Thursday, 5 April 2018

ये रास्ते है प्यार के (भाग ४)ये रास्ते है प्यार के (भाग ३)
मिहिर

मुंबईमध्ये गणपतीचा सीझन म्हणजे एकदम डेन्जर माहौल. मला इतकी गर्दी अजिबात आवडत नाही. खरंतर मला गर्दीच आवडत नाही, पण सध्या नाईलाज आहे. त्यात सुदैवाने पाऊस जरा कमी झालाय. पाऊस कितीही आवडता असला तरी ट्राफिक जामसोबत पाऊस म्हणजे वैताग.
गणपतीच्या दिवसांमध्ये इतर कुणीही पीआर इव्हेंट ठेवत नाही. एक तर अर्धा मीडीया गणपती कव्हरेजमध्ये बिझी असतो, आणि उरलेला अर्धा कुठेनाकुठे तरी ट्राफिक जाममध्ये अडकलेला. अर्थात जानम त्याला अपवाद. जानमचं आणि मुंबईमधल्या बर्याच राजांचं सेटिंग आहे. यावर्षी अंधेरीजवळच्या सर्वात मोठ्या सार्वजनिक गणपतीला सुपरस्टार गौरव खन्नाकडून किलोभर वजनाचा मुकुट अर्पण केला. ज्वेलर्स अर्थात जानम. इव्हेंटमध्ये फारसा दम नव्हता. एक तर निव्वळ फोटोऑप. शिवाय, सुपरस्टार असल्याने सगळा एंटरटेनमेंट मीडीया तसाही बोलावता आलेला. आय हेट दीज. कितीही फोटो काढले तरी त्यांचं समाधान का होत नाही कुणास ठाऊक!! इलेक्ट्रॉनिक मीडीयावाले तर कॅमेरा ऑन ठेवून कुठं काय भानगड सापडतेय का त्या शोधात. सिगरेट पण ओढायची चोरी. पता चला, दुपारच्या ब्रेकिंग न्युजमध्ये गणपती के सामने सिगरेट फुंक रहे थे मिहिर जैन करत आपला व्हिडिओ यायचा. मी तेवढा काय फार मोठा सेलीब्रीटी नाही, पण नशीब फुटकं असेल तर काय घ्या.
मीडीयाला वेळ दुपारी अकराची दिली होती. पाऊस आणि फिल्मी हीरो हे कॉम्बिनेशन लक्षात घेता इव्हेण्ट दोन अडीच पर्यंत संपला तरी नशीब म्हणायचं. आज टीममध्ये मी, फिरदौस आणि तेजू तिघंच होतो. आणि माझी आई! खरंतर पीआर इव्हेंटमध्ये आता तिचं काही काम नव्हतं, पण तिला देवाचं दर्शन घ्यायचं होतं आणि गौरव खन्नाला भेटायचं होतं. आज रांगेत उभं वगैरे राहता आम्हाला सरळ मंडपाचा ऎक्सेस मिळाला होता आणि व्हीआयपी रूम सज्ज होती. त्यामुळे मीच तिला इकडे बोलावून घेतलं होतं. गणपतीमंडळवाल्या स्वयंसेवकांनी तिला खुर्ची देऊन बसवलं होतं.
तुझं दर्शन झाल्यावर ड्रायव्हर तुला घरी सोडून येईलमी तिच्या बाजूच्या खुर्चीत बसत सांगितलं. आई एवढ्याशा दगदगीनं पण थकली होती.
लगेच नको, थोडावेळ थांबेन. तुझ्या त्या हीरोबरोबर मीपण एखादा सेल्फी काढेन. फ़ेसबूकवर टाकेन.” मी तिच्या या वाक्यावर नुसता हसलो. “तुझं कामाचं काय असेल ते बघ. मी इथं निवांत बसून आहे. माझ्यासाठी तू थांबू नकोस.” ती मला म्हणाली. कुणीतरी स्वयंसेवकानं आमच्या हातात चहाचे दोन पेपर कप दिले.
