, तर काय गहजब उडेल माहित आहे?”

“पूर्ण कल्पना आहे. पण ही टेप एकदा बघ आणि तूच मला सांग, मी जे विचारलंय ते बरोबर आहे की नाही?”
“वीर, नाही!” सारा निर्धाराने म्हणाली. “मी ही टेप बघणार नाही. तू जरी माझा बॉयफ़्रेंड असलास तरी हे मोमेंट्स तुझ्यासाठी खूप प्रायव्हेट आहेत, ते मी शेअर करावेत असं मला वाटत नाही.”

“कमॉन सारा, तुझ्यापासून मी कधी काय लपवलंय? माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट तुला माहित आहे.”
“हो. पण जेव्हा नात्यांचे संदर्भ बदलतील तेव्हा, आज तू आणि मी एकत्र आहोत, उद्या परत आपल्या नात्याला काही झालं, आपण वेगळे झालो” वीर मधेच काही बोलणार तेव्हा साराने त्याच्या तोंडावर हात ठेवला, “ऐकून घे, समज तसं झालं आणि मी बदला म्हणून तुझा राग म्हणून किंवा अजून कसल्याही कारणाने ही टेप पब्लिक केली तर?”

“तसं काहीही होणार नाही, याची मी पूर्ण काळजी घेईनच.” वीर गंभीरपणे म्हणाली. “सारा, प्लीज!! तू एकदा ही टेप बघ, आणि मग माझ्याशी या विषयावर बोल. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि माझी सारा इतकी तकलादू आणि पोकळ नाही, हे मला चांगलंच माहित आहे.”

“ठिक आहे. जर तू म्हणत असशील तर मी उद्या बघेन.”

“नाही... आत्ता ताबडतोब”

“सगळं ईक्विपमेंट जोडत बसावं लागेल.”

“पाच मिनिटं लागतील त्याला..”

सारा सोफ़्यावरून नाईलाजाने उठत म्हणाली. “तू म्हणजे ना वैताग आहेस” आत वीरच्या स्टडी-रूममधे जाऊन तिने त्याचा पीसी ऑन केला. 

“पासवर्ड काये?” तिने हाक मारून मुद्दाम विचारलं. वीरचं उत्तर आल्यावर हसत “हे इतकं डबलमीनींग तुला सुचतं कसं?” म्हणत तिने काम चालू केलं. 

“वीर, तू बाहेर काय करतोस?” दोनेक मिनिटांनी तिचा आवाज आला. 

“आलोच, राजनला मेसेज करून उद्याचं शेड्युल कन्फ़र्म करतो. तू बघ, फोनवर वेळ पण लागेल मला कदाचित, थोडं स्क्रिप्ट डिस्कस करायचंय,” म्हणत वीर उठून बाल्कनीमधे गेला आणि त्याने दरवाजा ओढून घेतला.. साराला ती टेप कन्व्हर्ट करून पूर्ण बघायला तिला किमान अर्धापाऊण तास लागला असता. किंवा त्याहून जास्त!!

साराने एक दोनदा त्याला हाक मारली तेव्हा त्याने फोनवर बिझी असल्याचं सांगितलं होतं. बरोबर तासाभराने साराने बाल्कनीचा दरवाजा उघडला. तिच्या हातात ती टेप होती. 

“या टेपच्या शेवटी तू शेवटी जे काय म्हणालास ते खरं होतं?” तिच्या आवाजामधे आनंद, आश्चर्य, अविश्वास सगळंच होतं. 

“खोटं कशाला बोलू?” तो हसत म्हणाला. 

“वीर, तू म्हणतोस की आपण लग्न करू या... लग्न... लाईक  पब्लिकमधे!! सगळ्यांसमोर. कारण मी मागे पण तुला सांगितलं होतं की हे गुपचुप लग्न वगैरे मी करणार नाही, त्यापेक्षा हे असं एकत्र राहणं परवडलं.”

“मी माझ्या आयुष्यामधली कुठलीही गोष्ट ज्याला कधीच सांगणार नाही, त्याला आज ही बातमी सांगितली. मग अजून दुसरं पब्लिक काय चीज? फ़क्त तुझा होकार आहे की नाही ते सांग.”

“वीर, यु आर अनबीलीव्हेबल!!! ऑफ़ कोर्स, माझा होकार आहे.... कसलं विचित्र तिरकं डोकं आहे तुझं. हे असं कुणी कुणाला तरी लग्नासाठी विचारतं का रे?” हसत सारा वीरच्या मिठीत शिरली. 

(क्रमश:) 


No comments:

Post a Comment