Wednesday, 16 October 2013

इंधन- हमीद दलवाई

इंधन ही हमीद दलवाईंची यांची एकमेव कादंबरी. याआधी त्यांचा “लाट” हा अप्रतिम कथासंग्रह वाचला होता, इंधनबद्दल बहुतेकांनी “अवश्य वाच” असे सांगितल्यामुळे वाचायची फ़ार उत्सुकता होती. पण हे पुस्तक बाजारामधे मला कित्येक दिवस मिळाले नव्हते. पुस्तकजत्रा.कॉमच्या राज जैन यांनी हे पुस्तक उपलब्ध असल्याचा फ़ेसबूकवर मेसेज टाकल्यावर ताबडतोब ही कादंबरी मागवून घेतली.
 
हाती आल्यावर सलग वाचून काढली एवढी छोटीशी कादंबरी आहे, पण या छोट्याशा प्रतलावर हमीद दलवाईंनी जो पसारा उभा केलाय, तो एकमेवाद्वितीय असा आहे. कादंबरी बरीचशी आत्मचरित्रात्मक आहे. भडकवण्यासाठी एक वार्‍याचा झोतदेखील पुरेसा ठरत असताना त्यामधे कुणी भसाभसा इंधन ओतल्यावर आग जशी काय पेटेल, तशाच गावामधल्या काही छोट्या छोट्या घटनांमुळे संपूर्ण गाव कसं गढळून निघते, त्याचे चित्रण म्हणजे इंधन.  १९६५ साली प्रकाशित झालेली ही कादंबरी एका गावातील विविध घटनांचा आणि त्यांच्या आपापसातील नात्याचा वेध घेते. या कादंबरीचा नायक (ज्याचे नाव कधीच समजत नाही) पंधरा वर्षांनी गावाला परत आला आहे. त्याच्या निवेदनामधून या गावाची पात्रं, त्यांचे व्यक्तिगत संबंध आणि वादविवाद येत जातात. स्वातंत्र्यानंतरची दोन दशकं जेव्हा फ़ाळणीसारखी गोष्ट देश विसरला नव्हता, जेव्हा देशाचा एक भलामोठा हिस्सा आंबेडकरांच्या विचारावर पाऊल ठेवून स्वत:चे अस्तित्व शोधत होता, जेव्हा खोती-जमिनदारी यांसारख्या सरंजामी प्रवृत्तींना चाप बसत होता- या काळांमधे ही कथा घडते. धर्म-जात यांसारख्या गोष्टींमधे हजारो वर्षं गुंतून पडलेला समाज आणि नव्या काळामधे या धर्म-जातीपेक्षाही जास्त महत्त्वाची ठरणारी सत्ता-पैसा आणि मग्रूरीची ताकद ही या कादंबरीचे बीज. तत्त्वापेक्षाही अहंकाराला, स्वत:चंच खरं करण्याच्या सामूहिक अट्टहासाचा परिपाक म्हणजे ही कादंबरी.
 