स्पीकरवर बेबी डॉल मै सोनेदी जोरजोरात वाजत होतं. याचा संबंध आमच्या ब्रॅंडिंगशी असण्याचा दाट होता, कारण इव्हेंटची सूत्रं तेजूच्या हातात होती.  जानमकडून मिस्टर हरिश आला होता, बिचारा हातात सोन्याचा मुकुट असलेला बॉक्स घेऊन शांतपणे आमच्या बाजूच्या खुर्चीत बसला होता. तिच्या बाजूला फिरदौस. तिची मघापासून फक्त एक भुणभुण चालू होती. तिला तिच्या आवडत्या हीरोसोबत सेल्फी काढून हवा होता. आईनं बसल्याबसल्या फिरदौसची लाईफस्टोरी एव्हाना काढून घेतली. तिचं नावगाव पत्ता झालंच तर आईवडलांच्या मूळ गावाचा पत्ता वगैरे सर्व आईनं नीट विचारून घेतलं. इतरही बर्याच गप्पा चालू होत्या. एरवी फिरदौस फारशी बोलत नाही, पण माझी आई म्हणजे!! दगडालाही बोलतं करे. मोबाईलवरचे मेसेजेस वाचत बसलो होतो, तेव्हा चुकून माकून दोघींच्या गप्पांचा (खरंतर प्रश्नोत्तरांचा) कार्यक्रम कानावर येत होता. फिरदौसला शेफ व्हायचं होतं, हे ऐकून मी कपाळावर हात मारला. हिला डिनर शिफ़्ट असेल तर आदल्या दिवशी सकाळपासून किचनमध्ये काम करावं लागलं असतं.
तेजूनं मंडपात गेल्यानंतर पहिलं काम काय केलं असेल तर जानमच्या लोगोची पोझिशन बदलून घेतली. फोटोत  एकवेळ गौरव अथवा गणपती आला नाहीतरी चालेल. पण लोगो पाहिजे. मिस तेजस्विनी पाटील अजिबात गणपतीच्या मूर्तीकडे आल्या नाहीत, अथवा त्यांनी हात जोडले नाहीत. तिचं लक्ष फक्त आणि फक्त कामाकडं होतं. इतर कुणाच्या लक्षात ही गोष्ट आली की नाही माहित नाही.. माझ्या लक्षात आली. तेजस्विनी नास्तिक आहे, माझ्यासारखीच.
माझा देवावरचा विश्वास खूप वर्षांपूर्वीच उडालाय. असा कुठल्याही एकाच प्रसंगानं नाही, पण हळूहळू देवाचं आणि आपलं काही जमत नाही हे उमजलं. पण, मी माझा नास्तिकपणा कुणाच्याही लक्षात येऊ देत नाही. माझ्या केबिनमध्ये महावीरांची मूर्ती आहे, सितार वाजवत असलेल्या गणपतीचं पेंटिंग आहे. कुठं देवळात वगैरे गेलो, तर मी उपचार म्हणून हात जोडतो, कारण माझं आणि देवाचं पटत नाही हे फक्त मला आणि देवालाच माहित आहे.
पण तेजस्विनीचं तसं नाहीये, तिचं आणि देवाचं भांडण आहे. आख्खं जग जीवाला त्रास देत ज्याच्या पायावर डोकं ठेवायला तासनतास पावसाबिवसामध्ये उभं आहे तो समोर असतानाही त्याच्याकडे पाठ वळवून दुर्लक्ष करायला नुसतं नास्तिक असून चालत नाही. त्या नास्तिकपणाचा माज असावा लागतो. तेजस्विनीसारखा.
मिहिरआईनं मला हळूच हाक मारली.
काय?”
हीच का रे ती?” तिनं विचारलं.
कोण?”
मला सेजल सांगत होती, तुझ्या ऑफिसमध्ये आले. तुला आवडते
च्यायला! परत दोन पाटलीणींचं रॉंग कॉम्बिनेशन झालं. हेच चालू राहिलं तर माझ्या आयुष्यावर डेव्हिड धवन पिक्चर काढेल. आता ही ती नाही म्हणावं तरी पंचाईत कारण मग ती कोण हे स्पेसिफिकली सांगावं लागेल. काहीच बोलू नये म्हटलं तर इव्हेंट संपायच्या आत आई मिस तेजस्विनींच्या घरचा नंबर वगैरे घेऊन पुढच्या तयारीला लागणार. नाहीतरी जानमवाले लोक आपला सेल्स काऊंटर लावला होता, आईनं ज्वेलरी शॉपिंग लागेहाथों करून घेतली असती. तुम्हाला वाटेल मी आतिशयोक्ती करतोय. पण खरंच नाही. माझ्या आईचा भरवसा नाही. माझी आई म्हटल्यावर तुमच्या नजरेसमोर जर निरूपा रॉय आली असेल तर तुम्ही फारच ऑफ ट्रॅक गेलाय.  माझी आई खाष्ट वगैरे अजिबात नाही, शी इज कूल. व्हेरी कूल!
आई, प्लीज! ती माझी कलिग आहे. माझी फ्रेंड आहेआईनं तिच्या डोळ्यांवरचा चष्मा काढला.
संजू आणि मी पण कलिगच होतो. आणि आम्हीपण चांगले फ्रेंडच होतोती किंचित हसत म्हणाली. मी माझ्या केसांतून हात फिरवला.
मी बोलू का तिच्याशी?” तिनं विचारलं.
