Tuesday, 13 February 2018

ये रास्ते है प्यार के (भाग १)


ये रास्ते है प्यार के (भाग १)

 महिन्याभराच्या हिमालयामधल्या ऑसम ट्रेकनंतर सोमवारी सकाळी ऑफिसमध्ये आल्यानंतर कसं वाटतं... सेम तस्संच आता वाटत होतं. म्हणजे खरंतर तसंच होतं. गेला अख्खा महिना मनाली मसूरी करत प्रचंड फिरले होते. आणि परवा रात्री फ्लाईटने मुंबई. आणि आज ऑफिस!!!
जूनचा पहिला आठवडा. पावसाची सुरूवात होण्याआधी होत असलेला अशक्य घामोडा उन्हाळा. त्यात आज लोकलला प्रचंड गर्दी. लेडीज फर्स्ट क्लासमध्ये बायांचं झालेलं कचाकचा भांडण. फर्स्ट क्लासमध्ये भांडणं होत नाहीत असा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मुंबईचा विसा कॅन्सल करवून घ्या..
भरीसभर घरातून मला निघायला झालेला उशीर. शेअर रिक्षावाल्यांची दादागिरी. इकडे टाऊनला पोचल्यानंतर टॅक्सी मिळता मिळेना आणि अगदी पंचेचाळीस सेकंदासाठी लागलेला रेडमार्क. च्यायला, त्या फिंगर प्रिंट वाल्या मशिनच्या आयचा घो!! सेकंदासेकंदाचा हिशोब ठेवतंय. रात्री बाराबारापर्यंत इथं कामं करतोय तेव्हा कधी ते रेकॉर्ड करत नाही.
डेस्कवर आल्याआल्या बॅग खुर्चीवर टाकली आणि बाटलीतलं पाणी प्यायले. अलमोस्ट अर्धी बाटली पाणी संपल्यावर लक्षात आलं की आमच्या ऑफिसबॉयने अजून पाण्याच्या बाटल्या बदललेल्याच नाहीत. कालचीच बाटली. किंवा मी महिनाभर रजेवर होते म्हणजे....
 ... पाण्याला प्लास्टिकचा तो चिकटसा वास. याक्क!!! सकाळी नाश्ता केला नव्हता ते एका अर्थानं बरं झालं,
कुठून दिवस उजाडला होता रे देवा. ऑफिसच्या पॅंट्रीमध्ये जाऊन मशिनचा तो भयाण चहा बनवून घेतला. सकाळी उशीर झाला म्हणून काहीच खाल्लं नव्हतं. सुदैवानं आमची तेजू आज लवकर आली होती. ती वर्किंग वूमन्स हॉस्टेलमध्ये राहते, त्यामुळे तिथं नाश्ता करतच नाही. येताना काहीतरी पार्सल घेऊन येते. आनंदाची गोष्ट म्हणजे ती कधीच स्वत:पुरतं आणत नाही, एक्स्ट्रा घेऊनच येते. माझ्यासारखे धावतपळत आलेले कुणीनाकुणी असतंच आणि कुणीच नसेल तर जतिनभाई हजर असतोच. त्याच्या बायकोनं त्याला कडक डायेटवर ठेवलाय, म्हणून तो ऑफिसात हादडून घेतो. तेजुचा नाश्ता, अजून कुणाच्या डब्यात काही स्पेशल असलं तर...
त्याला नाही कुणी म्हणू शकत नाही. कारण, तो आमच्या कंपनीचा मालक आहे. तर आज तेजूनं वडापाव आणले होते. एक अख्खा वडापाव आणि एक कप चहा (तोच तो मशिनवाला भयाण वगैरे वगैरे) पोटात गेल्यावर जीवाला जरा बरं वाटलं. वडापावसकट तेजूनं माझ्या महिन्याभरामधल्या गैरहजेरीमधलं गायब झालेलं गॉसिपही सांगितलं. अर्थात ऑफिसच्या व्हॊट्सऍप ग्रूपवर मला रोजचे महत्त्वाचे अपडेट्स मिळतच होते, पण काहीकाही गोष्टी तिथं लिहिता येत नाही, त्याला कानात खुसूरफुसूर करत टिपिकल गॉस्सिपिंगच पाहिजे.
“आणि हां, त्याला आधीच सांग, रिपोर्ट याच फॉर्मटमध्ये मिळतील. वर्षानुवर्षे असे रिपोर्ट करतो आणि हा म्हणे, फॉर्मॆट युजर फ़्रेंडली नाहीये. काय नमुना आणलाय ना हा. त्याला ना सेलिनानं बरोबर नाव ठेवलंय- हीरो हीरालाल”
“काय?” चहा उडता उडता राहिला. आजच्या गॉसिपिंगचा सर्वात मोठा विषय. नवीन आलेला सीनीअर अकाऊंट मॅनेजर. मिहिर जैन म्हणे. हा जतिनभाईच्या नात्यामधला. वशिल्याचे तट्टू आल्यानंतर त्यांचा जितका रागराग केला जातो तितकाच त्याहून कणभर जरा जास्तच याचा केला जात होता. अमेरिकेवरून डिग्री घेऊन आला होता ना. तेजूनं आता आपली राजधानी एक्स्प्रेस तुफान वेगानं सोडली होती.
“टिप्पिकल मारवाडी आहे. कंजूस तर आहेच, एक मिनिट वेळ वाया घालवू देत नाही. मिस तेजस्विनी आपने ये ईमेल नही भेजा, आधा घंटा हो गया. मिस तेजस्विनी आपको लंच के लिये इतना टाईम क्यु लगता. मिस तेजस्विनी आप तो हॉस्टेल जाओगे ना, खाना थोडेही ना बनाना है, ये रीलीज एडिट करके जाइयेगा” तेजूचा आवाज चांगलाच चढत गेला.
