Sunday, 29 May 2022

टॉप गन: मॅव्हरिक (फिल्म)



भूतकाळाची एक गम्मत असते. कधीही दुरून बघायला तो भूतकाळ छानच वाटतो. नॉस्टॅल्जिक आठवणींनी सजलेला भूतकाळ कायम रम्य, सुंदर वाटतो पण खरोखर काळ ओलांडून तो भूतकाळ आजच्या काळात आपल्यासमोर आला तर मात्र कदाचित... बोरिंग वाटू शकतोच. तब्बल तीस वर्षांनी आलेला टॉप गनच्या सीक्वेलबाबतीत ही भिती प्रकर्षाने जास्त जाणवत होती. भूतकाळामधली कथा तीन दशकांनी वर्तमानकाळात आणणे ही तारेवरची कसरतच आहे... 


1986 साली आलेला टॉप गन हा कल्चरल फिनोमेना होता. अमेरिकन नेव्हीच्यामते, ज्यावर्षी हा सिनेमा रीलीज झाला त्या वर्षापासून नेव्हीमध्ये अप्लाय करणार्‍यांची संख्या तब्बल पाचशे ट्क्क्यांनी वाढली. रे बॅन एव्हिएटर आणि बॉम्बर जॅकेट्सचा खप किती टक्क्याने वाढला देव जाणे. पण अवघ्या पंचविशीच्या टॉम क्रूझला या सिनेमाने जागतिक सुपरस्टारपद रातोरात देऊ केलं आणि त्याने ते गेली तीन दशकं अढळपणे टिकवून ठेवलं आहे. टॉम क्रूझ तेव्हा अ‍ॅक्शन हीरो म्हणून गाजला, लाखो तरुणींच्या दिल की धडकन बनला. आज टॉप गन मॅव्हरिक हा त्याचा सीक्वेल जेव्हा रीलीज झालाय तेव्हा टॉम क्रूझ साठीला पोचला आहे. चेहर्‍यावर वय दिसतं आहे पण ते अजिबात जाणवत नाही ते त्याच्या स्क्रीन प्रेझेन्समधून. आणि म्हणूनच टॉप गनचा सीक्वेल भूतकाळ घेऊन अवतरताना अजिबात बोरिंग वाटत नाही. आपल्या हिंदी सिनेमाला "हीरो"चे टेम्प्लेट टॉप गनच्या मॅव्हेरिकने दिले होते. निळी जीन्स, पांढरा टीशर्ट, डोळ्यांवर रे बॅन एव्हिएटर, बॉम्बर जॅकेट अशा वेषामधला आपला हीरो बाईकवरून सुस्साट एंट्री गेले दोन अडीच दशके घेतोच आहे.


टॉप गन हा टिपिकल अमेरिकन सिनेमा. सिनेमा तरीही जगभर गाजला, त्यामधली विमानांच्या लढाईची दृष्ये आजही अंगावर काटा आणतात. गो प्रो चा काळ नसताना आणि सीजीआय अगदीच बाल्यावस्थेमध्ये असताना, विमानाच्या आत आणि विमानावर कॅमेरा लावून शूट केलेले शॉट्स महान होते. आज सीजीआय काहीही करामती करू शकत असताना, कंप्युटर्सच्या सहाय्याने अख्खा सिनेमा ग्रीन स्क्रीनवरून घेता येऊ शकत असतानाही, टॉप गनचा सीक्वेल त्या जुन्यापुराण्या फूटेजची जादू सोबत घेऊन आला आहे. टोनी स्कॉट या मूळ दिग्दर्शकाच्या मृत्यूनंतर जोसेफ किनिस्की या दिग्दर्शकाने सिनेमाची धुरा सांभाळली आहे, आणि हे करत असताना एकच गोष्ट कायम लक्षात ठेवली आहे- हा सिनेमा टॉम क्रूझचा होता, आहे आणि राहील. 



सिनेमाच्या अगदी सुरुवातीला एक संवाद आहे जिथे मॅव्हरिकला "तुझ्यासारखे लोक आता अस्तंगत होत चालले आहेत" असं ऐकवलं जातं, त्यावर तो "कदाचित, पण आज नाही" हे ऐकवतो आणि पुढचे दोन तास हे उद्गार ज्खरे करून दाखवतो. तीन दशकापूर्वी असलेली सिनेमाची आर्थिक गणित, प्रसिद्धीचे प्रकार वगैरे सर्व सर्व काही बदलं आहे. एकेकाळी केवळ सुपरस्टार या एकमेव पात्रता निकषावर सिनेमा थेटरामध्ये आठवडेच्या आठवडे मुक्काम बाळगून असत. आता अभिनेत्यांपेक्षाही सुपरहीरोची चलती आहे. "काय अ‍ॅक्शन आहे, असं कधी घडेल काय पासून सुरू झालेला हा प्रवास " यापेक्षा "काय एफेक्ट्स आहेत, एकदम रीअल वाटतात" पर्यंत आलेला आहे. अभिनयापेक्षा इफेक्ट्सचे याचे कौतुक वाटायचे दिवस आहेत. सिनेमा हे सुपरहीरोच्या ब्रॅंड लॉयल्टीवर चालतात. अशा या बदलत्या काळामध्ये साठी गाठलेला टॉम पुन्हा एकदा त्याची ही गाजलेली भूमिका तडफेने घेऊन येतो, आणि बस्स.. छा जाता है. वय त्याच्या चेहर्‍यावर दिसतंच आहे, पण ते त्याच्या परफॉर्मन्समध्ये मात्र अजिबात जाणवत नाही. माणूस नसलेले फायटर प्लेन्स आता बॉम्ब टाकत जातात, पण तरीही, मानवी पायलटची आवश्यकता आजही राहणारच आहे, तसंच, कितीही ब्रॅंडेड चकचकीत झगमगाटी सिनेमा आले तरीही, अस्सल अ‍ॅक्शनची आणि सिनेमाची जादू मात्र तीच राहणार आहे. एक अर्थाने, आता असे सुपरस्टारडम आणि त्याची फॅनगिरी संपत आल्यासारखी आहेच आहे. टॉम क्रूझ त्या लाटेमधल्या शेवटच्या अभिनेत्यांपैकी एक. पण आग विझली तरी अद्याप निखारे मात्र रसरशीत आहेत. टॉम "बट नॉट टूडे" तो या सिनेमाभर अखंड जगला आहे. 