अजिबात नकोमी जरा घाईतच उत्तर दिलं. “आणि खरंच तसं काहीही नाहीये. मम्मी काहीही सांगते. प्लीज.. ऑफिस रोमान्स इज व्हेरी व्हेरी बॅड आयडीया!”
मूर्ख आहेस!” आईनं तिथल्या तिथं माझी अक्कल काढली, “ऑफिस रोमान्स आयडीया नसती तर तू ही नसतास, पण असं काही असलं तर मला सांगशील ना?” 
ऑफ कोर्स. तुझ्याशिवाय अजून कुणाला सांगणार? तुला गर्दीचा वगैरे काही त्रास होत नाहीये ना? बरं वाटतंय?” मी विषय बदलण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात तेजस्विनी आमच्याकडे चालत आली. “ऑल सेट बॉस. उद्याच्या फ्रंटपेजला फोटो लागलाच पाहिजे.” मी तिला बसायला अजून एक खुर्ची ओढून दिली.
आई, ही तेजस्विनी. माझी कलिगमी फॉर्मल ओळख करून दिली. तेजस्विनीनं झटक्यात वाकून आईच्या पायाला हात लावला. देवापुढंही मान झुकवणार्या तेजस्विनीच्या या कृतीचं मलाच आश्चर्य वाटलं. आईनं माझ्याकडे बघून नजरेनंचसंस्कारी पोरगीम्हटलं.
गणपतीच्या स्पीकरवर आतानागिण डान्स नचणाअसं अगम्य गाणं चालू झालं होतं. “मुडदा बसवला या मेल्याचा. मी काय गाणी लावायला सांगितली आणि हा भडवा काय बडवतोय!” पुटपुटत तेजस्विनी उठून डीजेवाल्याकडे गेली. मी आईकडे बघून नजरेनंचकाय संस्कारी पोरगीम्हटलं.  आई हसली. इतक्यात व्हीआयपी एण्ट्रन्सला बरीच गडबड झाली. गौरव खन्ना आला होता. सगळे फोटोग्राफर्स उसळून त्याच्यामागे लागले होते. बिचार्याला देवापुढे दोन सेकंद हात जोडू देईनात. “सर एक मिनिट, गौरवबाबा एक मिनिट, जरा इधर देखियेचालू होतं. तेजूनंआता फोटो काढायचे नाहीत, नंतर मेन इव्हेंटलाचअशी विनंती फोटोग्राफर्सना केली. तेजस्विनीची विनंती स्पीकरवरच्यासोना कितना सोना हैवरून देखील दणदणीत आवाजात आम्हाला ऐकू आली. दर्शन घेऊन मंडपाच्या स्वयंसेवकांनी गौरवला आमच्याजवळच्या खुर्चीमध्ये आणून बसवलं. त्याला बघून फिरदौस किंचाळायची तेवढी शिल्लक होती. गौरवला अर्थात याची सवय असणार. “हुश्श!” पाण्याची बाटली उघडत तो म्हणाला. “यानंतर काय?”
काही नाही, हा क्राऊन तुम्ही देवाच्या खाली ठेवा आणि मग फोटोज. काही स्टेटमेंट द्यायचे असतील तर द्याहरिश म्हणाला. स्पष्ट सांगायचं तर सेलीब्रीटी पाहून तो बराच गोंधळला होता. क्राऊन काय? देवाच्या खाली काय? पायाशी तरी म्हण ना बाबा!
नोप! मला बोलायचं काहीच नाहिये. इथे येऊन आपली किंवा फिल्मची पब्लिसिटी इज डिस्गस्टिंग. देवाबद्दल काय बोलणार? साऊंट बाईट्स इलेक्ट्रॉनिक मीडीयाला अरेंज केले असतील तरच देईन. तेही तीन किंवा चार.” गौरव म्हणाला. तेजूनं काही बोलता त्याच्या हातामध्ये कागद दिला. आजच्या इव्हेंटचा प्लान. मिनीट बाय मिनिट. काय बोलायचं ते पॉइंट्स.
आभा नाहीये का?” तेजूनं विचारलं. गौरवनं नुसती मान हलवून नाही म्हणून सांगितलं. मी नकळत माझी जीभ चावली. ये भाईसाब इधर बहुत गहरी चोट खाये हुवे है. स्पीकरवर किशनकुमारची गाणी लावण्याइतकी.  
सुट्टीवर?”
नाही. यु एसला शिफ़्ट. मॅरेजदोन तीन शब्दांत गौरवनं विषय संपवला. विषय किती खोल आहे हे मला अर्थात माहित आहे. तेजू माझ्याकडे वळून म्हणाली. “आभा, यांची ब्रॅंड मॅनेजर. आपल्या कुठल्याही इव्हेंटला ती जनरली असतेच. आय मीन असायची. ती असली की आम्हाला फार चिंताच नव्हती.” मी आभाला आधीपासून ओळखतो, पर्सनली नाही, पण ते आता तेजूला सांगून उपयोग नाही. सुदैवानं हे बोलणं चालू असताना गौरव हातातला कागद वाचण्यात रमला होता. इतक्यात त्याचं लक्ष माझ्या आईकडे गेलं. झटक्यात तो उठला आणिहॅलो आंटीम्हणत पुढे आला.