“मेले, हळू बोल. कोण ऐकेल.”
“अख्खं ऑफिस त्याच्या नावानं बोंबलतंय.”
“आणि तोच इकडे आला तर... “
“हीरो हिरालाल पॅंट्रीमध्ये येत नाहीत. ते लंचसुद्धा आपल्या डेस्कवर बसून करतात.”
“दॅट इज नॉट अलाऊड”
“त्याला सांगून बघ. तसंपण जेवतोय कुठे. ते बाटलीभर प्रोटीन शेक पितंय” ओहो!! हेल्दी वगैरे!! मला हेल्स्थ कॉन्शस लोकांचा फार आदर वगैरे आहे. एक तर तसलं आपल्याला काही जमणार नाही. देवानं चांगलं आयुष्य दिलंय ते एन्जॉय करायला.. मस्त खावंप्यावं जगावं... तर ते असो.
तेजू पुढं सांगत राहिली. “तसापण आज पोस्ट लंच येईल. त्या हिना कॉस्मेटिक्सच्या मीटिंगला गेलाय. त्यांचं रीन्युअल आलंय ना.”
“हीना कॉस्मेटिक्स! माझं अकाऊंट!!”
“अरे होय!! तू आज येणार हे त्याला माहित होतं, मग मीटिंगला तुला न्यायला हवं होतं!”
ये खबर छपवा दो अखबारमे, पोस्टर लगवा दो बाजार मे.... इट्स ऑफिशीअल. मी आता याक्षणी त्या नवीन बॉसच्या विरोधामध्ये यल्गार पुकारलाय. अब सिर्फ लडाई होगी. वो भी आरपारकी. प्रश्न केवळ आजच्या मीटिंगचा नव्हता. हीना वॉज माय बेबी. अगदी छोटी कंपनी होती. आमच्याकडे अकाऊंट आलं तेव्हा तर मार्केटमध्ये त्यांना कोण ओळखत पण नव्हत्ं. जतिनभाईला त्यांच्याकडून तश्या फारश्या अपेक्षाही नव्हत्या. पण गेल्या तीन वर्षामध्ये आमच्या पीआरने हीनाला ओळख मिळवून दिली. सोशल मीडीयावर त्यांचे मेकप ट्युटोरियल्स व्हायरल झाले होते. प्रिंटमध्ये चांगली डीमांड होती. टीव्हीवर तर अधिकृत मेकप स्पॊन्सरर म्हणून नाव मिरवत होते. आणि हे सर्व केलं कुणी तर....
“संजू” तेजू मान हलवत म्हणाली. “दिस इज रॉंग. तुला किमान त्यानं इन्फॉर्म करायला हवं होतं.”
“आय डोंट केअर” मी खांदे उडवत तेजूला सांगितलं. यप्प!! ती तेजू मी संजू. ती तेजस्विनी आणि मी संजीवनी. दोघीही पाटील. आम्ही दोघीही बहिणी शोभलो असतो इतक्या जवळच्या होतो. मागच्या महिन्यामध्ये जेव्हा अभिषेकनं मला आयत्यावेळी धोका दिला तेव्हा तीन दिवस सुट्टी टाकून तेजू माझ्यासोबत येऊन राहीली. तेजूनं माझ्या खांद्यावर हात ठेवला. “चल डेस्कवर जाऊ”
दिवसाची सुरूवात वाईटपासून चालू होत वाईटेस्ट वर येऊन थांबली होती. पीसी चालू केला तर ईमेल्स ओसंडून वाहत होते. त्यातले नको असलेले डीलीट करत होते तेवढ्यात नवीन मेलचं नोटोफिकेशन दिसलं.... ओपन केलं तर फक्त दोन ओळी. फ्रॉम मिहिर जैन.
“आय ऍम अटेंडिंग हीना. प्लीज सेंड मी द डीटेल्स” सकाळी नऊ वाजता आलेला मेल मी ओपनच केला होता दहा वाजता. व्हॉट द हेल. डीटेल्स म्हणजे नक्की काय हवं भाऊ तुम्हाला? मागचे मंथली रिपोर्ट्स हवेत? एमओएम हवेत की न्युज क्लिपिंग्ज हव्यात की प्लान्स हवेत? शाण्या माणसानं पेपरवर्कच्या बाबतीत माझ्या नादाला जायचं नाही. सरकारी हापिसर करत नसेल तितक्या प्रेमानं मी माझं प्रत्येक काम फाईल्बंद करून ठेवते. अर्थात सॉफ्टकॉपीमध्येच. बरं, मीटिंग कधी? कुणासोबत? काय डिस्कस करणार माहित नाही मग मी काय डिटेल्स पाठवू रे!!
लगोलग सेलिनाला मेसेज केला. ही आमची ऑफिस ऎडमिन. कोण कुठाय काय मीटिंग्ज आहेत काय इव्हेंट्स आहेत याची माहिती हिला असलीच पाहिजे. हीनाची मीटींग साडेदहा वाजता आहे असा तिचा रीप्लाय आला.
म्हणजे आता अर्ध्या तासांत मी याला सर्व डीटेल्स पाठवायचे, त्यानं वाचायचे आणि मग मीटिंग अटेंड करायची. तिकडे हीनाच्या मार्केटिंग टीमला फेफरं येईल. मला काये म्हणा.. गेल्या महिन्याभराची माझी गैरहजेरी सोडली तर गेल्या तीन वर्षांचे सर्व डीटेल्स माझ्याकडे व्यवस्थित होते. मी लगोलग होतं नव्हतं तेवढं सगळं मेल केलं. दोन मिनिटांत रीप्लाय आला.
