Friday, 13 June 2014

दरवाजा (भाग १)

सकाळी स्कूलबसमधून जाणार्‍या चैत्रा आणि अश्विनला रेश्माने बाय करून हात हलवला आणि निवांतपणे तिच्या बिल्डिंगकडे परत निघाली. दिवसाचा महत्त्वाचा टप्पा पार पडला. आता दुपारी तीनपर्यंत निवांतपणा.
बिल्डिंगजवळ आल्यावर सवयीने लिफ्टजवळ गेली. तेवढ्यात मागच्या महिन्यांत उसवायला लागलेले दोन ब्लाऊज डोळ्यासमोर आले, आणि तिने जिन्याने वर चढायला सुरूवात केली. चार मजले म्हणजे काही फार नाही. नवरा तर रोज म्हणायचा, "घराबाहेर पडत असलीस तर समजलं असतं, इथे प्लॅटफॉर्मचे जिने केव्हा चढतो आणि केव्हा उतरतो आम्हाला समजतदेखील नाही. तुला या चार जिन्यांचं एवढं कौतुक." बिल्डिंगमधल्या बाकीच्या बायका जिमला वगैरे जायच्या, पण जिमची महिना दीड हजार फी ऐकून तिने तो बेत कॅन्सल केला होता. "तेवढ्यात घरांत व्यायाम होइल" असा तिचा इरादा, पण त्या व्यायामाला मुहूर्त काही मिळत नव्हता हे नक्की.
दोन मजले चढून झाले होते तेवढ्यात केतकरांचा दरवाजा उघडा दिसला. केतकरवहिनी हॉलमधेच उभ्या होत्या. "मीरावहिनी, तुम्ही आहात होय! तरी मी म्हटलं जिन्यातून कोण चाललंय" तिला बघताच तोंडभर हसत म्हणाल्या.
"हो, चैत्रा अश्विनच्या शाळेची वेळ. बाकी, काम झालं?" तिने बोलायचं म्हणून बोलायचं असतं असलं एक वाक्य म्हटलं.
"कामाचं काय होतच राहतं. तुमचे नवीन शेजारी आले की नाही?" केतकरवहिनी म्हणाल्या.
"काय की, गेले महिनाभर रिनोव्हेशन चालू आहे. पेण्टिंग झालं, आणि काय काय बरंच केलंय. मी काय आत जाऊन पाह्यलं नाही"
"अहो, ते सर्व झालंच. मला भुरेवहिनी म्हणाल्यात की, आज उद्यांत राह्यला येणार आहेत. नवरा बायको दोघंच आहेत. अद्याप अपत्य वगैरे नाही... म्हणजे तुम्हाला तशी चांगली सोबत म्हणायची"
मागच्या महिन्यांत तिच्या फ्लॅटसमोर राहणार्‍या कामत आज्जी वारल्यावर त्यांच्या परदेशांत स्थायिक झालेल्या मुलाने फ्लॅट विकला होता. नवीन मालक कोण ते अद्याप तिने एकदाही पाहिलं नव्हतं. केवळ फ्लॅट रिनोव्हेशनला येणारे कामगार वगैरे सोडल्यास दोघेही कधी दिसले पण नव्हते.
"आजी होत्या तेव्हा बरं होतं. आता नुसते नवरा बायको म्हणजे कठीणच. त्यात नोकरी करणारी वगैरे मुलगी असली तर कसली सोबत नी कसलं काय." ती म्हणाली.
"हो, तेही आहेच. पण पार्टी चांगली मालदार आहे हां! फ्लॅट पूर्ण चेक देऊन घेतला. एकही पैसा ब्लॅकने देणार नाही असं सांगून. शिवाय कालपासून सामान येतंय ना ते सगळं शोरूममधूनच. अगदी भांडीसुद्धा नवीकोरी आली आहेत." केतकरवहिनी बहुतेक कालपासून याच ड्युटीवर असाव्यात.
"नवीन संसार असेल. चला, येऊ मी. गीता कामावर यायची वेळ झाली. परत घर लॉक दिसलं की दांडी मारून पळेल" म्हणत ती जिन्याने वर निघाली.
चौथ्या मजल्यावर जिन्यामधेच ठेवलेल्या सामानाने वाट अडवली होती. बाजूला उभा असलेला कामगाराने ते बघताच पुढे येऊन "सॉरी" म्हणत त्याने भराभरा सामान बाजूला केलं. केतकरवहिनी म्हणाल्या तसं सगळंच सामान नवंकोरं दिसत होतं.
दरवाज्याजवळ येऊन कुलूप उघडणार एवढ्यात कानांवर आवाज आला. "अरे, काय पेंटचा वास येत नाही. बास झाली तुझी नाटकं. सगळं सामान आज रात्रीपर्यंत लावून होइल. तू उद्या दुपारच्या फ्लाईटने परत ये"
रेश्माच्या हातातली चावी खाली पडली. इतका ओळखीचा आवाज!!!
"बिल्कुल नाही. किती दिवस राहणार आहेस? ताबडतोब परत ये. तुझ्याशिवाय कंटाळा आलाय!!"
शक्य नाहीये रेश्मा. तो इथे येणं शक्य नाही. तिने परत एकदा स्वतःला सावरलं. धडधडत्या अंत:करणाने तिने दरवाजा उघडला आणि ती तिच्या घरामधे आली.
हे शक्य नाही.
चेहर्‍यासारखा चेहरा असतो, मग आवाजासारखा आवाज का नसेल?
दिवसभर ती घराबाहेर पडली नाही. अगदी चैत्रा अश्विनला आणायलासुद्धा गीताला पाठवून दिलंय. "माझं डोकं दुखतंय" असं खोटंच सांगत.
संध्याकाळी मोहित परत आला तोपर्यंत समोरच्या फ्लॅटमध्ये पूर्ण शांतता होती. दुपारी आलेले कामगार परत गेले असावेत, घराचं कुलूप लावलेलं नव्हतं पण घरामध्ये पूर्ण काळोख मात्र दिसत होता.
"आले का हे नवीन लोक रहायला?" मोहितने विचारलं.
"हो, आजच,," तिने तुटकपणे सांगितलं. मोहितला तसाही फार जास्त इंटरेस्ट नव्हता, त्याने बातम्यांचे चॅनल लावलं आणि रोजच्यासारखा चैत्रा अश्विनबरोबर मस्ती करण्यामध्ये रंगून गेला.
दोन-तीन दिवसांनी रेश्मा या नवीन शेजार्‍यांबद्दल सगळं विसरून पण गेली होती. तो ओळखीचा वाटलेला आवाजसुद्धा.
नेहमीसारखी मुलांना शाळेत पोचवून आल्यानंतर ती किचनमधलं आवरत होती, एवढ्यात बेल वाजली.
गीता एवढ्या लवकर कशी आली असा विचार करत तिने दरवाजा उघडला, पण समोर गीता नव्हती.
"हाय! आय अ‍ॅम माही, हम लोग रीसेण्टली यहापे शिफ्ट हो गये." समोरच्या मुलीने हसत ओळख करून दिली.
"हाय, आय अ‍ॅम मिसेस मीरा. कम इन..." तिने लगेच म्हटलं. "मुझे तो लगा आप लोग रहने आये ही नही. घर तो बंद था.."
"हां.. वो मे गांव गयी थी, और ..उसको तो वैसेभी ऑफिसमे रहने का बहाना चाहिये"
इतक्यात तिला आठवलं, तो फोनवर बोलणारा... मराठी आवाज. "तू मराठी आहेस ना?" रेश्माने विचारलं.
"अरे, आप भी मराठी.. सॉरी. तुम्हीपण मराठी?" माहीने एखादं अद्भुत आश्चर्य असावं असा चेहरा केला "काय मज्जाय ना? बरं, मी कशाला आले होते, तेच विचारायचं विसरले. मला ना प्लीज दूधवाला, पेपरवाला आणि कामवाली वगैरेचे नंबर हवेत. प्लीज द्याल का?"
"एवढंच ना?" रेश्माने टेबलवरचा मोबाईल उचलून त्यामधले नंबर सांगायला सुरूवात केली. "गीता म्हणून माझ्याकडे कामाला येते, तुझ्याकडे पण तिलाच सांगेन. स्वच्छ काम करते आणि मुख्य म्हणजे दांडी मारत नाही,. कुठल्या वेळात तुझ्याकडे यायला हवी?"
"कधीही चालेल. .... माझी जनरली नाईट शिफ्ट असते. त्यामुळे मी दिवसभर घरी असते"
"नाईट शिफ्ट म्हणजे? कॉल सेंटरमध्ये वगैरे काम का?"
"तसंच, पण मी काम करत नाही. आय मीन... मी कॉल सेंटरची ओनर आहे... टेक सपोर्टचा छोटासा सेटप आहे"
रेश्माला मनातल्या मनात खूप आश्चर्य वाटलं, तीशी बत्तीशीची.... अवघ्या तिच्याच वयाची असेल ही मुलगी.
"दॅट इज व्हेरी गूड. म्हणजे गीता कधीही आली तरी चालेल. तुला स्वयंपाकाला कुणी हवंय?"
"नको. दोघांचाच स्वैपाक मॅनेज होतो..."
"तुला फुलवाल्याचा पण नंबर हवाय का? रोज पहाटे येऊन फुले देऊन जातो. पूजेसाठी वगैरे"
"नको आम्ही दोघंही पूजा वगैरे काही करत नाही. असिफचा तर विश्वासच नाही, आणि त्याच्यासोबत राहून राहून....पण हा फुलवाला रोज मोगर्‍याची किंवा चाफ्याची फुलं देईल का? असिफला फार आवडतात..."
पण माही काय म्हणतेय त्याकडे रेश्माचं लक्ष नव्हतं. असिफच्या उल्लेखासरशीच ती केव्हाच हरवून गेली होती. नजरेसमोर दिसत होता तो पंधरा वर्षापूर्वीचा असिफ. रोज पहाटे त्यांच्या बंगल्यामध्ये येणारा. लोखंडाच्या सळीने चाफ्याच्या झाडवर चढून फुलं तोडून घेणारा. मोगर्‍याच्या सर्व कळ्या संध्याकाळी तोडून न्यायचा, आणि मग त्याचे गजरे करून देवीच्या देवळासमोर विकायला.
"कधीतरी झाडावर एक तरी फूल वासासाठी म्हणून तरी ठेव रे." एकदा ती वैतागून त्याला म्हणाली होती.
"एक रूपया दे, दहा फुलं ठेवीन. एक रूपयाला दहा तेवढीच या फुलांची माझ्या दृष्टीने किंमत. आणि फुकट नेत नाही. तुझ्या वडलांना महिन्याचे दोनशे रूपये देतो" एवढंच बोलून तो सरळ निघून गेला होता.
समोर बसलेली माही काहीतरी बोलत होती. अचानक भानावर येत रेश्माने माहीला विचारलं, "चहा घेशील?" आता या क्षणी तिला असिफबद्द्ल काहीही बोलायचं नव्हतं. "चहा नको.. चला मी निघते."
"बस गं, चहा नको तर सरबत तरी घे" म्हणत ती किचनमध्ये गेली. नंतर माही कितीतरी वेळ बसून गप्पा मारत राहिली. माहीला कदाचित तिच्याबद्दल माहीत नसाव,, आणि माहित असलं तरी रेश्माबद्दल माहित असेल, मी तर मोहितची मीरा आहे.... तिने स्वतःचीच समजूत घातली.
पण माही गेल्यावर परत एकदा असिफचा विषय मनामध्ये यायला लागलाच.
असिफ इथेच पलीकडच्याच घरात रहायला आला होता, नक्की कशाला? सूड उगवायला, मी तुझ्यापेक्षा किती सुखी आहे हे सांगायला, तू ज्याला सोडून दिलंस, तो तुझ्याशिवाय देखील किती पुढे गेलाय हे ठसवायला...
पण हे असिफचं वागणं नव्हे. असिफ असा कधीच वागला नसता.
चार-पाच दिवसांत असिफ-माहीच्या घरामधे गीता कामाला यायला लागली. दूध, पेपर आणि फुलांचे रतीब चालू झाले. शिवाय रोजच्या रोज गाडी धुवायला म्हणून गीताच्याच भावाला सांगितलं. गीताकडून अलगदपणे तिने असिफच्या जाण्यायेण्याच्या वेळा कुठल्या हे विचारून घेतलं. तो सकाळी सात साडेसात वाजता जायचा आणि रात्री नऊनंतर घरी परत यायचा.
या दोन्ही वेळांमध्ये रेश्माला दरवाज्यामध्ये यायचं काही कारणच नव्हतं. माही मात्र, अधून मधून दुपारच्या वेळेमध्ये येऊन गप्पा मारायची. असिफने माहीला निवडलं होतं यात काहीच आश्चर्य नसावं, इतकी ती असिफसारखीच होती. स्वावलंबी, स्वतःचे न्निर्णय स्वतः घेणारी. शक्यतो समोरच्याला न दुखावता स्वतःचं काम करून घेणारी, हुशार. फार लहान वयापासून जबाबदारी घेणारी. माहीचं मूळचं गाव तमिळनाडूमधलं. घरामध्ये प्रचंड गरिबी पण चर्चच्या मदतीने शिकायला म्हणून चेन्नईला गेली, तिथून बंगळूरू आणि मग मुंबईमध्ये चार वर्षं नोकरी करून हे स्वतःचं छोटासा बिझनेस चालू केला होता.
आणि असिफ तिचा नवरा नव्हता, दोघांनीही अजून लग्न केलेलं नव्हतं.
माही असिफबद्दल काही बोलायला लागली की रेश्मा मुद्दाम वेगळा विषय काढायची.
ही दोघं तिथे रहायला येऊन महिना झाला तरी रेश्माने एकही दिवस असिफला पाहिलेलं नव्हतं. त्याला आपण इथे राहतोय की नाही तेच कदाचित माहित नसावं. त्याने आपल्या घरासमोर अरहायला येणं हा निव्वळ योगायोग. तिने स्वतःलाच सांगितलं.
पण महिन्याच्या पहिल्या रविवारी हा फुगा फुटलाच.
सकाळीच मोहितने दोन्ही मुलांना त्याच्या बहिणीकडे नेऊन सोडलं होतं. परत आल्यावत तिने बनवलेला थालिपीठाचा नाश्ता खाऊन तो टीव्हीवर लागलेली मॅच बघत होता. ती आतमध्ये संडे स्पेशल स्वयंपाकाची तयारी करत होती.
दरवाज्याची बेल वाजली म्हणून मोहितने दरवाजा उघडला, "मीरा, ए मीरा!! पेपरवाला आलाय.... बिल न्यायला. किती पैसे द्यायचेत?"
"आलेच" म्हणून हात धुवून ती बाहेर आली. दरवाज्यात असिफ उभा होता.
(क्रमशः)