आईनं त्याच्या पाठीत धपाटा घातला. माझ्या आईनं सुपरस्टार गौरव खन्नाच्या पाठीत धपाटा घातला. तेजस्विनीनं डोळे मोठे करत माझ्याकडे पाहिलं. हरिशच्या हातून तो बॉक्स पडता पडता राहिला आणि फिरदौस डोळ्यांची पापणी लवायच्या आत उठून उभी राहिली. आतापर्यंत तिच्याकडून पाहिलेली ही सर्वात फास्ट रीएक्शन.
सॉरीतो स्वत:चे कान पकडत म्हणाला. “सॉरी!”
सॉरी नंतर बोल. घरी कधी येणार ते सांगमाझी आई कडाडली. “आल्यापासून बघतेय आता लक्ष जाईल, मग लक्ष जाईल. तर आपल्याच धुंदीत. मिहिर इंडियात परत आल्यापासून एकदा तरी तोंड दाखवलंस का रे? गेले चार महिने फोन करतेय, तर फोन उचलत नाहीस. खूप बिझी आहेस ते मलाही माहित आहे. पण किमान एक फोन तरी करावा. मेसेजला तरी उत्तर द्यावं!”
सॉरी ना. या शनिवारी नक्की. प्रॉमिस. बनी,” त्यानं मागे वळून त्याच्या असिस्टंटला हाक मारली. “लगेच डायरी अपडेट कर. या शनिवारी मिनाआंटीकडे डिनरला. हॅपी?” आईकडे बघून तो म्हणाला. तिच्या पायाशी तो बसला आणि आईचा अत्यंत हाडकुळा झालेला हात त्यानं हातात घेतला.
फारसं कुणाला माहित नाही पण सुपरस्टार गौरव खन्ना आणि मी एकाच शाळेत शिकलोय. एकाच वर्गात. एकाच बेंचवर. आमची घरं पण तशी फार जवळ होती, त्यामुळे आम्ही होमवर्क पण एकत्रच केलाय. गौरव त्याच्या घरात कमी आणि माझ्या घरात जास्त राहिलाय. शाळा संपल्यावर त्यानं कॉलेज करता वडलांचा असिस्टंट म्हणून काम करायला सुरूवात केली आणि नंतर स्वत: हीरो बनला. आमच्या वाटा वेगळ्या झाल्या असल्या तरी आमची मैत्री कायम राहिली. जानमचा तो ब्रॅंड अम्बॅसॅडर असल्यामुळे आजच्या इव्हेंटला आम्ही आयुष्यात पहिल्यांदा प्रोफेशनल लेव्हलवर भेटतोय.
शनिवारी नक्की ये, तुझ्यासाठी स्पेशल काहीतरी बनवेन, मला जमलं तरआई त्याला म्हणाली. तिच्या याजमलंतरवाक्यावर गौरवनं माझ्याकडे पाहिलं. मी किंचित मान हलवली. तोही किंचित वरमला.
 गणपती मंडळाचे काही लोक आणि स्थानिक आमदार वगैरे आले. इव्हेंटची वेळ झाली होती. गौरवने डोळ्यांवर काळा गॉगल चढवला. मी चेहर्यावर पीआरचा मास्क चढवला. वैयक्तिक गोष्टी बोलायची ही वेळ आणि जागा नव्हे. तेजस्विनी मघाशीच बाहेर गेली होती. इलेक्ट्रॉनिक मीडीयाचे कॅमेरावाले व्हीआयपी रूमच्या दाराशी उभे होते. रूमबाहेर पडताना गौरवनं सहज माझ्या खांद्यावर हात ठेवला. “सॉरी यार! घरी यायला हवंय पण माझ्यात हिंमतच नाही.”
आय नो!” मी त्याला उत्तर दिलं.
पण या शनिवारी भेटूतो म्हणाला.
इव्हेंट वॉज सक्सेस. सोशल मीडीयामध्ये तर फोटोज व्हायरल झाले होते, शिवाय मेनस्ट्रीममध्ये पण बरंच कव्हरेज मिळालं. हरिशकडून परत एक एप्रोसिएशन मेल आलं होतं.
शनिवारी गौरव आमच्या घरी डिनरला आलाच नाही. बनीनं मला मेसेज करून तो येऊ शकत नसल्याचं कळवलं होतं. तो येणार होता हे आई विसरूनही गेली होती. लक्षात येऊनही काही फायदा नव्हता. आईला त्या दिवशी परत ऍडमिट केलं होतं.
