Monday, 14 May 2018

ये रास्ते है प्यार के ( भाग ५)


संजू
“आय थिंक दिस इज अ गूड आयडीया” तेजूनं आपलं मत मांडलं. ऑफिसच्या कॉन्फरन्स रूममध्ये मी, सेलिना, जतिनभाई, सेजल आणि मिहिर बसून डिस्कशन करत होतो. दरवर्षी आमच्या पीआर एजन्सीच्या ऍनिव्हर्सरीला दोन किंवा तीन दिवसांचा इव्हेंट असतो. पहिल्या दिवशी दिवसभर वर्कशॉप आणि लेक्चर्स. त्यानंतर पार्टी. पार्टीचं इतकं काय ग्रेट नाही, पण पहिल्या दिवशीची सेमिनार्स आणि पॅनल डिस्कशन्स फार महत्त्वाची ठरतात. गेल्या अनेक वर्षामध्ये या डिस्कोर्समध्ये कित्येक मोठमोठ्या नावांनी हजेरी लावली होती. इथूनच अनेक राजकारणी, पत्रकार आणि विचारवंतांनी मतं मांडून देशभर हंगामा केला होता. तो युपीचा म्हातारा लीडर माहिताय? त्यानं याच स्टेजवरून आपल्या दोन्ही बायकांना आपण व्यवस्थित सांभाळत असल्याचं सांगून स्वत:च्या राजकारण करीअरचा अंत करवून घेतला होता. त्याला दोन बायका असण्याचा प्रॉब्लेम नव्हता, ते तर कित्येकांना माहितच होतं, पण स्टेजवरून जाहीरपणे याची कबूली देणं वॉज अ डिझास्टर. चार दिवस टीव्ही आणि सोशल मीडीयावर नुस्ता कल्ला!
आम्ही आता बसून यावर्षीच्या इव्हेंटची रूपरेषा आखायचा प्रयत्न करतोय. दुसर्‍या दिवशीची पार्टी आणि इतर तयारी काय फार महत्त्वाची नाही, मी आणि तेजू चोवीस तासाच्या डेडलाईनवरपण ते निभावून नेऊ, खरी मजा स्पीकर शोधण्यात आणि फायनलाईझ करण्यात. आम्ही सर्वांनी आमच्या आवडीप्रमाणे चार चार नावं दिली होती. त्यांची उपलब्धता बघून फायनल् करायचं होतं. मिहिरच्या मते, यावर्षी वेगवेगळे चार लोक बोलवून त्यांना आवडीच्या विषयावर बोलायला लावण्याऐवजी सलग पॅनल डिस्कशन ठेवावं. आयडीया वाईट नव्हती.
आज फ्रायडे असल्यानं सर्वजण कॅज्युअल्समध्ये होतो. मी जीन्स आणि लेमन येलो कलरचा टॉप घातला होता. मिहिरनं खाकी कार्गो पॅण्ट्स आणि त्यावर हलक्या आकाशी रंगाचा टीशर्ट घातला होता. असलं खतरा कलर कॉंबो कॅरी करायला जबरदस्त ऍटीट्युड लागतो. मिस्टर मिहिर जैन ऍटीट्युडचे होलसेल डीलर आहेत. एरवी त्याचे केस चप्प जेल लावून बसवून भांग पाडलेले असतात. आज मात्र त्याचे केस नुकतेच शॉवर घेतल्यासारखे दिसत होते. फ़ॉर्मल शर्टमध्ये अजिबात लक्षात न येणारी गोष्ट म्हणजे मिहिर अत्यंत फिट माणूस आहे. गौरव खन्नासारखा बेस्ट फ्रेंड असल्यामुळे का माहित नाही पण मिहिर स्वत:च्या फिटनेसबद्दल जागरूक आहे. त्याचे बायसेप्स पैलवानांसारखे बल्की नाहीत, उलट मूर्तीकाराने कोरल्यासारखे लीन तरीही फिट आहेत. मीटिंगमध्ये बोलताना मध्येच खुर्चीत मागे रेलून त्यानं केसांमधून हात फिरवला तेव्हा तर त्याच्या हातावरचा प्रत्येक स्नायू पेन्सिलने स्केच केल्यासारखा दिसला होता. त्याचवेळी त्याचा टीशर्ट किंचित वर सरकल्यामुळे त्याच्या पोटाच्या साईडवर कसलातरी टॅटू असल्याचं समजलं. सीरीयस मिहिर जैन टॅटूबाज पण आहेत!!! नक्की काय टॅटू आहे ते समजलं नाही, पण कधीतरी कळेलच ना....
अर्थात मी त्याच्याकडे इतकं निरखून पाहत असल्यामुळे मला हेही माहित होतं की. मीटिंगमध्ये मिहिरचं लक्ष माझ्याकडेच आहे. मी माझ्या टॅबवर नोट्स काढत होते तर तो त्याच्या डायरीमध्ये लिहून घेत होता. मिहिर जैन यांचं हस्ताक्षर बेकायदेशीर म्हणून जाहीर करावं यासाठी मीच पीआयएल टाकणार आहे. मागे त्यानं मला कागदावर मीटिंगच्या नॊट्स बनवून दिल्या होत्या, तेव्हाच त्याचं अक्षर किती सुंदर आहे याची कल्पना आली होती, पण डायरीमधलं त्याचं अक्षर हा पूर्ण वेगळा विचार करण्यासारखा विषय आहे. कर्सिव्हमध्ये इतकं नेमकं सुरेख लिहिताना मी आजवर कुणालाही पाहिलेलं नाही. त्यात परत तो फक्त काळ्या फाऊण्टनपेननेच लिहितो. कातिलपणा लेव्हल अजूनच वर.
तेजूपण त्याच्या अक्षरावर जाम फिदा आहे. मघाशी मीटिंगमध्ये कुणाचातरी कॉल आला म्हणून मिहिर बाहेर गेला तेव्हा तिनं त्याच्या डायरीच्या पानांचे फोटो काढले आणि लगेच मला मेसेज केले.
“सेक्सी” मी तिला रीप्लाय केला.
“अक्षर की माणूस?” तिचा रीप्लाय.