दरवाजा (भाग २)

Tuesday, 3 June 2014

दुपार

गणपतीपुळ्यामध्ये दर्शन घेऊन परत निघाले. येताना आपल्या जुन्या कॉलेजवरून जाता यावं आणि जरा वेगळा रस्ता म्हणून माझ्या घराला जवळ पडणारा निवळीचा हायवे न पकडता चाफ़्याकडून शिरगांवला जाणारा रस्ता पकडला. मे महिन्यातली दुपारची टळटळीत वेळ. खरंतर मे महिना म्हणजे आमच्या गावाकडे पूर्वी आंबे काजू फ़णसाचा आणि त्याचबरोबर चाकरमान्यांच्या पाहुणचाराचा महिना. पण हल्ली हाच महिना “टूरीस्ट सीझन” असतो. कुठून कुठून लोकं “कोकण फ़िरायला” म्हणून येतात. इथल्या समुद्राची, निसर्गाची आणि माशांची अप्रूपाने स्तुती करतात. स्थानिक बापडे त्यांची निव्वळ मजा बघत असतात. त्यांना या कशाचं काहीही कौतुक नसतंच. मुळात कोकणी माणसाला कौतुक कशाचं असतं हा एक संशोधनाचा विषय. इतके दिवस गावात असताना आम्हाला तरी कधी कौतुक होतं या सगळ्याचं. पण गेले कित्येक वर्षं मी कोकणाबाहेर असल्यापासून मात्र मलादेखील अधूनमधून नॉस्टॅल्जियाचे झटके येत असतात. त्याबद्दल पुन्हा केव्हातरी...
सुट्टीत गावाला गेलं की एकदा तरी पुळ्याच्या गणपतीला जाऊन येणं होतंच. श्रद्धा म्हणण्यापेक्षा सवय किंवा परंपरा!! परंपरा म्हटलं की कसा भारदस्त शब्द वाटतो. खरंतर, कॉलेजमधे असताना “गणपतीपुळे हायवे” आमचा हॅंगआऊट पॉइन्ट होता. त्यामुळे रस्ताभर काहीनाकाही आठवणी जोडलेल्या आहेत, त्या आठवणी जागवत आणि एकटीने भटकायचं म्हणून हे फ़िरायला जाणं. नाहीतर कुटुंबकबिला घेऊन बाहेर पडलं की आपलं फ़िरणं कमी आणि इतर गडबडच जास्त!
दुपारची वेळ असल्याने आज रस्ता अगदी मोकळा होता. कसलंही ट्राफ़िक नसताना गाडी चालवायला जरा बरं वाटत होतं. वाटेमधले चुकारमुकार आंबे विकायला उभे असलेल्या माम्या सोडलं तर अजून कुणी दिसत नव्हतं. आमच्या कोकणातला उन्हाळा नुसता भाजत नाही, उकडूनपण काढतो. त्यातून पुळ्यासारख्या समुद्राच्या खूप जवळ असलं तर घाम विचारायलाच नको. असल्या घामट आणि चिकट वातावरणामधे दुपारच्या वेळेला ताणून देणे हा सगळ्यांत वेळेचा खरा सदुपयोग. त्यामुळे सर्वत्र निवांतपणा असतो. या रस्त्याला चढ चढून आल्यावर एक मोठाच्या मोठा माळ लागतो, पुळ्याचा समुद्र खाली दिसायला लागतो.. आजूबाजूला नुसता विस्तीर्ण पसरलेला माळ. याचंच नाव बहुतेक ढोक्याचा माळ. ही अशी चित्रविचित्र नावं कशी मिळत असतील एखाद्या ठिकाणाला कुणास ठाऊक. सहज गाडी थांबवली आणि खाली उतरले. खरंतर गाडी चालवायचा कंटाळा आला होता असं नाही, पण तरी थांबावंसं वाटलं. आकाशातला सूर्य आग ओकत होता असं म्हणणं म्हणजे फ़ार मवाळ ठरलं असतं. अख्खं आकाश त्या आगीने खरंतर पेटून उठलं होतं. माथ्यावर आलेल्या त्या सूर्याकडे बघणं अशक्य होतं, अगदी गॉगलच्या काचेआडूनसुद्धा. आजूबाजूला कुठेही एक झाड दिसत नव्हतं. सगळा कोरडा भाग. कातळी परिसर. पावसाळ्यांतून याच माळावर छान हिरवं पोपटी गवत उगवलेलं असतं. आणि मग साधारण पावसाळा संपत आला की गवतांवर कोवळी कोवळी फ़ुलं आलेली असतात. रंगीबेरंगी. त्यादरम्यान याच रस्त्यावरून जाताना किती नाही म्हटलं तरी पाचसात मिनिटं थांबणं होतंच. असल्या पावसाळी गवतामधून पायांत चप्पल न घालता धावणं हे माझं खूप आवडतं काम. नवरा मात्र “जनावर वगैरे येईल पायांमधे” असं ओरडत असतो. पण आज सोबत नवरा आलेला नव्हता, आणि समोर हिरवं गवत नव्हतं. होतं ते निव्वळ पसरलेलं भगभगीत काळं कातळ. चटका देण्याइतपत तापलेलं. आणि त्या कातळाला मधेमधे पॅचवर्क केल्यासारखे दिसणारे सुकलेल्या गवताचे पांढरट पिवळे पुंजके. अगदी दूरवर कुठेतरी करवंदीची भलीमोठी जाळी होती. पण तिथपर्यंत चालणं जीवावर आलं होतं. तसंपण सीझनमधे मुलं पहाटेच करवंदं तोडून नेतात विकण्यासाठी.
माझी नजर फ़क्त समोरच्या आकाशावर लागली होती. खालच्या काळ्या कातळाचं वर असलेलं हे निळं प्रतिबिंब म्हणावं असं आकाश. पण कातळ जितकं खडबडीत होतं तितकंच आकाश तलम. मुळात आकाश असतं का तिथे? पृथ्वीच्या आजूबाजूला पसरलेल्या या विशाल अवकाशामधला आपल्या नजरेला जो चिमुकला तुकडा दिसतो त्यालाच तर आपण आकाश म्हणतो. आज त्या तुकड्याकडे नजर टाकता येत नव्हती इतकं ते जळजळीत दिसत होतं. जिथवर आपली नजर जाते त्याला क्षितीज म्हणायचं की आपली नजर क्षितीजापर्यंतच जाते असं म्हणायचं माहित नाही. पण नजरेच्या त्या टप्प्यापलिकडे एक वेगळंच विश्व असलं तरी सध्या नजरेला दिसते त्या क्षितीजाचीच सीमारेषा खरी. आता अजून तीन चार तासांमधे सूर्यनारायण थोडे निवळतील. शांत होतील. थकल्या भागल्या हळूहळू क्षितीजाकडे सरकत जातील. त्यावेळी मात्र याच क्षितीजाकडे हजारो नजरा लागलेल्या असतील. मावळत्या आणि उगवत्या सूर्याला पाहणं लोकांना आवडतं पण जेव्हा तोच सूर्य आकाशामधे आपल्या खर्‍या शक्तीचं प्रदर्शन करत असतो, ती वेळ मात्र कुणाच्याच आवड्डीची नाही. आपलं पण असंच असतं ना... जेव्हा अंगात जोश असतो धमक असते तेव्हा सोबत कुणी नको हवं असतं, आपणच एकटे आपल्या साम्राज्याचे सम्राट. आणि जशीजशी ही धमक कमी होत जाते तेव्हाच कोणतरी सोबत असावंसं वाटतं, आपल्याला सांभाळून घेणारं, आपल्या पावलासोबत पाऊल टाकून चालणारं. आणि मग मनाच्या याच अवस्थेमधे तर रंगाची उधळण होते. संध्याकाळी क्षितीजावर झालेली असते तशी. लाल, तांबडा, केशरी, गुलाबी. सॉरी मी अजून म्हातारी वगैरे झालेली नाही. तरी उगाच असं वाटलं खरं.
मी जिथे उभी होते तिथून पुळे खालच्या बाजूला राहिलं होतं. मागे वळून पाहिलं तर खाली समुद्र दिसत होता. दिवसाच्या रात्रीच्या कुठल्याही वेळेला मला समुद्र कायम राजबिंडाच दिसतो. आता तरी का अपवाद? त्याच्या पोटामधे काय रत्नं बित्नं असतील ती असो, पण अंगावर आज राखाडी रंगाची कांती उन्हामुळे जी काय चमकत होती त्याला उपमा नाहीच. आणि अगदीच उपमा द्यायची झाली तर याच समुद्राच्या लेकींच्या अंगासारखा चमकत होता हा समुद्र. किंवा मग असंही असेल की समुद्राचा हाच रंग घेऊन मासोळ्यांनी आपला मेकप केला असेल. वार्‍याच्या प्रत्येक लहरीवर शांत हिंदकळणारं पाणी त्या पाण्यावर पडलेले उन्हाचे किरण, सोनेरी-चंदेरी रंगाचे. संथ एकाच लयीत. पण हे असं इतकं शांतगंभीर असणारं प्रकरण किनारा जवळ आला की अवखळपणे शुभ्र रंगामधे फ़ेसाळत धावत पुढे येणारं. शाळेमधे अगदी “शांत” असलेलं टिल्लू घरी जाताना आई दिसली की जसं धावत जातं अगदी तसंच. आणि मग त्याची आई कशी दोन्ही हात पसरून त्याला कवेत घेते, तशी समोरची जमीन येणार्या प्रत्येक लाटेला तितक्याच उत्साहाने आपल्या कुशीत घेतेय. इथून इतक्या वरून हा खेळ बघणं ही एक वेगळीच गंमत. आजूबाजूला असलेली सुरूची हिरवी झाडं, किनार्‍यावरची फ़िक्कट पांढरी वाळू, धवल रंगाच्या उफ़ाळलेल्या लाटा आणि त्यामागे पसरलेलं ते काळसर राखाडी पाणी आणि त्यावर चमकणारं चंदेरी ऊन. एखाद्या चित्रासारखं दिसत होतं हे दृष्य.
किती वेळ मी इथे उभी आहे कुणास ठाऊक? भान हरपले असणार माझे नक्कीच. नाहीतर या असल्या टळटळीत दुपारच्या ऊन्हामधे कोण शहाणं माणूस असं रस्त्यावर उभं राहणार आहे? एवढा वेळ आहे तरी एकदेखील गाडी गेली नाही.... इतकं सुनसान, निर्जन, एकाकी!!
किती दिवसांनी अशी मी स्वत:सोबतच होते... कायम माणसांच्या गराड्यात राहिलं की आपणच हरवून गेलेलो असतो. असा निवांतपणा मिळतात कुठे जगायला? आपल्याच स्वत:च्या धुनकीमधे जगायची एक नशा असते.. मी कुणाहीसाठी नाही.. कुणीही माझ्यासाठी नाही. मी स्वतंत्र, मी माझी... असे लख्ख जाणवून देणारे काही क्षण असतात आयुष्यामधे. असाच हा एक क्षण. स्वत:साठी स्वत:सोबत स्वत:भोवती, जगण्याचा, अनुभवण्याचा.
कुणाच्या तरी येण्याने ती जादू हरवली. रस्त्यावरून एक बाईक येताना दिसली.
“काही प्रॉब्लेम आहे का? गाडी वगैरे बंद पडलीये का?” बाईकवर बसलेल्या दोन तरूणांपैकी एकाने विचारलं. असतील पंचवीस सव्वीसची. बाईकची नंबरप्लेट पुण्याची, म्हणजे हे कोकण फ़िरायला म्हणून आलेले असणार.
“नाही, तसं काही नाही. सहज थांबले होते” मी उत्तर दिलं.
“मॅडम, काहीही प्रॉब्लेम असेल तर सांगा, आम्ही नक्की मदत करू. आम्ही चांगल्या घरातली मुलं आहोत.” आता दुसरा म्हणाला.
मला हसू आलंच. अगदी मनापासून. “खरंच काहीही प्रॉब्लेम नाहीये. गाडी व्यवस्थित आहे, थोडा वेळ कंटाळा आले म्हणून थांबले होते. डोंट वरी, मी याच गावाची आहे. आता घरीच निघतेय. विचारल्याबद्दल थॅन्क्स!!”
दोघांनाही मी हात हलवून बाय केलं. दोघं आपल्या वाटेने निघून गेली. दूरवर जाताना त्यांची बाईक धुरकट दिसत दिसत नाहीशी झाली.
“आम्ही चांगल्या घरातली मुलं आहोत” या वाक्याने मला परत एकदा हसू आलं. रस्त्यामधे एखादी मुलगी उभी आहे, आपण तिला मदत करावी असं ज्यांना वाटलं त्यांना परत आम्ही चांगल्या घरातली मुलं आहोत असं का सांगावंसं वाटलं असेल? किंवा मग दुपारच्या अशा वेळेला एखादी मुलगी रस्त्यामधे काहीही कारण नसताना थांबलीच कशी असेल हा प्रश्न पडला असेल का त्यांना? हे असं “मै और मेरी तनहाई” टाईप मोमेंट्स फ़क्त कथा कादंबयामधेच असतात असं लोकांना का वाटत असतं कुणास ठाऊक?
ही दोन्ही मुलं निघून गेल्यावर आजूबाजूला पुन्हा एकदा ती शांतता पसरली. दूरवर कुणीही नाही, मी, कातळ, समुद्र आणि आकाश सोडल्यास. आणि या सर्वांसोबत मी होते. कशासाठी थांबले होते मी? निसर्गसौंदर्य अथवा सृष्टीसौंदर्य बघण्यासाठी नक्कीच नाही? कारण डोळ्याच्या समोर होता तो कोरडाठाक माळ. बघण्यासारखं काहीही नसलेला, तरी या सगळ्या रूक्षपणामधे एक आगळा डौल होता, बेफ़िकीरी होती, एक माज होता.
मनाला जे कायम आनंद देतं असं दृष्य कायम बघावंसं वाटतं यात नवल ते काय...पण त्याहून जास्त मनाला ज्याची हुरहुर लागते असं दृष्य कायम नजरेसमोर हवं असतं. समोरचा निसर्ग पण असाच होता, उघडाबोडका, पण तरीही मला कोड्यात टाकणारा. काहीतरी अपूर्ण असलं की पूर्णत्वाची लागलेली आस का हवीशी वाटते? मध्यान्हीचा सूर्य त्याच्या शेड्युलप्रमाणे चालला होता. उन्हाळा त्याच्या शेड्युलप्रमाणे चालला होता. दुपारनंतर संध्याकाळ येणार, उन्हाळ्यानंतर पावसाळा येणार... हे त्यांना चांगलंच माहिती होतं. आपल्यानंतर काय या प्रश्नाचं उत्तर माहित असलं की या चक्रावरचं हे धावणं सोपं पडतं का? मुळात या चक्रावर सतत धावत रहायला हवंच का? या दुपार उन्हाळा वगैरे मंडळीचं जाऊन द्या, पण आपण? आपण तरी थांबू शकतो ना असं धावणं. हे झालं की ते झालं मग परत हे हवं म्हणून त्याच्यापाठी. धावत रहायचं. सतत धावत रहायचं. अजिबात कधीही न थांबता..
जगातले सगळे तत्त्वज्ञ कायम सांगत असतात, आयुष्य एकदाच मिळतं ते उपभोगून घ्या. पण आम्ही उपभोगापेक्षाही सेव्हींगवर जास्त नजर ठेवणारे लोक. आज कमावून घेऊ. उद्या म्हातारपणी आयुष्याचा आनंद घेऊ. म्हातारपण येतं की नाही त्याची कल्पनासुद्धा नसताना वर्तमानकाळाला दूर सारत भविष्यासाठी जगणारे. पण आजचा हा वर्तमान आणि त्या वर्तमानातला हा क्षण किती सुंदर आहे, किती महत्त्वाचा आहे याची जरादेखील तमा न बाळगता.
आज जर मी या अशा दुपारी इथे न थांबता गाडीच्या काचा वर चढवून एसी लावून या रस्त्यावरून या माळावरून निघाले तर या माळाला काही फ़रक खचितच पडणार नाहीये. मी इथे थांबून या उन्हामधे अशी एकटीच उभी राहून माझ्यापण आयुष्यामधे काही फ़ार मोठा फ़रक तसाही पडत नाहीये तरी मी इथे उभी आहे. स्वत:चीच सोबत घेऊन. स्वत:शीच संवाद साधत. हा क्षण महत्त्वाचा. संवादाचा. स्वत:शीच चालणार्या संवादाचा. आपल्याच मनाच्या डोहाचा तळ गाठत जाण्याच. स्वत:चीच ओळख करून घ्यायचा. हा क्षण महत्त्वाचा.
अजून जगण्यासाठी. अजून धावण्यासाठी. अजून प्रश्न पडण्यासाठी. अजून उत्तरं शोधण्यासाठी.
महत्त्वाचा आहे तो हा क्षुल्लक क्षण. या कडकडीत उन्हाच्या दुपाराने मला हा क्षण दिला.
गाडीत वाजलेल्या मोबाईलने माझी तंद्री भंग पावली. आईचा “कधीपर्यंत येतेस?” विचारायला फोन.
“निघालेच आहे. वाटेत आहे” मी उत्तर दिलं.
वाटेत तर आपण सारेच आहोत, प्रश्न हा आहे की वाटेवरून बाजूला सरून आजूबाजूला बघणार आहोत की नाही.
गाडी चालू केली, आणि माळावरून पुढे आले. हा सरळ रस्ता संपला, कोकणातल्या गर्द झाडीने वेढलेला वळणावळणावरचा रस्ता चालू झाला. पण ती दुपार तशीच तिथेच त्या माळावर पडून राहिली. त्या उन्हासकट, कातळासकट, निळ्या तलम आकाशासकट आणि चमचमणार्‍या समुद्रासकट.
फ़क्त मीच एकटी पुढे निघून आले होते.


