Thursday, 1 October 2020

शब्द - ग्रहण !

 शब्द - ग्रहण 


- नंदिनी देसाई 


उशीर होईल का तुला?” माझ्या हातामध्ये पदराचं एक टोक देत  त्यानं विचारलं. खांद्यावरून पदर त्यानंच पुढे ओढला आणि पिनप केला.


“काही सांगता येत नाही रे. पदर खूप खाली आलाय का?” मी आरश्यात बघत विचारलं. एशान साडी नेसायला माझी मदत करत होता, खरंतर तो मला साडी नेसवतच होता. हे स्किल त्यानं नक्की कधी शिकून घेतलं माहित नाही. तशी मी फार काही रोज साडी नेसत नाही, इव्हेंटसाठी आवश्यकता असेल तेव्हाच. त्यातही ऑफिसमध्ये  कुणी मदतीला असेल तरच, स्वत:ची एजन्सी चालू केल्यापासून अनेक ट्रॅडिशनल कार्यक्रमांना वगैरे साडीची गरज भासायची, पण त्यावेळी शिरीन नामक एक ब्युटीशिअन मदतीला असायची. आज मात्र, एशान नेसवत होता. (पुढचा विनोद आपापल्या जबाबदारीवर करणे! मैं ना बोलूंगी)


एशानचं एक वैशिष्ट्य आहे, त्याला कुठलंही काम केवळ जमत नाही, तर ते उत्तमच जमतं. साडी नेसवणे हा टोटल तथाकथित बायकी उद्योग पण तो अशा नजाकतीनं आणि परफेक्टली करू शकतो की, इतरवेळी हाच माणूस आपले दोन्ही हात ग्रीसमध्ये माखून गाड्यांची स्पेअर पार्ट्स बदलत असेल हे खरंही वाटणार नाही.

“लवकर ये, नाहीतर मला कंटाळा येईल” तो पदरला पिन लावून माझ्या कानांत कुजबुजला.
“कंटाळा आणि तुला? मस्त पिक्चर बघत बसशील! त्यातून मी घरी नाही म्हणजे, तुला हवे तसे मारधाडपट बघता येतील की”

“आज पाय दुखतोय. सरळ पेनकिलर घेऊन झोपेन. तू प्लीज बेल मारत बसू नकोस. किल्ली आठवणीनं घेऊन जा. तू कारपण घेऊन गेली असतीस तर बरं झालं असतं ना...” 

“डोंट वरी, अमित आहे ना सोबत. तो सोडेल मला. आपण उद्या परत डॉक्टरकडे जाऊ या का?”

गेले दोन महिने एशानचा पाय जायबंदी आहे. कारण खरंतर अगदीच क्षुल्लक होतं, हा जिममधून चालत येत होता आणि कुणीतरी नवशिक्या बाईकवाला येऊन याच्यावर आदळला. टायर बरोबर घोट्यावर आपटलं. ताबडतोब सर्जरी झाली आणि पाय महिन्याभरासाठी प्लास्टरमध्ये गेला. आता पाय बर्‍यापैकी ठिक झालाय तरी जास्त चालाफिरायला परवानगी नाही. कंप्लीट दोन महिने एशान घरातच बसून! प्रचंड वैतागला होता. ऑफिसचं बहुतेक काम एरव्हीही घरूनच करत होता, माझ्या एरवीच्या इव्हेंट मॅनेजमेंटसोबत याचंही बरंचसं काम मी बघत होते. तसा महिना दीड महिनाभर एशान ठिकच होता, पण गेले आठ दिवस मात्र तो प्रचंड मूडी झाला होता. ते साहजिकही होतं म्हणा. इतके दिवस घरात राहून डोकं अक्षरश: भंजाळतं. मी तसं काम असल्याखेरीज त्याला सोडून कुठेही जात नव्हते. पण आज एनसीपीएमध्ये शास्त्रीय गायनाचा प्रोग्राम होता. मी खरंतर जाणार नव्हते पण अमितने वारंवार फोन करून येच असा निरोप दिला. जाऊ कि नको यावर बराच वेळ खल केला, अखेर एशानलाच विचारलं दोघं मिळून जाऊ या का? मी त्याला माझ्यासोबत कच्छच्या वाळवंटामध्ये हुतूतू खेळायला जाऊ या का असं विचारल्यासारखा त्यानं चेहरा केला.


बरी आहेस ना? मला ते शास्त्रीय बिस्त्रीय झेपत नाही. दोन ओळी गायला अर्धा तास घेतात. अमितसोबतच जा

अमित माझा कॉलेजमधला मित्र. कॉलेजमध्ये असताना आम्ही फार क्लोज फ्रेंड्स होतो. कित्येक जण तर आम्हाला कपलही समजायचे. पण तेव्हा आमच्यामध्ये खरंच तसं काही नव्हतं. दोघांच्या आवडीनिवडी फार जुळत्या होत्या, म्हणजे क्लासिकल म्युझिक, कविता, नाटकं पाहणं वगैरे. माझ्यासारखाच अमितही छोट्या शहरामधून आलेला. आम्ही तेव्हा या मुंबईच्या मुलांच्या स्मार्टनेसपुढे बुजलो होतो. एक तर मास कॉमसारखा अवघड कोर्स. त्यात बरेचसे विषय आपल्या ओळखीतलेच नाहीत वर “गावामधून” आल्याचं एक वेगळंच बावळट फीलिंग. त्यामुळे कॉलेजच्या पहिल्याच वर्षी आम्हा दोघांची मैत्री झाली. एक पोरगा आणि पोरगी नुसते एकमेकांकडे बघत जरी असले तरी गावाकडे कॉलेजमध्ये पार हलकल्लोळ उडायचा. मुंबईचं ते एक बरं होतं. इथं फार कुणाला आमच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. म्हणूनही असेल कदाचित, मी आणि अमित म्हणूनच केवळ फ्रेंड या नात्यापुरतंच राहिलो. एशान माझ्याच वर्गामधला. सुरूवातीला त्याचा ग्रूप पूर्ण वेगळा आणि आमचा वेगळा. नंतर हळूहळू असाईनमेंट, प्रोजेक्ट्स करत आमचा सर्वांचाच मिळून एक ग्रूप झाला. कॉलेजची नंतरची दोन वर्षं तर आम्ही सर्वांनीच धमाल केली. अमित सध्या टेलीव्हीजन एडिटिंगमध्ये आहे, त्याच्याकडे या कार्यक्रमाचे पासेस होते.