मुळात या कादंबरीचा नायक फ़ार विलक्षण आहे. त्याचा धर्मावर, दीनवर विश्वास नाही, तो नमाझ रोझे असले काहीही धर्माशी संबंधित करत नाही. तो अतिशय विवेकवादी आहे, पण त्याचबरोबर त्याला चांगले-वाईट, उच्च-नीच यांची जाणीव आहे पण आपल्या वैयक्तिक मूल्यांवर तो समोरच्याला जोखत नाही. स्वत:च्याच भावाची रखैल असणार्‍या सुमतीबरोबर तो मैत्री करू शकतो, तिच्याशी गप्पा मारू शकतो. कधीकाळी जिच्याबद्दल आपल्या मनामधे काही नाजुक भावना होत्या, अशी मुलगी मेल्यावरदेखील तो मरतिकाची नमाझ पढावी लागेल म्हणून तिच्या मूठमातीला जात नाही. नायकामधला हा प्रखर विवेकीवाद अर्थात गावामधे कुणालाच आवडत नसल्याने तो गावी कित्येक वर्षे येतच नाही. मुंबईमधे राजकारण-समाजकारण यामधे कार्यरत असणारा हा मध्यम-वयीन नायक हार्ट ऍटॅकसारखे दुखण्यातून बाहेर पडून गावी विश्रांतीसाठी येतो. गांधी टोपी घालून राष्ट्रसेवादलात जाणारा नायक पंधरा वर्षापूर्वी गाव सोडतो तेव्हापासूनच घरच्यांशी, गावातल्यांशी त्याचे संबंध तणावपूर्ण आहेत. गावामधे इतर मुसलमान त्याला अंतर राखून आहेत त्याचे मुख्य कारण, त्याने पंधरा वर्षापूर्वी मुसलमान खोतांची बाजू न घेता, कुणब्यांना जमिनीवरचा ताबा न सोडण्याचा दिलेला सल्ला. खोतांच्या जमिनी कसंही करून गेल्याच असत्या, पण तरीही दोषाचा ठपका नायकावर येऊन बसलेला आहे. तो त्याला मान्यदेखील आहे. पंधरा वर्षांनी परिस्थिती बरीच बदलली आहे, आता गावातील लोकांना आपल्या गावच्या या नेत्याचे कौतुक आहे. “छाप्यामधे” येणारे नायकाचे फोटो व इतर बातम्या याबद्दल गावामधे चर्चादेखील होते. आता नाजुक तब्बेत घेऊन आलेला नायक मात्र शक्य तितके तटस्थ राहून गावामधल्या कॉम्प्लेक्स नात्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. गावामधील मुस्लिम, ब्राह्मण, परीट, न्हावी, वाणी, कुळवाडी, कुणबी आणि पूर्वीचे महार पण आता बौद्ध झालेले दलित अशा अनेक समाजघटकांमधे झालेले बदल- अथवा अजिबात न झालेले बदल नायक टिपत जातो. गावातले हे सगळे घटक उदरनिर्वाहासाठी एकमेकांवर अवलंबून असलेले. आणि तरीदेखील मनामधे एकमेकांबद्दल सूक्ष्म अढी कायम ठेवून असणारे. उच्च-नीच, शुद्ध-अशुद्ध, आपला-परका या भावनांना अद्याप कुरवळणारे पण तरीही “भानगडी” मात्र पुष्कळ करणारे. गावामधे अशा भानगडी आधीपासूनच आहेत. खुद्द नायकाचा भाऊ एका ब्राह्मण विद्यार्थिनीसोबत गेले कित्येक वर्षे झोपतो. गावामधे एकटीच राहणारी परटीण आपखुशीने मुसलमान खोतांना जवळ येऊ देते. सुदाम आपल्या तरण्याताठ्या सुनेवर बलात्कार करतो. तर अशा गावामधे नवीन घर बांधणारा इसाक त्याच्या बांधकामावर मजुरी करणार्‍या बौद्धाच्या लक्षुमीला घरी ठेवून घेतो आणि इथे ठिणगी पडते या आगीची. खोतांनी महारांच्या बाया लागू कराव्यात हे पूर्वी काही फ़ार आश्चर्याचं नव्हतं, पण आताच्या बद्ललेल्या काळात एका मुसलमानाने राजरोसपणे तिला आपल्याच घरात ठेवून घेणं तेदेखील विवाहित स्त्रीला हे बौद्धांना रूचत नाही. आपल्या स्वतंत्र अस्तित्त्वाची, आपल्या स्त्रियांच्या अब्रू इज्जतीची त्यांना आता जाणीव आली आहे शिवाय त्यांना कुळवड्यांची साथ मिळते आणि मग सुरू होतो एक वेगळाच संघर्ष. या संघर्षामधे नुकसान दोन्ही बाजूंचं होणार हे माहित असतं, तरीदेखील ही लढाई असते स्वत:च्या धर्माभिमानाची, जातीच्या अभिमानाची.... शिमग्याच्या पालखीच्या मिरवणुकीत ही लढाई अत्यंत भेसूर रूप धारण करते... आणि त्यानंतर नायक गाव सोडून निघून येतो, पण तरीही गावामधे घटनांची साखळी पुढे चालूच राहते. नायक गावामधून बाहेर पडल्यावर इतकावेळ वर्तमान काळामधे असलेलं निवेदन भविष्यकाळात चालू होतं. हा भविष्यकाळ म्हणजे “हे असंच घडणार” अशी नायकाची दृढ मनोधारणा की त्याचा “हे असं घडायला हवं” हा स्वप्नविलास याचा निर्णय वाचकांवर सोडला आहे.
हमीद दलवाईंनी उभा केलेला हा कोकणी गाव आजच्या काळाला मात्र पूर्णपणे बदलला आहे. किंबहुना साठच्या दशकापेक्षाही वाईट परिस्थिती गावांमधून पहायला मिळते हेच सत्य. संपूर्ण देशाचे राजकारणच आता जाती-धर्मानिष्ठित झाल्याने कोकणातील गावागावामधून देखील तेच चित्र आहे. आता मुसलमान खोत राहिले नाहीत. पूर्व आणी दक्षिण आफ़्रिकेमधे जाऊन पैसे कमावून येणारे तुरळक मुसलमान गावांमधून असायचे. ८०च्या दशकानंतर गल्फ़मधे जाऊन काम करणार्‍या मुसलमानांची एक अख्खी पिढी इथे उदयाला आली. शिक्षण, सुधारणा याहीपेक्षा जास्त महत्त्व जास्तीत जास्त पैसे कमावण्याला आले. नव्वदच्या दशकांतील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटनांनंतर हिंदु आणि मुस्लिम दोघेही भिन्न रहाणेच पसंत करू लागले  आहेत.
 