“गेस मार”
आमची मेसेजामेसेजी चालू असताना मिहिर आत आला आणि चर्चेला परत सुरूवात झाली. विषय काय ठेवायचा यावर खूप चर्चा झाली. काहीच फायनल होईना. अखेर सेजल म्हणाली, त्यापेक्षा चार लोक कोण ते ठरवा, आणि मग त्यांना एकत्रित करता येईल असा विषय बघू. परत एकदा चर्चेला धमासान तोंड फुटलं. आम्ही दिलेली कुठलीच नावं मिहिर जैन यांच्या पसंतीला उतरत नव्हती. बर्‍याच चर्चेनंतर तीन नावं अलमोस्ट फायनल झाली. तीनही स्त्रिया. तिघीही अत्यंत सीनीअर पत्रकार. एंटरटेनमेंट, हेल्थ आणि स्पोर्ट्स अशा बीटसमधून काम करणार्‍या. तिघींच्या अव्हेलेबिलिटीचाही प्रश्न नव्हता. चौथे नाव शोधण्य़ामध्ये मात्र फार वेळ गेला. शक्यतो बिझनेस अथवा कार्पोरेट बीटमधून एखादं नाव मिळतंय का बघत होतो.
सेजल आमच्या इतक्यावेळच्या बडबडीला वैतागून कुणालातरी फोन करायचं निमित्त घेऊन बाहेर गेली होती. मी फोनवरून गूगल करत सीनीअर पत्रकारांची काही नावंबिवं शोधत होते. कुणीतरी वेगळं हटके मिळालं तर हवं होतंच.
अचानक मोबाईलमधल्या स्क्रीनवर एक नाव झळकलं आणि डोक्यांत एकदम क्लिक झालं.
“आय नो!” मी किंचाळलेच. “चौथ्या पॅनलिस्टसाठी आपण क्राईम जर्नालिस्टला बोलावलं तर...”
“लेडी क्राईम जर्नालिस्ट! एकदम फॅण्टास्टिक” तेजूनं मान डोलावली.
“यप्प! मिस मिनाक्षी शहा. त्यांचं एक पुस्तक मी मागे वाचलं होतं. त्यांनी स्वत: ऐंशीच्या दशकामध्ये खूप क्राईम स्टोरीज केल्या. खास करून स्मगलर आणि अंडरवर्ल्डच्या...” मी बोलत असतानाच अचानक जतिनभाई हसायला लागला. त्याच्या हसण्याचं कारण मला लक्षात येईना.
“मिस संजीवनी, प्लीज हे नाव नको. दुसरा ऑप्शन बघा” मिहिर जतिनभाईंकडे जरा रागानं बघत म्हणाला.
“पण सर, शी इज रीअली गूड. खूप छान बोलतात आणि अनुभवीही आहेत...आय गेस, जतिनभाई त्यांना नक्कीच चांगलं ओळखत असणार... मला वाटतं की...”
मिहिरनं हातामधली डायरी धप्पकन जोरात मिटली. “मिस संजीवनी, परत एकदा! दुसर्‍या ऑप्शनचा विचार करू या.”
जतिनभाई मध्येच म्हणाले. “मिहिर, नॉट अ बॅड आयडीया....” त्याचंही बोलणं मध्येच तोडत मिहिर ओरडला. “एकदा सांगितलं ना.. नको!”
“मिस्टर जैन, तुम्ही प्लीज ऐकून घ्या.. दुसर्‍याही ऑप्शनचा विचार आपण करू या... पण चार सीनीअर स्त्री पत्रकार स्टेजवर असताना क्राईम रिपोर्टर असणं अधिक चांगलं नाही का? इट विल बी इण्टरेस्टिंग..”
“मिस संजीवनी, लास्ट वॉर्निंग. वी आर नॉट डीस्कसिंग मिनाक्षी शहा. ते नाव कॅन्सल करा.” माझ्या बोलण्यामध्ये अथवा हे नाव सुचवण्यामध्ये माझं नक्की काय चुकलं तेच मला कळेना. इतक्या दिवसांमध्ये मी मिहिरला इतकं चिडलेलं कधीही पाहिलं नव्हतं. त्याच्या मोबाईलसोबत आम्ही खेळ केला, तेव्हा तो वैतागला, पण हा असा संतापलेला कधीच नव्हता. मी किंवा जतिनभाईनं पुढं काही बोलण्याआधी तो ताडकन उठला आणि कॉन्फरन्स रूमबाहेर निघून गेला.
मी जतिनभाईकडे पाहिलं. त्यालाही नक्की असं का घडलं ते माहित असावं पण केवळ “कंटिन्यु. दुसरा एखादा ऑप्शन सुचवा.” इतकंच सांगून विषय संपवला. तेजूनं माझ्याकडे “नक्की काय झालं?” म्हणून पाहिलं तेव्हा मी फक्त खांदे उडवले. काय घडलंय ते मला माहित नसताना मी काय उत्तर देणार.
गेले काही दिवस मिहिर माझ्याशीच काय पण इतर सर्वच स्टाफबरोबर जरा नीट वागत होता. सुरूवातीला असलेला माजोरी गुर्मीपणा आता जरा कमी झाल्यासारखा वाटत होता. आजच्या प्रसंगानं मात्र मला जाणवलं. लोक कधीही बदलत नाहीत. बदलण्याचा कितीही आव आणला तरीही...
>>>>>>>>> 
मिहिर:
आयुष्यात काही काही लोकांसमोर तुम्ही खोटं बोलूच शकत नाही. इन फ़ॅक्ट बोलूही नये. कारण अशी माणसं म्हणजे आपल्यासाठी एक बेट असतात. चहुबाजूंनी वादळ घोंगावत असताना सुरक्षितपणे उतरायचं, स्वत:ला वाचवायचं तर ही अशी बेटं हवीतच. माझ्यासाठी सेजल असं बेट आहे. मी तोंडावर तिला अर्थात सेजल म्हणत नाही. म्हटलं तरी तिची हरकत नसेल म्हणा. नात्यानं ती माझी मामी लागते पण मी तिला कायम मम्मी म्हणत आलोय..
माझ्या आयुष्याबद्दलचे अनेक निर्णय मी जन्माला येण्यापूर्वीच घेतले होते, मला त्यामध्ये कधीही काही चॉइस नव्हता. आजही नाही. गंमत म्हणजे त्यातले अनेक निर्णय मी जन्माला आल्यानंतर फिरवले गेले. मला त्यामध्येसुद्धा काहीही चॉइस नव्हता.
माझ्या आईनं मला जतिनमामाला दत्तक द्यायचं ठरवलं होतं. प्रॉपरली, कागदोपत्री. जर तसं घडलं असतं तर मी जतिन शहांचा मुलगा म्हणूनच वाढलो असतो. कदाचित मला माझे जन्मदाते आईवडील कोण हे समजलंही नसतं, माझ्या घरच्यांनी सांगितलं असतं वा नसतं, नक्की काय घडलं असतं ते माहित नाही. पण मी कागदोपत्री संजय जैन यांचाच मुलगा राहिलो. मी जन्माला येण्यापूर्वी काही तास आधी संजय जैन हे जग सोडून गेले. त्यानंतर आईनं मला जतिनमामांना दिलं नाही पण तरीही सेजल माझ्यासाठी कायम आई बनली.
