Thursday, 28 November 2013

समुद्रकिनारा (भाग ७)

“पन्नास,” वीर पुन्हा ठाम्पणे एकदा म्हणाला, “पन्नासच्या वर एकही माणूस चालणार नाही”
राजन त्याच्यासमोर डोक्याला हात लावून बसला होता. “अरे, कसं शक्य आहे? आपला रीलीज आहे पुढच्या महिन्यांत, त्यासाठी हा ईव्हेंट परफ़ेक्ट होइल. शिवाय आधीचे प्रोड्युसर, दिग्दर्शक, कास्ट, क्रू आणी तुझा स्टाफ़, रसिकामॅमच्या सर्कलमधले लोक, शिवाय साराच्या घरचे, आय मीन गावाकडून तिचे कुणी नातेवाईक, तिचे कलीग्ज...”
“तिच्या साईडने फ़क्त तिचे तीन चार कलीग्ज आणि सुधीर देशमुख येतील. कन्यादान वगैरे भानगड पण तेच करणार आहेत. रसिकाकडून कुणी येणार नाही. ऑलरेडी सांगितलंय तिला, त्यामुळे टोटल पन्नास माणसं झाली पाहिजेत, जास्त नको.” वीर ट्रेडमिलवर धावत म्हणाला.
“प्लीज हट्ट करू नकोस. तुला हवं तर लग्नाच्या विधीसाठी घरचीच माणसं थांबू देत, पण नंतर एखादी पार्टी तरी....”
“राजन, मी तुला एकदा सांगितलं ना? पार्टी वगैरे काही भानगड नको. गेस्ट लिस्ट तू बनव. नाहीतर मी बनवेन, पण मला जास्त गर्दी नको. लग्न हा माझा प्रायव्हेट मामला आहे. त्यामधे प्रोफ़ेशनसंबंधी लोक आले नाही तरी चालेल.”
“आणि मीडीयाचं काय?”
“मीडीयाला नो एन्ट्री. एकपण मीडीयावाला व्हेन्युवर दिसता कामा नये”
राजन हसला, “आणि तू लग्न कुणाशी करणार?”
“काहीतरी जोक करू नकोस” वीर म्हणाला तरीदेखील तो हसलाच. “पण सारासमोर ही लाईन जरूर ऐकव. मस्त वैतागेल ती.”
“वीर, अजून एक महत्त्वाचं......” राजन अचानक गंभीरपणे म्हणाला.
“नाही. आपण रोहित कपूरला इन्व्हाईट करणार नाही,” राजनने काही विचारायच्या आधी तो म्हणाला.
“ते मलाही माहित आहे, पण आता माझा प्रश्न वेगळा आहे. काल तू रोहित कपूरची मीटींग रेकॉर्ड केलीस त्याची ओरिजिनल टेप......”
“डोन्ट वरी.. साराजवळ आहे.”
“काय?? साराजवळ?? वीर शुद्धीत आहेस ना तू?” राजन ओरडलाच.
“त्यात एवढं ओरडण्यासारखं काय आहे?” वीर हळू आवाजात म्हणाला.
“वीर, ती ओरिजिनल टेप आहे, कॉपी दिली अस्तीस तर ठिक.. पण ओरिजिनल टेप? उद्या ती कुणाच्या हाती पडली तर?? साराने कुणाला दिली तर?? साराकडून कुणी चोरली तर?”
वीर हसला, “राजन, तुला काय वाटतं रे? मी इतका भोळाभाबडा दिसतो तसाच डोक्याने पण आहे की काय? त्या टेपच्या शेवटी मी मुद्दाम रोहित कपूरसमोर साराशी लग्न करण्याबद्दल बोलून ठेवलंय. इन फ़ॅक्ट, साराला लग्नासाठी त्या टेपमधून विचारलंय मी काल.”
“याला कुठल्या भाषेत रोमॅन्टिकपणा म्हणतात?” राजन अविश्वासाने म्हणाला.
“ते रोमॅन्टिकपणा वगैरे ठिक आहे, पण समजा उद्या साराने ही टेप पब्लिक करायचीच म्हटली तर तिला जशी आहे तशी पब्लिक करता येणार नाही. तिला लास्ट पोर्शन एडिट करावा लागेल. आणि एडिटेड टेपची क्रेडीबीलीटी कुणीही कधीही धोक्यात आणू शकतोच की.”
“हे ठिक आहे, पण तरी तू टेप सारालाच का दिलीस?”