“सेंड मी द समरी. कान्ट रीड थर्टी फाईल्स”
थॅंक्स वगैरे काही म्हणायची पद्धत नाहीच.  मी लगेच तयार असलेली समरी (जी आधीच्याही मेलमधे एटॅच होती) परत पाठवून दिली. रीप्लाय आला. “के”
आय मीन, मी काय फार मॅनर्स वगैरे बोलत नाही, पण ईमेलला केवळ ओके किंवा के रीप्लाय करणार्‍या लोकांचा मला प्रचंड राग आहे. थॅंक्स म्हणून टाईप करा की. त्यातही TNX टाईप करून मोकळे होतात. वाढदिवसाच्या HBD अशा शुभेच्छा देणार्‍यांना तर मी ताबडतोब ब्लॉकच करते. मागच्या वर्षी तर चक्क जतिनभाईला ब्लॉक केला. HBD GBU असं माझ्या फेसबूक वॉलवर लिहिलं. बाबा, चांगला दोन किलोचा केक मागवून ऑफिसात वाढदिवस साजरा केलास ना, मग फेसबूकावर ही सहा अक्षरं एक वेळ लिहिली नसतीस तरी चाललं असतं. मी ब्लॉक केल्याचं समजल्यावर प्रचंड वैतागला होता. मग नंतर एकदोनदा त्यावरून मला रीक्वेस्ट (ऑफ़लाईनच अर्थात, एकदा तर चक्क भर मीटिंगमध्ये) केली, आणि मग मी त्याला अनब्लॉक केला. आता तो मला ऑनलाईन शुभेच्छा द्यायच्या भान्गडीतच पडत नाही. जे काय असेल ते समोर बोलतो.

असो! एकंदरीत या नवीन बॉससोबत माझं काही फारसं पटणार नाही हे निश्चित झालं होतं. त्या दिवशी हा हीरो हिरालाल ऑफिसला आलाच नाही. हीनासोबत मीटिंग आटोपून पुढं नवीन बिझनेस क्लायंटसोबत डिस्कस करायला गेला.
मी दिवसाभरात महिन्याभराची कामं संपवत संपवत आणली. अजून बरेच रिपोर्ट फायनल करायचे होते, बरंचसं वाचन राहिलं होतं. मीडीया क्लिपिंग नुसत्या नजरेखालून घातल्या होत्या. दिवस कसा संपला ते समजलंच नाही. संध्याकाळी ऑफिसमधून एकेक जण निघायला लागला तसा जीव कासावीस व्हायला लागला. परत त्या फ्लॅटवर जायचं या विचारानंच...
पण जाणं तर भागच होतं. मोठ्या कौतुकानं अकरा महिन्याचं डिपॉझिट एकहाती भरून लीझवर घेतलेला फ्लॅट. त्याचं “घर” करायचं किती मनात होतं, पण झालंच नाही. सध्या त्या केवळ भिंती आणि फरश्या आहेत. अजून महिन्या दोन महिन्यामध्ये एखादी रूममेट बघेन, म्हणजे तेवढाच आर्थिक भार सोसला जाईल.. तोपर्यंत तरी आपण परत गेलंच पाहिजे. अखेर साडेसात वाजता मी चर्चगेटकडे चालत निघाले.
आज अख्खा ऑफिसचा दिवस नवीन बॉसचं कौतुक ऐकण्यातच गेला. आमच्या ऑफिसमध्ये कधीच कुणाचं कशावरही एकमत होत नाही. अगदी ऑफिसमध्ये क्रिसमस ट्री लावायचा का.. दिवाळी पार्टी करायची का या असल्या क्षुल्लक बाबतीतही आमच्याकडे घमासान चर्चा होते. पण कधी नव्हे ते अख्ख्या ऑफिसचं एकमत यावेळी झालं होतं. जतिनभाईचा हा भाचा अत्यंत नालायक होता. नवीन बॉस कुणालाच आवडलेला नव्हता.
पण हा बॉस प्रत्येकाला झेलावा तर लागणार होताच. जतिनभाईला मुलं नाहीत. त्यामुळे त्याची ही एजन्सी आणि इतर काहीबाही बिझनेस बहिणीच्या मुलाकडे जाणार हे त्यानं आधीच ठरवलं होतं. त्यामुळे नवीन आलेला मिहिर जैन केवळ सीनीअर अकाऊंट मॅनेजर नव्हता, आज ना उद्या तो मालक होणार होता. परिणामी, त्यानं कितीही बॉसगिरी केली तरी प्रत्येकाला सहन करावीच लागत होती.
आमची पीआर एजन्सी फार मोठी नव्हती, पण आमच्याकडे तसे महत्त्वाचे क्लायंट्स होते. जतिनभाईला पीआरची एबीसीडी अवगत होती, त्याचं इंटरपर्सनल स्किल जबरदस्त होतं. केवळ त्याच्या नावावर आमच्याकडे अनेक क्लायंट्स टिकून होते. सर्व स्टाफमध्ये जतिनभाई अतिशय लाडका होता. तो आणि त्याची मिसेस सेजल आमच्यासाठी बॉस कधीच वाटले नाहीत, सेजलला भाभी किंवा दिदि म्हटलेलं आवडत नाही. आंटी वगैरे म्हटलं की विषय संपलाच, फायनल सेटलमेंट घेऊन घरीच निघायचं. सेजल पन्नाशीची असूनही आमच्यासारख्या पंचवीशींच्या पोरींना लाजवेल अशी राहते. निव्वळ मेकप किंवा कपड्यांबद्दल बोलत नाहीये मी. तिचा एकंदर जगण्याचा दृष्टीकोनही अजून फार तरूण आहे.. सेजल ऑफिसमध्ये रोजच्या रोज कामाचं काही बघत नाही पण मेजर प्रेस कॉन्फ़रन्स किंवा इतर काहीही इव्हेंट असतील तर सेजल हवीच.  खासकरून आमच्यासारख्या बाहेरून आलेल्या मुलींसाठी तर ही दोघंही अनेकदा खूप मदत करायचे. मी चार महिन्यांपूर्वी हॉस्टेल सोडून नवीन फ्लॅट शोधत होते तेव्हा जतिनभाईनंच त्याच्या ओळखेनं दहिसरमधला हा फ्लॅट निवडून दिला होता.