आता याक्षणी मी कॉन्फरन्सरूममधून ताडकन निघून माझ्या केबिनमध्ये आल्यानंतर बरोबर तिसर्‍या मिनिटाला सेजल माझ्यासमोर बसलीये. काय घडलं हे तिला समजलंही असेल..
“तू असा तिरसटासारखा का निघून आलास? त्या मुलींना खरंच माहित नाही की..”
“की ते माझ्या आईविषयी बोलतायत. खरं सांगू... माझ्यासाठी आईला त्या पॅनल डिस्कशनमध्ये बोलावण्यासारखा तिचा मान नसेल.. शी इज अ ग्रेट रिपोर्टर..” मला खरंच नक्की कळत नाहीये, मी चिडलोय, संतापलोय की हरलोय..
“पण मग नक्की काय झालंय?”
“मम्मी, आपण चार महिन्यानंतर होणारा इव्हेंट डिस्कस करतोय”
सेजल माझ्यासमोरच्या खुर्चीमध्ये बसली. माझ्या आईकडे चार महिने नाहीत. किंबहुना मिळालेला प्रत्येक दिवस हा तिच्यासाठी बोनस आहे.
 “तू आता काय ठरवलंयस?” तिची नजर पूर्णपणे माझ्यावर रोखत मला विचारलं.
“अजून तरी काही नाही. आपण एकदा सेकंड ओपिनियन घेऊया” मी माझ्या खुर्चीत डोकं टेकत उत्तर दिलं. हे डिस्कशन आम्ही घरी करू शकत नाही. जतिनमामाच्या केबिनमध्ये नाही. फोनवर किंवा मेसेजवर तर अजिबात नाही. कुणी वाचलं तर...
 “मी गेले सहा महिने सांगत होतो, की तिला युएसमध्येच ट्रीटमेंट देऊ. ऐकलंत माझं? नाही. दरवेळी तू इकडे परत ये तू इकडे परत ये. मी परत येऊन काय साध्य झालं? सहा महिन्यामध्ये दोन सर्जरी. आणि अजून म्हणावी तशी प्रोग्रेस नाही. आता हा नवीन डॉक्टर म्हणतो की फार तर महिना दिड महिना. ही अशी डेडलाईन!” बोलताना माझा आवाज चढला. मी सहसा संतापत नाही. वैतागतो, चिडचिड करतो, पण संतापत नाही. आताही मला राग आलाय तो माझाच! सेजल माझ्यासमोरून उठली आणि माझ्या खुर्चीजवळ येऊन तिनं माझ्या कपाळावर हात ठेवला. “सर्व ठिक होईल. सेकंड ओपिनियन पण घेऊ. अजून काहीही ट्रीटमेंट शक्य असेल ती करूया. मी आहे ना तुझ्यासोबत!” आईच्या तब्बेतीबद्दल आम्ही जतिनमामाला फारशी कल्पना देत नाही. एक तर तो स्वत: हार्ट पेशंट आहे, आणि आईच्या लंग कॅन्सरबद्दल समजल्यापासून तो अधिकच हळवा झालाय. तिला नुसतं ऍडमिट केल्याचं त्याला समजलं तरी तो हायपर होतो. यावेळी डॉक्टरांनी आम्हाला सगळेच ऑप्शन्स संपत आल्याचं स्पष्ट सांगितलंय. तरीही, कुठेतरी काहीतरी प्रयत्न करत राहिलंच पाहिजे.
मम्मीच्या मायेच्या स्पर्शानं माझ्या डोळ्यांत पाणी आलं. येस्स, मी बाप्यामाणूस आहे आणि मी रडणं अपेक्षित नाही वगैरे वगैरे. पण आधी म्हटलं तसं, आयुष्यात काही लोकांसमोर तुम्ही खॊटं बोलूच शकत नाही. माझी आताची अवस्था फक्त सेजलला माहित आहे.
“बेटा, मी आहे ना... आपण करू सगळं” ती शांतपणे म्हणाली. तिच्या त्या शांत आश्वस्त शब्दांनी मला अजूनच रडू फुटलं.
माझ्या केबिनच्या दरवाज्यावर टकटक झाली. “येस” मी डोळे पुसत म्हटलं.
“सर, मी संजू. दोन मिनिटं आत येऊ का?”
सेजल माझ्याकडे पाहून गालांत किंचित हसली. “कदाचित सॉरी म्हणायला आली असेल.”
“खरंतर मीच तिला सॉरी म्हणायला हवंय.
“गॉड, यु आर अ मेस” तिनं माझे विस्कटकेले केस सारखे केले. 
मी केवळ मान डोलावली. मला सध्या स्ट्रॉंग ब्लॅक कॉफीची गरज आहे. पण सेजलला काही सांगावं लागत नाही. तिचा माझा संबंध रक्ताचा नाही, पण मायेचा आहे.  तुम्ही दोघं डिस्कस करा. मी कॉफी पाठवते म्हणून सेजल केबिनबाहेर पडली. मिस संजीवनी आत येऊ की नको. बोलू की नको अशा संभ्रमामध्ये उभी होती.
“येस?” मी विचारलं. “प्लीज आत या ना”
“सॉरी सर! आता जतिनभाईंनी सांगितलं. मला माहित नव्हतं की त्या तुमच्या आई आहेत”
“खरंतर सॉरी मी म्हणायला हवंय. माझी रीएक्शन फारच वाईट होती. प्लीज हॅव अ सीट.”
“आय डोंट नो...त्यांना पॅनल डिस्कशनमध्ये बोलावलं तर... खरंतर.. त्या इतकं मस्त बोलतात. मागे मी एकदा त्यांना ऐकलंय...” संजीवनी बोलताना इतकी कधीच अडखळत नाही, आता मात्र तिला नक्की काय बोलायचं ते सुचत नाहीये.जतिनमामांनी तिला नाक्की काय सांगितलं माहित नाही. पण कदाचित तेजू बोलली असेल. मागे गौरवच्या इव्हेंटवेळी ती आईला भेटलीये.
“बिलिव्ह मी, मिस संजीवनी. मला पूर्णपणे माहित आहे की ती खूप छान बोलते. मुद्देसूद बोलत समोरच्याला वादामध्ये एकदम चितपट करणं हा तिचा आवडता खेळ आहे. मी तर तिच्याशी वाद घालायलाच जात नाही. मी तिला बोलवायला नाही सांगितलं कारण तिची तब्बेत ठिक नाही. घराबाहेर ती फारशी जात नाही आणि....”