Sunday, 5 January 2014

प्रेमकथा

“नवीन काही लिहिलंस?” तिनं विचारलं.

“हं”

“काय?”

“एक प्रेमकथा” तो त्याच्या नेहमीच्या शांत आवाजात म्हणाला. ती हसली. “प्रेमकथा आणि तू?”

“का? त्यात एवढं हसण्यासारखं काय आहे?”

“विश्वास बसत नाही. इतक्या दिवसांत कधी प्रेमकथा लिहिली नव्हतीस तू...”

तो गालातच हसला, तेव्हा तिने त्याच्या गालावरच्या खळीवर हलकेच टिचकी मारली. “ऐकव ना..”

“आता?”

“मग कधी? ऐकव पटकन!”

“मग ऐक, मधेमधे बोलू नकोस, आणि भलतेसलते प्रश्न विचारू नकोस”

“वा! वा!! इरशाद” ती पटकन बोलून गेली. त्याने तिच्या डोक्यात टपली मारली. “असला वात्रटपणा करशील तर मी नाही ऐकवत.”
“सॉरी” ती त्याचेच कान पकडत म्हणाली. “आता अजिबात बोलणार नाही..” त्याने एक क्षण तिच्या डोळ्यांत पाहिलं. तिच्या हसर्‍या डोळ्य़ांत त्याचाच चेहरा नाचत होता.

“एक दुनिया होती. वेगळीच, दूर कुठेतरी. सुरूवात, शेवट, आदि, अंत काहीही नसलेली. एखाद्या विस्तीर्ण अवकाशासारखी ती दुनिया. एक वेगळंच विश्व होतं ते. त्या दुनियेमधे दोन जीव असेच फ़िरत होते. कशासाठी? कुणासाठी? त्यांनापण माहित नव्हतं. कधीपासून? कधीपर्यंत? तेही माहित नव्हतं. पण ते असेच फ़िरत होते. खरंतर तरंगत होते. कारण या दुनियेला जमीन नव्हती, आकाश नव्हतं, होतं ते फ़क्त चारी बाजूंना पसरलेलं क्षितीज.” ऐकता ऐकता तिने डोळे मिटून घेतले. आता तिला फ़क्त त्याचा आवाज तिच्या डोळ्यासमोर दिसत होता. “तर असेच हे दोन जीव एकमेकांसमोर आले. एके दिवशी. फ़िरता फ़िरता. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. दोघांनाही वाटलं... आपण ओळखतो एकमेकांना. काहीतरी ओळख आहे, पण नाही. दोघंही स्वत:लाच एकदम म्हणाले. “आपण तर एकदम अनोळखी आहोत” आणि ते आपापल्या मार्गाने पुढे निघाले. निघताना दोघांची नजर मात्र एकमेकांना भेटली. किती वेळ? निमिष हा शब्द म्हणायला जेवढा वेळ लागतो त्याच्या पाव शतांश वेळ. बट देन देअर वॉज मॅजिक... जादू झाली. त्या दोघांच्या नजरेतून एक ठिणगी जन्मली. स्पार्क! केवढी होती ती ठिणगी. एवढीशी, चिमुकली. पण जादू होती खरी. जादू! ती ठिणगी मोठी मोठी होत गेली. इथे आपल्या त्या दोन अनोळखी जीवांना माहितच नाही, ते आपले फ़िरतातच आहेत तिकडे भलतीकडे. काहीतरी शोधत. आणि इकडे ही ठिणगी इतकी मोठी झाली.... की तिचे हजारो तुकडे झाले. हजारो तुकड्यांचे परत हजार तुकडे. त्यातल्या एका तुकड्याचा बनला एक तारा, तेजस्वी, लकाकणारा. चमकणारा. तुझ्या डोळ्यांसारखा. मग त्या तार्‍याच्या भोवती अजून काही तुकडे जमले. त्यातला एक निळा तुकडा होता, त्यावर सृष्टी तयार झाली. तिथेच का? कुणालाही माहित नाही. हजारो रंगांची, लाखो क्षणांची, करोडो श्वासांची सृष्टी....” बोलता बोलता तो थांबला.