कार्यक्रमाला तर जायचं होतं, पण एशानला एकट्याला सोडून जायला खरंच मन होत नव्हतं. अगदी ऐनवेळी मी जायचं कॅन्सल केलं. मग काय!  माझ्यावरच भडकला. “अरे, मी काय बेडरिडन  आहे का? ऑफिसला रोज सोडून जातेसच ना? तुला जायचं असेल तर निमूट जा पण प्लीज मी तुझ्यापायी गेले नाही असं म्हणून मला नंतर छळू नकोस.”

क्लासिकलच्या प्रोग्रामला साडी चांगली वाटेल म्हणून कपाट उपसलं, एक साडी मनासारखी दिसेना. ही फारच गॉडी, ती झगामगा लायटिंग. ही फारच डल, ती फारच जुनाट!

“तूच घेतल्यास ना या सर्व साड्या? मग तेव्हा ही अक्कल नव्हती का?” पलिकडून टोमणा आलाच.

“हो, पण आता ऑकेजननुसार काहीच ठिक वाटत नाहीये. कुठली नेसू?”

“नेसू? अरेवा! तुझी तू स्वत: नेसणार की काय!”

“नाही, शिरीनला कॉल केलाय. ती साडी हेअर मेकप सर्व करेल”

“माझ्या बायकोनं लग्नाच्या दिवशीही ही असली थेरं केली नाहीत. गपगुमान शालू नेसून केसांचा अंबाडा घालून लग्नात बसली होती. आणि तुम्ही साधं गाण्याच्या प्रोग्रामला जायचं तर ब्युटीशीअनला घरी बोलावणार”

“मग! तुझी बायको असेल साधीसरळ, मी नाहीये”

“बदललीच आहेस ना? लग्नानंतर?”

“का? बदलू नये का माणसानं? परिस्थिती आहे म्हणूनच करू शकतेय. नसते पैसे तर कशाला कोण गेलं असतं. चारचौघांत जायचं तर नीट सजून जाऊ नये का?”

“जा ना! कोण अडवतंय, पण त्या शिरीनला बोलवू नकोस. अतिशय वाईट्ट मेकप करते. त्यापेक्षा मी साडी नेसवायला हेल्प करेन आणि मेकपला पण.” हेच जर आधी प्लीज मदत करशील का म्हणून विचारलं असतं तर हज्जार कारणं दिली असती, बच्चमजी, हम तुमको बहुत अच्छे से जानते हय. शिरीनला कॉल बिल आम्ही केलाच नाय!

त्यानंच एक गुलाबीपिस्ता अशी लाईट पण सुंदर कॉम्बीनेशन असलेली साडी निवडली. सोबत गोल्डन ब्लाऊज. गळ्यांत घालायला कुंदनचा छॊटा नेकलेस. हातात ब्रेसलेट आणि कानात झुमके. एशानची निवड किती परफेक्ट असते हे तर माझ्याकडे बघून कुणाच्याही लक्षात येईलच, तरीही दरवेळी त्यानं असं काही “परफेक्ट” शोधून दिलं की एकदम प्यार आया है... वगैरे फीलिंग येतं.

जा असं म्हणाला तरी, आता मात्र एशानची भुणभुण काही संपेना. “उशीरच होईल का? तुझीच कार घेऊन जा ना,  कंटाळा आला तर लगेच परत येता येईल. डिनरला घरीच येशील का? मी वाट बघेन.” एक ना दोन, सतत चालूच. अखेर परत विचारलं. “मी नको जाऊ का?”
“मी तसं काय म्हटलंय का? जा!
हे म्हणजे अगदी उपकार करून टळ बाई एकदाची म्हटल्यासारखं.

गाण्याचा प्रोग्राम खूपच मस्त झाला, पण यायला नको तितका उशीर झाला. गवईबुवा भलतेच रंगात आल्यानं गाणं लवकर संपलं नाही. शिवाय कार्यक्रम झाल्यावर सो कॉल्ड सोशल मीटिंगमध्ये बराच वेळ गेला. तरी अमित म्हणत होता की, आता बाहेरच डिनर करू. पण मला भूकही नव्हती आणि एशाननं कितीही वाजले तरी मी वाट बघेन असं सांगितलं होतं. मी घरी पोचले तेव्हा रात्रीचा दीड वाचून गेला होता. मी माझ्या चावीनं दार उघडून आत आले. अख्खं घर अंधारं होतं. एरवी काही झालं तरी आमच्या घरामध्ये असा अंधार कधीच नसतो. मला रात्री पूर्ण अंधार असला की झोप येत नाही त्यामुळे बर्‍याचदा माझ्या बेडरूमचा किंवा हॉलचा लाईट चालू असतोच. आताही मी आत आल्या आल्या हॉलमधला छोटा लाईट लावला. सोफ्यावर एशान शांत बसलेला. अंधारातच.

“शान? अजून जागाच आहेस? मला वाटलं झोपला असशील. बरं वाटत नाहीये का? इतक्या अंधारात का बसलायस?”

कानांतले हेडफोन काढत तो म्हणाला. “मला काय धाड भरलीये? मोबाईलवर पिक्चर बघत बसलोय. किती? दीड वाजला ना?”

