Wednesday 18 January 2017

रहे ना रहे हम (भाग २३)

तो आणि मी एकत्र राहिला लागलोय हे बिल्डिंगमध्ये काही जणांना समजलं. काही जणांनी आडून तर काही जणांनी थेट विचारलं, मी बहुतेक जणांना  “नुकतंच लग्न झालंय, तो  शिपवर असतो, अजून थोड्या दिवसांनी परत जाईल” वगैरे थातुरमातुर उत्तर दिलं.क तर फ्लॅट माझ्या बापाचा होता, त्याला कुणीतरी काहीतरी फोन करून कळवलं असतं तर वेगळेच वांदे. त्यापेक्षा हे कारण सुटसुटीत झालं. आमच्यासमोरचा फ्लॅट कुण्या कुलकर्णींचा होता. तो त्यांनी अजून कुणालातरी भाड्याने दिला होता पण दरवाज्यावर नेमप्लेट कुलकर्णींची असल्याने आम्ही कुलकर्ण्यांचा फ्लॅट असंच म्हणायचो. क्वचित घरात नसताना काही कुरीअर, सोसायटीचं लेटर वगैरे त्यांच्याकडे आलेलं असलं की तेवढ्यापुरतं बोलणं व्हायचं. नवरा बायको आणि दोन मुलं असा छोटासा संसार होता. शांत लोकं होती आणि मुख्य म्हणजे चौकश्या फार करायचे नाहीत. आफताबबद्दल पण त्यांनी जास्त काही विचारलं नाही मीच एकदा ओळख करून दिली. बिल्डिंगमध्ये नाव सांगण्यापुरतं मी त्याचं नाव “अजय” केलं होतं. हे त्याला आवडायचं नाही, पण लोकांनी जास्त प्रश्न विचारले तर आमच्याकडे त्याचं उत्तर नव्हतं- खासकरून माझ्याकडे! खोटं बोलणं हे खरं बोलून भानगडी वाढवण्यापेक्षा जास्त परवडण्यासारखं होतं.

 या शेजार्‍यांनी डोंबीवलीला स्वत:चा फ्लॅट घेतला आणि ते जूनच्या दरम्यान शाळेची ऍडमिशन तिकडे घेऊन घर सोडून गेले. महिनाभर जेमतेम घर रिकामं राहिलं आणि लगेच नवीन भाडेकरू आले. नवरा बायको आणि कॉलेजमध्ये जाणार्‍या मोठ्या दोन मुली. वन बीएचकेच्या त्या छोट्याश्या फ्लॅटमध्ये हे पाचजण राहणार कसे याची मलाच चिंता. नवरा कंपनीत कामाला होता आणि बायको गारमेंट फॅक्टरीमध्ये टेलरिंग काम करत होती म्हणे. हे लोक आल्यापासून आमच्यासोबत एकही वाक्य बोलले नाहीत. मीच ओळख करून घेण्यासाठी काही विचारलं तर त्या काकी धाडकन दरवाजा बंद करून आत गेल्या. त्या बोलत नाहीत तर तू कशाला आगाऊपणा करतेस असा आहेर मला आमच्याच फ्लॅटमधून तात्काळ मिळाला.  
हे लोक (मला खरंच त्यांचं नाव माहित नाही!) रहायला आल्यानंतर दोनेक आठवडे सुरळीत गेले. मी आणि आफताब एके रात्री झलक दिखला जा बघत डिनर करत होतो तेव्हा अचानक त्यांच्या फ्लॅटमधून जोरात ओरडल्याचे आवाज आले. नवर्‍याने बहुतेक दारू प्यायली असावी. अतिशय घाणेरड्या आवाजात तो बायकोला शिव्या देत होता. थोडावेळ घाणेरड्या शिव्या, बायकोवर संशय घेणारं वगैरे सर्व काही झाल्यावर मात्र चक्क मारल्याचे आवाज येऊ लागले. ती बाई विव्हळायला लागली. पोरी कदाचित घरी नसाव्यात, असल्या तरी काही बोलत नसाव्यात. टीव्हीवरच्या कार्यक्रमाकडे माझे लक्ष लागेना, हातातला घास तसाच फिरत राहिला. आफताब शांतपणे जेवत होता. दोघांनाही तो मारल्याचा आवाज अस्वस्थ करत होता.