“आणि मग?” तिने मिटलेले डोळे उघडत विचारलं.

“ते अनोळखी जीव असेच कधीतरी फ़िरत फ़िरत त्या निळ्या तुकड्याजवळ आले, आणि योगायोग बघ, दोघांना पण ही नवीन दुनिया प्रचंड आवडली. दोघंही इथेच रहायला आले. इथल्या दुनियेचेच बनून. आणि मग एके दिवशी अजून एक जादू झाली... इथेच राहत असताना ते एकमेकांना भेटले. अजून एकमेकांसाठी अनोळखीच होते ते. पण त्या नजरेने दुसर्‍या नजरेला लग्गेच ओळखलं. हीच ती जादू करणारी नजर. हीच ती फ़ुलबाजीसारखी ठिणग्या उडवणारी नजर.. हीच ती....” तो तिच्या डोळ्यांत बघत म्हणाला, “हीच ती... स्वतंत्र दुनिया वसवणारी नजर... हीच ती.. इतकी वर्षं शोधत असलेली नजर..”

तिच्या डोळ्यांत पाणी तरारलं. “हीच ती... नजरेने नजरेला भिजवणारी नजर, आणि मग ते दोघं अनोळखी राहिलेच नाहीत.. या नजरेनेच कधीचेच एकमेकांचे होऊन गेले.” तो हलकेच म्हणाला आणि पुढे होऊन त्याने तिच्या गालावर ओठ टेकले.

ती हसली. थोडीशीच. “काहीही...” डोळ्यांतलं पाणी पुसत ती म्हणाली. “ही अशी प्रेमकथा? कोण वाचेल?”

“तू ऐकलीस ना? मग अजून कशाला कुणी वाचायला हवी?” तो म्हणाला.

“काहीही...” ती परत म्हणाली. “असं थोडीच घडत असतं कुठे?”

“पण कुठेही असं घडतच नसतं, असंही नाही ना.......” तो म्हणाला.  

Thursday, 2 January 2014

राधा

एक ओढ लागते मनाला...

तुझ्या दर्शनाची..

कधी गेला होतास तू इथून? किती दिवस, किती महिने, किती वर्षं, हिशोब तरी आहे तुला.

माझ्याकडे आहे. त्या प्रत्येक क्षणाचा, त्या प्रत्येक निमिषाचा, डोळ्यांतून झरलेल्या प्रत्येक अश्रूचा.. माझ्याकडे आहे  हिशोब.

एवढ्यात विसरलास का रे मला? कधीकाळी तुझ्या मुखातून पडणारा पहिला शब्द माझ्यासाठी होता, तुझ्या तेजस्वी डोळ्यांतला प्रकाश माझ्या स्वप्नात होता. होते आणि तुझ्या बासरीची धुन माझ्या श्वासात होती. आज ते शब्द आहेत, स्वप्नं आहेत आणि तेच श्वास आहेत. नाहीयेस तो फ़क्त तू.

वेशीपलिकडे तू गेलास तरी मागे वळून पाहिलं नाहीस. दूरदेशी निघालास... आणि मी मागेच राहिले. एवढं बळ नव्हतं माझ्यात की मी तुला म्हणावं. “सरक!मीपण येते तुझ्यासोबत” पण तू तरी मला म्हणालास का रे माझा हात धरून? “चल माझ्यासोबत” जगाच्या अनादिअनंतापर्यंत कुठेही तुझ्यासोबत आले असते, कसल्याही मार्गावरून केवळ तू पुढे आहेस म्हणून चालले असते. आणि कसल्या संकटांना केवळ तू सोबत आहेस म्हणून भिडले असते. क्षितीजाच्या अंतापर्यंत आणि जगाच्या कूठल्याही टोकापर्यंत. कशालाच घाबरले नसते. जर  तुझी साथ असती तर... तू सोबत असतात तर.. तर.. तर.. -शेवटी या जर-तरच्याच गोष्टी.


पण तुझी साथ नाही.. हेच एक विदारक सत्य. या गावामधे, या घरामधे, या मनामधे... आता फ़क्त मीच आहे. एकटी. एकाकी. तू फ़ार मोठा झालास म्हणे. कित्येक आयुष्यांचे निर्णय हल्ली तुझ्याच मर्जीने होतात. पण मग या एका साध्या क्षुल्लक जीवाचा निर्णय करायला तुला एवढा वेळ का लागतोय? काय मागितलंय मी तुझ्याकडे? केवळ तुझं एकवार दर्शन. केवळ तुझी सस्मित मुद्रा डोळ्यांमधे साठवून घेण्याचं भाग्य. एकदा तुझं दर्शन घडू देत, आणि तोच श्वास अखेरचा असू देत, ही मागणी माझी. पण अद्याप ती तुझ्या कानांपर्यंत गेली नाही...

किती वेळ मी अशीच तडपत राहू? किती वेळ मी अशीच स्वत:शी झुंजत राहू? खिडकीमधून येणारा वारासुद्धा हल्ली मला बघून हसतो. “अगं वेडाई, मी त्याच्याच गावाकडून आलो, त्याला पाहून आलो” त्याच खिडकीतून अंगणभर सांडलेलं चांदणंसुद्ध हेच सांगतं.. “आम्ही भेटलो बरं का त्याला” आणि मी मात्र इथे तुझ्या दर्शनासाठी वाटेवर नजर पसरून बसले आहे. एक एक श्वास मोजत.

परत एकदा डोळ्यांतून पाणी येतं. स्वत:च्याच दुर्भाग्याची दया येते. कित्येकदा वाटतं इथून उठावं, रस्ता फ़ुटेल तिथे निघून जावं. कुठलातरी एक रस्ता असेल, जो तुझ्या घराकडे जात असेल. कुठलीतरी एक वाट असेल ज्याच्या शेवटी तुझे चरण दिसतील. हृदयाच्या कोपर्‍या कोपर्‍यामधे जपून ठेवलेल्या तुझ्या स्मृती वेळीअवेळी नजरेसमोर येत जातात. माझ्या नकळत माझ्या मनावर साम्राज्य करतात, आणि मग सगळं जग म्हणतं ती बघा चालली, अजून एक वेडी. त्याच्यापायी.

वेड लागेल नाहीतर काय? तुझ्यापासून दूर गेल्यावर काय अवस्था होते याची तुला कधी कल्पना तरी आहे? कधी मागे वळून पाहिलंस? कधी पाहिलंस की तुझ्या पायाने तुडवली गेलेली फ़ुलं अजून कशाच्या प्रतिक्षेमधे आहेत? निव्वळ तुझ्या दर्शनाच्या आशेने जिवंत जळणारी मी तुला अजूनही दिसत नाही का?

पंचमहाभूतांवर  ज्याची सत्ता आहे, त्याला मला एकहीवेळ दर्शन देता येऊ नये? माझ्यासाठी त्याच्या व्यग्रातिव्यग्र दिनक्रमातून थोडावेळ काढता येऊ नये.. की मग त्याला आवश्यकताच भासत नसेल. कोण आहे मी आता त्याच्या लेखी? संपूर्ण देशामधल्या लावण्यवतींचा खजिना त्याच्या अंत:पुरामधे वसलेला आहे. ज्याच्यासमोर साक्षात रतीमदनाने नतमस्तक व्हावं असा तोच मुळात सौंदर्याचा पुतळा आहे... राजबिंडा, काळासावळा, चेहर्‍यावर सदैव असलेलं ते खट्याळ हसू. त्याला माझी चिंता कशाला?
मी डोळे मिटून तुझा चेहरा आठवतेय. विश्वास बसतोय? मी तुझा चेहरा आठवतेय.. जी गोष्ट कधी विसरलीच नाही ती आठवतेय... किती वर्षं झाली तुला पाहून... आता कदाचित बदलला असशील. पण माझ्या नजरेसमोर अद्याप तुझा तो एकच चेहरा दिसतोय.. माझ्याकडे अशा काही प्रेमानं पाहणारे- जणू काही अख्ख्या सृष्टीमधे मीच एकटी आहे, असं मला भासवणारी ती नजर. तुझीच ती मायावी नजर. एकदा या नजरेला नजर भिडली की ही अशी माझ्यासारखी अवस्था होते. ना धड जिवंत, ना धड प्रेत!  

मी धावत आरश्यासमोर जातेय. आरश्यामधे माझीच प्रतिमा माझ्याकडे उलट बघतेय. नाही.. मला नाही पहायचा हा चेहरा. मला दुसरा कुठलाच चेहरा आता पहायचा नाही  मला तो चेहरा पहायचाय. ज्याच्या दर्शनासाठी मी एक एक श्वास मोजतेय तो चेहरा. आरश्याच्या समोर पडलेली काजळाची ड्बी मी उचलली. यातलं काजळ माझ्याच गोर्‍या चेहर्‍यावर माखून घेतलंय. माझ्या काळ्याच्या चेहर्‍यासारखे... लांबलचक सरळ आणि मोकळे सोडलेले उचलून केस घट्ट बांधले.. कधीतरी तुला आठवत असतील का रे हे केस? तू हातात घेऊन कायम म्हणायचास “भगवान शिवशंकरांनी जसं गंगेला जटेमधे रोखलं तसं तुझ्या या केसांनी मला रोखून धरलंय....”
  
अंगावरच्या वस्त्रांची किती दिवस झाले मला शुद्ध नाहीच.... तरी आता धावत जाऊन कुठून तरी एक पिवळा शेला आणलाय. अगदी तुझ्यासारखाच. तू जसा नेसतोस तसाच नेसायला. गळ्यामधे तुझ्यासारखीच टपोर्‍या फ़ुलांची माळा घालतेय. आता यावेळी घरामधे कुठून आली ही माळ, माहित नाही. पण सुवर्ण मोती, चांदीपेक्षा तुला फ़ुलांचं भारी कौतुक, अगदी मला भेटायला येतानासुद्धा कायम वेगवेगळ्या रंगाची, वासांची फ़ुलंच घेऊन यायचास. “हे निसर्गाचं देणं आहे, त्याच्यासारखी कारागिरी कुणालाही करता येणार नाही” असं म्हणत. तुला किती प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचं अप्रूप, मग ती पक्ष्याची शीळ असो, वा नदीकाठी मिळालेला रंगीबेरंगी दगड. ही अख्खी सृष्टीच जणू तुला आनंद देण्यासाठी निर्माण झालेली.

खिडकीमधून एवढा वेळ येणारा वारा अचानक थांबलाय. चांदणं गायब झालंय. आत्ता इतके दिवस जपून ठेवलेलं ते एकुलतं एक मोरपीस मी बाहेर काढलंय, माझ्याच केसांत लावायला. आता फ़ार मोठा राजा झालास म्हणे. पण इथे असताना कुठे होता तुझ्याकडे मुकुट. एका गवळ्याचा पोर तू. रानावनात कुठेतरी मिळालेल्या मोरपिसाचेच अलंकार होते की तुझ्याकडे. आता ढीगाने असेल तुझ्याकडे अलंकार, पण हे असं सुंदर रंगीबेरंगी झळाळतं मोरपीस आहे का तुझ्याकडे? जसं आता या क्षणी मी तुझ्या कुरळ्या केसांमधे लावलं आहे अगदी तसं. तुझ्या निळ्या रंगाची सावली ज्यामधे पडली आहे तसलं मोरपीस.