“कारण, मला तिला दाखवायचं आहे की माझा तिच्यावर किती विश्वास आहे. सिम्पल.” वीर शांतपणे म्हणाला, “ जेव्हा कधी ही टेप ती बघेल तेव्हा तेव्हा तिला जाणवत राहिल की मी तिच्यावर किती मोठा विश्वास टाकलाय, दुसरं काही नाही तर त्या विश्वासासाठी ती माझ्या विश्वास्घात कधीच करणार नाही. राजन, साहिल परत आलाय! त्याच्या आणि तिच्या नात्यामधे अजून काही नवीन होण्याआधी मी साराशी लग्न करणार आहे, आणि त्यासाठीच मी एवढ्या लवकर इतका मोठा निर्णय घेतलाय... मला आता मागच्या वेळेसारखं काही भांडणं वादावादी व्हायला नको. साराला त्यासाठी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवायलाच हवाय, त्या धनुयारिणीच्या लफ़ड्यापासून तिला अजून माझ्यावर आधीइतका विश्वास नाही.”
“पण साहिलचा फ़क्त एकदा फोन आला होता ना तिला? आणि तो इकडे आलाय कुठे?”
“नाही, तो इथे मुंबईतच आहे. साताठ दिवसांपूर्वी ती भेटली पण होती त्याला. रोजचे फोन तर चालूच आहेत. आय कान्ट बीलीव्ह, पण तो आता परत का आला त्याचं एकच कारण असू शकतं.”
“वीर...” राजन भितीने म्हणाला, “यू मीन टू से?”
“येस्स.... मलापण तेच वाटतंय. पण अजून नक्की माहिती समजली नाही मला.”
“वीर, तू परत एकदा तिच्या मागे कुणालातरी ठेवलंयस का? तुमचं आधीचं भांडण आणी त्यानंतरचा ब्रेकप यामुळेच झालं होतं ना? आणि आता तू हे.... मला वाटतं तू पुन्हा एकदा या सर्वांचा विचार करावास?”
“काय विचार करणार तो करून झालाय, आता विचार पुरे. कारण, काहीही झालं तरी मी साराला माझ्याशिवाय दुसर्‍या कुणासोबत इमॅजिनसुद्धा करू शकत नाही. साहिल.... मरत पण नाही साला, खरं तर असं बोलायला नको हे मलाही समजतं पण काय करू?” वीर संतापाने म्हणाला, “काय मिळतं त्याला माझ्या आयुष्यामधे माती कालवून? मागच्या वेळेला साराला एकटा सोडून गेला होता तसाच कायमचा गेला असतातर? दर वेळेला परत येतो आणि माझ्या लाईफ़मधे प्रॉब्लेम करून जातो. पण यावेळेला नाही... राजन! आणि आज ना उद्या सारा मला खरं काय ते सांगेलच. कधीच खोटं बोलत नाही ती... पण खरं सांगू? मलाच भिती वाटते... सारा जर माझ्या आयुष्यातून गेली तर...माझं काय होइल?” बोलता बोलता अचानक वीर थांबला, “असो. आज संध्याकाळपर्यंत गेस्ट लिस्ट बनवून दे. व्हेन्युसाठी प्लीज मुंबईच्या बाहेर ठिकाण बघ. पुणे किंवा लोणावळा वगैरे. त्याहून दूर शक्य असेल तरी चालेल. रसिकाची ती मैत्रीण आहे ना, तिला विचारून घे, इव्हेंट मॅनेजमेंट करते ती.”वीर विषय बदलत म्हणाला.
“आणि बाकी सगळी तयारी?”
“अजून काय तयारी राजन? ते फ़ूड, ड्रिंक्स, थीम्स, डेकोरेशन वगैरे सगळं तूच बघ. मला त्यात काही समजत नाही. ज्वेलरी वगैरे रसिका बघेल.”
“ठिक आहे, आणि वीर तुला कितीही प्रायव्हेट लग्न करायचं असलं तरी मला तीन-चार मीडीया चान्स दे. तुझ्याच फ़िल्म्साठी मदत होइल,”
“ओके! तू काय माझ्या लग्नाला मीडीया सर्कस बनवल्याखेरीज थांबणार नाहीस, पण पन्नास... पन्नासच्या वर एक माणूस नको.” वीर हसत म्हणाला.
======================================================================