बाणकोटी अथवा संगमेश्वरी नावाने ओळखली जाणारी मुसलमान समाजाची बोली हल्ली फ़ार कमी ऐकू येत आहे. किंबहुना, कोकणाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या कित्येक कादंबरीमधेदेखील ही भाषा दिसत नाही. कादंबरीमधे मात्र या बोलीचा सहज सुंदर असा वापर आहे. गावातील सर्व पात्रे त्यांच्या ग्रामीण बोलीमधे बोलतात, आणि नायक सहजपणे ग्रामीण आणि शहरी बोलीमधे संवाद साधताना दिसतो. हमीद दलवाई यांची लेखणी फ़ार नेमकेपणाने ओघवतं लिहीते. सुमती, भाबी, बाबा, जनार्दन, इसाक यांसारखी पात्रे जिवंत उभी राहताना दिसतात. कादंबरीमधे कुणीच ब्लॅक ऍन्ड व्हाईट शेडमधे नाही, प्रत्येक पात्र हे ग्रे आहे. कुणालाही उदात्त करण्याचा अथवा कुणाचीही टीका करण्याचा इथे सोस नाही. लेखक फ़क्त घटना टिपतो आणि त्या मांडत जातो, परंतु दत्यातून कसलीही वैयक्तिकरीत्या टिप्पणी करत नाही. या सर्व घटनाक्रमाकडे नायक ज्या तटस्थतेने आणि अलिप्ततेने पाहतो ते फ़ारच रोचक आहे. वास्तविक, नायकाला संघर्षाची ठिणगी पडण्याआधीच त्यामागची भयावहता जाणवते, तसे घडू नये म्हणून तो त्याच्यापरीने प्रयत्नदेखील करतो. कुटुंबीयाविषयी, गावातील व्यक्तींविषयी, त्याला माया आहे, काळजी आहे पण त्याचबरोबर त्याला या गावातील चुका, त्यांच्या विचारधारेतील त्रुटी स्पष्टपणे जाणवतात. अधूनमधून तो हे सर्व व्यक्त करतो, परंतु गावामधील व्यक्ती जेव्हा आपले ऐकत नाहीत हे लक्षात येते तेव्हा नायक निवांतपणे प्रेक्षकाची भूमिका स्विकारतो. मात्र, प्रत्येक ठिकाणी लेखकाचा विवेकवाद, त्याच्या जीवनमूल्यावरील निष्ठा कुठेही ढळत नाहीत अथवा कुठेही “उपदेशकाची” भूमिका लेखक घेत नाही.
 
दिलीप चित्रे यांनी “द फ़्युएल” या नावाने या कादंबरीचे इंग्रजी भाषांतर केले आहे. आता कधी जमल्यास ते भाषांतर वाचण्याची इच्छा आहे.
 
 
 
 
 
 
 

Monday, 14 October 2013

समुद्रकिनारा (३)

आश्रमापाठीमागच्या बागेमधे मी अभ्यास करत बसले होते.  कुण्या पाटणकर नावाच्या माणसाची ही आंब्याची बाग होती. ऑक्टोबर महिना चालू होता. नुकताच पावसाळा संपल्याच्या हिरव्याशार खुणा अजून सगळीकडे पसरल्या होत्या. रविवारचा दिवस होता. माझी बीजगणिताशी थोडी खटपट चालू होती. साईन कॉस वगैरे जरा जास्तच त्वेषात लढत होते. वर्गात अजून शिकवलं नव्हतं. पण सर शिकवेपर्यन्त थांबण्यापेक्षा आपलं आपण समजून घेता आलं तर बरं कारण गणित हा माझा नंबर एकचा शत्रू होता.  भाषा इतिहास भूगोल कधी समजायला अडचण यायची नाही, पण गणित विद्न्यान हे मात्र गेल्या जन्माचे वैरी होते माझ्या.
आश्रमामधे आज रविवारचा दिवस म्हणजे सर्वांचा गोंधळ घालायचा दिवस. लेलेआजीची तब्ब्येत हल्ली बर्‍याचदा ठीक नसायची. त्यामुळे आश्रमामधे कुणीही त्यांचं ऐकायचं नाही. इथे मला हवी तसी शांतता होती.
हनुवटीवर हात ठेवून हातातले गणित वाचत होते.अचानक कुठल्यातरी गणितातल्या कसल्यातरी आकड्याने मला आठवण करून दिली. अजून पंधरा दिवसांनी आपला वाढदिवस. .. कुणाच्याच लक्षात नसेल, नाही नाही.. माझ्याशिवाय कुणालाच माहीत नव्हतं. इतक्या मोठ्या जगात मीच एकटी. काकाकाकूंनी कधी वाढदिवस साजरा केलाच नाही माझा. किंबहुना त्यादिवशी “ही आमच्या मढ्यावर आणून ठेवलेली अवदसा आहे” हे ऐकवणं मात्र काकूचं खास काम असायचं. काकूच्या, घरच्या सगळ्या आठवणी मनामधे गर्दी करून नाचायला लागल्या. अभ्यासात लक्ष लागेना. विचार इकडे तिकडे फ़िरायला लागल्यावर मी ते पुस्तक बंद करून ठेवलं. आणि पिशवीतून दुसरं पुस्तक काढलं. शाळेच्या वाचनालयातली जवळ जवळ सगळी पुस्तके वाचून संपली होती. पण मोठे सरांनी खास शिक्षकासाठी असलेल्या भागात मला प्रवेश मिळवून दिला होता, तिथली आवडती पुस्तके वाचण्यासाठी. त्यातूनच  शेक्सपीअरच्या नाटकाची भाषान्तरे घेऊन आली होती. Comedy of Errors मला विशेष आवडलं होतं. कधीनाकधी तरी याचं मूळ इंग्रजी पुस्तक नक्की वाचायचंच अशी मी स्वत:लाच बजावून ठेवलं होतं.