“आय ऍम रीअली सॉरी”
“एकदा सांगितलं ना... इट्स ओके. माझ्या आईला गेल्या वर्षी लंग कॅन्सर डिटेक्ट झालाय. ट्रीटमेंट वगैरे चालू आहे पण स्टेज फोर असल्यामुळे फारसे होप्स नाहीत. हे असं सांगायलाही मला फार विचित्र वाटतंय पण डिसेंबरमध्ये होणार्‍या इवेंटसाठी... ती कदाचित येऊ शकणार नाही. कारण तितके दिवस तिच्याकडे नाहीत.”
“ओह गॉड!”
“देवाला साद घालून काही उपयोग नाही. माझा त्यावरचा विश्वास केव्हाच उडालाय. तुम्हा सगळ्यांना कायम असं वाटतं की मी एजन्सी टेकोव्हर करायला इंडियामध्ये परत आलो. पण मी परत आलोय कारण, आईची तब्बेत. तिनं तिकडं यावं, मी तिची ट्रीटमेंट तिथं करवून घेईन असं हजारदा सांगूनही तिनं ऐकलं नाही आणि मला परत यावं लागलंय.”
“सर, मला खरंच माहित नव्हतं. इन फ़ॅक्ट....”
“जतिनमामांना आम्ही तिच्या तब्बेतीविषयी फार सांगत नाही, पण जे समोर दिसतंय ते त्यालाही कळत असणार..”
“मी परत एकदा सॉरी म्हणते. आई गमावण्याचं दु:ख मी फार आधी सहन केलंय, सो आय कॅन अंडरस्टॅंड व्हॉट यु आर गोइंग थ्रू”
“फार आधी म्हणजे?”
“मी दहा वर्षांची होते. आई तेव्हा मला सोडून गेली... त्यानंतर सावत्र आई नावाचा प्रकारही अनुभवलाय.”
“ओह!” मला तिच्याबद्दल हे खरंच माहित नव्हतं, अभिषेकसोबत झालेल्या प्रॉब्लेममध्ये तिच्या घरच्यांनी तिला अजिबात साथ दिली नव्हती. का ते आता समजलं. दोनेक क्षण आम्ही दोघं काही न बोलता शांत तसेच बसून राहिलो. कुठंतरी माझ्या आईच्या आजाराबद्दल तिला मी खूप आधी सांगायला हवं होतं असं वाटत राहिलं. मला संजीवनी आवडते, तिच्याबद्दल मला प्रचंड शारिरीक आकर्षण आहे. पण आज आता याक्षणी वाटलं की हे आकर्षण फक्त शारिरीक नाही, त्याहून अधिक गहिरं आहे. आणि ते नक्की काय आहे ते समजून घ्यायचं असेल तर मी तिच्याकडे केवळ डोळे फाडून बघत न राहता तिला जाणून घ्यायला हवंय. समजून घ्यायला हवंय.
माझ्या मोबाईलवर ईमेलचा टींग वाजला. मी मोबाईल उचलून पाहिला तर तेजूचा ईमेल. “मिस तेजस्विनी आऊट ऑफ टाऊन जातायत का?”
“का? काय झालं?”
“वीकेंडला अनअव्हलेबल असल्याची ईमेल आलीये”
“असेल. मला माहित नाही,” संजीवनी पटकन बोलून गेली, नंतर लगेच स्वत:ला सावरत म्हणाली.
“आय मीन ती बोलली होती... पण माझ्या लक्षात नाही” तिच्या गडबडीकडे पाहताना माझ्या लक्षात आलं की, तिला तेजस्विनी गावाबाहेर जात असल्याचं – तेही केवळ वीकेंडपुरतं माहित नाही. ती काहीतरी लपवतेय हेही स्पष्ट सामोरं दिसतच होतं.
तेजस्विनी आणि संजीवनी दोघीही एकमेकींना सांगितल्याशिवाय बाथरूम ब्रेकसुद्धा घेत नाहीत, अशावेळी तेजस्विनी अख्खा वीकेंड जर मुंबईबाहेर जात असेल तर संजीवनीला ते माहित नाही!!!
कुछ तो गडबड है दया.....
>>>
मिहिर:

“माय हेड इज अंडर वॉटर बट आय ऍम ब्रीदिंग फाईन” जॉन लेजंड माझ्या हेडफोनमध्ये गातोय. काही म्हणा, पण “दिवानापरवानाजानेमन्कसमिश्कमोहब्बत” वगैरे तेच तेच शब्द वापरून गुळमुळीत गाणी ऐकण्यापेक्षा मला इंग्लिश गाणी आवडतात. काय चपखल वर्णन केलंय माझ्या सध्याच्या अवस्थेचं. मी तसं मिस संजीवनींना बोलूनही दाखवलं (म्हणजे माझ्या अवस्थेचं वर्णन वगैरे नाही पण इंग्लिश लिरीक्स व्हर्सस हिंदी फिल्म गीतं), पण त्यांनी माझ्या म्हणण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून गाडीत एफएमवर चालू असलेलं “ब्रेकप सॉंग” अजूनच जोरात लावलं. इथं अजून कशाचा कशाला पत्ता नाही, आणि बाईसाहेब ऑलरेडी ब्रेकपचं गाणं लावून मग्न. आणि ही गाण्यामधली बाई तरी काय नाचत ब्रेकप झाल्याचं सांगतेय... याचा अर्थ तिचा खरोखरचा ब्रेकप नक्की झालेला नसणार. कहानी की डीमांडनुसार हीरो के साथ अफेअर होनेकेलिये ये साईड हीरो के साथ ब्रेकप होना मंगता है.. वगैरे.