आरश्यामधे मी हे रूप निरखतेय. केव्हापासून. काहीतरी कमी आहे. माझ्या सावळ्याच्या रूपामधे आणि या रूपामधे काहीतरी कमी आहे. अचानक आठवलं. ठेवलीये... मी तीसुद्धा जपून ठेवलीये. अशीच कुठेतरी. सगळं घर शोधायला लागलं तरी हरकत नाही. इथेच.. याच ठिकाणी ठेवली आहे. सापडली. हीच ती तुझी बासरी... इथून जाताना इथलं काहीही घेऊन गेला नाहीस. ही बासरी पण इथेच ठेवलीस. माझ्याशिवाय लाख करमत असेल तुला. पण हिच्याशिवाय कसं करमतं रे तुला? तुझ्या व्यक्तीमत्त्वाचा अविभाज्य हिस्सा असल्यासारखी ही बासरी.

माझ्यापेक्षा जास्त वेळा तुझ्या हातामधे असलेली. तुझ्या ओठांना नित्य स्पर्श करणारी ही बासरी. आता हातात घेतल्यावरपण तुझाच स्पर्श जाणवून देणारी. सहज ओठांना लावली तर अचानक तीच धुन उमटली... तुझ्या श्वासांची लय असलेली धुन... असं वाटलं जणू तुझ्या विशाल छातीवर माझं डोकं ठेवून मी तुझ्याच हृदयाचे ठोके ऐकतेय. माझ्याच नावाच्या लयीत पडणारे ठोके. 

तू कुठे आहेस? केव्हाची शोधतेय मी तुला... भान हरवून चारी दिशांना बघतेय. घरातल्या प्रत्येक खिडकी दरवाज्यामधे तुला धावत शोधतेय. तुला तुझ्या नावांनी हाक मारतेय. तू तुझं नाव पण बदललंस का? कुठल्या नावाने तुझा पुकारा करू? कुठल्या दिशेने तुला आवाज देऊ.. ये. ये. आता तरी ये. नको अजून त्रास देऊन. संपवून टाक हे सगळं. अजून काहीही इच्छा राहिलेली नाही. फ़क्त एकवार.. फ़क्त एकवार तुझं दर्शन.
एवढ्या साध्या इच्छेमधे माझा आत्मा अजून अडकलाय, हे तुला अजून समजलं नाही.. की समजून उमजून पण तू मुद्दाम आला नाहीस? कुठल्या जन्मातल्या कुठल्या पापांचा हा बदला आहे? सांग ना!!!

पण मग आता या क्षणी माझ्या नजरेसमोर या आरश्यामधे तुझं प्रतिबिंब कसं काय आलंय? तूच आहेस ना हा? कुरळ्या केसामधे मोरपिस लावलेला, पितांबरी शेला नेसलेला, रात्रीच्या आकाशासारखा काळा असलेला. तूच आहेस  ना हा?

हो.

हा इथे तूच आहेस. शेवटी माझी प्रार्थना ऐकलीस का? हीच तुझी ती स्निग्ध नजर. एखाद्या भोवर्‍यासारखी. स्वत:मधेच गुंतवून ठेवणारी. हीच ती गालावरची खळी, एखाद्याच्या जीवाला खोलवर घेऊन जाणारी. हेच ते स्मित, पौर्णिमेच्या चंद्रालाही फ़िकं पाडणारं.

आणि हाच तुझा चेहरा.

जो पाहण्यासाठी मी स्वत:ला इतके दिवस रोखून धरलं होतं. अजून तसाच आहेस तू. काहीही बदलला नाहीस. अजून तुझी कांती तशीच झळकतेय. अजून तुझं हसणं तितकंच जीवघेणं आहे. अजून तुझे बाहू मला पाशात घेण्यासाठी तत्पर आहेत. अजून तू तसाच आहेस. कित्येक वर्षापूर्वी तुला पाहिला होता तसा... तसाच दिसतो आहेस अगदी.

तुझं हेच रूप पाहण्यासाठी तर आजवर इथे राहिले होते. आता कशाचीच गरज नाही. कशाचीच. ना जगण्याची. ना मरण्याची. आहे तो काळ इथेच थांबावा. आणि मी इथेच स्थिर अशीच उभी रहावी. तुझं हे रूप माझ्या डोळ्यांत साठवत. तुझ्यामधे स्वत:ला हरवत आणि माझ्यामधे तुला शोधत. अशीच. कायम. कायम.  

( समाप्त) 

Tuesday, 24 December 2013

आम्ही माडिया


गेल्या महिन्यामधे कोर्सेरावरचा “मानवी इतिहास” हा ऑनलाईन कोर्स केला, त्यामधे मानवाची उत्क्रांती कशी होत गेली, तो भटक्या प्राण्यांपासून एका ठिकाणी राहून शेती करणारा प्राणी कसा बनत गेला याचा सगळा रंजक इतिहास होता. या इतिहासाकडे पाहताना लक्षात आलं, माझेदेखील पूर्वज (म्हणजे माझ्या आज्याचा आज्याचा आज्याचा आजा वगैरे वगैरे) कधीतरी या संस्कृतीचा भाग असणार. माझ्या एखाद्या पूर्वजन्मामधे या आदिम संस्कृतीमधे मी नक्की काय करत असेन वगैरे बरेच प्रश्न मला पडत असतात. त्यातच हाती आलं ते समकालीन प्रकाशनाने प्रसिद्ध केलेलं एम डी रामटेके यांचं आम्ही माडिया हे पुस्तक.


रामटेके यांची प्रत्यक्ष भेट कधीही झाली नसली तरी आंतरजाल, फ़ेसबूक, त्यांचा ब्लॉग यामुळे आमची व्हर्चुअल ओळख आहे. “आम्ही माडिया” हे त्यांनी लिहिलेलं पहिलंच पुस्तक समकालीन प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. सोशल मीडीयामधे रामटेकेंनी अधूनमधून सांगितलेले त्यांच्या आयुष्यातले काही किस्से वाचून हे पुस्तक वाचण्यासाठी “मस्ट” या यादीत होतंच.  तसंही आपल्याला आदिवासी संस्कृती म्हटलं की डोळ्यासमोर काही टिपिकल इमेजेस येतात. जंगलातलं वास्तव्य, शिकारीवर अवलंबून असणारी, निसर्गपूजक आणि बॉलीवूडवाल्यांचा आवडता डोक्यावर पिसे खोवून केलेला आदिवासी डान्स. आदिवासी म्हणजे नक्की कोण? आपल्यासारखीच काही माणसं, जी जगण्यासाठी आजही निसर्गावर जास्त प्रमाणावर अवलंबून आहेत. ज्यांची संस्कृती आणी आपली संस्कृती यामधे जमीन अस्मानाचा फ़रक आहे याहून जास्त काही माहित नव्हतं.


आम्ही माडिया पुस्तक वाचताना माडिया या गोंडवनातील आदिवासींच्या जीवनशैलीची एक वेगळीच ओळख होत जाते. रामटेके हे स्वत: या आदिवासी समाजाचा हिस्सा आहेत, त्यामुळे हे लिखाण “अभ्यासक” या भूमिकेतून न मांडता, रामटेके यांच्या स्वत:च्या आयुष्यातील काही प्रसंग, काही दंतकथा आणि काही पद्धतींची माहिती अशा स्वरूपात आहे. मुळात या आदिम भावजीवनाचं विश्वच वेगळं आहे, श्रद्धा-अंधश्रद्धा वेगळ्या आहेत. कुठल्याही आदिम संस्कृतीचे असतात तसे याही संस्कृतीचे काही प्रमुख रीतीरिवाज आहेत. त्यातले कितीतरी रिवाज आपल्याला गमतीशीर वाटतात, काही क्रूर वाटतात तर काही रिवाज समजल्यावर तथाकथित भारतीय संस्कृतीरक्षकांची प्रतिक्रिया काय असेल असा गमतीदार प्रश्नदेखील पडतो. गेल्या शतकभरामधे उदयाला आलेल्या ग्लोबलायझेशनच्या परिणामांमुळे इतकी शतके वेगळी राहिलेली जगभरातली आदिम संस्कृतीदेखील बदलत आहे, तसेच या आदिवासींच्या जीवनशैलीमधे मूलभूत बदल होत आहेत. त्यांचे जगणं बदलत आहे, शतकांपूर्वीपासून असलेल्या जुन्या पद्धती सहजासहजी सोडल्या  जात आहेत. नवीन विचारांचा स्वीकार करून मुख्यधारेमधे येण्याचा प्रयत्न केला आहे. पण या सर्व बदलांमधे हजारो वर्षांपासून जपून ठेवलेला अनोखा सांस्कृतिक वारसादेखील नाहीसा होत आहे, याची खंतदेखील त्यांना आहे. रामटेके यांचे आम्ही माडिया हे पुस्तक अशा स्थित्यंतरामधे असलेल्या समाजाचे एक उत्तम डॉक्युमेंटेशन करते. जिथे आजही जगण्यासाठी जंगलामधे जाऊन शिकार करावी लागते, जिथे आजही पुटुल सारख्या नागरी जीवनाला न पटणार्‍या पण माडीया समाजाच्या दृष्टीने प्रचंड महत्त्वाच्या पद्धती चालू आहेत असा समाज जेव्हा बदलतो तेव्हा कशापद्धतीने बदलतो हे वाचणं खूप रोचक आहे. ऐंशीच्या दशकामधे शाळा म्हणजे काय ते समजलेला हा समाज आज विविध क्षेत्रामधे प्रगती करत आहे, शिकत आहे, बाहेर पडून जग अनुभवतो आहे, आणि तसंच नक्षलवादसारख्या समस्या झेलतो आहे. पण काहीही असलं तरी हा समाज निराश आणि हताश असा मात्र अजिबात नाही.


सर्वसाधारण मराठी माणसाला माडिया संस्कृतीची माहिती आहे ती प्रकाश आमटे यांनी चालवलेल्या लोकबिरादरी या प्रकल्पामुळे. डॉ. प्रकाश आमटे यांनी केलेल्या नि:स्पूह कार्यामुळे या आदिवासांच्या आरोग्य, शिक्षण या बाबींमधे विकास झालेला आहेच त्याशिवाय मुख्य म्हणजे त्यांच्या परीघातल्या वर्तुळाबाहेर पडून हे आदिवासी जग पहायला शिकत आहेत. ज्या गावात आजही बस नाही, टेलीफोन नाही अशा गावातल्या एका तरूणाने जिद्दीने शिकून मल्टिनॆशनल कंपनीमधे नोकरी करतो, आणि त्याच्याच नजरेमधून दिसलेलं हे आदिवासी आयुष्य आपल्यासमोर मांडतो. इथल्या कित्येक पद्धती, श्रद्धा-समजूती यांचे मिश्किल शैलीमधे केलेले खुमासदार किस्से खरंच भन्नाट आहेत. त्यातही मेंदूला गोळी लागलेला वाघ गुरांच्या कळपात येऊन राहतो हा किस्सा अक्षरश: अविश्वसनीय आहे. अख्ख्या गावामधे आलेली भितीची लाट माझ्यासारखी शहरी मुलगी कल्पनादेखील करू शकत नाहीपण तरीही वाचताना मनापासून हसू मात्र येतं. या पूर्ण गोष्टीवर एक उत्तम ऍनिमेटेड सिनेमा तयार होऊ शकतो. डिस्नेवाले, ऐकत आहेत का?


