“हे बघ तुला जर
इंटरेस्ट नसेल तर आधीच सांगत जा... तुझं साधं लक्षसुद्धा नाही” अभिजीत बेडवरून
बाजूला होत म्हणाला. “आल्यापासून बघतोय, माझ्यासोबत असून नसून आहेस..काही भलतेच
विचार चालू आहेत”
नेत्रा त्याच्याहून
जास्त वैतागत म्हणाली, “तू आलास तेव्हाच सांगितलं तुला. दमलेय मी आज दिवसभर त्या
आझाद मैदानाच्या धुळीमधे फ़िरून फ़िरून. झोपून जाते म्हटलं तर तुला फ़ार प्रेमाचा
उत्साह आलाय...”
“आठवड्यातून एका
रात्री सुट्टी मिळते.... त्याहीवेळेला तुझे असले नखरे... हे दमण्याचे वगैरे बहाणे
आहेत... तुझ्या मनामधे दुसरंच काही तरी चालू आहे.”
“मी तुझी लग्नाची
बायको नाही, तू म्हणशील तेव्हा तुझ्याबरोबर सेक्स करायला....”नेत्रा उठून बसत
म्हणाली... “आणि हो... आज दिवसभर माझ्या डॊक्यामधे फ़क्त आणि फ़क्त या सरस्वतीचेच
विचार चालू आहेत.”
“कोण सरस्वती?”
अभिजीतने सिगरेट पेटवत विचारलं.
“आमची चीफ़
एन्टरटेनमेंट रिपोर्टर... सारा व्ही के. असलं फ़ॅन्सी नाव ठेवलं म्हणून बॅकग्राऊंड बदलत नाही..” नेत्राच्या आवाजातला तिरस्कार लपत नव्हता.
“तू काय म्हणतेस मला
काही समजत नाही. आता रात्री बारा वाजता माझ्या मिठीत असताना तुला तिचा विचार
करायची काय गरज आहे?”
“अभिजीत, मी आल्यावर
काय सांगितलं तुला? विसरलास का? सारा वीर कपूरसोबत आहे. आम्ही दोघी परत येताना मी
तिला बिल्डिंगपर्यंत टॅक्सीने सोडलं. मी लगेच तिच्यामागे गेले मुद्दाम. अभिजीत, ती
हिल रोडला राहते. एकदम पॉश सोसायटीमधे.... आणि लिफ़्ट्मधून तिच्यामागोमाग गेले
तर.... तिने डोअर बेल वाजवली.. कुणीतरी दरवाजा उघडला... पण ती एकटी राहते......”
“तू पण एकटीच
राहतेस...” अभिजीत्त तिचं वाक्य तोडत म्हणाला. “.... तरी आज आहे ना मी तुझ्या
रूमवर? तसा तिचा कुणी बॉयफ़्रेंड असेल.. पण आपण आता या वेळेला तिच्याबद्दल का डीस्कस
करतोय ते सांगशील??”
“कारण, मला
तिच्याबद्दल खूप आधीपासून संशय आहे.. अभिजीत... तुला गंमत समजलीच नाही का? ती वीर
कपूर... फ़िल्महीरो.. नेस्क्ट सुपरस्टार वगैरे.. त्याच्यासोबत झोपते. आज मी तिच्या
फोनवरून कन्फ़र्म केलंय. तिच्या रूमवरती पण तोच असेल एवढ्या रात्री.. आय ऍम शुअर..”
“नेत्रा, प्लीज... मला
आता काहीही समजत नाहीये. आधीच ब्रेनचं ब्लड सर्क्युलेशन कमी झालंय माझं... त्यात
तू हे काय बोलतेस? कसला संशय... कोण ती सारा.... भले त्या वीर कपूरबरोबर तिचं
अफ़ेअर असेनात का... की फ़रक पेंदा हे?”