“हो, अरे जाम उशीर झाला. हे क्लासिकल सिंगर्स ना एकदा रंगात आले की असले मस्त गातात. आजचा प्रोग्राम खूपच जोशात झाला. इन फ़ॅक्ट कित्येक लोक म्हणत होते की, आम्हाला जायची तशी काय घाई नाही, तुम्ही गात रहा. पण ऑर्गनायझर्सनी ऐकलं नाहीच.”

“हं! नाहीतर रात्रभर गाणी ऐकायला तुला आणि अमितला फारच आवडलं असतं”

“म्ह्णजे काय... तुला नाही कळणार शास्त्रीय संगीत... सावकाश धीरे धीरे माहौल बनतो, आणि तो तसाच ठेवून निघण्यांत मजा आहे, हे असं अर्धवट ऐकलं की ठिक वाटत नाही... पण सो. खूप दिवसांनी अगदी मनाजोगती मैफिल ऐकली. मी पटकन साडी बदलते आणि झक्क कॉफी करते चालेल? तू जेवलायस का?”

“झालंय. तुझं?” इतकी तुटक उत्तरं म्हणजे महाशय प्रचंड वैतागलेले असणार. पाय दुखत असल्यानं झोपला नसेल.

“आम्ही बाहेरच सटरफटर खाल्लंय. तेवढं पुरेसं आहे”

मी साडी बदलायला बेडरूमकडे वळाले तेव्हा अगदीच अनपेक्षितरीत्या पुढचा प्रश्न आला.

“मी साडीचा पदर फोल्ड करून पिनप केला होता, तो सुटा कसा झाला?”

“काय सॉलिड ऑब्झर्वेशन आहे रे तुझं. अरे, पिन निघाली. मला काही तो परत पदर तेवढा फोल्ड करून पिनप करता आला नसता म्हणून सुटाच फोल्ड केला. असापण छान दिसतो ना?”

“तुला काहीही छानच दिसतं.”

“कॉम्प्लीमेंट देत असलास तर तितक्या प्रेमानं सांग की, हे असं चिडवून कशाला बोलायला हवं?”

“जा, साडी चेंज कर. तोपर्यंत मी कॉफी करतो.” हे म्हणजे एकदम उत्तम काम. एशानसारखी कॉफी जगात कुण्णालाही जमणार नाही, यावर कधी नाही ते त्याचं आणि माझं एकमत होतं.

गाण्याची धुंदी अजून मनावर होतीच, त्यातलंच काहीबाही गुणगुणत मी साडी बदलली, सुटसुटीत नाईट ड्रेस घातला आणि हॉलमध्ये आले. डायनिंग टेबलवर फक्त एकच कॉफीचा कप माझी वाट पहात बसला होता. एशानच्या बेडरूमचा दरवाजा बंद होता, मी हलकेच ढकलला तर उघडाच होता. मी हळूच त्याच्या बेडवर जाऊन बसले. जागाच होता तरी डोळे मिटलेले.  “झोपलास?” मी आवाज दिला. त्यानं उत्तर दिलं नाही. मी त्याच्या कपाळावर हात ठेवला. “बरं वाटत नाहीये का? पेन किलर देऊ की उद्या डॉक्टरकडे जऊ या?”

“किंचित पाय दुखतोय, पण पेन किलर नको. त्यानं दुखणं थांबत नाही, फक्त ते दुखणं मेंदूपर्यंत पोचत नाही”

“त्रास तरी कमी होतो ना?”

“जाणवत नाही. कमी होत नाही! केवळ जाणवत नाही. आणि जेव्हा जाणवतो तेव्हा त्याची तीव्रता असह्य होते. त्यापेक्षा दुखतोय ते सहन करणं अधिक ठिक”

“फिलॉसॉफी झाडायची ही वेळ आहे का?”

“झोपायची वेळ आहे ना? मग प्लीज झोपू दे ना. जाताना प्लीज दार ओढून घे आणि लाईट बंद कर.” थोडक्यात आज तू इथून जा. खरंतर माझ्या आणि एशानच्या बेडरूम वेगळ्या आहेत, त्याची बेडरूम कम ऑफिस आहे (आणि माझं बेडरूम कम कपड्यांचं शोरूम असं तोच म्हणतो) पायाचं दुखणं झाल्यापासून तो माझ्याच रूममध्ये झोपत होता, आज जवळपास दोन महिन्यांनी तो त्याच्या रूममध्ये झोपला. मीही दमलेच होते. माझ्या खोलीत येऊन झोपले.

सकाळी उठायला तसा उशीरच झाला, त्याच्या बेडरूममध्ये पाहिलं तर तो नव्हता, हॉलच्या खिडकीजवळ बस्ला होता.

“गूड मॉर्निंग!” मी हाक मारली. त्यानं किंचित मागं वळून पाहिलं.

“गूड मॉर्निंग” तो तुटकपणे म्हणाला.
“कधी उठलास?”

“आताच”

“चहा करू?”

“मला नको”

“बरं वाटत नाहीये का?”

“हं!”

“ऐक ना, आज संडे आहे. ऑफिस तर नाहीच. बाहेर फिरायला जाऊया का? लॉंग ड्राईव्हला किंवा असंच”

“नको!” एवढी प्रश्नोत्तरं चालू असताना तो मात्र, बाहेरच बघत होता. मी त्याच्या बाजूला बसले,

“एशान, काय झालंय?” त्यानं माझ्याकडे एक नजर वळून पाहिलं. एखाद्या माणसासोबत चार वर्षं काढल्यानंतर किमान इतकं तरी समजतंच... तो रात्रभर जागा होता. त्याचे तारवटलेले डोळे, सुकलेला चेहरा आणि हा असा तोडून बोलल्यासारखा आवाज... मी याआधी एशानला असं कधीही पाहिलेलं नाही.

“आय थिंक, मी जरा वेळ जाऊन झोपतो.”

“तुला बरं वाटत नाहीये का?सांग ना मला. कंचनला बोलवू या का?”