मला दारू पिणारे लोक नवीन नाहीत. बाबा अधूनमधून पितो, अझर रोजच पितो, आफताब क्वचित, मी स्वत: क्वचित. मला शिव्या देणारे लोकही नवीन नाहीत. आज्जी माझ्या बाबाला गटार फुटल्यासारखे बोलतो, म्हणून कितींदा ओरडायची. अर्थात बाबाची ही भ आणि झ ची बाराखडी घराबाहेर. घरात नाही. माझ्यासमोर तर बिल्कुल नाही. मी जर अधेमध्ये च्यायला वगैरे काही बोलले तरी बाबा डोळे वटारून बघायचा.
पण मला अजिबात माहित नसलेली गोष्ट म्हणजे बायकोला मारणारी लोकं. माझा बाबा लाख  भानगडबाज असेल, पण इतक्या वर्षांत त्यानं कधी आईवर आवाज चढवलेला मी ऐकला नव्हता, मारणं तर फार दूरच. एखाद्या लहान मुलीला जपावं तसं आईला जपायचा. माळ्यावरून जड सामान तो स्वत: काढायचा, आई भाजी आणायला गेली तर हा पिशव्या उचलायला म्हणून सोबत जायचा, असा माझा बाबा आईवर हात काय उचलेल! माझ्या लहानपणापासून ते आजवर मला ना कधी बाबाने मारलं ना आईने. फार हट्ट केला की आई एखादा फटका द्यायची. कोपर्‍यात उभं करून ठेवायची. पण बाबा चुकूनही नाही. बाबा अहिंसावादी वगैरे अजिबात नव्हता. बाहेर असताना चिकार मारामारी करायचा, पण घरामध्ये नाही. आईसोबत बोलतानापण तो कधी “तुला काय कळतंय? बायकांची ही कामे नव्हीत” वगैरे बोलायचा नाही, असं कुणी स्वत:च्या बायकोला म्हटलं तरी ते त्याला खटकतं. अझर आणि नूरीच्या नात्यामध्ये इतके किचकट प्रॉब्लेम्स होते. पण अझरने तिच्यावर कधी हात उगारला नाही. त्यादिवशी अगदी सहनशक्तीचा कडेलोट होऊन पण त्यानं तिच्यावर हात उगारला नव्हता.

इतके दिवस मी अशी नवरा बायकोला मारतो आणि ती रडते वगैरे पिक्चर सीरीयलमध्ये पाहिलेलं. पण आता घडत असलेला प्रसंग अवघ्या काही फुटांवर होता. समोरच्या फ्लॅटमधून मारल्याचे आणि तोंडात बोळा कोंबून कण्हल्याचे आवाज येतच राहिले. ते आवाज येऊ नयेत म्हणून आफताबने  टीव्हीचा व्हॉल्युम मोठा केला, अर्ध्या तासाने आवाज यायचे थांबले.
पण त्यावर मी आणि आफताब काही बोललो नाही.
मग हे रोजचंच चालू झालं. तो माणूस दारू प्यायचा याबद्दल माझं काही म्हणणं नाही. आपल्या घराच्या चौकटीमध्ये काय वाट्टेल ते करायचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण दारू पिऊन असा दंगा करणं! एकदा तर रात्री दोन वाजता ओरडायचे आवाज ऐकू आले. मला आधी वाटलं की स्वप्नांतच ऐकू येतंय, पण चांगली जाग आल्यावरही आवाज येतच राहिला. बाहेर पाऊस जोरात पडत होता, तरी ओरडल्याचे आवाज येतच होते. लाईट लावून दाराच्या फटीतून पाहिले तर एका मुलीला तो बाप मारत होता, तेपण दार उघडून जिन्यामध्ये! मी आफताबला उठवलं पण तो म्हणे, “आपण काय करू शकतो?” आणि लगेच मुसक घेऊन तो झोपला.