मी महिन्याभरापूर्वी भलीमोठी रजा टाकली, पण फासे काही मनासरखे पडले नाहीत. कुठून जतिनभाईला खबर पोचली माहित नाही. पण रातोरात तो आणि सेजल माझ्या फ्लॅटवर् आले होते. फ्लॅटवर अस्ताव्यस्त सामान पडून होतं. काही काचेची भांडी फोडली होती. मी दोन चार नवीन साड्या कात्रीनं चक्क कापल्या होत्या. रडून रडून माझे डोळे सुजले होते. दोन दिवस काहीही न खातापिता तशीच घरात बसून होते. आपल्याच नशीबाला दोष देत. माझी हालत बघून दोघंही जाम चमकले होते.
“मी उद्या किंवा परवा राजिनामा ईमेल करते” मी मुसमुसत त्याला सांगितलं.
“आणि घरी बसून भांडी घासते का?” जतिनभाई कधी नव्हे ते कडाडला. “गुमान ऑफिसला यायचं. पर्सनल प्रॉब्लेम्समुळे काहीही झालं तरी करीअर कशाला बरबाद करायचा?”
सेजल प्रेमानं माझ्या बाजूला बसली. पाठीवरून हात फिरवत म्हणाली. “बेटा! नोकरी सोडलीस तर काय करनार? घरी परत जानार आहेस का?”
तो ऑप्शन माझ्यासाठी आता शिल्लक नव्हताच. आईबाबांनी माझ्यासाठी घराचं दार कायमचं बंद केलं होतं. मी मानेनंच नाही म्हणून सांगितलं. “मंग आता तुला नोकरीची गरज आहे. कधीही आलेस तरी माझ्या एजन्सीमध्ये तुझ्यासाठी जागा नक्की असेल. आय प्रॉमिस.” जतिनभाई म्हणाला.
“मी महिन्याभरानंतर परत जॉइन होते. आता गेले तर लोक हसतील”
“कुणी हसत नाही. एव्हरीबडी नोज व्हॉट हॅज हॅपन्ड. तरीही तुला वाटत असेल तर महिन्याभराचा ब्रेक घे” जतिनभाईनं तेजूला फोन करून माझ्या फ्लॅटवर बोलावून घेतलं आणि तिला चक्क सुट्टी दिली. ती माझ्यासोबत दोन तीन दिवस राहिली. मग मीच हिमालयाची टूर बूक केली आणि तसं जतिनभाईला फोनवरून कळवलं.
“दॅट्स लाईक माय डॉटर” जतिनभाई प्रेमानं म्हणाला. मला त्या क्षणाला त्याच्या मायेच्या या दोन शब्दांची असोशीनं गरज होती.
आणि आता त्याच जतिनभाईनं माझ्या डोक्यावर हा नवीन हीरो आणून बसवला होता.
दुसर्‍या दिवशी मी ऑफिसला लवकर गेले. एक तर घरी बसून काही काम होत नाही, आणि मला खरंतर त्या फ्लॅटमध्ये मनापासून कंटाळा येत होता. पावसाळी वातावरण सगळीकडे दाटून आलं होतं. आय हेट मुंबई मान्सून. आज अजून ऑफिसमध्ये कुणीही आलेलं नव्हतं. सर्व लाईट्स बंद असल्यानं माझ्या डेस्क एरियामध्ये अंधारं दिसत होतं. मी माझ्या डेस्कवरचा लाईट लावला. रिसेप्शनवर त्या अटेंडन्स मशिनला अंगठा दाखवून माझ्या डेस्कवर आले तर ऑलरेडी तिथं कुणीतरी बसलं होतं. माझा पीसी चालू होता, आणि त्यावर कुणीतरी माझे रिपोर्टस वाचत होतं.
“एक्स्युज मी” मी आत आल्याआल्या विचारलं. दोन काळेभोर डोळे माझ्याकडे वळाले. ऑफकोर्स द हीरो हिरालाल.
 “येस”
“आप मेरे डेस्कपे क्या कर रहे है?” मी शक्य तितक्या नम्रपणे विचारलं.
“हीनाचे पेमेंट डीटेल्स शोधत होतो. काल सेलिनानं मेल केलाच नाही, म्हणून तुमच्या पीसीवर आहे का चेक केलं.” मराठीमधून उत्तर आलं. अतिशय शांत, खोल आवाज..