“नको, ती बिझी असेल आणि उगाचच काळजी करत बसेल”

“शान, माझं ऐक. घरात बसून खूप वैतागलायस, बाहेर जाऊन येऊ... फ्रेश होशील. आता लगेच नको.. थोडावेळ रेस्ट घे, मी ब्रेकफास्ट बनवते... चालेल?”

“नको म्हटलं ना... प्लीज थोडावेळ मला एकटंच बसू देत” असं म्हणून तो तडक उठला आणि त्याच्या रूममध्ये गेला. जाताना आठवणीनं त्यानं रूमचं दारही लावून घेतलं. त्याचा वैताग एकीकडे समजतही होता, आणि त्याचवेळी गेले दोन महिने दुखणं सहन करनारा अचानक इतका कसा संतापला होता, तेही समजेनासं झालं होतं. मी कंचनला जमलं तर दिवसाभरामध्ये इकडे चक्कर टाका (आणि मी असं सांगितलं नाही हे ल्क्षात ठेवा) असा मेसेज लगोलग टाकून ठेवला. तिचा मिनिटाभरात ओके म्हणून रीप्लायही आला.

मुद्दाम जाऊन परत त्याला डिवचायला नको म्हणून मी माझं सर्व निवांतपणे आवरलं, गेले अनेक दिवस घरही आवरलं नव्हतं, ते थोडंफार आवरलं (एशानच्या भाषेत वस्तू इकडून नेऊन तिकडे टाकल्या, की हिचं घर आवरून होतं) परत कपभर चहा घेतला. तासाभरानं त्याच्या रूमचं दार वाजवलं. “दोन मिनिटांत आलो” त्यानं आतूनच आवाज दिला. तोवर मी त्याच्यासाठी दूध आणि कॉर्नफ्लेक्स वाटीत घालून ठेवलं.

“मला भूक नाहिये”

“का? सकाळी उठल्यापासून काही खाल्लं नाहीस, परत गोळ्या घ्यायच्यात... ऍसिडीटी होईल.. थोडंसं खाऊन घे.. बाहेरून मागवू का? मी बनवू का?” खरंतर हा शेवटचा प्रश्न काळजीवाल्या सुरात येऊच शकत नाही, आमच्या घरामध्ये ती धमकी आहे. मी किचनमध्ये जाऊन काहीतरी पदार्थ बनवणे, म्हणेज आमच्या घरामध्ये भलंमोठं भांडण ठरलेलं.

“नको म्हणून एकदा सांगितलं ना.. का कटकट करतेस?” तो अचानक माझ्यावर डाफरला. हे म्हणजे अतिच झालं.

“ओरडतोस कशाला? चांगलेपणानं विचारतेय ना... मी जर कटकट करतेय असं वाटत असेल ना तर....तर...” आयत्यावेळी धमकीपण सुचेना...

“तर काय...” तो अजूनच जोरात डाफरला. “सोडून जाशील?

काय बोलतोयस?”

“जा ना, एरवी भांडून माहेरी जातेसच”

“एकदा, एशान, एकदा ती चूक केली. तुला सोडून माहेरी जायची आयुष्यात ती चूक विसरणार नाही.. मागोमाग आला होतास. आठवतंय?”


“कसा विसरेन? मी मूर्ख ना.. शब्द दिलाय, आपण पाळायला हवा. सगळी कमिटमेंट, सगळी लॉयल्टी माझ्याकडूनच तर आहे..”

“तुला म्हणायचंय काय ते स्पष्ट सांग....कालपासून बिनसलंय.. इतकं मलाही माहित आहे. नक्की काय प्रॉब्लेम आहे? तुला सोडून पहिल्यांदा तर मी कुठल्या इव्हेंटला गेलेली नाही.. तुला चारचारदा विचारून मगच गेलीये. तुला सोडून जायचं खरंच माझ्या मनात नव्हतं, इन फ़ॅक्ट कार्यक्रमातही माझं लक्ष लागलंच नाहे. आय नो, तुझा पाय दुखत होता आणि आय शूड हॅव्ह बीन हीअर..”

“प्रश्न, तू मला सोडून का गेलीस तो नाहिये. माझा पाय गेले दोन महिने ठणाणा बोंबलत दुखतोच आहे. तरीही तू ऑफिसला जातेस, अजून कुठं बाहेर जातेस... मी त्याबद्दल कधी काही बोललोय?”

“मग काल रात्रीचाच इतका राग का?”

“हा प्रश्न तू स्वत:ला विचार”

“काय विचारू? मला जर माझी चूक  समजतच नाहीये तर मी काय विचारू सांग ना!”

 

तितक्यात दारावरची बेल वाजली. आमच्या स्वयंपाकवाल्या मावशी आल्या होत्या. त्यामुळे भांडणाचा विषय तिथंच थांबला. त्यांना किचनमध्ये काही सूचना देऊन- तशी त्याची काही गरज नसते- तरीही आपलीच आवड म्हणून काहीबाही सांगून मी बाहेर आले. तेव्हा, एशान परत त्याच्या खोलीमध्ये गेला होता आणि हां! दार आठवणीनं बंद केलं होतं.

मावशींचं काम होईपर्यंत मी हॉलमध्येच खुर्चीत पुस्तक वाचत पडले. एकतर पुस्तक अत्यंत बोर होतं शिवाय, रात्रीचं जागरण... कसा डोळा लागला समजलंच नाही. मला जाग आली तेव्हा मावशी काम आटोपून गेल्या होत्या आणि शान माझ्यासमोर सोफ्यावर बसून टीव्ही बघत होता.

“गूड मॉर्निंग” मी जागी झालेलं बघून त्यानं टोमणा मारला. घड्याळांत पाहिलं तर अकरा वाजत आले होते.

“उठवायचं ना मला..कसली वाईट झोप आली”

“साहजिक आहे! काल रात्री खूप दमली होतीस ना?  बाय द वे, तुझ्या मोबाईलवर अमितचा कॉल आला होता. तू कशी आहेस विचारायला.. मी सांगितलं नंतर फोन करायला.”