बागेत त्यावेळेला माझ्याशिवाय कुणीच नव्हतं, मोहोर आला की बागा धरायला बाहेरच्या माण्सांची वर्दळ चालू व्हायची, नेपाळी गुरख्यांच्या झोपड्या बागेत पडायच्या, पण इतर वेळी बाग अगदी एकाकी..

"

हॅलो.." थोड्या वेळाने एक आवाज आला. मी पुस्तकातलं डोकं वर करून पाहिलं. समोर एक तरूण उभा होता. सतरा अठरा वर्षाचा. पिंगट केस. गोरापान, उंच, निळे डोळे.

मी कधीतरी याला कुठेतरी पाहिलं होतं. कधी आणि कुठे ते आठवेना. माझ्या  चेहर्यावरचे गोंधळलेले भाव त्याने ओळखले असावेत. तो दोन पावलं पुढे आला.
"
हॅलो म्हटलं मी.." तो किंचित हसत म्हणाला. एखाद्या शांत पहाटे वार्‍याने फ़ुंकर घालावी तसं त्याचं स्मितहोतं. निळ्या डोळ्यात एक असीम खोली होती. काही न बोलता पापणीदेखील न मिटता मी फ़क्त त्याच्याकडे बघत होते.

"
पहले कभी नही देखा आपको यहा पे.." तो परत म्हणाला. त्याने अंगात पांढरा शुभ्र शर्ट आणि निळी जीन्स घातली होती. मला आश्रमात रहायला येऊन दोनेक वर्षे झाली होती. आजूबाजूला रहाणार्‍या सर्वांना मी ओळखत होते, पण या मुलाला आधी कधीच पाहिलं नव्हतं..

"
लगता है आपको सुनाई नही देता.." त्याने उजव्या हाताचा अंगठा हलवून नाही अशी खुण केली. एखाद्या चित्रकराची असावी तशी त्याची बोटे निमुळती होती.

एखद्याने संमोहित करावं असं मी त्याच्याकडे बघत होते.  
"
हाय..." मी बोलण्याचा प्रयत्न केला पण आवाज घशातच कुठे तरी हरवला. "हाय,," यावेळेला जरा जोरात, त्याला ऐकू जाईल अशा बेताने.

"
ओह.. तो आप सुन सकती है और बोल भी सकती है..." त्याच्या हातामधे एक चांदीचं कडं होतं आणि पायात काळे शूज.

मला काय बोलावं तेच सुचेना, मी शांतपणे हातातली पुस्तकं पिशवीत ठेवायला सुरुवात केली. दूरवर एक कावळा केकाटत होता. तेवढाच काय तो आवाज येत होता. तो शांतपणे फ़क्त माझ्याकडे बघत होता.

“इंटरेस्टींग " त्याच्या आवाजातला मिश्किलपणा लपत नव्हता.  

मी मान वर करून त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिलं.

"
आय मीन... दहावीचं गणिताचं पुस्तक आणि शेक्सपीअर एक साथ." तो म्हणाला.

माझ्या नकळत ओठांवर एक हसू आलं.

"

तुला हसता पण येतं... इथे कधी पाहिलं नाही तुला.." त्याने त्याच्या केसातून हात फ़िरवला आणि आधीच विस्कटलेले केस अजून विस्कटले.