संध्याकाळचे साडेसात वाजत आले होते. ट्राफिक ऍज युजुअल बोंबललेलंच होतं. मी आणि संजीवनी दोघंही हिना कॉस्मेटिक्ससोबत मंथली मीटिंग आटोपून ऑफिसला परत येत होतो. खरंतर मीटिंग इतकावेळ चालली की, तिथूनच घरी जाणं योग्य ठरलं असतं पण उद्या नेमका व्होल्डमार्टच्या एकमेव क्लायंट क्रीडाकृतीचा इव्हेंट होता. या एनजीओचं कॉन्ट्राक्ट पदरात पाडण्यासाठी आम्ही गेले दोन तीन महिने झटत होतो. आरएफ़पी पाठवल्यानंतर दया दाखवून त्यांनी हा एक इव्हेंट मॅनेज करून दाखवा मग पुढचं बघू असं सांगितलं होतं. आता मामला अटीतटीचा होता. क्रीडाकृती म्हणजे गरीब अनाथ मुलांना स्पोर्ट्समधून इन्स्पायर वगैरे करणारे लोक. प्रचंड पैसा. उद्याच्या इव्हेंटला सेलीब्रीटी म्हणून सुप्रसिद्ध सिनेस्टार सायमा येणार होती. त्यामुळे कंप्लीट मीडीया अटेंडन्स आणि मीडीया कव्हरेज यायलाच हवं होतं. आता रात्री उशीरा थांबून प्रेस रीलीज, मीडीया  डॉकेट्स आणि सेलीब्रीटी क्वेश्चन्स तयार करणं गरजेचं होतं.
अर्थात, त्यासाठी संजीवनीला ऑफिसमध्ये जायची तशीही गरज नाही. मोबाईलफोनवर चटचट टाईप करत तिचं काम चालू होतं. ऑफिसला गेल्यावर फक्त प्रिंट आऊट्स घेणं शिल्लक असेल. मी निवांत खिडकीच्या काचेला टेकून डोळे मिटून शांत बसलोय. मागच्या ऑफिसमधल्या मीटिंगनंतर आम्ही दोघं परत ऑकवर्डनेस लेव्हल १ वर परत आलो होतो. गेले महिनाभर एकमेकांशी केवळ कामाबद्दलच बोलतोय, खरंतर मला अजून इतर काही बरंच बोलायचं आहे. जमलं तर मिस संजीवनीला डिनर डेट किंवा पब हॉपिंग (तिला जे आवडेल ते.. मला काय.) करायचंय पण संजीवनी परत आपल्या कोषांत गेलीये. अजिबात बोलत नाही. माझ्याशीच नाही तर ऑफिसमध्येही कुणाशीच. अजून एक, तेजस्विनी आणि संजीवनी दोघींमध्ये काहीतरी अनबन झालीये, आधीसारख्याच दोघी अजून फ्रेंड्स आहेत पण कुठंतरी काहीतरी बिनसलंय.
मी संजीवनीला विचारू शकत नाही, पण तेजूला आज ना उद्या विचारणार आहे. ती नक्की सांगेल. तूर्तास मी संजीवनीसोबत फक्त कामापुरतंच बोलतोय.
“मीडीयावाले सायमाला गौरव खन्नाबद्दल नक्की विचारणार.. हो ना?” तिनं मध्येच मोबाईलमधून डोकं वर काढत मला विचारलं. मी कानातनं हेडफोन बाहेर काढले. तिनं प्रश्न रीपीट केला.
“ती नो कमेंट्स म्हणेल. कालच तिच्या मॅनेजरबरोबर बोलणं झालंय. क्रीडाकृती वगळता इतर कशाहीबद्दल ती हेच उत्तर देईल.”
“लोकं परतपरत तेच विचारणार... कारण झालेला इन्सिडेंट क्षुल्लक नक्कीच नाही”
मी केसांतून हात फिरवला. तीन दिवसांपूर्वी पहाटे चारच्या सुमाराला गौरव खन्ना वसईच्या हायवेवर सापडला होता. कंप्लीट ड्रंक ऑर हाय. नक्की माहित नाही. त्याला उठून उभं राहणं सोडा, नावही सांगता येत नव्हतं. लोकांनी त्याला ओळखलं आणि मग ताबडतोब पाचेक मिनिटांत व्हॉट्सऍपवर व्हीडीओ व्हायरल झाला. नंतर दिवसभर टीव्हीवर ब्रेकिंग न्युजच्या नावाखाली धांगडधिंगा चालू राहिला. एखादा माणूस रस्त्यावर दारू पिऊन पडलाय ही ब्रेकिंग न्युज देण्याइतका वेळ मीडीयाकडे होता. बनी आणि गौरवची पीआर टीम फुल्ल फ़ोर्समध्ये कामाला लागली. मी प्रेस रीलीज ड्राफ्ट करून दिली. थोडातरी डॅमेज कंट्रोल करायला. सध्या बनी ताबडतोब त्याला घेऊन मुंबईबाहेर गेलाय.
पण प्रसंग घडलाय तीनच दिवसांपूर्वी आणि आज सायमाचा पब्लिक इव्हेंट आहे. सायमा... गौरवची गेल्या दोन वर्षांपासूनची सीरीयस गर्लफ्रेंड. सुदैवानं पब्लिकमध्ये दोघं कधी या अफेअरबद्दल काही बोललेलं नव्हतं, त्यामुळे मीडीयाला त्याचा सीरीयसनेस माहित नाही.
“मिस संजीवनी, हे मी तुम्हाला सांगायला हवं का? माझ्यापेक्षा जास्त अनुभव तुमच्याकडे आहे. यु विल हॅंडल इट. वेळ आली तर क्वेश्नच ऍन्सर कॅन्सल करू. पण सायमा गौरवबद्दल काही बोलणार नाही इतकं बघा. इव्हेण्टच्या आधीपासून मीडीयावर लक्ष ठेव. फिल्मी डॉट कॉमवाल्यांकडे माईक जाता कामा नये”
इट्स अ स्किल. प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्याला हवा तो प्रश्न एक्झाक्टली हव्या त्या माणसाकडून विचारून  सेलीब्रीटीकडून हवं ते उत्तर पदरात पाडून हेडलाईन बनवता येते. मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनला भर चार लोकांत पुण्याकडून खेळायला आवडेल का असं विचारलं तर तो नाही थोडीच म्हणेल. हो आवडेल ना! इतकंच उत्तर देईल, पण ब्रेकिंग न्युज म्हणून धाडधाड “तेंदुलकर खेलना चाहते पूना टीम” असं म्हणत सुरू करतील.  फिल्मी मीडीया तर त्याहून अधिक तुफान मजा देणारा.
ऑफिसमध्ये लॉबीपर्यंत पोचलो, तेवढ्यात मिस संजीवनींचा मोबाईल वाजला. “सर, तुम्ही पुढे व्हा. आय नीड टू टेक दिस कॉल” म्हणून ती थांबली.
मी रिसेप्शन काऊंटरवर रहमानला कॉफी आणायला सांगितली, तेव्हा तिथं एक माणूस बसलेला दिसला. खाली मोबाईलमध्ये मान घालून त्याचं काहीतरी गेम खेळणं चालू होतं. ऑफिस टायमिंग संपलं होतं, त्यामुळे आता कोण आलंय म्हणून रहमानला नजरेनंच विचारलं. त्यानं फक्त खांदे उडवले.