गावातल्या बहुतेक पद्धती या अगदी काळ्या दगडावरची पांढरी रेघ या मताने आजवर चालत आलेल्या आहेत, माडीयांची गोत्रपद्धती घरामधे किती देव यावरून ठरते. त्यावरून नाती ठरवली जातात. तसंच, पुटुल ही पद्धत लग्नाची पद्धत मात्र खरंच खूप विचित्र आहे, मुलीच्या मुलीला सून करून आणायची पद्धत बर्‍याच समाजांमधे दिसून येते- पण तिथे हो/नाही म्हणण्याचा पर्याय असतो. माडीयांमधे मात्र हा हक्क हो पुटुल नावाने ओळखला जातो आणि तो नाकारता येत नाही. त्यामुळे कित्येकदा विजोड वयाची जोडपी (तीदेखील सख्खी आते मामे भावंड) अशी दिसतात. नवरी नवर्‍यापेक्षा दहा बारा वर्षापेक्षा मोठी असू शकते, तरीही तिला ते लग्न करावंच लागतं. मात्र, अविवाहित तरूण तरूणींना इथे लैंगिक स्वातंत्र्य असते, तसेच लग्नाआधी गर्भार होणे ही काही सामाजिक आपत्ती वगैरे मानली जात नाही. माडिया आदिवासींच्या विवाह पद्धतीचं अजून एक वैशिष्ट्य “लोन आळियना”  (घरात घुसलेली स्त्री) वाचताना मला वेगळ्याच समाजातली पण अशीच मनमानीपणाने जगणारी गोनींदांची चिंगी डोळ्यासमोर येत होती. अशी स्त्री घरात घुसली तर मात्र तिच्या नवयाला पुटूल हक्क उपस्थित झाला तर त्याचे पैसे द्यावे लागतात. रैके तेंडणा ही मात्र थोडी विचित्र पद्धत, माडियांमधे विवाहित स्त्रीला पोलके घालायची पद्धत नाही. लग्नाच्या विधीमधे पोलके उतरवण्याचा विधी असतो तोच हा रैके तेंडणा. विवाहित मुलीने उघड्या छातीने वावरणं म्हणजे शालीनता असे हा समाज मानत असला तरी सध्या शाळेमधे शिकलेल्या मुली या पद्धतीला विरोध करत आहेत. अशीच विरोधामधे उभी राहिलेली कुम्मे जेव्हा गावामधे पोलकं घालते, आणि तिचे पाहून इतर विवाहित स्त्रियादेखील पोलके घालायला लागतात, तेव्हा एक लढा जिंकला जातो. माडिया असो वा दिल्लीमधली मुलगी तिला “आम्हाला आमच्या मनाप्रमाणे वागू द्या” यासाठी लढा हा द्यावाच लागतो हेच खरं. याच प्रकरणातला “ढगल्या” हा भाग मुळातून वाचण्यासारखा आहे. माडियांमधे “लग्न” हा विधी वेगळा, आणि स्त्री-पुरूषाचं एकत्र सहजीवन वेगळं. त्यामुळे दोन तीन मुलं झाल्यावरदेखील लग्न केल्याचे किस्से वाचून मजा वाटते.
रामटेके यांची भाषा अगदी मिश्किल आहे, अगदी दु:खी अथवा वाईट प्रसंगाचं वर्णन करतानादेखील त्यांच्या स्वभावातला मिश्किलपणा जाणवत राहतो. माडियांच्या कित्येक श्रद्धा समजुती सांगताना  रामटेके “माझ्या या गोष्टींवर विश्वास नाही” अशी सरळ कबूली देतात. पण माडीयांच्या अंधश्रद्धांना तर्काची कसोटी लावताना कुठेही ते चॆष्टा अथवा टिंगल करत नाहीत. या श्रद्धा समजुती हजारो वर्षापासून चालत आलेल्या असूनदेखील आता माडीयांचा त्याबद्दलचा दृष्टीकोन हळूहळू बदलत असल्याचेही नमूद करतात.


या पुस्तकाच्या बाबतीत माझा छोटासा का होइना एक अपेक्षाभंग मात्र झाला. आम्ही माडिया या पुस्तकामधे माडिया संस्कृतीबद्दल जी माहिती मिळते ती लेखकाच्या अगदी फ़र्स्ट हॅन्ड अनुभवातून आलेली आहे, तरीही मधेच लेखक नुसती माहिती देत जातो ते प्रचंड खटकते. लेखकाकडे सांगण्यासारखे प्रचंड अनुभव असताना अधून मधून “आमच्यात अशी अशी पद्धत आहे” वगैरे रटाळ माहिती येत जाते. लेखकाला या आदिवासी संस्कृतीमधून बाहेर आल्यावर बसलेले काही कल्चरल शॉक्स आणि त्यातले काही किस्से-खास करून आपल्या नागरी जीवनातल्या दांभिक वागणुकीचे-  ऐकल्यावर पुस्तकामधे देखील असे काही असेल अशी फ़ार अपेक्षा होती, ती मात्र पूर्ण झाली नाही. मधेच लेखकाच्या आयुष्यातले काही प्रसंग आणि मधेच नुसती माहिती देणारी प्रकरणं यामुळे वाचताना मधेच फ़ार कंटाळा येतो.

हा एकमेव थोडासा नकारात्मक भाग सोडला तरीही एकंदर पुस्तक वाचण्यासाठी मी नक्कीच रेकमेंड करेन. माडिया संस्कृतीच्या जगण्याची, झुंजण्याची आणि तरीही आलेला प्रत्येक दिवस आनंदाने जगण्याचा प्रयत्न करणार्‍या माडियांचं आयुष्य समजून घेण्यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयोगी पडेल असे आहे. 



Monday, 9 December 2013

समुद्र किनारा (भाग १०)

वीर कपूर चालत चालत कंपाऊंडच्या बाहेर आला आणि अचानक थांबला. पायातले बूट काढून त्याने कंपाऊंडच्या आत फ़ेकले आणि उघड्या पायांनी तो वाळूतून चालायला लागला. सकाळचे साडेसहापण अजून वाजले नव्हते, पण बर्‍यापैकी उजाडलेले होते. समोरचा समुद्र अजून आळसावल्यासारखाच होता. इतक्या पहाटे या प्रायव्हेट बीचवर अजून कुणीही नव्हतं, त्याच्याशिवाय. तो दूरवर वाळूमधेच बसला होता. वीर चालत चालत त्याच्या बाजूला जाऊन उभा राहिला.
“हॅलो, मिस्टर नदीम शेख. हीअर वी मीट अगेन” वीर म्हणाला.
त्याने मान वळवून वर पाहिलं आणि तो हसला.. “वीर. शादी मुबारक!” तो बसल्याजागीच म्हणाला.
“आल्याबद्दल धन्यवाद.” वीर म्हणाला. बोलताना “बस ना,” तो म्हणाला पण वीरची नजर त्याच्या हातातल्या सिगरेटवर होती. “स्मोकिंग?” वीरने उभं राहूनच विचारलं.
“आजची लास्ट!”
“यु आर इम्पॉसिबल!! मुद्दाम करतोस का तू हे सगळं. तुला माहित आहे आज माझं.....”
“आज तुझं लग्न आहे ही एकच गोष्ट मला माहित आहे वीर. आणि म्हणूनच या लग्नाच्या आधी मला तुला भेटायचं होतं!”
“कशासाठी? झाली तेवढी कॉम्प्लिकेशन्स बास नाही का झाली तुला? अजून काय हवंय? सुखाने जगू देत ना आम्हा दोघांना” वीर वैतागून म्हणाला. “आय ऍम सॉरी.. चुकून बोललो मी..”
“त्यासाठीच तर आज मी इथे आलोय. तुम्हाला दोघांना सुखाने जगता यावं म्हणून.”
वीर त्याच्या बाजूला वाळूत बसकण मारत बसला.
“मी इथे आलोय हे सरस्वतीला सांगितलं नाहीस ना?” त्याने विचारलं.
“तूच मला ऑर्डर केली होतीस. नको सांगूस म्हणून. पण मला माहित आहे, ती कालपर्यंत तुझा फोन ट्राय करत होती. तुझा नंबर लागला नाही म्हणून तुझ्या घरी पण फोन केला होता तिने... पण तू इथे आलास ते तिला का नाही सांगायचं?”

तो फ़क्त हसला. “माय फोन इज डेड, अनलाईक मी. मी इथे आलो होतो आणि तुला भेटलो होतो हे तिला कधीच सांगू नकोस. आणि आता यापुढे तुमच्या दोघांच्या आयुष्यामधे मी परत येणार नाही.”
“असं दर वेळेला म्हण तू. दरवेळेला. जर तुला माहिती होतं की आज आमचं लग्न आहे, तर मग....”
“तरी मी तुला का सांगितलं की मी इथे येणारच म्हणून? तू नको म्हणत असताना सुद्धा, मुद्दाम फ़क्त तुला भेटायला म्हणून मी का इथे आलो? का मी परत परत तुझ्या आणि सरस्वतीच्या आयुष्यामधे येऊन विष घालतो आहे... का मी एकदाचा मरून जात नाही? हेच सगळं म्हणायचं आहे ना तुला?”
“नदीम, प्लीज... तुला मी इथे येऊ नको म्हटलं नाही... कालपण तुझा मेसेज आल्यावर तुला ये असाच रीप्लाय केला होता. तुझ्यामधे आणि सारामधे असलेलं नातं मला चांगलंच माहित आहे... साराच्या बोलण्यामधे तिच्या साहिलचं नाव नसेल असं एकही वाक्य नसतं.. आजही ती तुझ्यावर तितकंच प्रेम करते जितकं तू तिच्यावर!”
“पण त्या प्रेमाला काहीही भविष्य नाही”