"

त्या आश्रमात राहते." मी हातानेच आश्रमाची बिल्डिंग दाखवली. अचानक मला जाणवलं, आपण कोण आहोत ते... इथे मला कुणाशी ओळख नको होती. एखाद्या मुलाशी तर बिल्कुल नको.
"
ओह.. म्हणजे तू आय मीन,," त्याला कदाचित नक्की शब्द सापडेना..
"
हो. मी अनाथ आहे. दहावीला शिकते आणि अभ्यासाला इथ आले होते, अजून काही?" मी थंड आवाजात विचारलं.
"अनाथ? कोई अनाथ नही होता. सबको देखनेवाला खुदा उपर बैठा है. वही सबका मालिक है, परत अनाथ म्हणू नको." तो शांतपणे म्हणाला. त्याच्या गळ्यात एक काळा ताईत होता.

मला ताबडतोब तिथून निघायचं होतं. संतापाची एक लाट अंगात उसळत होती. तो परत पुढे अजून काही बोलला असता तर नक्कीच हा ज्वालामुखी भडकला असता. त्याच्या आत मला तिथून निघायचं होतं.
तो मात्र फ़क्त माझ्याकडे बघत होता.
"
मी कधी या जागेचा स्टडीसाठी विचारच केला नाही. पण मला निवांतपणे इथे येऊन बसायला आवडतं " तो परत हसत म्हणाला.


मला त्याच्याशी बोलण्यात आता काडीचाही इंटरेस्ट नव्हता. ताबडतोब इथून निघून जायचं होतं. आश्रमातल्या कुणी मला असं एखाद्या मुलाशी बोलताना पाहिलं असतं तर गहजब उडाला असता. पण एकच प्रॉब्लेम होता. हा मुलगा नेमका रस्त्यात उभा होता.
"
मला निघायचं आहे." मी सांगितलं.
"
ओह.. झाला स्टडी? परत भेटूच. मी अजून महिनाभर आहे इथे. नाव काय तुझं?"

खरंतर मला त्याला नाव सांगायचं नव्हतं. त्याच्याशी बोलायचं पण नव्हतं. तरीपण त्याच्या चेहर्‍याकडे खास करून तळ्यासारख्या नितळ डोळ्यांकडे बघण्याचा मोह सोडवत नव्हता. तरी त्याची नजर चुकवत मी म्हटलं, .
"
सरस्वती..."
"
नाईस नेम... " तो हसला आणि रस्त्यावरून बाजूला झाला.

मी हसले आणि पुढे निघाली.
"
बाय द वे, मी साहिल.."

मी वळून त्याच्याकडे पाहिलं. जोरात कुठूनतरी वारा आला. साहिल... कोण होता हा साहिल. खूप ओळखीचा आणि तरीही अनोळखी वाटणारा... नक्की कोण होता हा साहिल?
आश्रमात परत आल्यावर पण मी त्याचाच विचार करतेय. आता मला असं का वाटतंय की मला साहिल तिथे भेटणार हे मला आधीपासून माहित होतं??
आयुष्यात आपण एकाच क्षणाला कितीतरी नवीन माण्सांना भेटत असतो, मग तरी साहिल भेटल्यावर मला असं वेगळंच का वाटत राहिलं? नक्की कशामुळे?
वीरने हातातली डायरी मिटून परत ठेवून दिली. का वाचतो मी हे सतत, नक्की काय शोधतोय मी? त्याने स्वत:लाच पुन्हा एकदा विचारलं. सारा ऑफ़िसला निघून गेल्यावर विचित्र एकटेपणा जाणवायला लागला, पुन्हा एकदा आपल्या आयुष्यामधे साराचं स्थान काय आणी साराच्या आयुष्यामधे आपलं स्थान काय असे प्रश्न त्याला छळत होते. कदाचित याच प्रश्नांच्या उत्तरासाठी तो साराच्या जुन्या डायर्‍या काढून वाचत बसला होता.
 
सारा स्टेशनवर आली तेव्हा साडेदहा वाजून गेले होते. लोकल बर्‍यापैकी रिकामी होती. त्यामुळे आरामात बसता तरी आलं. स्टेशनवर बांधून घेतलेला वडापाव बसून ती खात होती तेवढ्यात मोबाईल वाजला.
रिंगटोन ऐकूनच हा फोन नक्की कुणाचा हे तिला समजलं होतं. तिने लगेच हातातला वडापाव खिडकीतून बाहेर भिरकावला आणि फोन घेतला.
“बोलो.. कबसे तुम्हारे फोन का वेट कर रही थी.. कल रात को क्यु फोन नही किये... इत्ता भी कैसा काम होता की मेरी याद तक नही आती......  अच्छा.. अभी ऑफ़िस जा रही हू... हां... थोडा मीटींग वगैरा... वो तो चलता रहता है... आज है ना एक बायलाईन... अपने वीर कपूरकी... उसकी कल शादी कॅन्सल हो गयी... पता नही... कैसा बंदा है!! उसको खुदको नही मालूम क्यु नही करता शादी... अच्छा सुनो... स्टेशन आ गया.. मै ऑफ़िस खतम करके तुमको कॉल देती हू... बाय.... आय मिस यु टू!!” म्हणत साराने फोन कट केला.
 