>>>>>>>>> 
संजू:
सो, यु मीन टू से त्यानं तुला कॉल केला होता?” तेजूनं गरमागरम कांदाभजी कढईमधून ताटामध्ये काढत मला विचारलं.
आय डोंट नोमी किचनमधल्या टॉवेलला हात पुसला. आज ऑफिसला गणपती विसर्जनाची सुट्टी होती. उद्या वीकेंड. त्यामुळे सलग तीन दिवस सुट्टी्चा मस्त मुहूर्त जमून आला होता. काल ऑफिसवरून तेजू आणि मी थेट माझ्या फ्लॅटवर आलो होतो. तेजूला खरंतर मी मागेही एक दोनदा हॉस्टेल सोडून माझ्यासोबत यायला सांगितलं होतं. रेंट शेअर नाही केलंस तरी चालेल हेही सांगितलं. पण तेजू ऐकेल तर ना. प्रश्न पैशांचा नव्हता पण तिला हॉस्टेल सोडायचं नव्हतं.
आज शुक्रवार सकाळ, मस्त पाऊस आणि दिवसभर कुठंही बाहेर जाता घरातच टीव्ही बघत घालवायचा असा उदात्त प्लान ठरवून आम्ही दोघींनी ब्रेकफास्टला कांदाभजी केली. लंच आणि डीनर अर्थात बाहेरून ऑर्डर करणार. दिवसाचे तीनही मील्स घरीच बनवण्याइतके माझे कूकिंग स्किल्स नाहीत आणि तेजू कितीही ग्रेट कूक असली तरीही ती तीनेक तास माझ्या किचनमध्ये खपणं मला आवडणार नाही. आता तिला कांदाभजी बनवायला सांगतानाच मला जरा ऑकवर्ड झालं होतं. काल रात्री दररोजच्या नियमांनुसार मला मिस कॉल आला होता. दुर्दैवानं तेव्हा आम्ही दोघी गेम ऑफ थ्रोन्स मॅरेथॉन करत अस्ल्यामुळे जाग्या होतो. त्यामुळे तेजूला या मिसकॉलबद्दल समजलं.   
संजू, तुला कुठल्याही नंबरवरून कॉल येतायत... तेपण रात्री अपरात्री आणि तुला त्यात काहीच वाटत नाही?”
रात्री अपरात्री नाही, एक्झाक्टली रात्री तीन वाजून तेहतीस मिनीटांनी. थ्री थर्टीथ्री. मला काही वाटून उपयोग काय आहे? मी हॅलो म्हटलं की कॉल कट होतो. परत कॉल लावेपर्यंत फोन स्विच ऑफ झालेला असतो. दिवसभर नंतर स्विच ऑफ असतो. नंबर ट्रू कॉलरवर ब्लॉक्ड आहे. इतके सारे उपद्व्याप फक्त अभिषेक करू शकतो हे तुलाही माहित आणि मलाही
तू सरळ पोलिस कंप्लेंट कर
त्यानं काय हॊणार आहे?”
तो तुला त्रास देतोय. हॅरेसमेंट करतोय
तेजू, त्यानं मला फुलं पाठवलीत. गिफ़्ट्स पाठवलेत आणि हे रात्रीचे कॉल त्याचेच आहेत हे मलाही नक्की माहित नाही. पोलिसांना काय सांगू? अफेअर ब्रेकप आहे म्हणून ते सोडून देतील. उद्या पुढे मागे पोलिस स्टेशनामध्ये रेकॉर्डला नाव गेलं तर नोकरी शोधताना वांदे होतील. त्याचाही प्लीज विचार कर.”
तुला तुझ्या त्रासापेक्षा या गोष्टीची जास्त भिती आहे? अनबिलिव्हेबल!”
माझ्या जागी तू असतीस तर काय केलं असतंस? आणि प्लीज, मला ते मेलोड्रामाटिक मी त्याला असा बदडेन आणि तसा जाळेन वगैरे नको. प्रॅक्टीकली सांग.”
मी त्याला भेटले असते आणि हे सर्व काही बंद कर असं ठणकावून सांगितलं असतं
मी त्याला भेटू शकत नाही. तो विचार जरी केला तरी मी अस्वस्थ होते. तेजू, काय काय घडलंय हे फक्त तुला माहित आहे. तू होतीस माझ्यासोबत. मला परत तोच त्रास नकोय. त्याला पाठवायची तितकी ट्रकभर फुलं पाठवू देत. रात्रभर मला कॉल करू देत. आय डोंट केअर...”
तू रात्री फोन स्विच ऑफ करत जातेजू एखादा नवीन शोध लावल्यासारखी म्हणाली.