वीर हसला, “असं म्हणत म्हणत तीन वर्षं गेली, नदीम.”
“….. तोच तर प्रॉब्लेम झालाय ना. हरामखोर त्या हॉस्पिटलवर केस ठोकणार आहे मी. आधी सांगतात सहा महिने... आणि अजून मी जगतोय त्याचं काय?”
“तू नंतरचा इतका विचार करतोस की आजचं जगणं विसरून गेलास”
“जगणं? म्हणजे नक्की काय असतं रे वीर? जन्माला आलो ते हार्टमधे काहीतरी सॉलिड प्रॉब्लेम घेऊन. नंतर काय सर्जरी वगैरे झाली तरी डॉक्टर म्हणाले फ़ार तर वीस-पंचवीस वर्षं जगेल हा. आणि म्हणून ती सगळी वर्षं नुसती अशीच गेली. अम्मीअब्बाच्या चिंतेमधे, काळजीमधे.. रात्र रात्र अम्मी जागायची, नमाझ पढायची, कशासाठी तर पोरगा वाचावा म्हणून. एवढी वर्षं सगळी न जगल्यासारखी. वीर, तुला आठवतं, शाळेत असताना तू सगळ्या स्पोर्ट्समधे कायम असायचाच, आणि मी मात्र कधीच नाही. जास्त धावलं की मला दम लागायचा म्हणून अब्बांनी शाळेला पत्रच देऊन ठेवलं होतं स्पोर्ट्सबद्दल...”
“आणि त्या मूर्खांनी ते इतकं सीरीयसली घेतलं की तुला त्या वर्षी चेसमधे पण खेळू दिलं नव्हतं” त्या आठवणीने वीरला हसू आलं.
नदीम पण हसला. “स्कूलचे दिवस माझ्यासाठी बेस्ट होते. कारण आधी कितीतरी वर्षं मला अम्मीने घराबाहेर सोडलंच नव्हतं कधी. सतत घरामधे. बाहेर गेला की आजारी पडेल म्हणून. म्हणून होम स्कूलिंग. पाचवीनंतर कुठे मला स्कूल कसलं ते बघायला मिळालं. असाच तर प्रत्येक दिवस जात होता वीर, मला अजून जगवण्यासाठी अम्मी अब्बा रोज झगडत होते. पैशाला कमी नव्हती, दुआंना कमी नव्हती, कमी होती ती माझ्या नशीबात. कधी कधी असं वाटायचं हे सगळं कशासाठी? आपण आज ना उद्या मरणार.. मरायचं आहे तर आपण आपल्या टर्म्सवर का नाही मरायचं. पण ते आमच्यात मान्य नाही.. हराम आहे! म्हणजे आला दिवस जगायलाच हवा. कसा का होइना, पण कधीकधी फ़ार विचित्र घडतं रे. मुंबईमधल्या पोल्युशनचा मला त्रास होतो असं वाटलं म्हणून अम्मी मला घेऊन तिच्या गावी गेली होती. अख्खा महिनाभर. असंच काही कामधाम नव्हतंच मला तिथे. अब्बांनी तर मला कॉलेजला पाठवायचंच नाही असं आधीच ठरवलं होतं. फ़ार वेळ जात नसेल तर म्हणाले कुठल्याही ऑफ़िसमधे येऊन बसत जा. घरचेच दोन तीन न्युजपेपर, आणि वर नवीन चॅनल चालू केलं होतं तेव्हा. तसंही घरामधे कुणी मला काही बोलणारं नव्हतंच. मी काम करावं वगैरे कुणाचं काही म्हणणं नव्हतं. पण मला ते करायचं पण नव्हतं. तेव्हा गावामधे असंच दुपारचं फ़िरत असताना मला ती दिसली. एका झाडाखाली बसलेली, आपल्याच विश्वात रंगलेली. पुस्तक वाचण्यामधे हरवलेली. सरस्वती. आयुष्यातले काही क्षण असे असतात की वाटतं याच क्षणासाठी तर आपण इतके दिवस जगत होतो.. माझ्यासाठी तो क्षण होता, वीर. मी तिला कितीतरी वेळ नुसता बघत होतो. डोळ्यांमधे साठवून घेत होतो. कुणाच्या प्रेमात पडण्याची, कुणासोबत आयुष्य घालवण्याची स्वप्नं रंगवण्याइतका खुळा तेव्हा नव्हतोच, सहा महिन्यांपूर्वी चेकप केलं होतं. सगळं नॉर्मल होतं, पण लाईफ़चं घड्याळ टिक टिक करत चाललंच होतं. तिच्याशी थांबून बोलणं म्हणजे आपलाच पाय खोलात घालणं हे पटत होतं, कळत होतं. पण वळत नव्हतं. नाही राहवलं मला. मी तिच्याकडे बघत बसलो आणि प्रेमात पडत गेलो. तिच्याकडून कसलीच अपेक्षा न ठेवता. तरीही त्यादिवशी तिच्यासोबत बोललो. बोलताना जाणवलं, ती पण आपल्या प्रेमात पडत आहे...पण तिने तोपर्यंत तिने एवढं सोसलं होतं की रस्त्याने जाणार्‍या कुणीही तिच्याशी दोन ओळी नीट बोललं असतं तरी त्याच्या प्रेमात पडली असती... पण नशीब माझंच फ़ाटकं. तेव्हा गावी असताना रोज तिला भेटायचो. मैत्री झाली, माझ्या भावना मी कधीच लपवल्या नाहीत. तिच्या भावना तिने कधीच सांगितल्या नाहीत... आणि गंमत माहीतीये, तिला मी तिच्या आयुष्यामधे मान्य होतो, पण माझा धर्म मान्य नव्हता. माझ्या नावामुळे तिच्या जुन्या आठवणींचे डंख तिला डसायचे, म्हणून तिने तिच्यापुरता मार्ग शोधून काढला, माझं नावच बदलून तिने स्वत:च्याच मनाची समजूत घातली, पण तिच्या मनातली खळबळ मला समजत होती. पण कुठल्या तोंडाने मी तिला कमिटमेंट देणार होतो? कसं तिला सांगणार होतो की धर माझा हात. मी तुला आयुष्यभर सांभाळेन, इथे माझ्याच दुसर्‍या दिवसाचा मला भरवसा नव्हता. पण कसं ते माहित नाही, त्या लढाईमधे माझ्याच प्रेमाचा विजय झाला. तिला घेऊन इथे मुंबईला आलो. माझ्या घरातला प्रत्येक जण तिला बघून खुश होता. ती स्व्त: इथे त्याहून जास्त खुश होती. तिला तिच्या मनाप्रमाणे तिला इथे जगता येत होतं. अब्बांनी सांगूनसुद्धा ती आमच्या पेपरमधे कामाला आली नाही. आधी स्ट्रगल केला, जेव्हा आमच्याकडे आली तेव्हा कुणालाही आमच्या दोघांबद्दल न सांगताच. जगातलं प्रत्येक सुख तिच्या पायाशी टाकण्याइतका श्रीमंत होतो, पण जेव्हा... जेव्हा...” बोलता बोलता तो अचानक थांबला. “.. जेव्हा मला ऍटॅक आला, आणि डॉक्टर म्हणाले, ऑलमोस्ट ओव्हर.. तेव्हा मात्र धीर खचला. मी सरस्वतीला सोडून जाणार ही कल्पनाच मला असह्य झाली... आणि त्यानंतर थोडे दिवस तिच्यापासून लांब राहिलो, एकदाचं मी तिला आमचं नातं संपलं म्हणून सांगून घराबाहेर पडलो. तिला माझ्याशिवाय जगणं भाग होतं. तिने जगण्यासाठी मी दूर जाणं आवश्यक होतं.. मी तीळ तीळ मरत असताना तिच्या डोळ्यांत स्वत:ला कधीच बघू शकलो नसतो..”
“त्याच रात्री तू माझ्या घरी आला होतास...” वीर म्हणाला.
“हो. कुठे जाऊ काय करू समजत नव्हतं! घरी गेलो असतो तर अम्मी-अब्बांनी सरस्वतीला खरं काय तेच जाऊन सांगितलं असतं. पार गोंधळून गेलो होतो. कुणाचाच काही आधार नव्हता... आजूबाजूला इतकी माणसं असतानासुद्धा एकटा पडलो होतो....”
“नदीम...” वीरने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. “मी तेव्हाही तुझा मित्र होतो, आजही आहे. तेव्हाच जर मी....”
“काय करणार होतास? माझा आजार तुला माहित होता. सरस्वतीबद्दल तुला सगळं सांगितलं होतं मी....”
“नदीम, खूप आधी, जेव्हा सारा नवीन होती इथे, तेव्हा एका पार्टीमधे तिला भेटलो होतो, तिने मला नाव सांगितलं... सरस्वती केळकर, ऍन्ड आय अल्मोस्ट आस्क्ड हर, तू नदीमची गर्लफ़्रेन्ड ना? पण नाही विचारलं ते एका अर्थाने बरंच झालं... नंतर राजनला सांगून तिला आमच्या टीममधे बोलावलं. तुझ्याशी बोलताना मला असं वाटायचं की ही सरस्वती मला खूप ओळखीची वाटते. माझ्यासारखीच तर आहे ती. मला बापाने सोडलं, तिला आईने. दोघांनाही सतत स्वत:ला खूप प्रूव्ह करत राहण्याची जिद्द आहे. माझ्या लाईफ़मधे रसिका पिलर होती, आणी सरस्वतीच्या लाईफ़मधे तू.... तू जेव्हा तिच्याबद्दल माझ्याशी बोलत रहायचास तेव्हापासून...”
“तेव्हापासून तू पण तिच्या प्रेमात पडत होतास, मला माहिती होतं, ट्रीटमेंटसाठी युकेला गेल्यावर माझ्याकडे फ़ार कमी ऑप्शन्स होते, मी त्यातला सगळ्यांत सोपा ऑप्शन निवडला, मरायच्या आधीच सरस्वतीला मी मेल्याचं खोटं सांगितलं. वाटलं, ती रडेल. दोन तीन दिवस, कदाचित आठवडाभर. आणि मला विसरेल. मुंबईला आल्यावर माझा आजार तिला समजला होता. हे होणार हे तिला माहितच होतं....”
“तरीपण... मी तेव्हाही तुला म्हटलं होतं नदीम. आपण फ़िल्मची स्क्रीप्ट नाही लिहत रीअल लाईफ़मधे. तुझी सरस्वती मरण्यासाठी म्हणून घराबाहेर पडली.... तुझे सगळे अंदाज चुकले साफ़. सरस्वती एक दोन दिवस रडून मग तिच्या साहिलला विसरणार नव्हतीच....”
“आणि तेव्हा तू तिच्या आयुष्यात आलास.... माझ्या मैत्रीखातर की तिच्याखातर... ते मला माहित नाही”
“दोन्ही चूक. सारा माझ्या आयुष्यात आली तीच मुळी माझ्यासाठी. साराने माझ्या आयुष्याला एक वेगळंच परिमाण दिलं. तिचं तिच्या साहिलवर प्रेम होतं, आजही आहे आणि उद्यापण राहिल. साराच्या मनामधे तुझी जागा कधीच मिळवू शकणार नाही. ती कायम स्वत:ला समजावत राहते, की माझ्यावर तिचं साहिलपेक्षा जास्त प्रेम आहे. पण तिच्या डोळ्यांत मला खरं काय ते दिसतं, तिच्या स्पर्शात ते जाणवत राहतं. ती माझ्यावर प्रेम करत नाही. मी तिचा कधीच नाही. कधीच.. मग स्वत:वरच चिडतो मी. मलाच प्रश्न पडतो... का मी या मुलीवर इतकं प्रेम करतो... तिच्या मनामधे तर दुसरंच कुणीतरी आहे. माझ्याशिवाय दुसरंच कुणीतरी... मग मला आठवतं त्या दुसर्‍या कुणालातरी.... तुला.... तिच्या आयुष्यातून बाजूला सारून तर मी तिच्या प्रेमात पडलोय. तुझा खूप राग येतो मग नदीम... खूप राग. मग तेवढाच राग साराचा पण येतो.. आणि सर्वात शेवटी स्वत:चा राग येतो.. कशाला आपण एवढं हिच्यावर प्रेम करतो..... कशासाठी?”
“वीर, प्रेम कोण कुणावर कशासाठी करतं हे जर माहित असतं तर लाईफ़ इतकं कठिण झालं असतं का रे? सगळी इक्वेशन्सच सोपी झाली असती ना...”
वीर यावर काहीच बोलला नाही. दूरवर उठणार्‍या समुद्राच्या लाटा बघत राहिला. कितीतरी दिवसांनी तो आणि नदीम असे भेटत होते. याआधी नदीम मुंबईत आलाय हे समजलं तरी वीर पेटून उठायचा, सारा कदाचित त्याच्या आयुष्यातून निघून जाईल, या एकाच भावनेने. पण आज सारा आणि तो लग्नाच्या गाठीमधे गुंतत असतानादेखील आलेला नदीम पाहून वीर चिडला नव्हता. कदाचित या सगळ्यांमधे सर्वात जास्त अन्याय त्याच्यावरच झाला होता म्हणून असेल. समोर बसलेला नदीम गेल्या चार महिन्यांमधे अजूनच थकलेला दिसत होता. त्याच्या वडलांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला तरी होणारी गोष्ट अटळ होतीच...
नदीमने हातातल्या घड्याळात पाहिलं.
“आठ वाजता राजन माझ्या कॉटेजवर येईल. मी तिथे नसलो तर तो शोधत इकडे नक्कीच येईल” वीर म्हणाला.
“आणि मला इथे बघून लगेच पॅनिक होइल.. घाबरू नकोस, मी तेवढा वेळ थांबणार नाही. तुझ्या लग्नाचा मुहूर्त एवढा महत्त्वाचा नाही, जितका माझ्यासाठी इथून जाण्याची वेळ आहे.” बोलता बोलता नदीमने अजून एक सिगरेट पेटवली
.
“मघाशी आजची लास्ट म्हणाला होतास ना?.."

“कमॉन, आजचा दिवसच लास्ट आहे माझा. काय बेक्कार लाईफ़ आहे रे माझं. मनासारखं व्यसन पण करता येत नाही. असं तुकड्यातुकड्यातून जगताना खरंच वैतागून गेलोय.”
वीरने त्याच्या हातातली सिगरेट घेतली आणि वाळून विझवली. “नदीम, एकदा भेट साराला. लग्नाआधी भेट. पुन्हा एकदा दोघंही विचार करा. तू निघून जाणं एवढाच रस्ता असू शकत नाही...”
यावेळी नदीम हसला. “आणि तुझं काय वीर? समजा, मी आणि सरस्वतीने लग्न करायचं ठरवलं तर तुझं काय होणार?”
वीरला काहीही उत्तर सुचलं नाही. “या कथेचा दुसरा कुठला शेवट असूच शकत नाही. वीर आणि सरस्वती. हे असं ऐन मोक्याचय वेळी नवरा नाहीतर नवरी बदलणं पिक्चरमधेच शोभून दिसतं.”
“मग आता नेक्स्ट काय?” वीरने विचारलं.

