Sunday 5 January 2014

प्रेमकथा

“नवीन काही लिहिलंस?” तिनं विचारलं.

“हं”

“काय?”

“एक प्रेमकथा” तो त्याच्या नेहमीच्या शांत आवाजात म्हणाला. ती हसली. “प्रेमकथा आणि तू?”

“का? त्यात एवढं हसण्यासारखं काय आहे?”

“विश्वास बसत नाही. इतक्या दिवसांत कधी प्रेमकथा लिहिली नव्हतीस तू...”

तो गालातच हसला, तेव्हा तिने त्याच्या गालावरच्या खळीवर हलकेच टिचकी मारली. “ऐकव ना..”

“आता?”

“मग कधी? ऐकव पटकन!”

“मग ऐक, मधेमधे बोलू नकोस, आणि भलतेसलते प्रश्न विचारू नकोस”

“वा! वा!! इरशाद” ती पटकन बोलून गेली. त्याने तिच्या डोक्यात टपली मारली. “असला वात्रटपणा करशील तर मी नाही ऐकवत.”
“सॉरी” ती त्याचेच कान पकडत म्हणाली. “आता अजिबात बोलणार नाही..” त्याने एक क्षण तिच्या डोळ्यांत पाहिलं. तिच्या हसर्‍या डोळ्य़ांत त्याचाच चेहरा नाचत होता.

“एक दुनिया होती. वेगळीच, दूर कुठेतरी. सुरूवात, शेवट, आदि, अंत काहीही नसलेली. एखाद्या विस्तीर्ण अवकाशासारखी ती दुनिया. एक वेगळंच विश्व होतं ते. त्या दुनियेमधे दोन जीव असेच फ़िरत होते. कशासाठी? कुणासाठी? त्यांनापण माहित नव्हतं. कधीपासून? कधीपर्यंत? तेही माहित नव्हतं. पण ते असेच फ़िरत होते. खरंतर तरंगत होते. कारण या दुनियेला जमीन नव्हती, आकाश नव्हतं, होतं ते फ़क्त चारी बाजूंना पसरलेलं क्षितीज.” ऐकता ऐकता तिने डोळे मिटून घेतले. आता तिला फ़क्त त्याचा आवाज तिच्या डोळ्यासमोर दिसत होता. “तर असेच हे दोन जीव एकमेकांसमोर आले. एके दिवशी. फ़िरता फ़िरता. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. दोघांनाही वाटलं... आपण ओळखतो एकमेकांना. काहीतरी ओळख आहे, पण नाही. दोघंही स्वत:लाच एकदम म्हणाले. “आपण तर एकदम अनोळखी आहोत” आणि ते आपापल्या मार्गाने पुढे निघाले. निघताना दोघांची नजर मात्र एकमेकांना भेटली. किती वेळ? निमिष हा शब्द म्हणायला जेवढा वेळ लागतो त्याच्या पाव शतांश वेळ. बट देन देअर वॉज मॅजिक... जादू झाली. त्या दोघांच्या नजरेतून एक ठिणगी जन्मली. स्पार्क! केवढी होती ती ठिणगी. एवढीशी, चिमुकली. पण जादू होती खरी. जादू! ती ठिणगी मोठी मोठी होत गेली. इथे आपल्या त्या दोन अनोळखी जीवांना माहितच नाही, ते आपले फ़िरतातच आहेत तिकडे भलतीकडे. काहीतरी शोधत. आणि इकडे ही ठिणगी इतकी मोठी झाली.... की तिचे हजारो तुकडे झाले. हजारो तुकड्यांचे परत हजार तुकडे. त्यातल्या एका तुकड्याचा बनला एक तारा, तेजस्वी, लकाकणारा. चमकणारा. तुझ्या डोळ्यांसारखा. मग त्या तार्‍याच्या भोवती अजून काही तुकडे जमले. त्यातला एक निळा तुकडा होता, त्यावर सृष्टी तयार झाली. तिथेच का? कुणालाही माहित नाही. हजारो रंगांची, लाखो क्षणांची, करोडो श्वासांची सृष्टी....” बोलता बोलता तो थांबला.

“आणि मग?” तिने मिटलेले डोळे उघडत विचारलं.

“ते अनोळखी जीव असेच कधीतरी फ़िरत फ़िरत त्या निळ्या तुकड्याजवळ आले, आणि योगायोग बघ, दोघांना पण ही नवीन दुनिया प्रचंड आवडली. दोघंही इथेच रहायला आले. इथल्या दुनियेचेच बनून. आणि मग एके दिवशी अजून एक जादू झाली... इथेच राहत असताना ते एकमेकांना भेटले. अजून एकमेकांसाठी अनोळखीच होते ते. पण त्या नजरेने दुसर्‍या नजरेला लग्गेच ओळखलं. हीच ती जादू करणारी नजर. हीच ती फ़ुलबाजीसारखी ठिणग्या उडवणारी नजर.. हीच ती....” तो तिच्या डोळ्यांत बघत म्हणाला, “हीच ती... स्वतंत्र दुनिया वसवणारी नजर... हीच ती.. इतकी वर्षं शोधत असलेली नजर..”

तिच्या डोळ्यांत पाणी तरारलं. “हीच ती... नजरेने नजरेला भिजवणारी नजर, आणि मग ते दोघं अनोळखी राहिलेच नाहीत.. या नजरेनेच कधीचेच एकमेकांचे होऊन गेले.” तो हलकेच म्हणाला आणि पुढे होऊन त्याने तिच्या गालावर ओठ टेकले.

ती हसली. थोडीशीच. “काहीही...” डोळ्यांतलं पाणी पुसत ती म्हणाली. “ही अशी प्रेमकथा? कोण वाचेल?”

“तू ऐकलीस ना? मग अजून कशाला कुणी वाचायला हवी?” तो म्हणाला.

“काहीही...” ती परत म्हणाली. “असं थोडीच घडत असतं कुठे?”

“पण कुठेही असं घडतच नसतं, असंही नाही ना.......” तो म्हणाला.  

No comments:

Post a Comment