बेब, यु नो दॅट इज नॉट अलाऊडआमचे फोन एजन्सीने दिलेत. रात्री-अपरात्री मीडीयावाल्यांपैकी अथवा क्लायंटपैकी कुणीही आम्हाला कॉल करू शकतं त्यासाठी आम्ही रात्री फोन चालू ठेवणं गरजेचं आहे.
जतिनभाईंला सांग. तो समजून घेईल
तो आता इथं नाहीये
मिहिरला सांग.”
त्याला सांगून उपयोग नाही. समहाऊ, त्याला या सिच्युएशनचं गांभीर्य माहित नाहीये
मी त्याच्याशी....”
प्लीज नको. तेजू. खरंच नको. त्याला काही बोलू नकोस..आता जेवढे प्रॉब्लेम चालू आहेत त्याच्या दुप्पट होतील. आपण प्लीज हा विषय इथंच थांबवू या का?”

विषय थांबवू या, पण या प्रॉब्लेमवर काहीतरी सोल्युशन काढणं गरजेचं आहे हे मान्य कर. मिहिरशी एकदा बोल. ही इज गूड पर्सन.”
ओहो, तुम्ही एकदम बेस्ट फ्रेंड वगैरे झालात की काय?” कढईमध्ये भज्यांचा अजून एक घाणा घालत मी विचारलं.
आमच्या नशीबांत तेवढंच तर आहे. आम्हाला थोडीच कुणी केबिनमधून लॅपटॉपच्या आडून पडदे सरकवून बघतंयमला चिडवत ती म्हणाली.
हाहा! व्हेरी फनीतेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. कॉल घेण्यासाठी माझ्या हातात झारा देऊन ती बाहेर हॉलमध्ये गेली. मी तो घाणा ताटात काढतच होते तेवढ्यात ती परत आली.
हे बघ, या दोन मुलांमधले कुठले चांगले वाटतात? दोघं इंजीनीअर आहेत. दोघंही पुण्यात आहेत.” माझ्या डोळ्यांसमोर मोबाईल धरत तिनं विचारलं. “पत्रिका दोघांच्याही जुळतात
आता हे कुणासाठी? तुझ्या बहिणीचं लग्न तर ठरलं ना?”
डार्लिंग, मला चार बहिणी आहेत. दोघींची लग्नं झालीत आणि दोघींची व्हायचीत. तिसरीचं ठरलंय म्हणून आता चौथीचं बघायला सुरूवात केली
चार बहिणी? जस्ट लाईक लिटल वूमेन
दहावीला गणितात किती मार्क पडले होते हो तुम्हाला? माझ्या आईवडलांना मी धरून पाच.”
फीमेल पांडव
पण ते महाभारतामधले पांडव कसे मोठ्या भावाच्या आज्ञेत वगैरे होते. आमच्या चार म्हणजे सरळ मराठी सीरीयल्समधून बाहेर आलेले नमुने आहेत. अजून कॉलेज नाहीझालं की लग्नाचे डोहाळे चालू.”
मी हातात मोबाईल घेऊन ते दोन्ही फोटो पाहिले. टिपिकल. डोळ्यांवर गॉगल, गळ्यात सोन्याची चेन, हातात सोन्याचे ब्रेसलेट. तेजूच्या भाषेत गुंठामंत्री. घरची शेती आहे म्हणायचं, आणि प्रत्यक्षात बुलेट उडवत गावं उंडारायची. तिच्या वडलांची सर्व शेती भाऊबंदकीच्या नादात वकिलाच्या घश्यात गेली, आता राहतं घर आणि त्याच्या आजूबाजूचा जमिनीचा तुकडा शिल्लक आहे. दहावी झाल्यानंतर तालुक्याच्या गावी असलेल्या छोट्याश्या कॉलेजमधून तिनं कंप्युटर्सचा डिप्लोमा केला. त्यानंतर तिला डिग्रीला ऍडमिशन सहज मिळाली असती. पण पैसा कमावणं ही तिची प्रायोरीटी होती. कुठल्याश्या कंपनीमध्ये ती कंटेंट रायटर म्हणून लागली. पैसा फार नव्हता, पण  या कामामुळे ती गाव सोडून मुंबईला आली. वयाच्या एकविसाव्या वर्षी गावाकडून आलेली तेजू आता कितीही डॅशिंग आणि टशनवाली भासत असली तरी एकेकाळी ती मठ्ठ गावंढळ होती. सेम माझ्यासारखीच. दहा वर्षं या अजब मायानगरीमध्ये काढली आणि आमचं रंगरूपच काय अख्खं व्यक्तीमत्वच बदलून गेलं. आता यापुढे नशीब कुठंही घेऊन जाऊदेत, पण मुंबईनं जो काय मुलामा चढवलाय तो काढता येणं मुश्किल. हां, तर सांगत काय होते...