मी दाराआडून ती मारामारी कितीतरी वेळ पाहत राहिले. मुलगी कॉलेजच्या फंक्शनला गेली होती. तिकडून तिला यायला उशीर झाला होता, म्हणून बाप मारत होता. आधी बराच वेळ घरामध्ये तमाशा झाला असावा, पण मग ती मुलगी “मी आता घर सोडून जाते आणि जीव देते” म्हणत बाहेर निघाली आणि जिन्यामध्ये हे प्रकरण चालू झालं.
मी माझ्या मोबाईलवरून शंभर नंबर डायल केला. पोलिस येतील आणि काय ती कारवाई करतील, पण माझा फोन ज्याने कुणी घेतला त्याची एकंदर अवस्था समोरच्या मारकुट्या बेवड्याइतकीच होती. त्याला मी काय बोलतेय ते समजून घ्यायचं नव्हतंच, वर इतक्या रात्री कुणी मुलीनं फोन केलाय हे पाहून अधिकच चेव चढल्यासारखा, “मग आता घरात एकटी आहेस का? पत्ता सांग जरा” असं बरळू लागला. फोन बंद केला, आणि बेडरूममध्ये येऊन दार लावून झोपले. झोप कधी लागली माहित नाही पण सकाळी जाग येईपर्यंत तेव्हा रात्रीचाच प्रकार डोक्यात भिरभिरत होता. सकाळी नेहमीप्रमाणे आईचा फोन आला, “गूड मॉर्निंग”
नेहमीसारखं काय चालूये, कसं चालूये वगैरे थॊडंफार बोलणं झालं. आई मला रोज न चुकता फोन करायची, तिला अजून मी आणि आफताब एकत्र राहत असलेलं माहित नव्हतं. त्यामुले तिला वाटायचं की मी एकटीच आहे, आणि म्हणून तिला माझी काळजी वाटायची. मी बोलता बोलता तिला रात्रीचा प्रसंग सांगितला.
“बाबाला विचार, त्या कुलकर्णींचा काही कॉंटॅक्ट नंबर आहे का?”
“विचारते. त्यांनी पण यतिनसारखाच इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलाय. दुबईला का कुठेतरी असतात. तिकडेच सेटल झालेत. त्यांच्या एजंटचा नंबर असला तर देते.” मग इकडचं तिकडचं बोलून फोन ठेवला.
माझ्या हातात चहाचा कप देत आफताबनं विचारलं “कुलकर्णींचा नंबर कशाला हवा?”
“त्यांना सांगूयाकी. तुला काल रात्री जराही जाग आली नाही. तासभर तमाशा चालू होता. त्या माणसानं मुलीचं डोकं जिन्यावर आपटलं. मी पोलिसांना तेव्हा फोन केला..”
“वेडी आहेस का तू? पोलिसांना कशाला?”
“अरे मग, किती मारामारी चालू होती...”
“त्यात आपला काय संबंध आहे. स्वप्निल? पुन्हा असला आगाऊपणा करू नकोस. आणि कुलकर्णींना किंवा त्यांच्या एजंटला काही सांगायची गरज नाही!”
“आर यु क्रेझी? तो माणूस गेले महिनाभर रोज त्याच्या बायकोला आणि मुलींना मारतोय. मी त्यात काय आगाऊपणा करतेय? मी परवा तुला म्हटलं की, फक्त दार उघड आणि....”
“आणि काय करू? त्याच्या दोन कानाखाली मारू? बेवड्यासोबत हाणामारी हेच करू का? गुंडा आहे का मी?”
“तू विषय भलत्याच ट्रॅकवर नेतोस. आवाज चढवून विचारलं असतं तरी चाललं अस्तं ना. बाबा म्हणतो की, आपल्या बायकांवर हात उगारून मर्दानगी सिद्ध करणारी माणसं प्रत्यक्षात भाडखाऊ असतात.”