“अभिजीत, सारा
तिच्या पर्सनल लाईफ़मधे काय वाट्टेल ते करू देत, आय डोण्ट केअर. पण वीर कपूर??? वीर
कपूर तिचा न्युज सोर्स आहे. इतका मोठा स्टार बेस्ट फ़्रेण्ड असल्यासारखा तिला फ़िल्मच्या
सगळ्या न्युज पुरवत असतो. तिच्या आधीच्या कचरा न्युजपेपरमधून तिला या न्युजपेपरमधे
जॉब त्याच्याच जोरावर मिळालाय. प्रश्न सारा वीरसोबत काय करते तो नाहीये. प्रश्न हा
आहे की, तिने हे रिलेशनशिप लपवून का ठेवलंय? जर तिला लपवायचंच होतं तर तिने
सर्वांना साहिलबद्दल का सांगून ठेवलंय?”
“अता हा साहिल कोण?”
अभिजीतने मघशी काढून ठेवलेला टीशर्ट अंगात घालत विचारलं.
“साराचा बॉयफ़्रेन्ड.
ऍकॉर्डिंग टू सारा, तो गल्फ़ला असतो. मुसलमान आहे, त्याच्या घरून लग्नाला परवानगी
नाही..” नेत्राने अभिजीतच्या हातातली सिगरेट घेऊन ओढली, “म्हणून दोघं लग्न करत
नाहीत... ब्ला ब्ला ब्ला... पण ही स्टोरी नक्कीच खोटी आहे... साराच्या फ़ेसबूकवर
त्याचा आणि तिचा एकही फोटो नाही. गेल्या तीन वर्षात त्याला ऑफ़िसमधे कुणी पाहिलेलं
नाही... साराच्या मोबाईलवरून साहिलला फोन लावला तर तो फोन वीर कपूर उचलतो...”
“सो?”
“म्हणजे सारा आणि
वीर दोघेही हे रिलेशनशिप लपवतायत... आलं का लक्षात? वीरने चार दिवसापूर्वी लग्नाची
अनाऊन्समेंट रद्द केली होती. कशासाठी ते कुणालाच माहित नाही... पण त्यावर साराच्या
रिपोर्टलाच सगळ्यांनी खरं मानलंय...”
“नेत्रा, हे सगळं
खरं असलं तरी त्याचा नक्की काय संदर्भ लावतेस तू? तिचं पर्सनल लाईफ़ आहे...”
“हो. पण वीर कपूरचं
लाईफ़ पर्सनल नाहीये ना... ही इज अ स्टार... ऍन्ड मोस्ट इम्पोर्टंटली ही इज अ सन ऑफ़
अ सुपर्स्टार..”
“व्हॉट रब्बिश!!
त्या सर्व अफ़वा आहेत... मीडीयामधे छापून येतं विनाकारण..”
“नो, अभिजीत. तुला
त्याची काहीच हिस्ट्री माहित नाही का? वीर कपूरबद्दल??”
“मला कशाला माहित
असायला हवं? मी केपीओमधे काम करणारा माणूस आहे, तुझ्यासारखा जर्नालिस्ट नाही...
लोकांची गॉसिप्स चघळत लिहायला... सालं आठवड्यातून एखादी रात्र मिळते.. ती एंजॉय
करणे सोडून हे असलं भलतंच काही तरी विचार.... खड्ड्यात गेली ती सारा आणि तो वीर.
असेल त्यांचं काही लफ़डं. ठेवली असेल त्याने तिला.. तुला घेऊन काय करायचंय??
“मला भलामोठा स्कूप
मिळतोय... साराच्या पर्सनल लाईफ़वरून जर मी धवनला हे पटवून देऊ शकले की सारा
स्लीप्स अराऊन्ड फ़ॉर स्टोरीज.. तर माझा किती फ़ायदा आहे ते बघ ना.. अनाथ आहे ती,
म्हणजे घरचे तर कुणी पैसे देत नसणार. बाजारात येणारं प्रत्येक नवीन गॅजेट
तिच्याकडे असतं. कपडे तर युरोपियन ब्रॅन्डचे वापरते. अभिजीत, माझे वडील कस्टम्समधे
ऑफ़िसर आहेत, तरीपण मी तिच्याइतके पैसे उधळू शकत नाही.... मग साराकडे कुठून येतात
एवढे पैसे? कसं काय तिने वीरला पटवलं असेल... दिसायला तर काळीच आहे की ती... ”
नेत्रा बोलत असतानाच अभिजीत बेडरूममधून बाहेर पडून हॉलमधे गेला, “कुठे निघालास?” तिने
बेडवरूनच विचारलं.