“ओके”
“आय गॉट इट. मी प्रिंटची कमांड दिलीये” समोर बसलेला मिहिर जैन देखणा होता. देखणा म्हणजे एकदम मॉडेलटाईप देखणा. उंचीला माझ्यापेक्षा अर्धाफूट जास्त. म्हणजे सहा फूट नक्कीच. अंगात क्रिस्प व्हाईट शर्ट, शर्टामधूनही त्याचे जिममध्ये कमावलेले स्नायू अगदी व्यवस्थित दिसत होते. कोपर्‍यापर्यंत दुमडलेल्या बाह्या, पायांत लेदरचे शूज. कार्पोरेट लूक एकदम परफेक्ट. पण या परफेक्ट लूकला मारणारं काय असेल तर त्याची नजर. काळे चकाकते डोळे. नजरेचा थांगही लागणार नाही अशी खोल नजर. क्षणभर मी त्याच्याकडे बघतच बसले. आणि मग भानावर आले. “तुम्ही माझा पीसी ओपन का केलात? इट्स...” मी माझी बॅग बाजूच्या खुर्चीवर ठेवत विचारलं. माझा संताप आवरण्याची अतिशय पराकाष्ठा करत!
त्याची एक भुवई उंचावली. “इट्स नॉट युअर पर्सनल पीसी. ऑफिसचा पीसी आहे आणि मी कामाचेच  रिपोर्ट्स बघत होतो. महिनाभर सुट्टीवर होता तेव्हा अनेकदा वर्क फ़ोल्डर ओपन केलाय. तुमच्या पर्सनल डॉक्युमेंट्स किंवा इमेल्स मध्ये मला काडीचाही इंटरेस्ट नाही” तो माझ्या खुर्चीवरून उठत म्हणाला. “बाय द वे, फॉंट जरा मोठा वापरत जा, डोळ्यांना वाचताना त्रास होतो”
“यु कॅन अल्वेज झूम इट”
 “व्हाय शूड आय..” तो म्हणाला आणि स्वत:च्या केबिनमध्ये निघून गेला. नालायक! हाय हॅलो ओळखबिळख काही नाही. एजन्सीचा अद्याप मालक असलेला जतिनभाई आला की सर्वांना हसतमुख गूड मॉर्निंग म्हणतो आणि हा काल उगवलेला पोरगा जणू आम्ही स्टाफ म्हणजे याची स्वत:ची जागिर असल्यासारखा वावरतोय.
आधी म्हटलंच ना, तसं अब तो लडाई होगी. वो भी आरपारकी.

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> 
तर ही आहे जतिनमामांची लाडकी संजू. मिस संजीवनी पाटील. ज्या दिवशी मी ऑफिसमध्ये पहिल्यांदा आलो तेव्हा जतिनमामानं सगळ्या स्टाफची ओळख करून दिली. तेपण प्रत्येकाच्या डेस्कवर जाऊन. ऑफिसच्या एकदम कोपर्‍यामध्ये असलेल्या एका रिकाम्या डेस्ककडे बघून मामा म्हणाले, “ही संजूची जागा. सध्या सुट्टीवर आहे. आली की ओळख होईलच. तुला बरंचसं काम तिच्याबरोबरच करावं लागेल.”
नाऊ डोंट गेट मी रॉंग. पण त्या डेस्ककडं बघताच तिथं कशी व्यक्ती बसत असेल याचा अंदाज आला होता. दॅट्स माय सुपर पॉवर. मी समोरच्याबद्दल एका क्षणामध्ये हवी ती माहिती काढू शकतो. केवळ एका नजरेमध्ये. नुसतं त्या व्यक्तीच्या जागेकडे बघूनदेखील. समोरच्या भिंतीवर जुन्या काळच्या हिरोचा फोटो. धर्मेंद्र ऑर जितेंद्र. मला ब्लॅक ऍंड व्हाईट एरामधले लोक फारसे समजत नाहीत. हिंदी फिल्म्स बघायची फारशी आवडही नाही त्यामुळे आय डोंट केअर पण जुन्या काळचा हीरो..  बाकी डेस्कवर फक्त एक डायरी आणि पाण्याची बाटली. महिनाभर सुट्टीवर जाताना ती डायरी तिथंच कशाला ठेवली होती कुणास ठाऊक? पाण्याची बाटली बदलायची जबाबदारी आमच्या एआर रहमानकडे आहे. ते त्याचं काय खरं नाव नाही, पण अख्खं ऑफिस त्याला रहमान म्हणतं, म्हणून मीही म्हणतोच. रहमानभाऊ कामाला इतका पक्का होता की, त्या मिस पाटील सुट्टीवर जाऊन आठ दिवस झाले तरी बाटली तिथंच होती. आपल्याला काय! ती सुट्टीवरून आल्यावर काय ते बघून घेईल. बाकी, अख्ख्या ऑफिसामध्ये प्रत्येकाकडे कंपनीचा लॅपटॉप होता. पण मिस संजीवनी पाटील यांच्याकडे नाही. त्या अजूनही दोन हजार पाचमधला डेस्कटॉप वापरत होत्या. कारण काय माहिताय? ट्रेनमधून इतकं ओझं कोण नेईल! राईट! माझा त्यावर विश्वास तरी कसा बसेल. फ्रॅंकली स्पीकिंग, घरून काम न करण्याचं अत्यंत सबळ कारण! माझ्याकडे लॅपटॉप नाही. उद्या ऑफिसमध्ये येऊन बघेन. मला वर्क फ़्रॉम होम शक्य नाही. त्या डेस्ककडे पाहताच मला या मिस पाटीलच्या पर्सनालिटीचा थोडासा अंदाज आला. अंदाज कसला नजरेसमोरच उभी राहीली खरंतर. सलवार कमीझ, सतत सावरायला लागणारी ओढणी, केसांचा तो हाफपोनी म्हणतात तसला अजागळ प्रकार. डोळ्यांना चष्मा असणारच. टिपिकल गावकरी मुलगी.