“सीरीयसली, इफ यु डॊन्ट नो द मिनिंग, डोन्ट युज द वर्ड!! सेकंड थिंग, मी अस्लं काहीही करणार नाही. तूपण कुणालाही फोन करून काही बोलू नकोस. आपला यात काहीही संबंध नाही”
“आफताब...”
“स्वप्निल, पूर्ण ऐकून घे. कुलकर्णी का जे कोण आहेत त्यांना फोन करून काय सांगशील? समोरचा माणूस दारू पिऊन दंगा घालतो. ते जर विचारायला इकडे आले तर तो काय म्हणेल.. मी माझ्या घरात काय वाट्टेल ते करेन. ही पोरगी कोण मला बोलणारी? विषय वाढलाच तर हेदेखील बाहेर येईल की, तू इथे बिनालग्नाची एका मुलासोबत राहतेस. तेपण माझ्यासोबत. तुला या सर्वांचे परिणाम माहित नाही का?”
“सेम लॉजिक अप्लाईज, मी माझ्या घरात काय वाट्टेल ते करेन. दोन प्रौढ व्यक्ती आहोत आणि आपल्याला कुणाहीसोबत एकत्र रहायचा हक्क आहे. मी काय किंवा तू काय.. आपण कुणाला मारत नाही. फिजिकली हर्ट करत नाही. रात्रीअपरात्री घाणेरड्या शिव्या देऊन बिल्डिंग जागवत नाही. ”
“कुणी जागत नाही. काल तुझ्याशिवाय अख्ख्या बिल्डिंगमध्ये कुणीही उठलं नव्हतं. जरी आपण एकमेकांना मारत नसलो तरीही स्वप्निल, एखाद्या मुलीनं असं बिनालग्नाचं राहणं हे समाजात मान्य होणारी गोष्ट नाही हे तुला चांगलंच माहित आहे.”
“ग्रेट!! नवर्‍याने बायकोला धडाधडा मारलं तरी चालतं. तिच्या आणि स्वत:च्या मुलीच्या प्रायव्हेट पार्ट्सचा वाट्टेल तसा घाणेरडा उल्लेख चारचौघांत करायचा ते या समाजामध्ये चालतं कारण त्यांचं लग्न झालेलं आहे. माझ्याइतक्या वयाच्या मुली असलेला बाप आपल्या लग्नाच्या बायकोवर भलते संशय घेऊ शकतो. पण मी!! बिनालग्नाची तुझ्यासोबत राहू शकत नाही तेच नेमकं समाजाला खटकतं. ”
“रॉंग. तू आणि मी तर लग्न करूनही या समाजामध्ये सुखाने ताठ मानेने राहू शकत नाही. समाजाला खटकण्यासाठी आपल्या नात्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. तुझी आणि माझी केस फार कॉम्प्लेक्स आहे. आपली आर्थिक स्थिती वेगळी, धर्म वेगळे. माझ्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही. पण तुझ्यासाठी चिक्कार आहेत..... तेव्हा माझं ऐक. जास्त डोकं घालू नकोस. तो माणूस जे वागतो ते चुकीचं आहे हे मलाही माहित आहे. पण आपण यामध्ये काही करू शकत नाही. चहा गार झाला. संपव. ऑफिसला जायचं नाही का?” तो उठत म्हणाला.
“ती बाई अशा नवर्‍यासोबत का राहत असेल? ती स्वत: कमावती आहे. का सोडून देत नाही?”
“तो चर्चेचा वेगळाच विषय आहे. नवरा सोडून आलेल्या बाईला समाजात काही किंमत नाही हे तुला माहित असेल. चल, आटप. डोक्याला जास्त ताण घेऊ नकोस. ” मी मात्र माझ्याच विचारांमध्ये गढले होते.

“आफताब, मला हे सर्व घरी सांगायचंय” मी अखेर म्हटलं. खूप दिवसांपासून असं वाटत होतं.. किमान आईला तरी सांगावं. आईला जर विषय समजला असता तर...”
“हे म्हणजे? आताच तर तासभर ऐकवलंस ना कालचं प्रकरण?”