नेत्रा थोडीशी नाराज होती, काल पहाटे मेल पाठवल्यावर दिवसभर तिने धवनच्या फोनची अथवा मेसेजची आतुरतेने वाट पाहिली होती. पण काल त्याच्याकडून काहीच उत्तर आलं नाही. उलट संध्याकाळी घरी निघताना देशमुख सरांनी तिला बोलावून “तुझं कामात लक्ष नाही असं एच आरचं म्हणणं आहे. त्यांनी उद्या सकाळी अकरा वाजता तुला बोलावलंय. ऍडमिन डीपार्टमेंटला जाऊन भेट” असं तुटकपणे सांगितलं होतं.
“कामात लक्ष नाही. मी केलेली स्टोरी धवनने नीट वाचली असती, तर एव्हाना प्रमोशन दिलं असतं मला,” मनातल्या मनात ती पुन्हा एकदा चरफ़डली.
आज सकाळी दहा वाजता ऑफ़िसमधे येताना ती तोच विचार करत होती. सरस्वती केळकर ते सारा व्ही के असा एक वादळी प्रवास. घरांतून पळून गेलेली, महिलाश्रमात राहून नादारीवर शिकणारी सरस्वती, अठरा वर्षं झाल्यावर गावांतल्या कुणाचा तरी हात धरून पळून गेलेली सरस्वती- हा जो कोण होता तो “साहिल” नक्कीच नव्हता, कारण तिच्या ओळखीमधे या नावाचा कुणी मुलगाच नव्हता हे तिला परवाच्या भेटीमधे नक्की समजलं होतं. ती कुणासोबत पळाली होती, तिचं मूळ गाव कुठलं ते मात्र कुणी सांगत नव्हतं. महिलाश्रमापासून ते मुस्लिम मोहल्ल्यामधे सर्वत्र फ़िरलं तरी सरस्वती केळकरबद्दल कुणीही धड माहिती सांगायला तयार नव्हतं. उलट “आम्ही तिला ओळखतसुद्धा नाही” हेच प्रत्येकाने सांगितलं होतं. पण एक दुवा नेत्राच्या हाती लागला होता. साराच्या सीव्हीमधे तिने लंडनच्या एका कॉलेजमधे जर्नालिझम केल्याचा उल्लेख होता, तेवढी तीन वर्षे ती गावामधल्या एका स्थानिक वर्तमानपत्रामधे काम करत होती चक्क. म्हणजे तिने डिग्रीचं सर्टिफ़िकेट खोटं जोडलं असणार. या ऑफ़िसमधे मात्र प्रत्येकजण सरस्वती किती हुशार, किती गुणाची आणि कीती सीन्सीअर याच गुणगानामधे व्यस्त होता. साराच्या पर्सनल लाईफ़बद्दल मात्र त्यांना काही माहित नव्हतं.
इथे मुंबईत आल्यावर तिला मिळालेल्या एक सो एक ब्रेकिंग न्युज, फ़िल्म-टीव्ही पर्सनॅलीटीजबरोबर वाढत जाणारी ओळख... हे तर सगळंच अविश्वसनीय होतं. पण त्याहून आश्चर्यकारक होतं ते तिचं आणि वीरचं प्रकरण.... पण नेत्राच्या स्टोरीचा आता तो मुख्य विषय राहिलाच नव्हता. सारा व्ही के बनण्याआधी सरस्वती केळकरने काय काय दिवे लावले होते ते इथे कुणालाच माहित नव्हते....
सकाळचे साडेदहा वाजले तरी ऑफ़िस एकदम शांत होतं. एवढ्या लवकर कुणी येणार नाही याची तिला पूर्ण खात्री होती. पण तरी डेस्कवर बसलेली सारा पाहून ती एकदम चपापलीच.
“सारा, तू इतक्या लवकर?”
“हो. थोडं काम होतं. तू कशी काय लवकर?” सारा समोरच्या स्क्रीनवरून नजर न हटवता म्हणाली.
“माझंपण थोडंकाम होतं,” हातातली बॅग डेस्कवर ठेवत ती म्हणाली. “सारा, आज तू रोहित कपूरचा इंटरव्ह्यु घेणार आहेस ना? मी येऊ सोबत?”
“हो, चालेल! आज दुपारनंतर जायचं आहे, तेव्हा ऑफ़िसमधे असलीस तर चल!” सारा शांतपणे म्हणाली.
साराच्या या उत्तराने नेत्रा खुश झाली. एवढ्यात एका शिपायाने येऊन “सारा मॅडम, आपको एच आर मे बुलाया” सांगितलं. साराला जणू काही हे अपेक्षित असल्यासारखं ती लगेच गेली पण. आणि नेत्रा प्रचंड खुश झाली.
फ़ायनली... तिच्या जबरदस्त इन्व्हेस्टीगेशन जर्नालिझमचा काहीतरी जबरदस्त परिणाम झालाच होता!!!
सुमारे अर्ध्या तासाने परत एकदा शिपायाने येऊन तिला सोबत यायला सांगितलं “किधर एच आर मे?” तिने त्याला विचारलं. तो तिच्या सोबतच लिफ़्टमधे शिरला.
“नही, बारा मंझिलपे”
“पण बाराव्या मजल्यावर तर...” ती पुढे काही म्हणायच्या आत लिफ़्ट थांबली.
“आप इधर रूको. अंदरवाले साब बुलायेंगे तो जाना” एवढं म्हणून तो परत गेला. नेत्रा तिथल्याच एका सोफ़्यावर बसली. बाकीच्या पूर्ण ऑफ़िसपेक्षा हा मजला सर्वात वेगळा. वर्तमानपत्राच्या मालकांची ऑफ़िसेस होती या मजल्यावर. समोर बसलेली एकमेव रिसेप्शनिस्ट तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून काहीतरी टाईप करत होती. बाकीचा बंद केबिनमधे कोण होतं कुणास ठाऊक.
इथे आल्यावर नेत्राच्या घश्याला जवळजवळ कोरड पडली होती. ज्युनिअरमोस्ट असल्याने क्वचित धवनच्या केबिनमधे जायची वेळ यायची तिच्यावर. आणि आज तर डायरेक्ट ओनर ऑफ़िसमधेच.... कशासाठी? एका कलीगची चुगली केली म्हणून की साराची असली कहाणी समोर आणली म्हणून.
पाचेक मिनिटं बसून झाल्यावर समोरच्या रिसेप्शनिस्टने तिला बाजूच्या एका केबिनमधे जायला सांगितलं.
नेत्राने धडधडत्या अंत:करणाने दरवाजा उघडला. भलीमोठी प्रशस्त केबिन होती आणि समोर तिशीचा एक माणूस बसला होता. बघताक्षणी तरी तो तिला अजिबात आवडला नाही. काळासावळा आणि दिसायला जरा विचित्रच होता तो.