“एक्स्ज्युज मी?” मी त्या माणसालाच विचारलं. त्यानं मान वर करून माझ्याकडे पाहिलं.
“हाय. मला संजूला भेटायचं होतं.”
“ऍण्ड यु आर....”
तितक्यात माझ्या पाठीमागचा दरवाजा ढकलून संजीवनी आत आली आणि दारातच थबकली. तिच्या चेहर्‍याकडे पाहताच हा कोण हे माझ्या लक्षात आलं.
“संजू” माझ्या प्रश्नाकडं पूर्ण दुर्लक्ष करत तो पुढं आला. “ऐकून घे प्लीज”
“मला काहीही बोलायचं नाहीये. ऐकायचं नाहीये. प्लीज इथून जा” ती म्हणाली. खरंतर कुजबुजली. भितीनं तिचा चेहरा पांढराफटक पडला होता.
“संजीवनी, यु आर ओके?” मी तिला विचारलं.
“येस सर, प्लीज त्यांना जायला सांगा” ती एक पाऊल माझ्याकडे सरकत म्हणाली.
“हे बघ, जोपर्यंत मी तुझ्याशी बोलत नाही. तोपर्यंत मी कुठंही जाणार नाही. खरंतर मी दहिसरला तुझ्या फ्लॅटवरच येणार होतो”
मिलॉर्ड, प्लीज नोट! तुझ्या फ्लॅटवर!!!  आपला वगैरे नाही.
“पण तिथं बोलण्यापेक्षा इथं येणं अधिक बरं आहे ना. तुला मला भेटायचं नाही हे मला माहित आहे पण प्लीज ऐकून घे. फक्त ऐकून घे. आपण इथं खाली कॉफी शॉपमध्ये जाऊ या. पाचच मिनिटं त्याहून जास्त वेळ नकोय..” तो विनवत राहिला.

“पण मला नाही ऐकायचंय” ती परत कुजबुजली. रहमान हा सारा नजारा बघत निवांत उभा. खरंतर मला सिक्युरीटीला बोलावून या अभिषेकला धक्का मारून बाहेर काढता आलं असतं, पण आयुष्यामध्ये एक गोष्ट कधीही लक्षात ठेवायची. लव्हबर्ड्सच्या भांडणात स्वत:हून कधीही घुसायचं नाही. खास करून ज्या भानगडी आपल्याला माहित नाहीत तिथं तर अजिबात नाही. आणि ज्या भानगडीच्या एका पार्टीमध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे तिथं तर अजिबात नाही.
“रहमान, ऑफिसमध्ये तेजू आहे?”
“कोई भी नही. सब चले गये.”
आमच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत अभिषेक पुढे बोलत राहिला. “मी इथं चार वाजल्यापासून तुझी वाट बघतोय. जोपर्यंत तू माझ्याशी बोलत नाहीस तोपर्यंत रोज येत जाईन. ऑफिसमधून हाकललंस तर तुझं नाव घेत रस्त्यावर उभा राहीन. प्लीज. फक्त ऐकून घे...” वेल, मधुबाला शूड बी हॅपी. कारण या दिलिपकुमारच्या आवाजामध्ये जबरदस्त सीन्सीअरिटी होती.
“संजीवनी, पाच मिनिटं बोल.” मी तिच्याकडे वळून अगदी हळू आवाजात सांगितलं. “कारण, घरी येऊन त्रास वगैरे दिला तर अधिक प्रॉब्लेम होइल. कॉफी शॉपमध्ये वगैरे जायची गरज नाही. आपल्या इथं ऑफिसमध्ये कॉन्फरन्स रूममध्ये बस. दॅट विल बी मोर सेफ”
“प्लीज नको!” ती पुटपुटली. तिचे डोळे पाण्यानं भरले होते.
“मी सीक्युरीटीला बोलवू का?”
“नको! तो घरी येईल..”
“माझ्या केबिनमध्ये बसून बोला. मी इथंच आहे. घाबरू नकोस.” मी तिच्या खांद्यावर हात ठेवत सांगितलं. ती इतकी नक्की का घाबरली होती हे मलाही माहित नव्हतं, कदाचित अभिषेक अचानक असा आला म्हणून, कदाचित ऑफिसमध्ये यावेळी आम्हा तिघांशिवाय कुणीही नाही म्हणून, अथवा इतर काही कारणानं. पण तिची भिती चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होती.
“तुम्हीपण तिथंच थांबा. प्लीज!!”
“ओके. तू पुढे जा, मी आलोच. मिस्टर अभिषेक, प्लीज गो टू माय केबिन. तुमच्या रीक्वेस्टनुसार फक्त पाच मिनीटं. बोलून घ्या”
ती दोघं माझ्या केबिनकडे वळाल्यावर मी रहमानची गचांडी पकडली. “तो इतका वेळ का थांबला?”
“तुम्ही परत ऑफिसमध्ये येणार म्हणून वाट बघत थांबले”
“स्टुपिड, आम्ही परत येणार हे त्याला कुणी सांगितलं?” रहमानच्या तोंडून आवाज निघेना. मी त्याच्या शर्टाची कॉलर सोडली. “ही लास्ट वॉर्निंग समज. यापुढे ऑफिसमधल्या कुठल्याही माणसाची, खासकरून लेडीजची येण्याजाण्याची माहिती कुणालाही सांगायची नाही.”
“पण ते तर म्हणाले की मी फॅमिली मेंबर आहे म्हणून. याहीआधी अनेकदा आपल्या ऑफिसला आलेत की.”
“जेवढं सांगितलंय तेवढं लक्षात ठेव. जास्त आवाज करू नकोस. प्रत्येक चुका पोटात घालायला मी जतिनभाई नाही. परत असं काही घडलं तर सरळ नोकरीवरून काढून टाकेन.” सीरीयसली, आपल्याकडे लोकांना एखाद्याच्या सेफ्टीची जराही पर्वा नाही. इतकी वर्षं ते क्राईम पेट्रोल आणि तसले शोज बघूनसुद्धा नाही. तो “सॉरी” पुटपुटला. मी त्याला केबिनमध्ये तीन कप कॉफी पाठवायला सांगून आत आलो.
मी नॉक केलं तर आतून अभिषेकचा आवाज आला, प्लीज कम इन. ऑफिस माझं, केबिन माझी. आतमध्ये बसलेली कन्यापण माझीच होण्याच्या वाटेवर आणि हा मला कम इन म्हणतोय!!