“तुझ्यामाझ्याबद्दल! सांगितलं तर वाईट काय होणार नाही ना...”
“पुढे मागे काहीही न बघता आपलं लग्न लावून देतील. मला आता या स्टेजला ते खरंच नकोय.” तो ताडकन म्हणाला.
“लग्नासाठी म्हणत नाहीये, पण एकंदरीतच...”
“हे बघ, मी तुला खॊटं बोल असं कधीच सांगणार नाही... पण प्लीज तू परिस्थिती समजून घे. यतिनकाकांनी जर लग्नाचा विषय काढला तर मला नाही म्हणता येणार नाही... काकांचे आमच्या घरावर तितके उपकार आहेत. त्यांच्यामुळे अझरभाई स्वत:च्या पायावर उभा राहिला आहे. पण तो सध्या एकटा आहे. त्याच्याआधी मी लग्न करणं मला स्वत:ला चूक वाटतं. मी लहान भाऊ आहे.  म्हणून प्लीज.. अजून थोडे दिवस जाऊ देत. तू आणि मी दोघं मिळून सांगू. या रिलेशनशिपला सध्या तरी याच स्टेजवर थांबू देत”
“याला रीलेशनशिप असं तरी का म्हणावं?” खूप दिवसांपासून मनामध्ये असलेला प्रश्न अखेर मी विचारला.
“आपण अनोळखी आहोत का? आपल्या दोघांमध्ये नातं आहे. आणि हे नातं काल किंवा आज सुरू नाही झालंय. हे तुलाही माहित आहे आणि मलाही. कुठल्यातरी मूर्ख निर्णयामुळे मला आपल्यामधली ही फ्रेंडशिप हरवायची नाही.” मला हे नातं फ्रेंडशिपच्या पुढे न्यायचं होतं, पण त्याला मैत्री महत्वाची वाटत होती.

तो अख्खा दिवस ऑफिसमध्ये विचार करण्यांतच गेला. सध्या माझ्याकडे फारसे रिपोर्ट नव्हते. काम जास्त नसलं की मन भरकटत राहतं.  समोरच्या फ्लॅटमध्ये चौकटीमध्ये आखलेला संसार जखडत ओढत का होईना रेटून नेणारी ती बाई आणि मी चौकटी मॊडल्याच्या अविर्भाव आणत प्रत्यक्षात तिच्यासारखीच अडकलेली मी. ती लग्नाचा नवरा आहे म्हणून सोडू शकत नाही, मी माझं खूप प्रेम आहे म्हणून सोडू शकत नाही. तिच्या पायांतली बेडी दिसते, जाणवते. माझी बेडी तर तलम नाजुक, दिसतही नाही. जाणवत तर त्याहून नाही. पण तरीही बेडी आहे. एकाचठिकाणी बांधून ठेवणारी, तिथल्यातिथेच मला अडकवून ठेवणारी ही बेडी आहे.

अर्थात दिवसभर विचार फक्त मीच केला असावा असं नाही कारण, संध्याकाळी घरी आल्यावर आफताबने मला दोन गूड न्युज दिल्या. एक माझं गावी जायचं तिकीट बूक झालं होतं आणि दुसरं म्हणजे मी आईला हे सगळं काही फोनवर सांगण्याऐवजी प्रत्यक्ष गावी गेल्यावरच सांगावं. सांगताना एकत्र रहातोय वगैरे न सांगता, “आम्ही कमिटेड रिलेशनशिपमध्ये आहोत पण लग्नाचा विचार नाही” हे सांगायलाच हवं असं त्याचं म्हणणं. मी सकाळी इतकी बकबक केली खरी, पण आईला हे सर्व सांगायचं म्हणजे पोटात कावळे नाचल्यासारखे व्हायला लागलं. ते भूक लागल्यावर कावळे ओरडतात, पण आईची जाम भिती वाटली की कावळे नाचतात!!!