“तुम्ही मिस नेत्रा का?” तिने काही बोलायच्या आत तो म्हणाला.
“हो,”
“या, बसा आतमधे!” तो रूक्षपणे म्हणाला. नेत्राला अजून नक्की काय चालू आहे त्याचा अंदाज लागत नव्हता.
“तुम्ही क्राईम रीपोर्टंग बघता का?”
“नो, सर. मी जनरल रिपोर्टिंग बघते”
“एनी आय एम पी स्टोरीज?”
“अं.... सर, आय डिड दॅट स्टोरी ऑन...” नेत्रा गडबडली. तिने तिच्या नावाने एकही उल्लेखनीय स्टोरी अजून केलीच नव्हती, करणार कशी? आतापर्यंत तिला तसा चान्सच मिळाला नव्हता.
“हे तुम्ही लिहिलं आहे?” तिच्या उत्तराच्या पूर्ण होण्याची वाट न बघता त्याने समोर एक कागद टाकला.
बघ़ताक्षणी नेत्राला तो तिचाच काल धवनला मेल केलेल्या कागदाचा प्रिण्ट आऊट आहे ते समजले.
“हो”
“नुसते हो म्हणू नका, नीट वाचून घ्या. आणि मग या इथे या कागदावर” त्याने तिच्या पुढ्यात दुसरा एक कागद टाकत म्हटले, “इथे सही करा. हा लिहिलेला मजकूर मीच लिहिला आहे म्हणून”
“पण का सर?”
“नेत्रा, तुम्ही जिथे काम करता तिथल्या एका कलीगवर अत्यंत भयानक आरोप लावले आहेत, तेदेखील खोटे. असं करण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे वगैरे मी विचारत बसणार नाही. पण कायदेशीररीत्या तुम्हाला या लिखाणाची जबाबदारी घ्यावीच लागेल.”
“सर, प्लीज!! मला एकदा एक्स्प्लेन करायची एक संधी तरी द्या. मी जे काही केलं त्यामधे सारावरती कसलेही आरोप लावलेले नाहीत. खरं काय तेच मी सांगितलं आहे. मी प्रत्यक्ष तिच्या गावामधे गेले होते. तिथल्या लोकांना भेटलेय. तिथून माहिती गोळा केली आहे. सरस्वती केळकर मुंबईला येण्याआधी एका साध्या गावातल्या शाळेत शिकत होती. आईवडील कुणीही नव्हतं तिला. ती गावातल्याच कुठल्यातरी एका मुलासोबत पळून आली मुंबईला. त्यानंतर ती जॉइन झाली इथे. इथे जॉइन होताना तिने लंडनच्या कॉलेजचं सर्टीफ़िकेट दिलंय. ते तिला कसं शक्य झालं मला माहित नाही. पण ते सर्टिफ़िकेट खोटं असणार. कारण तेवढी वर्षं ती गावामधेच काम करत होती. इकडे आम्हाला सगळ्यांना तिने साहिल म्हणून कुणी बॉयफ़्रेन्ड असल्याचं खोटंच सांगितलंय. पण असं कुणीच तिच्या लाईफ़मधे नव्हतं. सर, तिचा तो बॉयफ़्रेन्ड आहे, त्याबद्दल गावात कुणीच नीट सांगत नाही. सगळे घाबरतात त्याला. बहुतेक गुंड मवाली वगैरे असावा आणि इथे प्रत्यक्षात तिचं वीर कपूरसोबत अफ़ेअर आहे. पण हे तिने कुणाला सांगितलं नाही. ती हे सर्व लपून का करते माहित नाही. नक्की कशासाठी... म्हणून...”
“म्हणून तुम्ही वीर आणि सरस्वतीचे एकत्र फोटो काढलेत, त्यांच्या नकळत, त्यांच्या घरामधे? आणि ते या मेलसोबत जोडलेत. सरस्वती तुमच्यावर आता इन्व्हेजन ऑफ़ प्रायव्हसीच्या नावाखाली केस ठोकू शकते.... नशीब समजा तुमचं... ती असं करत नाहीये.”
“म्हणजे सर?”
“येस्स, तिने ते फोटो पाहिलेत, तुमची ही घटिया स्टोरी पण वाचली, म्हणून सल्ला देईन, की अजून महिनाभर तरी तिच्या समोर जाऊ नका, इतकी चिडली आहे ती.....” नेत्रा जणू गर्भगळित झाली.
“सर पण...”
“प्लीज स्टॉप कॉलिंग मी सर... मी तुमचा बॉस नाही. जरी इथे ओनर केबिनमधे बसलो असलो तरी माझा या वर्तमानपत्राशी काहीही संबंध नाही... ”
“ओके, पण मग...”