बदलत्या तांत्रिक करामतींनी टॉप गन मॅव्हरिकमध्ये कमाल केलेलीच आहे. एका निर्जन डोंगराळ भागामध्ये असलेल्या युरेनियम प्लॅंटवर बॉम्ब टाकून ते निकामी करणे या अतिकठीण मिशनसाठी इंस्ट्रक्टर म्हणून आलेला मॅव्हरिक त्यासाठी लागणारी टीम तयार करतो, हे करत असताना जुन्या काळच्या काही जखमादेखील भरत जातो. गूजचा मुलगा असलेला रूस्टर आता त्याच्यासोबत टॉप गनमध्ये आहे. त्याच्यसोबत असलेले भूतकाळाचे काही लागेबांधेदेखील आहेतच. एक जुनापुराणा रोमान्स आहे, जो आता टॉप गनमध्ये परत आल्यावर पुन्हा बहरला आहे. पण, हे सर्व काहीही असताना सिनेमाचा फोकस मात्र त्याच्या अ‍ॅक्शनवरून ढळत नाही. अगदी अफिल्य प्रसंगापासून ते शेवटच्या प्रसंगापर्यंत रॉ अ‍ॅक्शन ही या सिनेमाची जान बनून जाते. एरियल फूटेज तेही डोंगराळ ओसाड भागाचं व्हिज्युअली स्टनिंग तर आहेच, शिवाय या सिनेमाच्या भरभक्कम बाजूंपैकी एक आहे. विमानाच्या वर आणि आत लावलेले कॅमेरा यामुळे आपण सिनेमा पाहत नसून, खरोखर त्या फायटर जेटमध्येच आहोत अस वाटायला लागतं. दोन तासाची ही अक्षरश: एक रोलरकोस्टर राईड होते. 



सिनेमाच्या प्लॉटमध्ये काही मेजर घोळ अवश्य आहेत, शिवाय कथा अत्यंत प्रेडिक्टेबल देखील आहे. एक लीडर, त्याचा भूतकाळाशी झालेला सामना, मग त्यात आलेले प्रश्न, त्याने काढलेले मार्ग हे खूपच सरधोपट आहे, पण तरीही टॉम क्रूझचा अफलातून स्क्रीन प्रेझेन्स या सगळ्याला मॅजिकल बनवून जातो. त्याच्यासोबत असणारे इतर सर्व अभिनेते हे सिनेमाब्भर फायटर पायलट वाटत राहतात. विमानांची लढाई सुरू असताना विनाकारण गोळ्या झडत नाहीत. डॉगफाईट ही कुठूनही अचंबित आणि अतर्क्य वाटत नाही, हीच सिनेमाची गम्मत. 



टॉप गनच्या यशामध्ये त्याच्या साउंडट्रॅकचा हातभार फार मोठा होता. बर्लिनचं टेक माय ब्रेथ अवे आजही प्रेमगीत म्हणून लोकांच्या मनामध्ये बसलेलं आहे. लेडी गागाचं होल्ड माय हॅंड कदाचित त्या गाण्याची जागा घेणार नाही, पण तरीही हे तितकंच गाजेल हे नक्की. शिवाय, मूळ सिनेमामधलं टॉप गन अ‍ॅन्थेम पण या सीक्वेलमध्ये आहेच आहे. 


एका अर्थाने टॉप गन मॅव्हरिक ही त्या गतकाळाला दिलेली सलामी आहे. पण म्हणून सिनेमा तेवढा आणि तितकाच नाही. आजच्या नवीन पिढीलाही तो समजू शकेल, भावू शकेल आणि त्यांच्यापर्यंत पोचू शकेल. आणि म्हणून टॉप गन मॅव्हरिक ही तारेवरची कसरत सफाईने आणि यशस्वीरीत्या पूर्ण करतो. 

 - नंदिनी देसाई

2 comments:

  1. Watching movie on edge of the seat
    You are in for a surefire visual treat
    Turning up the speed, sound & heat
    Memories come alive on every beat.

    ReplyDelete
  2. टॉप गनच्या यशामध्ये त्याच्या साउंडट्रॅकचा हातभार फार मोठा होता.>>>> अजूनही तो आहे! जुन्या चित्रपटात असलेल्या भावना नवीन चित्रपटात कमीच जाणवतात.

    ReplyDelete