आठवड्याभरानं गणपती येणार होते. मी ऑलरेडी ऑफिसमध्ये पाच दिवसांची सुट्टी खेरीज शनि-रवि जोडून आठवड्याभराचा प्लान केला होता. पण तिकीट वेटींग लिस्टवर होतं, ते आज कन्फर्म झालं. मुंबईपासून इतक्या जवळ असूनही मी अलमोस्ट सात की आठ महिन्यांनी घरी निघाले होते.
आफताबला सुट्टी नव्हती, त्यामुळे तो एकटाच राहणार होता. निघताना त्यानं माझं सामान अगदी व्यवस्थित पॅक करून दिलं. शिवाय, आईसाठी साडी वगैरे शॉपिंग करायला पण तो गपगुमान आला.
रात्रभर प्रवास करून घरी गेल्यागेल्या आईनं “इतक्या दिवसांनी आल्याबद्दल” स्वागत केले. आईच्या स्वागताची पद्धत म्हणजे, “मी यतिनला सांगित्लं, गाडी घेऊन स्टेशनात जा. पोरीला घरचा पत्ता सापडला नाही तर चिंता. इतक्या दिवसांनी येतेय, कुठे हरवली बिअरवली तर काय घ्या. मुंबईमद्ये एकटी राहते पण आमचं गाव अडनीड. हरवायचे चान्सेस पण जास्त” अशी टकळी सुरू झाली की आपण मान खाली ठेवून बसायचं. चुकूनही उलटं उत्तर द्यायचं नाही आणि कविताने खवलेल्या खोबर्‍याच्या ताटाकडे तर अजिबात पहायचं नाही.
बाबा सकाळीच दुकानामध्ये गेला होता. गणपतीच्या दिवशी काहीबाही लोकं सामान घ्यायचं विसरतात, मग आयत्यावेळी यतिनभाऊंचं दुकान उघडं दिसलं की आपोआप तिकडे जातात. एका सामानासोबत अजून चारपाच गोष्टी नेतात. त्यामुळे यतिनभाऊ कुठल्याही सणाला दुकान उघडं ठेवतात. तसंपण आमच्याकडे गणपती बसवायला भटजी येतो, पूजेचे सर्व साहित्य आणि नैवेद्याची तयारी आई करते. बाबा घरी आला की आरती करायची असा नियम.
आईची बडबड होइस्तोवर मी नाश्ता केला. पहाटेपासून पाऊस चांगलाच पडत होता. तसा भाद्रपद आला तरी याअवर्षी पावसाने चांगलाच हात दिला होता. आतापण खिडकीमधून पडणारा पाऊस बघत मी फेसबूकवर स्क्रोलिंग करत बसले होते. आईला आता नाही तर उद्या सर्व सांगायचं असं मी ठरव्लं होतं. सणासुदीच्या दिवशी उगाच वादविवाद नकोत. आईबाबाची रीऍक्शन नक्की काय असेल ते मला अजून समजत नव्हतं. विचारांवरून विचार नुसते पॉपकॉर्नसारखे तडतड उडत होते. “फुले आणली नाहीत” आईनं मध्येच पुकारा केला.
“गाडीची चावी दे, मी घेऊन येते”
“आता चांगली मिळणार नाहीत. अझरपण घरात नाही. त्याच्या बागेत जास्वंदीची फुले आहेत. तो आला की हाक मारून मागवते”
“मी जाऊन आणते की. दोन मिनिटांचं तर काम आहे” मी लॅप्टॉप शटडाऊन करत म्हटलं.
“खरं की काय, चक्क आमच्या लाडक्या राजकुमारी घरामध्ये काहीतरी काम करणार!”
“माते, मला सर्व घरकाम येतं. समजलं ना. सतत टोमणे मारू नकोस.” मी पाठच्या दरवाज्याने बाहेर पडले. पावसानं सगळा चिखल झाला होता. भांडी घासायच्या भागामध्ये तर शेवाळ साठलं होतं.
“ताई, जपून जा” कविताने मला सल्ला दिला. “छत्री नेताय?”