“मी माझ्या फ़्लॅटवर
जातोय. नेक्स्ट टाईम, तू तिकडेच ये. एवढं सालं ड्राईव्ह करून इथे यायचं आणि तुझं
ऑफ़िस पुराण ऐकायचं. झक मारली आणि आज इथे आलो.”
“एवढापण चिडू नकोस.
माझ्या करीअरचा प्रश्न आहे. थोडीफ़ार साथ देऊ शकतोस तू मला....” ती चिडून ओरडली.
“काय साथ देणार? काय
अपेक्षा आहेत काय तुझ्या माझ्याकडून? मघासी तर ओरडलीस ना.. लग्नाची बायको नाही
म्हणून... मग आता?” अभिजीत तिच्याहून जास्त जोरात ओरडत म्हणाला.
“तुझ्याशी ना बोलणंच
बेकार होत चाललंय”
“मग नकोच बोलूस...
यु नो व्हॉट.... कदाचित तुझ्या आणि सारामधे हाच डिफ़रन्स असेल.. ती कदाचित त्या
वीरला अशी बेडवरून रात्री दीड वाजता हाकलून देत नसेल...”
“मी तुला कुठेही
हाकलत नाहीये, तू स्वत:हून जातोयस”
अभिजीतने बाहेरचा
दरवाजा उघडला, “पण तू थांब हे देखील म्हणू शकत नाहीस ना...” आणि धाडकन दरवाजा ओढून
तो बाहेर पडला.
==========================================================
“सारा... सारा...
लवकर ये” वीरच्या आवाजातलं हे ओरडणं ऐकून साराचे डोळे उघडले. डोळे चोळत तिने मोबाईलमधे किती वाजले ते पाहिले तर पहाटेचे
साडेपाच वाजले होते.
“सारा.. प्लीज लवकर
ये...” पुन्हा एकदा वीरचा घाबरा आवाज आला.
सारा कशीबशी बेडवरून
उतरली.
“काय झालं?” तिने
पेंगुळल्या आवाजात विचारलं. वीर हॉल आणि किचनमधल्या पॅसेजवर उभा होता.
“पाल आहे” वीर
सावकाश म्हणाला.
साराने पुन्हा एकदा
डोळे चोळले. “आणि म्हणून तू मला मध्यरात्री झोपेतून उठवलंय?” सारा अविश्वासाने
म्हणाली. वीर एकटक त्या पालिकडे बघत हातात झाडू घेऊन उभा होता.
“नीट बघ तिकडे.
गॅसच्या बाजूला आहे अजून” वीर पुन्हा एकदा हळू आवाजात म्हणाला.
“तू जोरात बोललास तरी
पालीला काही समजणार नाही... बेडरूममधे जाऊन बस..” साराने चष्मा पुसून डोळ्यांवर
लावला आणि वीरच्या हातातला झाडू घेतला. वीर तिथून गेल्यावर ओट्यावरची ती पाल दात
ओठ खात झाडूच्या दोन तीन फ़टक्यात गारद करून टाकली.
“नीट मार गं. नाहीतर
मागच्या वेळेसारखी परत जिवंत व्हायची.” वीरची सूचना आली.
“एवढी चिंता असेल तर
तू येऊन मार ना... मला कशाला आमंत्रण दिलंस..” साराने लगेच उत्तर दिलं. मेलेली ती
पाल किचन बाल्कनीमधून खाली भिरकावून दिली. “गेली आता घराबाहेर. तुला इकडे यायचं
असलं तर ये” सारा म्हणाली.
“थॅन्क गॉड तू घरात
होतीस.. नाहीतर काही खरं नव्हतं माझं. आय जस्ट हेट दीज लिझर्ड्स.” वीर म्हणाला.
“मी घरात होते
म्हणजे? हे माझं घर आहे वीर. विसरलास का? आणि तू एवढा मोठा ऍक्शन हीरो म्हणवतोस
आणि साध्या एका पालीला घाबरतोस?” सारा त्याला चिडवत म्हणाली. “उद्याला तुझ्या
मूव्हीमधे एखादी पाल व्हिलन म्हणून असेल तर?”