एजन्सीमध्ये गेली पंधरा दिवस मी अनेकदा मिस पाटीलच्या डेस्कटॉपवरून अनेकदा काम केलं. पीसीच्या वॉलपेपरवर परत एकदा ब्लॅक ऍंड व्हाईट  हिरॉइन दिसली. या मिस पाटील अद्यापही साठच्याच दशकांमध्ये वावरत होत्या. डेस्कटॉपवर एक फोल्डर तिच्या नावाचा होता. कितीहीवेळा टेम्प्ट  होऊनही मी तो फ़ोल्डर ओपन केला नाही. अखेर एके दिवशी संध्याकाळी लेट काम करत असताना तेजस्विनीने तो फोल्डर उघडला. गाणी. हजार गाण्यांचा फोल्डर. लाईक, सीरीयसली. मिस संजीवनी पाटलांच्या पीसीवर हजारो गाणी होती. सगळी एकदम जुनीच. परत कधी मी त्या फ़ोल्डरच्या वाटेला जाणार नाही. पण तिचा वर्क फोल्डर वाचताना परत एकदा मिस पाटीलबद्दल माझ्या मतावर शिक्कामोर्तब झालं. परफेक्ट इंग्लिश. ग्रामरमधल्या चुका नाहीत. टूद पॉइण्ट असलेले रिपोर्ट्स. प्रत्येक मीटिंगचे, प्रत्येक मीडीया प्लानचे व्यवस्थित बनवलेले फोल्डर. तारीखवारासह लिहिलेली माहिती. जतिनमामाला तिच्या कामाबद्दल प्रचंड अभिमान होत्ता. हुशार तर ती होतीच. त्यात मला काही म्हणायचं नाही.  दिसण्याबाबतीत मात्र माझा अंदाज कधी आजवर चुकलेला नाही.
आजवर.
प्रिंटरमधून येणारे कागद गोळा करत असताना मी परत एकवार डेस्कवर बसलेल्या मिस संजीवनी पाटीलकडे वळून पाहिलं. फ़ॉर्मल ट्राऊझर्स आणि त्यावर क्रीम कलरचा शर्ट. ट्राऊझरच्या वेस्टलाईनपर्यंत पोचतील इतके लांब केस. सरळ मऊ रेशमी. पाहताक्षणी त्या केसांमधून आपली बोटं फिरवावीत आणि त्या केसांचा रेशमीपणा आपल्या त्वचेत साठवून घ्यावा असं वाटणारे केस. सावळासा रंग. उन्हानं किंचित रापलेला.
कानांत हेडफोन घालून कसलंतरी गाणं ऐकत होती.. आय ऍम व्हेरी मच शुअर, कुठलंतरी जुन्याबिन्या काळांतलं गाणं असणार. गाण्यासोबत ती हलकेच गुणगुणायला लागली, तेव्हा अंदाज बरोबरच ठरला. काय तरी सावरीया बावरिया चालू होतं. पण मिस संजीवनी पाटीलबाबत माझा तेवढा एकच अंदाज बरोबर ठरला. मला आजवर वाटली होती त्यापेक्षा ही मुलगी पूर्ण वेगळी होती.
 खुर्चीत बसल्यावर तिनं वाकून पायामधले कॅनव्हासचे बूट काढले. पायानंच ते डेस्कखाली सरकवले. आणि आत ही महामाया ऑफिसमध्ये स्लीपर घालणार की सॅंडल्स!  असा विचार मी करत असतानाच तिनं डेस्कखालून हिल्स बाहेर काढले. कधी एखाद्या मुलीला पायामध्ये ते उंची हिल्स घालताना पाहिलंय? आय मीन, तळपाय हलकेच पुढे सरकवून हातानं तो स्ट्रॅप हातांच्या बोटांनी ऍडज्स्ट करत टाचेवरून नीट बसवताना! नंतर पाऊल ते कथ्थकवाल्या मुली करतात तसं हलकेच आपटताना. सेम रीपीट प्रोसीजर फॉर पाऊल नंबर दोन. दोन्ही पावलांमध्ये ते कातिल हिल्स घातल्यावर तिनं कानातले हेडफोन्स काढून डेस्कवर ठेवले. आणि मिस पाटील खुर्चीतून उठून उभ्या राहिल्या.
परत एकदा... ओह! माय! गॉड!
पाठमोरी उभी असलेल्या मिस संजीवनी पाटलांनी आताच्या आता माझा खून करायचं ठरवलंय. मघाशी प्रिंट दिलेले रिपोर्टचे कागद अर्धे माझ्या हातत होते. अर्धे अजून प्रिंटरच्या ट्रेमध्ये.  मोकळ्य असलेल्या लांब केसांमधून हलकेच हात फिरवत तिनं ते वळवले, आणि डेस्कवरची क्लिप उचलून बांधले. सावळीसी उंच बारीक मान आता माझ्या नजरेसमोर आली. त्या मानेवरून हलकेच आपले ओठ फिरवायची इच्छा मनामध्ये दाटून आली.
व्हॉट इज रॉंग विथ मी?