“कशी आहेस म्हणजे?”

हाऊ वूड आय नो! त्यानं काहीतरी कामानिमित्त फोन केला असेल. आता तुझ्याऐवजी मी बोललो म्हटलं की, काहीतरी कारण नको.. म्हणून उगाच कशी आहेस असं विचारायला फोन केला”

“मूर्ख आहे अमित”

“एक्झाक्टली, मेसेजेस करायचे ना, कॉल काय कुणीपण घेतंच... ओह, सॉरी. त्यानं चार पाच मेसेजेस पण केलेत. मी काही ते वाचले नाहीत.” टीवीवरची नजर न हटवत तो बोलत राहिला.

झोपेतून जागं झाल्यामुळं किंवा अजून काही! पण अचानक माझ्या डोक्यांत क्लिक झालं... म्हणून एशान इतका चिडला होता? इम्पॉसिबल!

“एशान..” मी आवाज दिला. त्यानं लक्ष दिलं नाही. “शान, माझ्याकडे बघ” त्यानं नजर वळवली. “तुला नक्की राग कशाचा आलय? मी रात्री उशीरापर्यंत बाहेर गेले म्हणून की मी अमितबरोबर रात्री उशीरा बाहेर गेले?”

“मला तू रात्रभर घराबाहेर राहिलीस तरी काही प्रॉब्लेम नाही. कामासाठी कित्येकदा राहतेस. आजवर कधी काही बोललोय?”

“म्हणजे मी अमितसोबत गेले हा तुझा प्रॉब्लेम आहे?”

“ऑफ कोर्स. कॉलेज स्वीटहार्टसोबत तू रात्री दीड दोन वाजेपर्यंत फिरतेस, घरी येताना साडीचा पदर सुटलेला आहे..”

“एशान, दिस इज रीडीक्यु....”

“नो, इट्स नॉट. मी नेसवलेली साडी आहे, त्याची पिन सुटणारच नाही याची मला खात्री! ठिक आहे, तोही प्रश्न फार महत्वाचा नाही. तसं झालंही असेल.. एक वेळ आपण मान्य करू... “

“एशान असं काहीही नाहीये”

“ओके”

“व्हॉट डु यु मीन बाय ओके?”

“तुझ्यात आणि अमितमध्ये अफेअर नाहीये ना?”

“अरे, कसं शक्याय? त्याचं लग्न झालंय, दोन मुलं आहेत. माझं लग्न झालंय.. आम्ही दोघंही आपापल्या करीअरमध्ये प्रचंड बिझी आहोत..”

“सो व्हॉट?”

“सो व्हॉट म्हणजे? एशान तू माझ्यावर संशय घेतोयस”

“हे बघ, मी काल रात्रीपासून केवळ याच गोष्टीचा विचार करतोय... आता मी या स्टेजला पोचलोय की मला.... मला... माहिताय की इट कॅन हॅपन. लव्ह कॅन हॅपन विथ एनीबडी. त्यातून तू आणि अमित..... फर्स्ट इयरला असताना तू आणि अमित इन्व्हॉल्व्ह होतात हेही मला माहित आहे.”

“त्याही वेळेला तसं काहीही नव्हतं, एशान!”

“खोटं सांगू नकोस. प्लीज! माझ्यावर किमान उपका म्हणून खोटं सांगू नकोस” तो अचानक उठला आणि माझ्याजवळ आला. “हे बघ, मी समजू शकतो ही असं झालंही असेल. तू आणि अमित आधीपासून एकमेकांना ओळखता, तुम्ही दोघंही सेम आवडीनिवडीवाले आहात. अख्ख्या कॉलेजला माहित होतं की तुम्ही कपल होता. फर्स्ट इयरं दरम्यान तर तुमचं काही कारणानं ब्रेकप झालं”  

“मूर्खासारखं बोलू नकोस. आणि विषय बंद...”

“आणि कालच्या त्या सेल्फीचं काय?”

“कुठला सेल्फी?”

“अमित आणि तू. फेसबूकवर टाकलाय आणि कॉलेजच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपमध्येपण.”

“माझा पदर सुटलेला असणं आणि आम्ही कॉलेजमधले कपल असणं याहून मोठ्ठा इश्यु सेल्फि आहे?”

“येस्स, कारण सेल्फिसोबत अमितनं टाकलंय... एम्जॉयिंग कॉन्सर्ट विथ माय कॉलेज स्वीटहार्ट. पुढं बदाम बिदाम”

“मग?”

“हे बघून तुला जराही खटकलं नाही?”

“खटकण्यासाठी मुळात मी ते पाहिलेलंच नाहीये.  तुला कदाचित माहित नसेल पण मी दर पाच मिनिटांनी फेसबूक चेक करत नाही. आणि अमित मूर्ख आहे. काहीही लिहितो. त्याचे पॉलिटिकल व्ह्युज मला पटत नाहीत. मी त्याला केव्हाच अनफॉलो केलंय”

“तुझा इतका चांगला मित्र असून?”

“तो माझा चांगला मित्र प्रत्यक्षात आहे... फेसबूकवर नाही. मी त्याला आता फोन करेन आणि सांगेन पोस्ट डीलीट कर. मी त्याची कॉलेज स्वीटहार्ट कधीच नव्हते.”

“कमॉन, अख्ख्या कॉलेजला माहित होत. लायब्ररीमध्ये दोघंच एका कोपर्‍यात बसलेले असायचा. इन फ़ॅक्ट मला तर तेव्हाच अख्ख्या ग्रूपनं तुझा विचार सोडायला सांगितलेलं. मी अलमोस्ट सोडलाही होता, आपण दोघं व्हीडीओ प्रॉडक्शनला एकाच टीममध्ये आलो.इतके दिवस तू फक्त आवडत होतीस, पण एकत्र काम करताना वेड्यासारखा तुझ्या प्रेमात पडत गेलो. आवडणं आणि प्रेम करणं यातला फरक माझाच मला जाणवत गेला.”