नशीब लागतं अशा गोष्टी घडायला!!
आतमध्ये एका खुर्चीवर संजीवनी मान खाली घालून बसली होती. तिच्यासमोरच्या खुर्चीवर अभिषेक. मी केबिनच्या एका साईडला इन्फ़ॉर्मल मीटींगसाठी बनवलेल्या सेक्शनल सोफ्यावर बसलो. त्यांच्या गप्पा ऐकण्यामध्ये मला काहीही इंटरेस्ट नव्हता. मी केबिनमध्ये आत आल्या आल्या संजीवनीनं मान वर करून माझ्याकडे फक्त एकदा पाहिलं. त्या नजरेमध्ये असलेली भिती आता शंभरपटीनं वाढली होती. मी नजरेनंच शांत रहा असं सांगितलं आणि माझ्या बॅगमधून मुराकामीचं पुस्तक काढून वाचत बसलो.
“आय ऍम सॉरी.” अभिषेक तिला म्हणाला. दुर्दैवाची गोष्ट अशी की, त्या सॉरीचा लवलेशही त्याच्या आवाजामध्ये आता जाणवत नव्हता. “मी त्या दिवशी असं अचानक निघून जायला नको हवं होतं. किमान तुला सांगायला तरी हवं होतं.. पण... माझी स्वत:ची अक्कल कामच करत नव्हती... मी तुला माझ्या शेजार्‍यांबद्दल सांगितलं होतं आठवतंय... त्यांना मला जावई करून घ्यायचं होतं, त्यांची मुलगी बी ईच्या लास्ट इयरला आहे. त्यांनीच... आय ऍम व्हेरी शुअर अबाऊट इट.. त्यांनीच काहीतरी ब्लॅक मॅजिक केलं म्हणून माझं डॊकं असं फिरलं.”
माझ्या हातून पुस्तक पडता पडता राहिलं. सीरीयसली, दिस इज युअर एक्स्युज! मिस्टर अभिषेक असंच पाच मिनिटं बोलत रहा, आणि यापुढं ही मुलगी तुम्हाला दिसणारसुद्धा नाही याची काळजी मी घेईन.
“जे काही व्हायचं होतं ते होऊन गेलंय.” संजीवनी अगदी हळू आवाजात म्हणाली. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं ना, माझा बॉडी लॅंग्वेजचा अभ्यास जबरदस्त आहे. त्यामुळे संजीवनीच्या या आवाजावर मी नजर वर करून तिच्याकडे पाहिलं. रॉंग. मी नजर त्याच्याकडे वळवली. त्याची नजर एकटक तिच्या चेहर्‍यावर स्थिरावलेली होती.
“प्लीज जरा ऐकून घे” तो हलकेच तिच्या हातावर त्याचा हात ठेवत म्हणाला. पण संजीवनीनं तिचा हात मागे घेतला नाही. उलट ती अजून थरथरली. रोमॅण्टिक थरथर नव्हे, भितीची थरथर. तिच्या या वागण्यमागचं कारण अजून माझ्या लक्षात येईना. अभिषेक आणि ती गेली दोन तीन वर्षं कपल होते. दोघं एकत्र राहत होते. दोघांमध्ये इंटीमसी होती, तरीही ती अभिषेकला इतकी बिचकत का होती...
माझी नजर अजून त्या दोघांवर होती. तिनं अधूनमधून माझ्याकडे जरातरी पाहिलं होतं, पण अभिषेक मी इथं आहे हे कदाचित पूर्ण विसरून गेला होता.
माझी नजर अचानक तिच्या पावलांवर पडली. तिनं आज फ्लॅट सॅंडल घातले होते. दिवसभर मीटिंग होत्या म्हणून की काय माहित नाही पण नेहमीच्या हाय हिल्सपेक्षा ते काळे फ्लॅट्स तिच्या पावलांवर अजिबात चांगले दिसत नव्हते, पण आता माझं लक्ष त्याकडे नव्हतं. ती आणि अभिषेक समोरासमोर बसले होते आणि अभिषेकच्या ऑक्सफर्ड शूचा उजवा तळवा बरोबर संजीवनीच्या डाव्या पायाच्या अंगठ्यावर होता. माझी नजर किंचित वर सरकली. मघाशी त्यानं ठेवलेला हलकाच हात मी परत पाहिला. नो! दिस इज नॉट हॅपनिंग. किमान माझ्यासमोर तरी नाही.
अभिषेकने त्याच्या हातानं तिचा तळवा दाबून धरलेला. जोर इतका की दुखावं पण व्रण दिसू नयेत. बोलताना सॉरी म्हणत तिची माफी मागणारा अभिषेक प्रत्यक्षामध्ये मात्र तिला चक्क धमकावत होता. तेही इतक्या सराईतपणे. म्हणजे हे पहिल्यांदा नक्कीच घडत नसणार.

संजीवनी वॉज अब्युज्ड.
>>>
संजू:
अभिषेकसोबत ज्यावेळी मी इन्वॉल्व झाले तेव्हाच काही गोष्टी लक्षात आल्या होत्या. तो प्रचंड मूडी होता. त्याच्या मनाविरूद्ध झालेली कुठलीही गोष्ट सहन व्हायची नाही. सतत त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी ऐकावं असं त्याचं ठाम मत होतं. त्यावेळी तो पझेसिव्हपणा, ती त्याला सतत वाटणारी इनसेक्युरीटी आणि जेलसी प्रचंड रोमॅंटिक वगैरे वाटत होती. नंतर त्यातला रोमॅंटिकपणा जरी कमी झाला तरी, त्यावेळी मी इतकी गुंतले होते की मला त्यात काहीच चूक वाटलं नव्हतं. मी काय कपडे घालावेत, कुठे जावं, काय करावं याचे सर्व निर्णय तोच तर घेत होता. तेजूनं त्याच्या या हुकूमशाहीबद्दल मला कित्येकदा सुनावलं होतं. मला जाऊदेत, त्यालाही बरंच ऐकवलं होतं. तेजू आणि अभिषेकचं एकमेकांबरोबर तसंही कधी पटलं नाही. म्हणून अभिषेकनं मला मारलेलं मी कधीही तेजूला सांगितलं नाही. तेजूलाच काय, कुणालाच नाही. तसंही तेजूशिवाय अजून कुणाला सांगणार होते.