ऑफ़िसची पूर्ण रिपोर्टींग टीम हजर होती, म्हणजे काहीतरी सीरीयस मॅटर होता. धवन ऑलरेडी चिडला होता, त्यात साराला उशीरा आलेली बघून त्याचा राग अजूनच वाढला.
“ये भी कोइ टाईम है?” आल्या आल्या त्याने फ़ैरी झाडली. वास्तविक साराचा ऑफ़िस टाईम एक वाजताचा होता पण आता ते त्याला सांगत बसायची वेळ नव्हती.
“आय थिंक, सारा आणि नेत्रा दोघी फ़िल्डवर जाऊ देत. इथे त्यांचं फ़ारसं काम नाही” देशमुख म्हणाले.
“दॅट्स अ गूड आयडीया.” धवन म्हणाला. “सारा, देशमुख आपको इन्फ़ो देंगे. जल्दी काम पे लगो. मुझे शामको छे बजे से पहले रिपोर्ट चाहिये, कम्प्लीट रिपोर्ट. ऑनलाईन स्निपेट्स हर आधे घंटेमे. ओके?”
नक्की काय चाललंय ते तिला अजिबात माहिती नसल्यामुळे मान हलवण्याखेरीज दुसरा उपाय नव्हता तिच्याकडे.
धवनच्या केबिनबाहेर आल्याबरोबर तिने देशमुखना लगेच विचारलं, “काय भानगड आहे?”
“सिंपल, तुला खूप दिवसापासून पॉलिटिक्स करायचं होतं ना... हीअर इज युअर चान्स! तुझा रोहित कपूर आज दुपारी राजकीय पक्षात प्रवेश करतोय. आज एक मोठी सभा आहे तिथे हे कदाचित अनाऊन्स केलं जाईल. आपली पूर्ण टीम सभेच्या कव्हरेजमधे बिझी आहे-. चार पेजची सप्लीमेंट निघेल उद्या त्यामुळे पॉझिटिव्ह कव्हरेज. तू फ़िल्म ऍंगल घेऊन काम करशील, नेत्रा तुला असिस्ट करेल. आय नीड ऍट लीस्ट थ्री स्टोरीज ऑन दिस! रोहित कपूर अचानक कसा काय राजकारणाकडे वळला? त्याची आधीची फ़िल्म हिस्ट्री. त्याचे आधीचे सर्व लफ़डी.. येस्स, दॅट विल इन्क्लूड रसिका ऍज वेल. ब्रेकिंग न्युज ही आहे की, रसिका याच पक्षासाठी ऑलरेडी काम करतेय. नेस्क्ट इलेक्शनमधे तिला टिकीट मिळणार हे जवळ जवळ कन्फ़र्म आहे. रोहित कपूर आणि रसिका एकत्र स्टेजवर येतील का? हा सगळ्यांत मोठा ऍंगल असेल तुझ्याशिवाय अजून कुणाला रसिकाच्या इनर सर्कलमधे ऍक्सेस नाही. तुझे सर्व कॉन्टॅक्ट्स पणाला लाव, पण काहीतरी खास घेऊन ये.. शिवाय, जमलंच तर इतर फ़िल्मवाल्यांचे स्निपेट्स घे. बॉलीवूड रोहित कपूरला नक्की कसं सपोर्ट करतंय वगैरे हे सर्व तुला बघायचं आहे.. ऍम आय क्लीअर?”
“येस्स सर!! काही प्रॉब्लेम आला तर मी तुम्हालाच कॉल करेन. निघू का मी?”
“तू एकटी नाहीस, नेत्राला पण घेऊन निघ. धवनची ऑर्डर आहे.”
खरंतर साराला नेत्राचं  लटांबर सोबत नको हवं होतं, पण डायरेक्ट धवनची ऑर्डर म्हटल्यावर काही बोलता आलं नसतं.
नेत्रा उत्साहाने नुसती फ़सफ़सत होती. “सारा, आय थिंक तुझे कॉन्टॅक्ट्स चांगले आहेत तर तू फोनवरून बोलशील का सर्वांशी? मी लगोलग कॉपी बनवत जाईन.”
“सध्या नाही, आधी ऑफ़िसमधून बाहेर पडू या” सारा बॅग उचलत म्हणाली.
“कुठे आझादमैदानला जायचं का?”
 