“कशाला? चार फुले तर तोडून आणायची”
कवितासोबत हल्ली तिची सून कामाला यायची. दोघी मिळून कामं करायच्या. कविता आमच्याकडे काम करत असताना तिची सून अझरभाईंकडे कामाला गेली होती. मी गडग्यावरून उडी मारायच्या बेतात असताना ती एकदम समोरून आली.
“घरात कुणी नाये” मी अलिकडच्या गडग्यावर आणि ती पलिकडच्या असा संवाद चालू झाला.
“माहिताय. मी त्यांच्या बागेमधून फक्त फुले आणतेय”
“तिकडे सगळा चिखल आहे.”
“असू देत ना”
“तिकडे एकटीने जाऊ नका. जनावरं वगैरे येतात” मला हिचा रागच आला. लहानपणापासून मी या घरात फिरतेय आणि ही कोण मला सांगणारी? एकंदरीत तिचा सूर मला “तू तिकदे जाऊ नकोस” असाच होता. एकतर फारशी ओळख पाळख नाही तरी मला “जाऊ नका” सांगणारी ही कोण?
“वाट सोड, उशीर होतोय” मी अखेर म्हटलं.
“सांगते तेवढं ऐका, जाऊ नका.  त्यांनीच सांगितलंय, येऊ नका म्हणून”
“आता तर म्हणालीस की अझर घरात नाही. आता म्हणे, येऊ नका. हा काय मूर्खपणा आहे?” मी सरळ गडग्यावर चढून पलिकडे उडी मारली. कविताला मी लहानपणापासून ओळखते. तिनं असला आगाऊपणा कधी केला नसता, पण ही सून काल आली आणि मला शहाणपणा शिकवते. तडातडा अझरच्या बागेकडे निघाले खरी.. (ही बाग अझरची नक्की कधीपासून झाली. मला आठवतंय तसं या बागेची खरी मशागत केली आफताबने. असो) पण अचानक जाणवलं की घराचा मागचा दरवाजा उघडा आहे. खिडक्या उघड्या आहेत. म्हणजे, अझर घरातच आहे!! कविताची सून नुकतीच त्याच्या घरामधून बाहेर आली होती...  मी तिकडे येत आहे ते बघून.. नक्की काय ते समजेना. पावसाने बाग सगळी पाणीपाणी झाली होती. जास्वंदीच्या झाडाजवळ नुसती फांद्यांची झुप्पाझिप्पी झाली होती. लालचुटूक जास्वंदीची कैक फुलं फुलली होती. हाताच्या जवळ येतील तितकी मी काढून घेत होते. शिवाय थोडी तगरीची, मोगर्‍याची अशी फुलं वेचली. अजून थोडं पुढे गेल्यावर चाफ्याचं एक उंच झाड होतं. त्यावर फुलंच फुलं आली होती. दोन चार उड्या मारून फुलं काढली पण आली नाहीत.
अझरचं या फुलबागेकडे अजिबात लक्ष नसावं इतक्या वेड्यावाकड्या फांद्या वाढल्या होत्या, वेलींच्या मांडवाखालून जावं तसा अंधारभरलं वातावरण होतं. एक तर पावसाळी दिवस. कुंद हवा. त्यात पाण्यानं निथळणारी झाडं. त्यांत मी एकटीच. म्हणजे मी स्वत:लाच तसं सांगितलं. कारण, मघापासून मला दोनतीनदा जाणवलं की मी आता एकटी नाहीये. कुणीतरी आहे. मी इकडेतिकडे वळून पाहिलं पण होतं. घराह्च्या पुढच्या बाजूला अझरची बाईक आणि कार दोन्ही दिसत नव्हते. घराचं दार तर उघडं होतं, मग घरात होतं कोण?
आयुष्यात कधी वाटली नाही तितकी भिती मला आता याक्षणाला वाटली. माझी भिती खोटी नव्हती हे पण मला लगेच समजलं कारण, अचानक कुणीतरी झाडीमधून पुढे आलं, माझे केस धरून खस्स्कन त्याच्या अंगाजवळ ओढलं आणि एकदम अचानक किस घेतला.