“एशान, त्यावेळेलाही माझ्या मनात तुझ्याबद्दल केवळ चांगला मित्र हीच भावना होती आणि सेम अबाऊट अमित. आम्ही फक्त मित्र होतो”

सगळ्या कॉलेजला माहित होतं...”

“आय डोन्ट इव्हन केअर अबाऊट इट, की सगळ्या कॉलेजला काय माहित होतं.... सत्य काय आहे ते मलाच फक्त माहित आहे. मी अणि अमित कधीच कपल नव्हतो...”

दरवाज्याची बेल वाजली. कंचन आणि एशानचे डॅड आले होते. आम्ही दोघांनीही किती तोंडभर हसू आणून त्यांचं स्वागत केलं. किंवा नॉर्मल वागण्यासारखा प्रयत्न केला तरी कंचनच्या लक्षात आलं की काहीतरी बिनसलंय.

तिनं लंचला बाहेर जाऊ, शॉपिंगला जाऊ असं सुचवलं, मी काहीबाही कारणं दिली. एशान काही न बोलता शांत बसून होता. त्याचे डॅड तर एरवीच इतकं कमी बोलतात, आज परिस्थिती नाजूक आहे हे बघून तितकंही बोलले नाहीत. तासादीडतासानं ते दोघं निघून गेले. त्यंच्यासोबतच आम्ही घरी जेवलो. ते असेपर्यंत एशान माझ्याशी एकही वाक्य प्रत्यक्ष बोलला नाहीये हे माझ्या लक्षात आलं.

एशान त्याच्या रूमकडे निघाला. मी त्याल आडवलं. “विषय पूर्ण करून मगच जा”

“मी आता खूप दमलोय. सकाळपासून माझा पाय ठणकतोय. प्लीज, आता नको थोड्यावेळानं बोलू. प्लीज” एशान एरवीही कधी प्लीज म्हणत नाही. एका वाक्यात दोनच वेळा तर नाहीच. आणि म्हटलं तरी इतक्या दयनीयपणे कधीच नाही.

“ठिक आहे, पण दार लॉक करायचं नाही.”

तो काही न बोलता त्याच्या खोलीत जाऊन बेडवर पडला. मी माझा मोबाईल घेतला, त्याच्या खोलीमधल्या खुर्चीवर जाऊन बसले. जे काही व्हायचं ते त्याच्यासमोरच होऊ देत. अमितला कॉल लावला. चार पाच रिंगनंतर त्यानं फोन उचलला. मी कॉल स्पीकरवर टाकला.

“हे, गूड मॉर्निंग. मघाशी फोन केला तेव्हा बिझी होतीस...” एशान डोळे मिटून पडला होता पण त्याचं लक्ष इकडेच असणार याची मला खात्री होती.

“अमित, फेसबूकवर काय फोटो टाकलायस?”

“कुठला म्हणतेस? कालच्या प्रोग्रामचे बरेच टाकलेत. का ग?”

“तुझा नी माझा सेल्फी. तो मला न विचारता तू पब्लिक सेटिंगवर का टाकलास? आणि वर कॉलेज स्वीटहार्ट म्हणून का लिहिलंस?”

“अरे, त्यात इतकी का चिडतेस? कॉलेज फ्रेंड आहोतच की आपण,”

“अमित, मूर्खपणालाही मर्यादा असतात. प्लीज त्या ओलांडू नकोस. सर्वात आधी तो फोटो डीलीट कर”

“अरे बापरे! इतकी चिडलीस? तुझ्या नवर्‍याला आवडलं नाही की काय? तसा तो स्वत: कॉलेजमध्ये कितीतरी अफेअर्स करत होताच... मग..”

“अमित, मुद्दा एशानचा नाही. माझा आहे. मला न विचारता फोटो टाकलेलं आवडलं नाही. तू फोटो डीलीट कर. अन्यथा परिणाम वाईट होतील”

“करतो, करतो. मॅडम. इतकं रागवायचं कारण नाही. कॉलेजमध्ये असताना...”

“आपण आता कॉलेजमध्ये नाही. इतकं लक्षात ठेव. प्लीज परत मला न विचारता असं काही फोटो अथवा पोस्ट्स लिहू नकोस.” मी त्याला पुढं बोलायचीही संधी न देता फोन कट केला. एक विषय संपवला. अमितसोबत विषय संपवणं फार सोपं होतं. या घरामध्ये फुरंगटून बसलेल्या भुताचं काय!!

बेडवर त्याच्या बाजूलाच मीही पडले. त्याच्या कपाळावरून  ओढून घेतलेला हात हलकेच बाजूला केला

“एशान” त्याचे हिरवेनिळे डोळे उघडले. रात्रभरच्या जागरनानं दमलेले डोळे.

“सॉरी” तो इतकंच म्हणाला.

“प्लीज, असं करू नकोस. असा विचार चुकूनही करू नकोस.”

“असा विचार मुद्दाम ठरवून करतं का कुणी?”

“मी जायला खरंच तयार नव्हते.. अगदी शेवटच्या क्षणीही मी तुला म्हटलं... यापुढे अजिबात कधीही तुला सोडून कुठंही जाणार नाही”

“ए स्टुपिड, आपण नवरा बायको आहोत. सयामीज ट्विन्स नव्हे, सगळीकडे गळ्यांत गळे घालून फिरायला. तुझ्या माझ्या आवडीनिवडी भिन्न, तर वेगळं फिरणं साहजिक आहे ना..”

“हे इतकं रॅशनली तुला सुचतं.. मग काल का असं बोललास?”