“नेत्रा, लेट मी बी व्हेरी क्लीअर. मला व्यक्तिश: तुमच्या या ऑफ़िस पॉलिटिक्समधे काडीचाही इंटरेस्ट नाही. हे असं करण्याआधी जरा तरी विचार केला होता का तुम्ही? तुमच्या या कामामुळे तुम्ही सरस्वतीला किती दुखवलं असेल याचा विचार करा. आणि त्यातून तुम्हाला नक्की काय मिळणार आहे? इथे कामाला जॉइन होण्याआधी, वीर कपूरशी कसलंही नातं जोडण्याआधी तिने या वर्तमानपत्राच्या मालकांना सत्य काय होते ते सांगितलेले आहे. म्हणूनच तुमच्या या आगाऊपणामुळे तिचे काहीच नुकसान होत नाहीये. पण तुम्हाला मात्र किंमत मोजावी लागेल. तिने तिचा भूतकाळ तुमच्यापासून लपवला असेल त्याला काहीतरी कारण असेलच ना? आणि तुम्हाला खरं सांगितलं नाही, याचा अर्थ प्रत्येकाला खोटं सांगितलं असा होत नाही,”
“पण सर प्रश्न लपवण्याचा नाही, खोटं बोलण्याचा आहे. मला तिच्या गावामधे समजलं होतं की सारा लग्न करून पळून गेली होती... पण मग ती तिच्या नवर्‍याबद्दल का सांगत नाही? तिचं एच आरमधे रेकॉर्ड अनमॅरीड असं काय दिलंय तिने? मी तिचा पासपोर्ट पाहिलाय एकदा, पण पाच वर्षापूर्वी ती लंडनला गेल्याचा काहीच पुरावा नाही, मग तिने तो कोर्स कसा केला असेल? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्य़ासाठी मी ही स्टोरी केली.”
तो हसला. “बरीच इन्व्हेस्टीगेशन केलेली दिसतेय तुम्ही सरस्वतीवरती. पण काही गोष्टी क्लीअर करतो. तो कोर्स डिस्टन एज्युकेशन मोडमधे होता. वाटलं तर तुम्ही कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन अजून याबद्दल माहिती बघू शकता. तिचं जर्नालिझमचं सर्टिफ़िकेट पूर्णपणे खरं आहे, जरी ती शिकायला परदेशी गेलेली नसली तरी. त्याच वेळेला तुम्ही म्हणालात तसं ती स्थानिक पेपरमधे लिहत होतीच आणि सरस्वती पळून गेली होती हे खरं आहे, पण तिने लग्न वगैरे अजिबात केलं नाही. तिला मुंबईत तुमच्या देशमुख सरांच्या मदतीने नोकरी मिळाली होती पण ती ज्या आश्रमात राहत होती त्यांनी तिला जायची परवानगी दिली नाही, म्हणून ती पळून गेली.”
नेत्रा आश्चर्याने ऐकत होती. “सर, हे तिने खरं सांगितलं कशावरून? कदाचित ती खोटंही बोलली असेल'
“मला याबाबतीत खरं-खोटं करायची गरजच नाही, मिस नेत्रा. कारण मीच तो माणूस आहे ज्याच्यासोबत सरस्वती पळून म्हणा किंवा निघून म्हणा, मुंबईला आली होती.” खुर्चीवरून उठत तो म्हणाला, “तुम्हाला भेटून खूप आनंद झाला, हे म्हणायला बरं वाटलं असतं. पण खरं सांगायचं झालं तर अजिबात आनंद झाला नाही, उलट सध्या प्रचंड पेशन्सने माझा संताप आवरण्याचा प्रयत्न करून तुमच्याशी बोलतोय... जी जखम भरून येण्यासाठी मी गेले पाच वर्षं प्रयत्न करतोय, तुमच्या या एका ईमेलने ती परत भळभळली. सरस्वती माझ्यापासून दूर जातेय. गेलीच पाहिजे. पण तुमच्या या नाक खुपसण्याने मला आज इथे परत यावं लागलं. आणि तुम्ही या कागदावर लिहिलेल्या अनेक घाणेरड्या आरोपांसाठी एक वेळ सरस्वती तुम्हाला माफ़ करेल, पण मी? कधीच नाही..”
त्याच्या नजरेतला तो संताप आणि विखार आता स्पष्ट दिसत होता, “हे करून तुम्हाला काय मिळालं ते माहित नाही! सरस्वतीने नोकरी जॉइन करताना यापैकी प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण दिलेलंच आहे त्यामुळे ती खोटं बोलली वगैरे सर्व तुमच्या मनाचे खेळ आहेत. आणि खाली एच आर तुमचं टर्मिनेशन लेटर तयार करतंच आहे. नवीन नोकरीच्या शोधासाठी शुभेच्छा,”
नेत्रा क्षणभर थबकलीच. काय बोलावं ते तिला सुचेना. एच आरकडून टर्मिनेशन लेटर वगैरे तिच्या मेंदूपर्यंत पोचलंच नाही.
“तुम्ही... तुम्ही.. तुमचं नाव साहिल आहे?” तिने विचारलं.
“नाही! माझं नाव साहिल नाही. पण हो. मी साहिल आहे.” तो हसत म्हणाला आणि केबिनबाहेर निघून गेला.
================================================