तेजू! पहिल्या नोकरीचा पगार जेमतेम हातात येऊ लागला तेव्हापासून तिनं बहिणींच्या लग्नासाठी पैसा बाजूला काढायला सुरूवात केली. जतिनभाईंच्या एजन्सीमध्ये येण्याआधी एका बहिणीचं लग्न लावून दिलं. सर्व हुंडा, मानपान करत. तेजूच्या आईवडलांना या चार बहिणींची इतकी चिंता होती की, त्यांनी तेजूच्या लग्नाचा विचार केलाच नाही.
ती नोकरीला लागली, तेव्हा तिला खूप मागण्या आल्या होत्या. गावाकडच्या काहीजणांची मुलं मुंबईमध्ये नोकरी करणारी होती, त्यांना इथं राहणारी, पैसे कमावणारी मुलगी चालली असती. पण आईवडलांनी ते होऊ दिलं नाही. काहीबाही कारणं सांगून ते नकार देत राहिले आणि तेजू इथं ढोरासारखी राबत राहिली. तिचा पगार वाढत राहिला तश्या त्यांच्या गरजा वाढत राहिल्या.
दोन बहिणींची लग्नं, दिवाळसण, बाळंतपण करून झालंय. आता तिसरीचं लग्न ठरलंय. डिसेंबरमध्ये लग्न आहे. आता लगेहाथों चौथीसाठी स्थळं बघायला सुरूवात केलीये. तिचं मागच्या वर्षी बारावी झालंय. तिचं त्याच्या आधीच्या वर्षीही बारावीच झालं होतं. सलग दोन वर्षं नापास असल्यानं लग्नाच्या बाजारामध्ये किंमत फारशी नाही. माना अथवा मानू नका, पण हल्ली मुलगी नुसती सुंदर-गृहकृत्यदक्ष वगैरे असून चालत नाही किमान ग्रॅज्युएट तरी असावी लागते. बरं, मुलगी नुसती ग्रॅज्युएट असून चालत नाही ती सुंदर आणि गृहकृत्यदक्षही असावी लागते. बरं, या तीनही कॅटेगरीमध्ये बसत असलेली मुलगी फार पैसा कमावून चालत नाही. कारण, नवर्याचा पगार तिच्यापेक्षा कमी असून चालत नाही. शिवाय, काहीही असलं तरी मुलगी चारित्र्यवान आणि धुतल्या तांदळासारखी शुद्ध वगैरे असावीच लागते.
तेजू, यार एक बात बता! हे स्त्रीशिक्षण, वूमन ईम्पॉवरमेंटमध्ये वगैरे नक्की काय साध्य झालं?”
आं!” माझ्या हातामधून मोबाईल परत घेत ती म्हणाली. “त्याचा इथं काय संबंध?”
इमॅजिन, तू आणि मी शंभर वर्षांपूर्वी. आपण आता वय वर्षं तीस. त्याकाळी आपलं ऑलरेडी लग्न झालं असतं. म्हणजे लीगली सेक्स अलाऊड. आपल्याला भानगडी करायची गरज नाही.” तेजूनं एक भुवई उंचावून माझ्याकडं पाहिलं. “ओके. तथाकथित भानगडी करायची गरज नाही. फॅमिली लाईफ, कंपॅनियनशिप, आणि झालंच तर आई होणं वगैरे सगळं झालं असतं. लाईफ़ कशी सेट झाली असती... शिका, नोकरी करा, इतकी धावाधाव वगैरे काही नसतंच. आपली आर्थिक जबाबदारी कुणीतरी घेतली असती. साला, जबाबदारीचं ओझंच नाही.”
संजू, सीरीयसली. डोकं फिरलंय तुझं? काय बोलतेस. आज आपल्याकडे विचारस्वातंत्र्य आहे. निर्णय क्षमता आहे. तुझ्या आईवडलांकडून एक पैसाही घेता तू आज इथं पोचलीस. हे घर घेतलंस. अभिषेकसारख्या डुकराकडून इतका मोठा धोका पचवूनसुद्धा मुळूमुळू रडत बसता तू स्वत:च्या पायावर उभी राहिलीस. हे सारं तुला कमी वाटतंय का?” तिनं प्लेटमध्ये भज्या ठेवून त्याच्याबाजूला टोमॅटो सॉसचे दोन चार डॉट्स टाकले. मोबाईलवरून त्या प्लेटचे चार फोटो काढले.
आय डोंट नो. कधीकधी तुझ्याकडे बघून वाटतं की, तू जर शिकली नसतीस... किंवा गावातच राहिली असतीस तर...”