“सॉरी, पण कित्येकदा मला कायम खरंच असं वाटतं, की जितकं माझं तुझ्यावर प्रेम आहे तितकं तुझं माझ्यावर नाही. आय मीन, लूक ऍट द फॅक्ट्स. मी कॉलेजमध्ये असल्यापासून तुझ्यावर प्रेम करतोय. तेव्हा त्या प्रेमाच्या प्रवासामध्ये अफेअर, लग्न, संसार वगैरे गोष्टी मी इमॅजिनही केल्या नव्हत्या. गरजच भासली नव्हती. मग कधीतरी जेव्हा आयुष्यात सेटल व्हायचा विचार केला तेव्हा तूच नजरेसमोर आलीस. तोपर्यंत माझं प्रेम हे केवळ फक्त माझ्यासाठी होतं. तुला लग्नासाठी विचारलं, तू हो म्हणालीस, आणि आपण लग्न केलं. पण या सर्वांमध्ये तुझ्या दृष्टीनं मी काय होतो? फक्त एक चांगलं स्थळ? आय मीन, तुझी कारणमीमांसा काय होती... चांगला मुलगा, कमावता, निर्व्यसनी..”

“हॅंडसम” मी मध्येच कुजबुजले.

“थॅंक्स.” तो किंचित हसला. “पण या सर्वांचाच विचार करून तू हा लग्नाचा निर्णय घेतलास. हे लव्ह मॅरेज माझ्या बाजूनं होतं. तुझ्यासाठी अरेंज मॅरेजच होतं ना... मग कधीकधी मला वाटतं की मी जसा इझीली तुझ्या प्रेमात पडलो, तसंच त्याच नैसर्गिकपणे तू दुसर्‍या कुणाच्याही प्रेमात पडू शकतेस ना... तसं झालं तर... त्यात चूक काय आणि बरोबर काय हे मला ठरवता येत नाही पण इतकं मात्र खरं की माझ्यासाठी ते अखेर असेल. तुझ्याशिवाय जगण्याचा मी विचारही करू शकत नाही.  तू सोडून गेलीस तर...”

“मी कुठं जाणार आहे... तू प्लीज परत असलं काहीबाही मनात आणू नकोस”

“परत तेच.. असं ठरवून कुणी विचार करतं का? आपलं मन हे आपलंच वैरी असतं, इतकं तरी तुला पटतंय का? मला मान्य आहे की, मी असा विचार चुकूनही करू नये, पण मानत नाही. स्वत:लाच प्रश्न पडतो… जितक्या असोशीनं मी तुझ्यावर प्रेम करतो, त्याच असोशीने तू माझ्यावर प्रेम करत असशील? मला तुझ्याबद्दल जे काही वाटतं, तेच तुला माझ्याबद्दल वाटत असेल? किंवा ते जर तुला इतर कुणाच्या बाबतीत वाटलं तर! जे घडू शकतंच आणि तसं घडलं तर मी काय करणार आहे?”


“मुळात जे घडलेलंच नाही
, यावर तू विचार करतो आहेस. तुला संशय येणं किंवा तुझी चिडचिड होणं मी समजू शकते. पण आजूबाजूला इतकी छान छान माणसं असताना तुला येऊन येऊन संशय त्या इडियट अमितचा येतोय? दॅट इज रिडिक्युलस! शान, अमित माझा चॉईस कधीच नसेल. स्वप्नातही नाही. तो चांगला मित्र आहे, आमच्या आवडीनिवडी सेम आहेत बस्स. इतकंच. ज्यानं फर्स्ट इयरला मला सांगितलं होतं की, तो लग्न फक्त गावातल्या मुलीसोबत करणार आहे, कारण गावातल्या मुली सभ्य असतात आणि मुंबईपुण्यामध्ये शिकायला आलेल्या मुली बिघडलेल्या असण्याचे चान्सेस जास्त असतात. कॅन यु  बिलिव्ह दिस? यावरून त्याचा आणि माझा वाद झाला. आणी, तू ज्याला ब्रेकप म्हणतोयस ना, ते हे भांडण होतं. नंतर तो मला सॉरी म्हणाला, माझे व्यु बदलण्याचा प्रयत्न करेन म्हणाला. ते नंतर काही बदलले नाहीच म्हणा. पण मला त्याच्या वृत्तीची कल्पना तेव्हाच आली होती. व्हिडिओ प्रॉडक्शनला हा महाशय फेमिनिझमवर फिल्म बनवणार होता. डबल स्टॅंडर्ड्स यांचे. म्हणून मी मुद्दामहून टीम चेंज करून घेतली. तुझ्या टीममध्ये आले. अशा माणसासोबत लग्नानंतर मी अफेअर का करेन? कशासाठी?”

यावर त्यानं काही न बोलता माझा हात हातात घेतला. मी माझ्या हातांची बोटं त्याच्या बोटांत गुफली. त्याच्या मनात काय खदखदत होतं, ते त्यानं सांगितलं होतं. त्यावर मी द्यायचं ते उत्तर दिलं.

त्याच्या मनामधला संशय गेला की नाही, माहित नव्हतं. मी विचारलंही नसतं.

एशानच्या बाबतीत एक गोष्ट खरी आहे. त्याचे डोळे म्हणजे त्याच्या मनाचा आतसा. इतर कुणालाही त्याचे डोळे समजोत न समजोत, मला लगेच वाचता येतात. आता सकाळसकाळपर्यंत त्याचे डोळे घनगर्द झाकोळलेले होते. कसल्यातरी वादळाच्या सावलीसारखे.

पण आता याक्षणाला तेच डोळे स्वच्छ नितळ एखाद्या विहीरीच्या खोल डोहासारखे. कुठल्याही संशयाचा भोवरा नसलेले.

 

मी हलकेच त्याच्या कपाळावरून हात फिरवला. तसे त्यानं डोळे मिटून घेतले. दोनेक मिनिटामध्ये त्याला झोप लागली. मीही त्याच्या बाजूलाच पडले. मला झोप काही लागली नसती, असं मला वाटलं होतं. पण….