ऑफ़िसमधून बाहेर पडून मी बस स्टॅन्डकडे निघाले होते. आजचा अजून एक दिवस सरला. आता थोडेच दिवस!! मग ही नोकरी सोडून द्यायची.. आणि पुढे? पुढे काय याचा अजून विचार केलाच नव्हता. काकाच्या घरून आल्यावर इथे महिलाश्रमात रहायला जागा मिळाली, शिक्षण चालू झालं, तात्पुरती का होइना पण नोकरी मिळाली, पण यानंतर पुढे काय हा प्रश्न अजून होतास. इथलं काम वाईट होतं अशातला भाग नाही. पण त्याच त्याच डबक्यात किती वर्षं रहायचं?
तंद्रीत चालत असतानाच समोरुन साहिल बाईकवरून येताना दिसला. आता हा इथे कशाला आला?

"अजीब लडकी हो.. केव्हाचा शोधतोय. गायब का होतेस?" तो माझ्यासमोर थांबत म्हणाला. "वो मामुके पास मी तुझ्या जॉबसाठी फ़िल्डंग लावली होती पण तू त्याला भेटायला आलीच नाहीस. का?" 

आसपासचे सर्वजण त्याच्याकडे बघायला लागले. एक तर हे तसं काही मोठं गाव नाही आणि त्यात अशा गोष्टी तर फ़ार लवकरच पसरतात. 
"साहिल.. प्लीज.. आपण इथे नको बोलू या... मी उद्या भेटते तुला.."
"मागच्या वेळेला पण हेच बोलून तू मला रस्त्यावर सोडुन गेली. मला भेटायचं नाहीच आहे का तुला?"
"साहिल, इथे सगळे बघतायत आपल्याकडे. पण आता नाही बोलत," मी कसंबसं म्हणाले, पण सांगितलेलं ऐकेत तो साहिल कसा?. 
"चल, बस," तो म्हणाला. 
"साहिल, एकदा सांगितलं ना मी इथे बोलणार नाही." मी परत सांगून पाहिलं. 
"तू चुपचार माझ्यासोबत येते की मी इथे जोरात ओरडून सांगू तू माझी आयटेम आहे म्हणून.. " तो शांतपणे म्हणाला. साहिल असं नक्की करू शकेल यावर माझा पूर्ण विश्वास होताच. 
त्या दिवशी अर्ध्या गावाने तरी मला पहिल्यांदा त्याच्यासोबत जाताना पाहिलं असेल. गावामधे चर्चेला नवीन निमित्त मिळालं असणार नक्कीच.