आईबापानं धरून कुणाच्याही गळ्यांत बांधली असती. त्याक्षणी माझं अस्तित्व संपलं असतं. नावासकट! संजू, फॅमिली लाईफ् आणि कंपॅनियनशिप म्हणजे सगळं नसतं गं. आय नो!! मी घरासाठी फार करते किंवा बहिणींच्या लग्नासाठी खूप पैसे खर्च करते हे तुला पटत नाही... पण याचा अर्थ मी शंभर वर्षांपूर्वीच्या बायांसारखी पीरीयड्स सुरू झाल्यापासून पोरं काढत बसणं प्रीफ़र करेन इज टू मच! आणि प्लीज, आर्थिक जबाबदारीबद्दल तर बोलूयाच नको. आता काम करतोय ते आपल्या मर्जीनं. आवडतंय म्हणून. जबाबदारीचं ओझं जेव्हा वाटायला लागतं ना तेव्हा आपण आपलं स्वातंत्र्य गमावलेलं असतं. मी अजूनही स्वतंत्र आहे. उद्या जर आईवडलांना म्हटलं की मी घरी पैसे पाठवत नाही, तर ते माझं काही वाकडं करू शकणार नाहीत.”
माझ्या घरच्यांचं जाऊ देत, ते नालायकच लोक आहेत पण किमान तुझ्या आईवडलांनी तरी तुझ्यासाठी...”
लग्न? वेड लागलंय. संजू या रोमॅन्टिक वातावरणामधून बाहेर ये. मी त्या कुठल्याश्या मराठी फिल्मची हिरॉइन नाहीये. जी शहरात येऊन पैसे कमावते, गावी पाठवते आणि गावात तिला कोण किंमत देत नाही वगैरे.”
ती प्रॉस्टीट्युट बनते! पण माझा मुद्दा तो नाहीये.”
काही का असेना! तसं नाहीये. आईवडील गावात खुश. मी इकडे खुश. फार कमी जणांना असं बिनधास्त एकत्र रहायला मिळतं, मी ते प्रचंड एंजॉय करतेय..”
तुला वाटत नाही... स्वत:चं घर असावं, संसार असावामाझ्या मोबाईलवर मेसेजचा पिंग झाला. मी उचलून पाहिला तर तेजूनं आता भज्यांचा फोटो अपलोड केल्याचं नोटिफिकेशन. त्यावर पहिला लाईक व्होल्डमार्टचा!
आयुष्य पडलंय त्यासाठी. तुझं आणि अभिषेकचं अफेअर चालू होतं ना, तेव्हा मला कित्येकदा असं वाटलं. किंचित एका क्षणासाठीपुरतं तरी... आपल्याही आयुष्यात असा एखादा जोडीदार असावा. पण मग ते नंतर प्रकरण इतकं भयंकर झालं की मग आपण एकटे  आहोत हेच बरं झालं असं वाटलं
ओह येस. अभिषेक आणि मी. आमच्या दोघांबद्दल तुम्हाला अजून बरंच काही समजायचंय.
बट देन..”
सेक्स? डार्लिंग, इट्स ऑलरेडी टेकन केअर ऑफ
म्हणजे..”
बास ना आता. किती प्रश्न विचारशील? चहा ठेवू का? भजी खाताना हातात चहाचा कप नसला तर स्वर्गात जागा मिळणार नाही.”
तू विषय टाळतेस
तसं समज पण एक लक्षात घे, संजू, जोपर्यंत मला माझ्या टर्म्स आणि कंडीशन मान्य करणारा माणूस मिळत नाही. तोपर्यंत.... मला माझं सिंगल स्टेटस अजिबात खुपत नाही.”
तुझ्या टर्म्स आणि कंडिशन्स मिस्टर मिहिर जैनना सांगून पहा. ते कदाचित मान्य करतील
आय हाय!! त्याची आठवण आल्याखेरीज तुला चैन पडत नाही का? तसंही त्यांना आम्ही काय सांगून उपयोग. त्यांची नजर तर मिस संजीवनी पाटीलवर अडकलीये.” तेजू मला चिडवत म्हणाली. “दोन्ही पोरांचे फोटो बघ, आणि तुझे ओपिनियन सांग. मला दोनपैकी एकाची सविस्तर माहिती काढून दाखवाबिखवायचा प्रोग्राम करायचा आहे. दोघींची लग्नं एकदम झाली तर सगळ्याच दृष्टीनं बरं
तेजूनं माझ्या हाती परत मोबाईल दिला. मी दोन्ही फोटो परत पाहिले. तेवढ्यात तिच्या मोबाईलवर एक मेसेज पॉपअप झाला.
मिसिंग यु ऑलरेडी. कॅन यु कम टू माय प्लेस फॉर वीकेंड. प्लीज कॉल मी.” त्यानंतर बदामाच्या दोन चार स्मायलीज.
मेसेज आला होताजानम कॉर्प कॉम मॅनेजर नावाच्या नंबरवरून.
म्हणजे.... मिस्टर शर्मांकडून!!!

(क्रमश: )