नंतर जेव्हा कधी तीन चार तासांनी जाग आली, तेव्हा आमच्ये कथानायक महाशय हॉलमधल्या सोफ्यावर बसून काहीतरी वाचत होते.

“मला परत झोप लागली?” मी डोळे चोळत विचारलं. चंद्राचं ग्रहण संपून स्वच्छ चांदणं घरभर पसरावं तसा कलत्या उन्हांचा प्रकाश हॉलमध्ये पडला होता. आता चांदण्याची उपमा उन्हाला देणं यात बरेच सिंटॅक्स एरर आहेत पण आपण काय लेखक वगैरे नसल्याने कृपया चालवून घेणे.

“तू घोरायला लागलीस आणि मला जाग आली.” अतिशय गंभीरपणे उत्तर आलं.

“मी काही घोरत वगैरे नाही”

“नेक्स्ट टाईम व्हिडिओ बनवून ठेवतो, म्हणजे कळेल” सेकंदाचाही विलंब न करता प्रत्युत्तर.

एव्हरीथिंग वॉज नॉर्मल. म्हणजे, काल संध्याकाळसारखेच आजही आम्ही एकमेकांना टोमणे मारतच बोलत होतो पण, आता ते टोमणे जीवघेणे वाटत नव्हते. नॉर्मल वाटत होते. वाटल्यास न्यु नॉर्मल म्हणा.

किचनमध्ये जाऊन कॉफी करून घेतली आणि मीही त्याच्या बाजूला बसले. या माणसानं चक्क हातातलं पुस्तक लपवलं.   

“काय वाचतोयस?”

“अजिबात सांगणार नाही. तू एंड सांगून मोकळी होतेस!”

“काहीही काय!” आता माझा वाचनाचा स्पीड जास्त चांगला आहे म्हणून मागे एकदोनदा तो अत्यंत तल्लीन होऊन मिस्ट्री नॉवेल वाचत होता, पण वाचताना प्रचंड अस्वस्थ झाला होता,  म्हणून मी सांगून टाकलं की, त्याची बायको स्वत:हून पळून गेलेली आहे पण आगीतून फुफाट्यात अशी तिची अवस्था होते. तिचा नवीन बॉयफ्रेंड एकदम सायको असतो, म्हणून ती त्याचा खून करते आणि जुन्या नवर्‍याकडे परत येते. सिम्पल. आता हे सांगितल्यावर वैतागायची काही गरज आहे का?

पण तेव्हापासून, हे महाशय कुठलं पुस्तक वाचतायत हे पण माझ्यापासून लपवतात…. काय बोलणार?

“आपली लव्हस्टोरी पण अशीच एखाद्या पुस्तकातून लिहायला पाहिजे ना?”

माझ्या या प्रश्नावर त्यानं मान वळवून माझ्याकडे पाहिलं. त्याच्या या नजरेला सबटायटल्स द्यायची गरजच नाही पण समजा दिलेच तर ते  “आतापर्यंत  बरी होती ना ही?” पासून ते “परत झटका वगैरे आला की काय” इतपत काहीही चालेल.

 

“आपल्या लव्हस्टोरीमध्ये नावालासुद्धा विलन नाही याची मला जरा भितीच होती. पण आता मी ठरवलंय, आयमीन, तूच ठरवलंस की, आपल्या लव्हस्टोरीमध्ये विलन म्हणून आपण अमितला पेश करू. कॉलेजमध्ये जेव्हा कधी, तू मला प्रपोझ करायचा विचार करतोस तेव्हा अमित येऊन तुला मारहाण करतो वगैरे असा सीन टाकून देऊ, नंतर मग तुझं आणि माझं प्रेम जुळतंच. अमित मध्ये खूप व्हिलनगिरी करतो, गैरसमजूत करण्याचा प्रयत्न करतो वगैरे मसाला टाकू”

“ए बये! त्या अमितला इतकी अक्कल असेल असं मला वाटत नाही. मुळात एक तर व्हिलन असायला चिक्कार हुशारी हवी. ते काही नाही, या लव्हस्टोरीमध्ये हीरो पण मीच असणार, आणि व्हिलन पण मीच असणार!”

 

घ्या, आता गेले चार वर्षे मी काय वेगळं म्हणते काय!!

“हा! पण या लव्हस्टोरीचा एंड मात्र अजुन काही दशकं होणार नाही याची मात्र खात्री आहे” माझ्या या वाक्यावर तो मनापासून हसला.

मघाशी म्हटलं तसं ग्रहण संपल्यानंतर हसावं अगदी तस्साच!!!

 

-    नंदिनी देसाई

 

 

 

7 comments:

  1. Eshan...fevorate ahe majha...jashya tujhya stories. Tu faqt lihi...

    ReplyDelete
  2. या लव्हस्टोरीचा एंड मात्र अजुन काही दशकं होणार नाही याची मात्र खात्री आहे..

    धन्यवाद...अगदी मनातल बोललात, ही story अशीच पुढे जात जावो अप्रतिम as usual

    ReplyDelete
  3. Ishan's mind & body had exertion
    Didn't approve of her excursion
    Wasn't ready to listen to her version
    Developed for everything an aversion.

    ReplyDelete
  4. Lovely read as usual. heart warming story. But I have to agree with Eshaan. All the stories in the series depict his feelings for her and his commitment. She seems to be smitten with his looks/eye and charm, his parents and their progressive family values. How and when did Eshaan stopped being a good catch(एक चांगलं स्थळ) and became someone she absolutely cant stand being without.
    Would love to read that side too.

    ReplyDelete
    Replies
    1. Sorry for very late reply. This is absolutely spot on comment on these two characters. She is still falling in love with him in every episode. In this series somewhere we will see this point as well. Thanks for the detailed reply.

      Delete
  5. nice, I want to exchange backlink with your blog. please contact mohitpatil637@gmail.com

    ReplyDelete