“असले व्हिलन नसतात
आपल्याकडे.. असली तर मी काय तो रोल करणार नाही.... कॉफ़ी घेतेस?”
“मी परत जाऊन झोपते
तासभर. आज सुट्टीचा दिवस आहे माझा... सकाळी सकाळी तुझ्यामुळे पाल मारावी लागली.”
“पण तू ते पेस्ट
कंट्रोल करून घेतलं नाहीस का? मागच्यावेळेला केलं होतं ना?”
“हो, ते तुला झुरळं वगैरे दिसले होते म्हणून तूच कुणालातरी बोलावलं होतंस. वर्ष होऊन गेलं त्याला... मला त्याची काही गरज वाटत नाही.. झुरळं दिसली की सरळ स्प्रे मारते.. आणि पाल दिसली की सरळ सुतावरून स्वर्गात पाठवते...”
“तुला बरोबर जमतं ना
हे पाल वगैरे मारायला..” वीर तिच्या हातात कॉफ़ी देत म्हणाला.
“मग? तू आमच्या
आश्रमात कधी पाहिलं नाहीस. तिथे फ़रशी नव्हती, शेणानं सारवलेली जमीन. पाल,
कुसरूम्ड वगैरे तर नेहमीचेच होते तिथे. पावसाळ्यात कधीकधी विंचू, जनावरं पण
यायची...” एरवी सारा तिच्या आश्रमांच्या दिवसाबद्दल फ़ारसं कधी बोलायची नाही.
“जनावरं? यु मीन गाय
बैल वगैरे?”
“नाही रे वेड्या.
जनावरं म्हणजे साप वगैरे. तेव्हा रोज कुणाच्याना कुणाच्या खोलीत साप निघायचेच.आधी
पहिले थोडे दिवस मला भिती वाटायची, नंतर सवय झाली होती मी पण साप मारायला लागले
होते. एकदा तर मी आणि साहिल बागेत असंच काहीतरी बोलत बसलो होतो. आणि समोरून चक्क
जातिवंत नाग आला. मारू नये म्हटलं तरी धोक्याचाच. मारावं म्हटलं तर आम्हीच दोघं
तिथे... उलटून आला तर काय करा. शेवटी साहिलने तिथलाच एक दगड उचलून मारला... मी पण
दोन तीन दगड घेतले आणि मारला एकदाचा त्याला..” सारा भराभर बोलत होती... तिचं
वीरकडे लक्षच नव्हतं. असतं तर तिला ताबडतोब वीरच्य चेहर्यावर आलेला संताप आणि
तिरस्कार ताबडतोब दिसला असता...
“बरोबर आहे...
तुझ्या साहिलला एखाद्याला मारणं फ़ारसं कठिण नाहीच” तो कड्वट आवाजात म्हणाला.
“काय म्हणालास?” सारा बोलताना अचानक थांबत
म्हणाली.
“काही नाही... असंच
सहज..” तो बाल्कनीमधून बाहेर बघत म्हणाला.
“सॉरी.. साहिलचं नाव
तुझ्यासमोर घ्यायचं नाही असं कायम ठरवते.. पण ते शक्य होत नाही...” सारा अपराधी
स्वरांत म्हणाली.
वीर काही न बोलता
शांत बसून राहिला.
“वीर, सॉरी म्हटलं
ना...”
“नुसतं सॉरी म्हणून
काय होणारे? सारा, आपलं नातं तुटलं होतं ते याचसाठी. मी, राजनने तुला कितीवेळा
समजावून सांगितलंय.. प्रोफ़ेशनल काऊन्सिलींग देऊन सांगितलंय...” वीर बोलत असताना
साराच्या डोळ्यांतून पाणी आलं. “सारा, ट्राय टू अंडरस्टॅन्ड.. हे तुझ्यासाठी खूप
धोकादायक आहे... समजतंय का तुला मी काय म्हणतोय ते?” वीर समजुतीच्या स्वरांत
म्हणाला.