“सिंपल. तू इथून उठशील, मागे फ़िरशील आणि कॉटेजकडे चालत जाशील. फ़क्त एक प्रॉमिस करून. एकदाही मागे वळून पहायचं नाही...”
“आणि तू?”
“मी? मी पण सेम... इथून उठणार आणि सरळ चालत जाणार... मागे वळून न बघता...”
“वेडा आहेस का तू? आत्ता तर म्हणालास की आत्महत्या अलाऊड नाही तुमच्यामधे म्हणून.... आणी मग सरळ तू समुद्रामधे”
नदीम हसला. “येस, वीर. आता वेळ आली आहे साहिलने किनारा सोडायची. मी आत्महत्या करत नाहीये. मी फ़क्त चालत पाण्यात जातोय..”
“बट यु डोन्ट नो स्विमिंग, आणि तुझी कंडिशन.... नदीम... प्लीज! असला काही वेडेपणा करू नकोस.”
“वेडेपणा? हाऊ मेनी टाईम्स यु विश्ड? मी मरून का जात नाही असं कितीवेळेला वाटलं तुला? मग आज तुझी ती दुआ खरंच घड्तेय”

“नदीम. नो!” वीर ओरडला, “माझ्यामधे आणि सारामधे तू कितीही असलास, तरी मी तुला असं करू देणार नाही. हात जोडतो वाटलं तर आज माझं लग्न आहे आणि आज तू...”
“डोन्ट वरी, वीर. म्हणून तर मी घड्याळ बघतोय, करंटचा टाईम चेंज होइल, मी इथे सापडणार नाही. बॉडी किमान शंभरेक किमी तरी वाहील. दोन तीन दिवसांनी सापडेल. आय होप तोपर्यंत ईझीली ओळखू येणार नाही मी... तेव्हा सरस्वतीला तू सांगू शकशील. आज आता काहीच बोलायची गरज नाही तुला.”
“तुला मी इतका वाईट आणि दगडाच्या काळजाचा वाटलो का? तू इथे मरणाच्या गोष्टी करत असताना मी तिथे आनंदात लग्न लावून घेईन? आता ताबडतोब साराला इथे फोन करून बोलावतो. हा प्रश्न फ़क्त तुझ्या आणि माझ्या आयुष्याचा नाही, तिच्यापण आहे. तिलाच याचा डीसीजन घेऊ देत” वीरने खिशामधला मोबाईल काढला, नदीमने तो फोन लगेच हिसकावून घेतला.
“वेड मला नाही तुला लागलंय. काय बोलतोस तुला तरी समजतंय. सरस्वतीला इथे बोलावून तुला तुझ्याच आयुष्यात माती कालवायची आहे का? माझी लास्ट सर्जरी फ़ेल गेलीये. तसंही माझ्याकडे जास्त दिवस नाहीत...”
“मग जेव्हढे दिवस आहेत तेवढे.... आज आता या मरायच्या गोष्टी कशाला? असं करून तुला काहीही मिळणार नाहीच... कारण तू गेल्यावरपण सारा तुझ्यावरच प्रेम करत राहणार. तुझ्याच आठवणीत जगत राहणार.. मग काय फ़ायदा आहे?”
“क्लोजर वीर क्लोजर. तुला एक क्लोजर मिळेल. मी आता या जगात नाही, सरस्वतीला तुझ्यापासून दूर घेऊन जाणारं कुणीही या जगात नाही, याचं तुला क्लोजर मिळेल.”
“मला नकोच आहे. आज सारा माझ्यासोबत जशी आहे, तेवढ्यात मी खुश आहे. तू या जगात असल्याने अथवा नसल्याने तिच्या मनामधे असलेल्या तुझ्या प्रेमामधे अथवा माझ्या प्रेमामधे काहीच फ़रक पडत नाही”
“तुला पडत नसेल, पण मला पडतोय. एनीवेज, तुला प्रत्येक गोष्ट समजावत बसण्याइतका वेळ माझ्याकडे नाही. तुला पण लग्नासाठी रेडी व्हायचं आहे ना... यु गो, ऍन्ड लेट मी गो...”
“नदीम, नाही. माझं मन मला असलं काम कधीच करू देणार नाही... तू माझ्यासोबत आता चल, आपण शांतपणे एकदा बसून बोलू या... विचार करू या”
“त्यासाठीच तर तुला इथे बोलावलं होतं ना मी वीर? तुझ्याशी बोलायचं होतं, तुला भेटायचं होतं...”
“साराला?”
“तिला भेटलो तर मरायचा निश्चय परत डळमळेल माझा.”
“मी तुला मरू देत नाहीये नदीम. विसरलास का? आय ऍम युनि चॅम्पियन इन स्विमिंग. तुला समुद्रामधून बाहेर खेचत आणण्याइतका नक्कीच....”
“ते माहित आहे वीर. पण प्रश्न असा आहे की कशासाठी? कशासाठी तू मला वाचवणार? वाचवून तरी काय होइल?”
“आणि तू मरून तरी काय होइल? आज ना उद्या साराला खरं काय ते समजेल. आणि एका सेकंदासाठी तरी तुला असं वाटतं की ती मला माफ़ करेल?”
“मी तिच्यासाठी एक लेटर लिहून ठेवलंय. योग्य वेळी तिच्याकडे पोचतं केलं जाईल. शिवाय कंपनीमधले माझे शेअर्स पण तिच्या नावावर केलेत. खरं काय ते समजल्यावर ती कदाचित मला माफ़ करणार नाही, पण तुला करेल”
“नदीम, माझा फोन दे. लेट मी कॉल समवन. तू असला अघोरीपणा करू नकोस.”

“तुला साराची शपथ आहे वीर. तुझ्या साराची. एक पाऊलपण आता पुढे येऊ नकोस.” नदीम मागे सरकत म्हणाला. अचानक त्याने खिशातली गन काढली. “पुढे आलास तर बघ..”
“नदीम थांब प्लीज...”
“नाही वीर. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुझ्या आणि सरस्वतीच्या नात्यामधे कायम दरी राहणार. मला जाऊ देत, फ़क्त जाताना मला एक वचन दे की, तू माझ्या सरस्वतीला कधीही अंतर देणार नाहीस”
वीर पुढे येत म्हणाला, “नदीम, आता हा मूर्खपणा बास. माझा फोन दे. मी सरस्वतीला कधीही अंतर देणार नाही, पण म्हणून तुला मरू पण देणार नाही, प्लीज ऐक जरा माझं.” आता वीर खरोखर घाबरला होता. समुद्राच्या लाटा नदीमच्या पायापर्यंत पोचल्या होत्या. मागे वळून साराला अथवा राजनला जाऊन बोलावणं शक्य नव्हतं, वीरचा फोन नदीमने पाण्यात फ़ेकला होता, आणि पुढे जाऊन नदीमला धरणं शक्य नव्हतं. नदीम चांगला शूटर होता, त्याचा नेम सहजासहजी चुकला नसता.
काय करावं ते वीरला सुचेना. त्याने दूरवर आजूबाजूला पाहिलं. प्रायव्हेट बीच असल्याने त्या दोघांखेरीज कुणीही नव्हतं. देव करो आणि मला शोधायला म्हणून राजन अथवा कुणीतरी लगेच येऊ देत, वीर मनातच म्हणाला.
“मला मरायची भिती नाही, वीर. मी खूप विचार करून हा निर्णय घेतलाय. ही गन मी उगाच आणली नाही. तू मला विरोध करशील याची कल्पना होती. फ़िजिकली तू मला आतापण खेचत घेऊन जाशील हे माहित आहे.. पण मी ही गन चालवणारच नाही असा तुझा समज असेल तर तो खोटा आहे... कारण, मला माझ्या मरण्यापेक्षा तुझं जगणं महत्त्वाचं वाटत नाहीये सध्या.”
“यु आर जस्ट रॅम्बलिंग. तू माझ्यासाठी नाही पण सारासाठी तरी...”
“नो, यु आर रॉंग. एक पाऊल जरी पुढे आलास तरी मी गोळी चालवेन... आय विल शूट ऑन युअर नीकॅप. मग समोर पडून माझं मरण तुला बघायला लागेल”” नदीमच्या डोळ्यातला थंडपणा वीरला जाणवला. “आत्ताच मागे फ़िर, आणि तुझ्या कॉटेजमधे जा. मागे वळून पाहू नकोस. माझी शेवटची रीक्वेस्ट आहे. करंटच्या टायमिंगमधे फ़रक पडला तर बॉडी इथेच मिळेल माझी. चालेल का?”
“नदीम...” वीरने परत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. पण नदीम अजून पाठी पाण्यात जात होता, आता त्याच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलं होतं.
वीर सावकाश मागे वळला. आता मागे फ़िरण्याव्यतीरीक्त त्याला दुसरा काहीही पर्याय दिसत नव्हता,
कॉटेजपर्यंत जाऊन मदत बोलावणे किंवा नदीम पाण्यात बुडायला लागल्यावर मागे धावत जाऊन त्याला वाचवायचा प्रयत्न करणे हे शक्य होतं. वीर मनातल्या मनात नदीम समुद्राच्या खार्‍या पाण्यात किती वेळ टिकू शकेल याचं गणित करत होता.

“साहिल आता त्याच्या समुद्राकडे कायमचा चाललाय, वीर. आता मला वाचवू नकोस” नदीमचा आवाज आला. “सरस्वतीला सांग, मी कायम तिच्यावर खूप प्रेम केलंय. तिच्याशिवाय जगणं शक्य नव्हतं आणि तिच्यासमोर मरणं शक्य नव्हतं..”
नदीमचा आवाज थांबला. वीर जागच्या जागी थबकला. “चालत रहा वीर, आय कॅन स्टिल शूट यु. मागे पाहू नकोस.” परत नदीमचा आवाज आला. वीर दोन पावलं पुढे चालला. त्याच्या मनामधे एक वेगळीच लढाई चालू होती. साहिलने मरावं ही तुझी खूप दिवसापासूनची इच्छा होतीच की, तो स्वत:शीच म्हणाला, मग आता का घाबरतोस? तो मृत्यू तुझ्या डोळ्यासमोर होतोय म्हणून? की आजवर तू कुणाचा मृत्यू पाहिलाच नाहीस म्हणून?
हे असं वागून नदीमने काय मिळवलं असेल.... कदाचित माझ्या मनामधे आयुष्यभराचा गिल्ट? इतके दिवस सारा आणि साहिलच्या प्रेमामधे आपण मधे आलो याची भावना होती, सारा परत कधीतरी साहिलकडे परत जाईल याची असुरक्षितता होती.. आणि आता? सारा फ़क्त माझीच होईल अशी भाबडी अपेक्षा आपण करतोय? जे आपलं कधी नव्हतंच त्याला आपलंच मानून चालण्याचा हा आपला वेगळा अट्टहास!
वीर चालत असताना परत थांबला. नदीमचा आवाज आला नाही, आपण कितीवेळ चालतोय? कॉटेजच्या अगदी जवळ पोचला होता. गर्र्कन त्याने मागे वळून पाहिलं. समोरचा समुद्र शांत हेलकावे खात होता. अगदी शांतपणे. कदाचित त्याला खूप उशीर झाला होता, किंवा कदाचित त्याला हा उशीर हवा होता.
पण मागे वळताच वीर ओरडला आणि जीवाच्या आकांताने त्या समुद्राकडे धावत सुटला. साहिलला जगवण्यासाठी किंवा.....
(समाप्त)