गेली तीन वर्षं मी युएसमध्ये टॉप पीआर फर्ममध्ये काम केलंय. आज ना उद्या भारतात परत येऊन मला मामांची ही एजन्सी ताब्यात घ्यावी लागेल हे मला माहित होतं. त्यासाठी मामांनीच मला युएसला पोस्ट ग्रॅड साठी पाठवलं होतं. बारावीला इंजीनीअरिंगला जाण्याइतके मार्क असूनही मी इंग्लिश लिटरेचरला गेलो.  सुरूवातीला मला वाटलं की, माझा खरा इंटरेस्ट  क्रीएटिव्ह रायटिंगमध्ये आहे. पण नंतर पोस्ट ग्रॅड झाल्यावर जेव्हा प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली, तेव्हा जाणवलं की मला यामध्ये फार इंटरेस्ट आहेच शिवाय चांगलं जमतंय पण. वर्षभराच्या जॉब एक्स्पीरीअन्सनंतर मामा मला परत ये म्हणून मागे लागले. मी होता होईतो टाळाटाळ केली पण अखेर चार महिन्यांपूर्वी मामांनी मला अल्टिमेटमच दिला. मामांपेक्षाही आईने. आणि मी इथं परत आलो. आल्यावरही वर्षभर दुसर्‍या एखाद्या एजन्सीमध्ये थोडे महिने काम करून एकंदरीत मीडीया सर्कलचा आणि पीआरचा अंदाज घेण्याचा माझा प्रयत्न होता. पब्लिक रिलेशन्स आणि मीडीया रिलेशन्स हे काम एका दिवसांत होण्यासारखं नसतं. त्यातून मला तीन वर्षं भारताबाहेर असल्यानं इथला काहीच अंदाज नव्हता. मामांना हे सर्व सांगायचा प्रयत्न केला. पण त्यांनी अजिबात ऐकून घेतलं नाही. भारतात परत आल्यानंतर बरोबर पंधरा दिवसांनी माझ्या हातात अपॉइण्टमेंट लेटर पडलं. ताबडतोब जॉइन व्हायचंय या धमकीसकट.
आय ऍम नो इडियट. मामांचा स्टाफ अत्यंत जुना आणि लॉयल आहे. इथल्यापैकी कुणालाच कालपरवा आलेला हा मुलगा आपला बॉस बनून आलाय हे आवडलं नव्हतं. शिवाय, मी आज केवळ मॅनेजर असलो तरीही आज ना उद्या एजन्सी टेकोव्हर करेन हे प्रत्येकाला माहित होतंच... मामांनी मला इथं अचानक आणून बसवल्यानं कुणाहीसोबत पर्सनली इंटरॅक्ट होण्याची मला संधीच मिळाली नाही. आय ऍम ऍन आऊटसायडर. त्यानंतर कितीही वेळा प्रयत्न केला तरी स्टाफने मला त्यांच्यात आजवर सामावून घेतलंच नाही. मी बॉस आहे म्हणून नव्हे, एजन्सीचा मालक असलेल्या आणि वयानं सर्वात मोठ्या असलेल्या जतिनमामांना अख्खा स्टाफ मैत्रीच्या नात्यानं वागवतो. आणि मी मात्र त्यांच्यासारखाच अकाऊंट मॅनेजर असून आणि वयानं त्यांच्याइतकाच असूनही कायम बाहेरचा....
बोलून कुणी दाखवत नाही, पण प्रत्येकाच्या नजरेमध्ये ते दिसतंच ना. माझ्यासमोर आताच आलेल्या मिस संजीवनी पाटीलकडे बघा. मी त्यांच्या डेस्कवर बसून रिपोर्ट बघतोय हे समजल्याबरोबर तिच्या नजरेमध्ये असला संताप उसळला. खरंतर मीही थोडं नमतं घेऊन हसून दोन चार शब्द बोलू शकलो असतो. नाही असं नाही. मुळात मी मनानं फारसा खडूस नाही. पण मी आता इथं एजन्सीमध्ये मैत्री करायच्या फंदात पडणार नाही. माझ्याकडून मी खूप प्रयत्न केले. आता बास. तसंही मिस संजीवनी पाटील कालपासून माझ्यावर जाम चिडलेल्या दिसत होत्या. नक्की कशासाठी ते माहित नाही. वास्तविक, दोघांची तशी फारशी अजून ओळख झालीच नव्हती.
या सगळ्यांना मी केवळ खडूस बॉस इतकाच वाटतो ना? मग आपणही तितकंच राहू. मामा कितीही म्हणत असले तरी अजून वर्षा दोन वर्षांत काही ते रीटायर होणार नाहीत आणि झाले तरीही एजन्सीच्या कामकाजामध्ये राहणारच. प्रत्यक्ष बॉस बनायला मला खूप वेळ आहे. तोपर्यंत गणितं किती बदलतील कुणास ठाऊक...
“काही हवंय का?” मिस संजीवनी पाटीलच्या प्रश्नानं मी भानावर आलो. इतकावेळ प्रिंटरसमोर असाच विनाकारण उभा आहे की काय..
माझे उरलेले प्रिण्ट आऊट्स मी उचलून घेतले. “स्टेपल करून देऊ का?” अतिशय नाटकी आवाजात तिनं विचारलं.
“न.. नको” मी विनाकारण घसा खाकरत विचारलं. आवाजाला काय धड भरली कुणास ठाऊक. ती समोर अक्षरश: फूटभर अंतरावर उभी होती. तिनं घातलेल्या हाय हिल्समुळं तिची उंची आता बरीच जास्त वाटत होती, अर्थात माझ्याइतकी नाहीच.. तिनं प्रिंटरसमोरून काही कोरे कागद उचलले आणि ती मागे वळाली.
“मिस पाटील” मी आवाज दिला. ती किंचित थबकली. “उद्या आपली जानमसोबत मीटिंग आहे. त्यांना काही मेजर चेंजेस डिस्कस करायचे आहेत. तुम्ही डायरेक्ट दहा वाजता त्यांच्या ऑफिसमध्ये याल का?”