“हो.. मी
माझ्यापरीने प्रयत्न करत नाही का? मला तुमच्या या सर्वांची ही अपेक्षाच समजत
नाही... मी माझ्या आयुष्यामधून त्याला कायमचं वजा करावं... जणू तो आणि मी कधी
भेटलोच नव्हतो.. असं मानावं.... पण हे शक्य नाही वीर... माझ्याच्याने हे जमणार
नाही. कारण, वीर जेव्हा माझ्या आयुष्यात तू नव्हतास, तेव्हा साहिल ही एकमेव
व्यक्ती होती... त्याने मला आधार दिला... कितीवेळा वाटलं की जाऊन जीव द्द्यावा.
त्याने परत जगायला शिकवलं. मी त्याच्याशिवाय आज इथे कधीच आले नसते... आणि वीर, तू
दरवेळेला मला चुकीत धरतोस? माझ्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना मी तुला सांगितली
आहे. अगदी वयाच्या चौदाव्या वर्षी माझ्या सख्ख्या काकाने केलेला बलात्कार असू दे
वा मी फ़र्स्ट इयरनंतर साहिलसोबत पळून गेले ते असू दे.. काय लपवून ठेवलंय मी तुझ्यापासून?
ज्या क्षणापासून तुझ्या प्रेमात पडले त्या क्षणापासून साहिलशी सगळे संबंध तोडले.
कितीतरी दिवस माझा फोन नंबर पण नव्हता त्याच्याकडे... त्याला माझा नंबर कुठून
मिळाला माहित नाही... अधून मधून फोन करतो... तेवढंच!” साराच्या या वाक्याबरोबर वीर
चमकला... “कालच त्याचा फोन आला होता... दोन मिनिटं बोलल्यासारखं केलं आणि फोन
ठेवून दिला... अजून काय करू मी? माझ्या भूतकाळातील आठवणी मिटवून तर टाकून देऊ शकत
नाही ना?”
“सारा... सांगितलं
ना एकदा. सॉरी! माझा खरंच तस काही उद्देश नव्हता.. तुझ्या लाईफ़मधे साहिल काय आहे
ते माहित आहे मला.. पण आता... जाऊ देत तो विषय. आजचा पेपर आलाय का? तुला फ़्रंटपेज
बायलाईन असेल ना?”
“नाही, आजची बायलाईन
मला नाहीये” सारा डोळ्यांतलं पाणी पुसत म्हणाली. “आणि त्यात काही फ़ारसं ग्रेट पण
नव्हतं, रोहित कपूर शेवटी स्टेजवर आलाच नाही. काय गडबड झाली कुणास ठाऊक....”
“गडबड काही झाली नाही. मी काल त्याला फोन केला होता.” वीर सहजपणे म्हणाला. “रसिकासाठी म्हणून...”
“खरंच वीर? पण कसं
काय...”
“काही नाही गं,
त्याला फोन केला आणि...” एवढ्यात वीरचा मोबाईल वाजला. राजनचा नंबर होता.
“सारा, एक मिनीट
हा... फ़ायनान्सरचा फोन आहे. मी जरा बाल्कनीमधे जाऊन बोलेन” म्हणत वीर बाल्कनीमधे
आला आणि त्याने दरवाजा बंद करून घेतला.
पलिकडे राजन काही
बोलणार त्याआधीच वीर
हळू आवाजात म्हणाला, “राजन... साहिल
परत आलाय?”
“क्या बात कर रहा
है?”
“आता सारासोबत आहे
मी. तिनेच सांगितलंय” वीर प्रचंड चिडलेला होता.
“कसं शक्य आहे?
साहिल....”
“हे बघ कसं शक्य आहे
ते मला माहित नाही. काहीही कर आणि कसंही कर.. पण हे असलं परत घडता कामा नये” एवढं
बोलून वीरने फोन कट केला.
साहिल परत आला होता
ही काही फ़ार आश्चर्याची गोष्ट नाही, पण त्याने साराला फोन करायची हिंमत केली ही फ़ार
वाईट गोष्ट आहे, वीर स्वत:शीच पुटपुटला.
No comments:
Post a Comment