“तिथे जाऊन तुला सतरंज्या घालायच्या असतील तर जा.” सारा लिफ़्टमधे जात म्हणाली. नेत्रा तिच्या पाठून लगबगीने धावत आली.
“म्हणजे? धवनने फ़िल्डवर जायचं म्हणाला ना?”
“नेत्रा, आधी आपण समोरच्या हॉटेलमधे जाऊन लंच करूया, स्टोरी ऍन्गल ठरवू आणि मग काम डीव्हाईड करू” सारा तुटकपणे म्हणाली.
नेत्राला खरंतर खूप प्रश्न विचारायचे होते, पण साराला बोलण्यामधे काहीही इंटरेस्ट नसल्याचं बघून ती गप्प बसली. साराने हॉटेलमधे जाऊन दोन व्हेज थाळीची ऑर्डर दिली आणि नेत्राच्या चुळबुळीकडे पूर्ण दुर्ल़क्ष करून  लगेच डायरी काढून काहीबाही लिहायला सुरूवात केली.
 
“काय लिहितेस?” दोन तीन मिनिटांनी नेत्राने न राहवून विचारलं.
“एक मिनिट सांगते... आधी एक काम कर. तुझ्या मोबाईलवरून मी सांगते त्या नंबरला फोन लाव. फोन उचलला की मोबाईल माझ्याकडे दे.”
पलिकडून हॅलो असा आवाज आल्यावर नेत्राने लगेच साराकडे फोन दिला.
“हॅलो. सारा व्ही के. क्या यार... इतनी बडी न्युज हमसे छुपाके रखते हो... कभी तो ब्रेकींग दे दिया करो...” साराचा आवाज कमालीचा खेळकर आणि उत्साही होता. “..फोन पण घेत नाही हल्ली तुम्ही आमचा.. बॉस के स्ट्रिक्ट ऑर्डर्स है क्या??? ते सगळं राहू दे, पर्सनल गोष्टी पर्सनलच राहू द्याव्यात. मग? मीटींगमे क्या डीसाईड हो रहा है वो तो बोलो. अरे कमाल करते हो. रोहित कपूरचा पर्सनल मॅनेजर असून तुम्हाला माहित नाही??... अरे तुम्ही फ़क्त बोला आज. एडिटरने अख्खं पान रोहित कपूरसाठी ठेवलंय... हा.. मग त्याचं काय??” अचानक साराच्या चेहर्‍यावरचा रंग उडाला. “ये खबर पक्की है?? सोच के बोलो.” तिचा आवाज एकदम बदलला. “ठिक है. अर्ध्या एक तासाने मी परत फोन करेन तुम्हाला. माझ्याच नंबरवरून फोन करेन. कृपा करून तेव्हा फोन उचला”  
 
“काय झालं सारा?” नेत्राने मोबाईल परत घेत म्हटलं, तोपर्यंत वेटर जेवणाच्या थाळी घेऊन आला होता.
“नेत्रा, जेवण आटप. मी जरा एका मिनिटांत येते” म्हणत सारा उठून बाहेर निघून गेली. नेत्राच्या कानांपासून पुरेसं लांब आलेलं पाहून तिने खिशातला तिचा मोबाईल काढला आणि लगोलग वीरला फोन केला.
 