जानम ज्वेलर्स हा आमचा नुकताच आलेला क्लायंट. त्यांनी मागच्या वर्षभरामध्ये अनेक नवीन स्टोअर्स लॉन्च केली होती, पण त्याचा म्हणावा तितका इफ़ेक्ट दिसत नव्हता. साऊथ इंडियामध्ये प्रचंड स्ट्रॉंग असूनही ब्रॅण्ड प्रचंड स्ट्रगल करत होता. मला अजून या क्लायंटची फारशी माहिती नाही. रिपोर्ट्स वाचायलाही वेळ झाला नाही. मिस पाटील जर फ्री असतील माझ्या केबिनमध्ये कॉफी घेत डिस्कशन केलं असतं. गूड वन, मिहिर.
तिनं आता पूर्ण मागे वळून पाहिलं. “जानम माझा नाही, तेजूचा क्लायंट आहे”
ओह! घातलाच का घोळ!!
“सॉरी, मला तुमच्या दोघींमध्ये थोडं कन्फ़्युजन होतं.” मी खरं काय ते सांगून टाकलं. खरंतर दिसायला दोघीही प्रचंड वेगळ्या आहेत. तेजस्विनी उंचीला कमी, किंचित जाड आणि गोरीपान आहे. स्वभावही दोघींचे भिन्न असावेत, म्हणजे असायला हवेत. कोईभी टीममे सिर्फ एकही गुंडा होता है आणि तेजू निर्विवादपणे आमच्या टीममधला गुंडा आहे. क्लायंटलाही “ज्याच्यात तुम्हाला समजत नाही त्यात अक्कल चालवू नका” असं ठणकावून सांगणारी तेजू. तिच्यासारखीच हीपण गुंडा असेल तर विषय संपलाच!!
पण चेहर्‍यावरून तरी मिस संजीवनी पाटील फार शांत वाटतायत.
वाटतायत, आहेत असं नाही!!!
“इट्स ओके. मी तेजूला मेसेज देईन. एनिथिंग एल्स?”
बोल काहीतरी गाढवा, मी स्वत:लाच ढोसलं. पण आयत्यावेळी काही विषय आठवेना.
“नो” म्हणत मी मागे फिरलो. माझ्या केबिनमध्ये येऊन बसलो. गेल्या पाच दहा मिनिटांत कधीतरी बाहेर जोरात पाऊस चालू झालाय. कंप्लीट एसी ऑफिस असल्यानं आत आवाज अजिबात येत नाही. नजर खिडकीच्या बाहेर गेली तर फक्त करड्या रंगाचाच माहौल दिसतोय. आय लव्ह मुंबई मान्सून. मुंबईइतका वेडा पाऊस कुठंच पडत नाही. खिडकीच्या काचेवरून ओघळणारे ते पावसाचे थेंब बघताना उगाचच संजीवनीची नजर आठवली. मधासारख्या रंगाचे डोळे. नितळ. माझ्या नजरेला तिच्या खोल खोल गर्तेत घेऊन जाणारी सरळ नजर.
समोर लॅपटॉपवर हीना कॉस्मेटिक्सच्या कालच्या मीटिंगचे डिटेल्स होते.. हीना हे मिस संजीवनीचं अकाऊंट. काल या मीटिंगला तिनं सोबत येणं गरजेचं होतं. पण नुकतीच महिन्याभराच्या सुटीनंतर ऑफिसमध्ये आल्यावर अचानक मीटिंगला येणं तिला जमलं असतं की नाही माहित नाही... म्हणून काल मीच एकटा गेलो. ते अर्थातच तिला आवडलेलं नव्हतं. काल मेल पाठवताना मला तो तुटकपणा जाणवला होता.
पण यापुढे हे अकाऊंट दोघांना मिळून मॅनेज करावं लागणार होतं. त्यासाठी मिस संजीवनी पाटलांना माहिती देऊन ठेवणं गरजेचं. म्हणजेच त्यांच्याशी बोलणं गरजेचं. म्हणजेच आता केबिनमधून उठून मी तिच्या डेस्ककडे जाणं त्याहून गरजेचं.
एक मिनिट!! फक्त एक मिनीट.

आय मीन, मी क्रीएटीव्ह रायटिंगवाला माणूस आहे, त्यामुळे कथा सांगणं हा माझ्या इण्टरेस्टचा मामला आहे हे सर्व बरोबर. तरीही, काही क्लॅरीफिकेशन्स आताच देणं गरजेचं नाही का?
येस, मिस संजीवनी पाटील अत्यंत आकर्षक आहेत. माझ्या टाईपच्याही आहेत. माझ्यावर त्यांचा सध्या खूप राग आहे पण थोड्याच दिवसांत आम्ही दोघं जेव्हा एकत्र काम करू तेव्हा त्यांना लक्षात येईल की मी किती ऑसम आहे. अपनी भी पर्सनालिटी काफी आकर्षक है..
पण तरीही, ही माझी आणि संजीवनीची लव्हस्टोरी नाही.
येस. नीट वाचलंत. ही आमची लव्हस्टोरी नाही.
मग ही नक्की कसली स्टोरी आहे?
ते आताच सांगून काय उपयोग?
ही स्टोरी कदाचित मिस संजीवनी पाटलांचं ठरलेलं लग्न अचानक कसं काय मोडलं त्याची स्टोरी आहे.
कदाचित ही मी तेजस्विनी पाटीलसोबत लग्नाला तयार झालो याची स्टोरी आहे.
किंवा कदाचित ही माझ्या आणि संजीवनीच्या एकमेकांसोबत असलेल्या प्रोफेशनल स्पर्धेची स्टोरी आहे.

राईट! गोष्टीच्या नावावरून तुम्हाला ही लव्ह स्टोरी वाटली का? ये रास्ते है प्यार के? प्रत्यक्षात ते ये रास्ते है पी आर के असंही असूच शकतं ना..

बट देन, कदाचित ही लव्ह स्टोरी असूही शकते. कुणास ठाऊक..