तसं त्याचं आणि माझं नातं केव्हाचं हे मलाही आठवत नाही. पण नातं आहे हे मात्र नक्की. प्रत्येक नात्याला काहीतरी नाव असावं असा अट्टाहास जेव्हा ठेवला जातो तेव्हा त्या नात्यातला अलवारपणा कधी निघून जातो ते समजत सुद्धा नाही. सुदैवाने अजून त्याच्या आणि माझ्या बाबतीत असं झालेलं नाहिये, अजून तो तसाच आहे आणि अजून मी तशीच आहे, आणि आमच्या दोघांमधला संवादही तसाच. किती शतकांपासून चालू आहे मलाच माहित नाही.
खरंतर माझ्याकडे सांगण्यासारखं काहीच नसतं, त्याच्याकडे खजिना असतो अद्भुत गोष्टींचा, पण मला फक्त ऐकायला कंटाळा येतो हे त्याला समजतं, म्हणून तो कधीतरी माझ्या गप्पा पण ऐकतो. आणि मनातल्या मनात हसतो.
माझे दु:ख त्याच्या एका लाटेएवढं. त्याची एक लाट माझ्या आयुष्याएवढी. तो उंच, खोल, गहनगंभीर धीरोदात्त.. मी चंचल अवखळ भिंगरी. तो कितीतरी काळापासून तिथेच, कुणाच्या तरी प्रतीक्षेत असल्यासारखा, आणि मी इथून तिथे, तिथून इथे... स्वतःच्या शोधात असल्यासारखी..तो मला कित्येकदा थांबायला सांगतो.. पण मी थांबत नाही थांबावंसं वाटतच नाही. हा प्रवास सतत सुरू असल्यासारखा.. पण जाते त्याच्यापासून दूर आणि परत त्याच्यापर्यंतच येऊन पोचते.
तो कदाचित कधीतरी माझ्यावर चिडतही असावा, कुणास ठाऊक. त्याचा चेहरा बघून काहीच सांगता येत नाही. आणि त्याला तर माझा चेहरा बघायची पण गरज नसते, माझ्या मनातली प्रत्येक झुळूक त्याच्यापर्यंत अलगद पोचते. एखाद्या बासरीच्या सुराप्रमाणे... अलगद.
"माझ्यासारखे किती वेडे असतील ना तुझ्या आजूबाजूला?"मीच कधीतरी लटक्या रागाने म्हणते,
तो गालातल्या गालात हसतो.. आणि म्हणतो,"अगं, प्रत्येक जण खास आहे माझ्यासाठी. पण तू जरा जास्तच," आधी मला वाटायचं वा!! किती मी स्पेशल. पण आता लक्षात आलंय की प्रत्येकाला खुश करण्यासाठी तो असं काहीना काही तरी बोलत असणारच. सवयच असणार त्याला तशी. आधीपासूनच.
पण तरी तो मला आवडतो. कुठे ना कुठेतरी त्याचा एक तरी कोपरा माझ्यासाठी आहे हे मला माहीत आहे, तो एक कोपरा माझा, मी मात्र संपूर्णपणे फक्त त्याची.
त्याचा धीरगंभीर स्वभावाचं मला कायम आश्चर्य वाटतं, नेहमीच तो असा मनात गुंज घालणारा. माझ्या पायातले पैंजण त्याच्या फुंकरीने छनकवणारा. हळूवारपणे माझ्या केसाच्या बटा उडवणारा, माझ्या पावलाची नक्षी वाळूतून स्वतःच्या हृदयात जपणारा, माझ्यासाठी शंख शिंपल्याची आरास करणारा.. माझ्या हलक्यशा लकेरीवर शंखनाद करणारा,,
कधी कधी मात्र मला उगाच वाटतं. तो चिडलाय, तो खवळलाय. मी घाबरते. कावरी बावरी होऊन जाते. आपल्याच माणसाने असं वागणं खूप त्रास देऊन जातं. हेच कधी त्याला समजावते तर तो वर उलट मलाच हसतो.."अगं खुळाबाई,,, तुला काय वाटलं मी चिडलो? हेच का तू मला जाणून घेतलंस? हेच का तुझं माझं नातं.. ?"
माझ्या डोळ्यसमोर त्याचं रौद्र रूप उभं राहतं. "तांडव आहे ते, मिलनाचं, सृजनाचं, या सृष्टीच्या आनंदाचं तांडव आहे, मी काय रौद्र रूप दाखवणार? मी तर या सृष्ट्रीचा एक पाईक, हे चराचर ज्याच्या हातात मी त्याच्या पायाचा दास.. घाबरू नको."
"खरंच?" मी काहीतरी बोलायचं म्हणून बोलते. मनातून मात्र पार घाबरलेली.
"अगदी तुझी शपथ.." त्याची एक लाट हलकेच माझ्या पायाला शिवून जाते.
"ए शपथ काय? सुटली म्हण.."
"नाही म्हणत जा" तो हसत दूर जातो.
"थांब,"तो अचानक ओरडतो.
"काय झालं?" मी भांबावून जाते.
"माझ्या जवळ येऊ नकोस"
"का?""जो माझ्या जवळ येतो तो माझ्यापेक्षा खूप दूर जातो..." त्याच्या आवाजातली खिन्नता मला जाणवतेय. "तोच माझा शाप आहे"
आता मात्र मी खळखळून हसतेय
"हात्तीच्या,, एवढंच ना...अरे तुला इतकंही माहीत नाही,, हेच का तुझं माझं नातं? हेच जाणलंस तू मला?"
तो शांत बसलाय, मी एक एक पाऊल पुढे टाकत त्याच्या कानात हलकेच सांगितलं.
"अरे मी कुठे तुझ्यापासून दूर जाईन. इथेच सुरू झालेलं आयुष्य इथेच संपणार.. मी जर कधी हरवले ना तर स्वतःमधेच कुठेतरी शोध मला. नक्की सापडेन मी तुला.. तुझ्यामधेच कुठेतरी तुला शोधत...."
समाप्त
Manaparyant pohachelel..... kadhi kadhi kahi gosti aaplyasathich lihlya aahet as ka watat
ReplyDelete