साहिलने गाडी एका सुनसान रस्त्याला घातली. 

"आपण कुठे चाललोय?" मी दोन तीनदा विचारलं. त्याने काहीच उत्तर दिलं नाही. वैतागून त्याच्या पाठीत एक धपाटा घातला. तसा बेफ़ाम चाललेल्या बाईकवरून पाठी वळून तो हसला.
"और बस दो कदम..." 
दो कदम? कि किलोमीटर? शेवटी त्याने एके ठिकाणी बाईक थांबवली.. दूरवर कुणी चिटपाखरू सुद्धा नव्हतं. 
"देखो.." तो म्हणाला. समुद्राकदे बोट दाखवत. आता या संध्याकाळी या समुद्रकिनार्‍यावर नक्की काय बघायचं?

सूर्यास्त होत आला होता. त्याचं एक विलक्षण प्रतिबिंब समुद्रावर पडलं होतं. 

“मला इथे येऊन सूर्यास्त बघायला फ़ार आवडतं” तो म्हणाला. समुद्रावरून येणारा वारा सहज तोंडावर बसत होता. “गावापासून लांब, एकाकी... तरीही सोबत कुणीतरी असणारा सूर्यास्त” मी काही न बोलता शांत उभी राहिले.

"सरस्वती, मुझसे दूर क्युं भाग रही हो?" त्याने माझ्या डोळ्यात बघत विचारलं. 

"काय?" ती गडबडली. 
"मी खूप दिवसापासून पाहतोय. तू माझ्यापासून लांब पळतेस. का? " 
"असं काहीही नाही. मला हल्ली दिवसभर वेळ नसतो. तू इथे गावात आहेस हे मला माहितसुद्धा नव्हतं." मी उत्तर दिलं.

"खोटं बोलत जाऊ नकोस. तुला जमत नाही." तो समुद्राकडे बघत म्हणाला. 

"खरं सांगू? अगदी खरं? मला तुझ्याशी मैत्री ठेवायची नाही." मी एकदाचं सांगून टाकलं.
"का?" 
"काहीही कारण असेल त्याच्याशी तुला काय देणं घेणं.." 
"सरस्वती, का हे विचारायचा हक्क आहे मला. आणि तू माझ्याशी मैत्री तोडून स्वत:पासून लांब जाते आहेस." तो म्हणाला.
"म्हणजे?" 
"कुठल्याही रिलेशनपासून दूर गेल्याने नाती संपत नाहीत, सरस्वती. आपण फ़क्त आपल्यापासून दूर होत जातो.."
"साहिल, असं नाही. मी तुला आताच कुठे भेटली आहे. आणि तू इतक्यात आपल्या नात्याच्या गोष्टी पण बोलायला लागलास?" 

"म्हणजे आपलं काहीच नातं नाही असं तुला म्हणायचे आहे?"

"साहिल, आपलं नातं? आपली फ़क्त ओळख आहे. तेपण मी तुला तीनचारदा भेटले आहे म्हणून. बाकी काहीही नाही."

"आणि तू ओळखीच्या प्रत्येक माणसाला सांगतेस की तू घर का सोडलस? तुझ्या आईने काय केलं.. हो ना??" त्याच्या स्वरात आतापर्यंत कधीच न जाणवलेला कडवेपणा होता. 