“हा सारा.. झाली मीटींग?” त्याने पहिल्याच रिंगला फोन उचलला.
“वीर, रसिका कुठाय?” साराने विचारलं.
“ती पुण्याला आहे. का? काय झालं?” साराच्या आवाजातला गंभीरपणा जाणवून तो म्हणाला.
“वीर, तुला माहित आहे का? आज रसिका ज्या पक्षासाठी काम करते त्याची एक हाय लेव्हल मीटींग मुंबईमधे चालू आहे..”
“मला कसं माहिती असेल... तिच्या असल्या कुठल्याच कामाची मला खबरबात मला नसते...”
“वीर, रोहित कपूर पक्षात प्रवेश करतोय. आज संध्याकाळी आझाद मैदानवर सभा आहे. सभेबद्दल मीडीया अवेअर आहे, पण या रोहित कपूर ऍंगलबद्दल फ़ार कमी जणांना माहिती आहे. मी आता राकेशला फोन केला होता, त्याने न्युज कन्फ़र्म केलीये. रोहित जर या पार्टीमधे आला तर....”
“साल्याने रसिकाची फ़िल्म  करीअर बरबाद केली, आता पोलिटिकल करीअर पण बरबाद करून ठेवेल.. थॅन्क्स फ़ॉर दिस इन्फ़र्मेशन. मी लगेच रसिकाला फोन करतो..”
“खरंतर मीच तिला फोन करणार होते, पण मागच्या वेळेला आमची बोलाचाली जरा.....”
“आय नो. ती जरा जास्तच बोलली होती तुला, तरी मी सांगतो तिला... घरी कधी येशील?” त्याने विचारलं.
“आज खूप उशीर होइल वीर, सभा साडेपाचला चालू होइल. संपायला दहा वाजणार, नंतर स्टोरी फ़ाईल... उशीर होइल..” सारा अपराधिक स्वरांत म्हणाली.
“डोन्ट वरी.. मी आज पूर्ण दिवस इथेच आहे. कुठेही जात नाही. राजन दोन स्क्रीप्ट्स घेऊन आलाय, त्या वाचत बसलोय. काही इंटरेस्टींग, शॉकिंग, वगैरे असलं तर मला फोन कर...”
 “बाय... टेक केअर... “ म्हणत साराने फोन ठेवला.
टेबलकडे ती परत आली तेव्हा नेत्राने अजून जेवायला सुरूवात पण केली नव्हती, “अगं काय हे? लवकर जेवून घे. आपल्याला अजून काम करायचंय” सारा वैतागून म्हणाली.
“सारा, आपल्याला जर एकत्र काम करायचं असेल तर प्लीज असं सीक्रेटीव्ह काम करू नकोस. आय रीअली ऍडमायर युअर वर्क म्हणू धवनच्या मागे लागून तुझ्यासोबत आली आहे. पण जर तू असं माझ्यापासून लपत काम केलंस तर काय उपयोग?”
“काय लपवून काम केलंय. तुझ्यासमोर राकेशला- रोहित कपूरच्या पर्सनल मॅनेजरला फोन लावलाय. त्याने दिलेल्या इन्फ़ोवर जेवण झालं की स्टोरी फ़ाईल करायची आहे, नंतर परत इतर ऍंगल्स वर काम करायचंच आहे..”
“मग तू आता इथून बाहेर जाऊन कुणाला फोन केलास? ते काय होतं?” नेत्राने चिडून विचारलं त्यासरशी सारा हसली.
“मुली, अगं माझ्या बॉयफ़्रेंडला फोन केला होता, आज यायला उशीर होइल म्हणून.” सारा हसत म्हणाली “जेवून घे. चिक्कार काम आहे आज.” जेवता जेवता तिने मोबाईलमधले मेसेजेस, मेल्स पाहणं चालूच ठेवलं होतं.

“सारा, तुझा बॉयफ़्रेंड म्हणजे साहिलला फोन केला होतास का? पण तो तर गल्फ़मधे असतो ना? ” नेत्राने अचानक विचारलं.
नेत्राच्या या प्रश्नाने सारा अचानक गडबडली पण लगेच सावरत ती म्हणाली. “हो... गल्फ़ला असतो पण सध्या सुट्टीवर आलाय!”
 
नेत्रा मनातल्या मनात हसली. साराचा बॉयफ़्रेंड साहिल आहे हे अख्खं ऑफ़िस जाणत होतं. पण गेल्या सहा-सात महिन्यापासून नेत्राला कायम वेगळाच संशय येत होता, सारा वाटते तेवढी साधीसरळ नाही हे तर तिला आधीपासून माहित होतं. त्यातही हे साहिल प्रकरण तिला फ़ारच वेगळं वाटत होतं, आजवर ऑफ़िसमधे कुणीही साहिलला भेटलं नव्हतं.
साराचं लक्ष नसताना नेत्राने एकदा तिचा मोबाईल चेक केला होता- साराचे कॉन्टॅक्ट डीटेल चोरण्यासाठी पण सारा ज्याला आपला “बेस्ट कॉन्टॅक्ट” म्हणायची अशा वीर कपूरचा नंबरच तिच्या मोबाईलमधे सेव्ह केलेला नव्हता. आता जेवून झाल्यावर सारा वॉशरूमला जाण्यासाठी गेल्यावर नेत्राने समोर ठेवलेला तिचा मोबाईल लगेच उचलला, आणि डायल केलेला पहिलाच नंबर पाहिला- साहिल.
नेत्राने वॉशरूमच्या दिशेने एकदा पाहिलं आणि धोका पत्करून तो नंबर तिने डायल केला.
दोन रिंग वाजल्यावर पलिकडून आवाज आला. “सारा... लगेच इतक्या लवकर फोन केलास?”
वीर कपूर!!! नेत्राच्या घशाला कोरड पडली आणि तिचे हात जवळ जवळ थरथरत होते. वीर कपूर म्हणजे साहिल.... इतके दिवस तिला फ़क्त संशय होता, आज ते नक्की झालं.
नेत्राने तो कॉल लगेच डीलीट केला आणि फोन होता तसा ठेवून दिला. नेत्रा स्वत:वरच प्रचंड खुश झाली, एक भलीमोठी ब्रेकिंग न्युज तिच्या हाताशी आली होती, फ़क्त ती न्युज कशी खेळायची हे मात्र तिला व्यवस्थित ठरवावं लागणार होतं.