त्याच्याबद्दल मला पहिल्यांदा भिती वाटली जेव्हा त्यानं मला ऑफिसमध्ये फुलं पाठवायला सुरूवात केली. हे कितीही फिल्मी जेश्चर वाट्लं तरीही मला त्यामधला अर्थ समजला होता, त्याची ही पझेसिव्हगिरीची नवीनच लेव्हल होती. रोजचे मिसकॉल्स आणि मेसेजेस कमी पडले म्हणून की काय आज तो मला भेटायला ऑफिसमध्ये आला होता. संध्याकाळी तेजू आणि जतिनभाई दोघंही नसताना तो आला यामध्ये योगायोग नक्कीच नव्हता.
पण मिहिर सोबत असेल असं त्याला वाटलं नसेल...
तो सॉरी म्हणत होता, परत आपल्या नात्याला सुरूवात करू या म्हणत होता. त्याच्या सर्व चुका त्याला मान्य होत्या, पण या सर्वांकडे माझं अजिबात लक्ष नव्हतं. माझ्या पायाच्या अंगठ्यावर त्यानं टेकवलेला बूट हळूहळू जोर करत होता. मी जेव्हा कधी नजर उचलून मिहिरकडे पाहिलं तेव्हा तेव्हा अभिषेकनं पाय इतक्या जोरात दाबला की माझ्या तोंडामधून अलमोस्ट आईगं बाहेर पडलं. अलमोस्ट!! अभिषेकचं हे वागणं माझ्यासाठी नवीन नव्हतं, आणि मी हे वागणं लपवेन हे त्याला चांगलंच माहित होतं.
पण त्याचा अंदाज जबरदस्त चुकला, कारण मिस्टर मिहिर जैन पुढच्याच सेकंदाला आमच्यासमोर उभा होता.
“मिस्टर नायर, ताबडतोब उठायचं आणि बाहेर पडायचं” तो अत्यंत शांत आवाजात म्हणाला. “यापुढे चुकूनही संजीवनीबद्दल विचारसुद्धा करायचा नाही. इथं ऑफिसच्या आसपास जरी दिसलात तरी पोलिसांच्या ताब्यात देईन.”
“वेल, पाच मिनिटांऐवजी तीनच मिनिटं बोलायला दिल्याबद्दल थॅंक्स. संजू, आय विल कॉल यु”
“लाईक हेल” कधीतरी कूकरची शिट्टी होण्यापूर्वी पाहिलंय, अख्खा कूकर आतल्या पाण्याच्या वाफेनं जागच्याजागी नुसता थडथडत असतो, सेम तसाच मिहिरच्या चेहर्‍यावरची नसननस थडथडत होती. “निघा.”
अभिषेक तसाच ताडकन केबिनबाहेर पडला. जाताना त्यानं माझ्याकडे केवळ एक नजर टाकली. मी शहारले. विषय अजिबात संपला नव्हता, आता कुठे सुरू झाला होता. यापुढे मला फ़्लॅटवर जातायेताना अधिक सावध रहावं लागेल. दरवाज्याचं कुलूप बदलावं लागेल कारण आताच्या कुलूपाची एक चावी अभिषेककडे आहे.... इतके दिवस हा विचार डोक्यातपण कसा आला नाही!!!
“आर यु ओके?” मिहिरनं मला विचारलं.
“येस!”
“व्हाय?”
“म्हणजे?”
मिहिर माझ्या अगदी समोर उभा होता. इतक्या दिवसांमध्ये सोबत काम करत असूनही तो इतका जवळ आलेलं कधी आठवलं नाही. त्याच्या काळ्या करवंदी डोळ्यांमध्ये वादळ उसळल्यासारखं दिसत होतं. किंचित हात पुढं करून त्यानं माझ्या केसांची एक बट उगाचच सारखी केली, त्या हलक्याश्या स्पर्शानंसुद्धा आमच्यामध्ये असलेल्या अनामिक आकर्षणाची तीव्रता किती गहन आहे हे मला जाणवलं.
“का अशा माणसासोबत होतीस?” त्यानं विचारलं. मी मान वर करून पाहिलं. इतक्या दिवसांत पहिल्यांदाच त्यानं मला एकेरी हाक मारली होती.
“माहित नाही. कधी वाटलंच नाही...”
“यु डोंट डिझर्व्ह हिम.” तो अजून एक पाऊल पुढं येत म्हणाला. सीरीयसली, आमच्यामधलं अंतर आता सेंटीमीटरवरून मिलिमीटरवर आलं होतं.
“त्याचं माझ्यावर प्रेम आहे” त्याला सांगतानाही मला माझ्या शब्दांमधला फोलपणा जाणवत होताच.
“नेव्हर. नेव्हर सेटल फॉर समवन लाईक हिम.” तो अजूनच पुढे आला. त्याची लांब बोटं माझ्या गालांवरून फिरत राहिली. मी डोळे बंद केले. “लूक ऍट मी” तो माझ्या कानांमध्ये कुजबुजला. त्याच्या त्या किंचित हलक्या पण स्पष्ट आवाजानं माझ्या हृदयाचे ठोके डबल स्पीडने धावायला लागले. मी डोळे उघडले. समोर कृष्णविवराचं मायाजाल घेऊन तो उभा होता. त्या काळ्या नजरेमध्ये मी हरवून जात असताना कशाचंही भान उरलं नव्हतंच. त्यानं किंचित पुढे झुकून माझ्या ओठांवर ओठ टेकवले. माझा श्वास किंचित थबकला. त्याची जीभ हळूवारपणे माझ्या खालच्या ओठांवरून फिरली.
“ओके?” उत्तर द्यायची गरजच नव्हती, माझी वाढती अस्वस्थता त्यालाही समजलेली होतीच. त्याचा डावा हात माझ्या पाठीवरून फिरत राहिला. एकाच वेळी मला आश्वस्त करणारा आणि त्याचवेळी माझी दुनिया उलटसुलट करून मला वेडावनारा तो स्पर्श. उजव्या हातानं त्यानं माझं मनगट धरलं, तिथंच जिथं आता अभिषेकनं मला दुखवलं होतं.  त्या दुखर्‍या वेदनेवर त्याचा अंगठा आणि दोन बोटं किंचित फिरत राहिली. त्या स्पर्शाच्या आभासानंसुद्धा ती वेदना हुळहुळत कमी झाली.
एकच क्षण त्यानं माझ्याकडे पाहिलं आणि पुढच्याच क्षणी त्याच्या नजरेमध्ये उसळलेली सुनामी माझ्या नजरेपर्यंत पोचली. त्याच्या आणि माझ्या उंचीत तसाही फूटभराचा फरक होता. मी टाचा उंचावल्या आणि त्याच्या ओठांना माझ्या ओठांनी प्रतिसाद दिला...
(क्रमश: )