" मी तुला माझा भूतकाळ सांगितला कारण.... कारण, मला तुझ्याशी बोलताना तो मोकळेपणा जाणवला... पण याचा अर्थ असा नव्हे की आपण..." 
"एक मिनिट.. मी इथे वाद घालायला आलो नाही. तुझ्या भूतकाळाशी अथवा वर्तमानकाळाशी मला काही इण्टरेस्ट नाही, मला तुला फ़क्त इतकंच सांगायचं आहे, की सरस्वती, आपलं नातं आहे. तू कबूल कर अथवा करू नकोस. ती तुझी मर्जी! " 
" तू काय बोलतो तुला समजतं का रे?" हताशपणे मी म्हणाले.. 
"सरस्वती, तुझं आणि माझं नातं.... त्यासाठी कुठल्याही नावाची गरज नाही. आज या घडीला हे नातं मैत्रीचं आहे. उद्या या नात्याचे रंग काय बदलतील ते माहित नाही... तुझी सगळ्यात मोठी भिती तीच आहे ना? "

" मी स्वत्:ला त्या ठिकाणी नाही बघू शकत जिथे माझी आई आहे. हे मी तुला ऑलरेडी सांगून झालंय.." सरस्वती शांतपणे म्हणाली. 


त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. 
"माहित आहे मला. पण नात्यांपासून, जगापासून घाबरू नकोस. तु आतल्या आत स्वत्:मधे हरवत चालली आहेस. बाहेर बघायला तुला वेळ नाही. आपल्या दुनियामधे हरवू नको. जगाकडे बघ, स्वत:कडॆ बघ!! जगावर विश्वास ठेवायला शिक. " 
"विश्वास, रक्ताची नाती जेव्हा तुम्हाला पाळण्यात सोडून जातात नाहीतर तुमच्या इज्जतीला लुटतात, तेव्हा विश्वास ही गोष्टच अशक्य असते..." माझ्या डोळ्यांसमोर काका आणि आईचा चेहरा तरळून गेला.

"सरस्वती, तुझी आई कशी का असेना, कुठेतरी जिवंत आहे, केव्हातरी ती तुला न्यायला पण आली होती. आयुष्याच्या कुठल्यातरी वळणावर तू तिच्याकडे परत जाऊ शकशील.... पण माझी तर आईच नाही. मी काय करू?" 

" तुला वडील आहेत. मामा मामी काका काकी सगळे आहेत. पण मी? माझं या अख्ख्या जगात कुणीही नाही."
"मी सुद्धा?" 
“तू एकटाच तर आहेस.... मित्र म्हणून!” 
"तेच तर मी तुला सांगतोय. मीच एकटा तुझा मित्र का? बाकी कुणी का नाही. बाहेर जा, चार लोकांत मिक्स हो. खूप सारे मित्रमैत्रीण बनव...मग तुला कधीच एकटं वाटणार नाही... मी.... मी तुला सोडून गेल्यावर सुद्धा."
"बोलणं सोपं आहे. करणं कठीण आहे. " 
"काही कठीण नाही. तुझा स्वत:वर विश्वास असेल तर” . 
"माझा माझ्यावर प्रचंड विश्वास आहे म्हणूनच मी आज इथे आहे. एवढ्या मोठ्या जगाच्या पसार्‍यात एकटी...."
"अब देखो... " त्याने बोलता बोलता मधेच आकाशाकडे बोट दाखवलं. 
सूर्य केव्हाच मावळला होता. राखाडी अंधार पसरत चालला होता. सगळीकडे काजळी पसरल्यासारखा, 
"थोड्या वेळापूर्वी इथे किती रंग होते, आता फ़क्त काळा.. "तो म्हणाला. 
"म्हणजे?" त्याने विषय का बदलला हे तिच्या ध्यानात आले नाही. 

"दुनिया बदलती है. वक्त बदलता है. रिश्ते बदलते है, पर ये नजारा वैसा ही है, अगर कुछ बदला है तो अपना नजरिया." 
"आणि या सगळ्याचा तुझ्या आणि माझ्या नात्याशी काय संबंध?" 
"काहीही नाही. आपलं नातं आहे तेच आहे. आणि राहील. सरस्वती. एक जिग सॉ पझल आहे. आपण त्याचे तुकडे आहोत. एकमेकापासुन वेगळे केले तर फ़क्त चित्रविचित्र तुकडे आणि एकत्र असतील तर चित्र.”
"आपण कधीच एकत्र असणार नाही.." 
तो हसला. "हे ठरवणारी तु अथवा मी कोण? तकदीर से जुडे है हम दोनो. चाहकर भी अलग हो ना पाओगी."

रात्र चढत होती. माझ्या मनात विचाराचे कल्लोळ उठले होते.
साहिल मात्र नेहमीच्या सवयीप्रमाणे आकाशातले तारे बघत होता.

No comments:

Post a Comment