Monday 1 July 2013

गजरा

तसं मला लहानपणापासून फुलांचं त्यातही मोगर्‍याचं फार वेड. आम्ही रत्नागिरीत असताना दोन-तीन वर्षांनी एकदातरी घर बदलायचो. घर बदललं की आईचं पहिलं काम मोगरा, अबोली, गुलबक्षी वगैरे फुलझाडं अंगणात नसतील तर आधी ती लावायची. कोकणातलं घर म्हटलं की झाडं लावायला जागा असणारच. आईला झाडांची जोपासना करायची भारी हौस. मला मात्र झाडांची जोपासनेपेक्षा त्याला आलेल्या रंगीबेरंगी  फुलांचं जास्त कौतुक. आईला चाफा आणि अबोली फार आवडतो, आणि मला मात्र मस्त टप्पोरा फुललेला मोगरा... आईने स्वतःचं घर झाल्यावर तर प्रत्येकाच्या वाढदिवसाला एक एक असं करत घरात फुलझाडांची रांगच लावली. त्यातही माझ्या वाढदिवसाला आला तो मोगराच.
 
 
मोगरा फुलला की अख्खं अंगण  गंधाळायचं. त्याचा सौम्य तरी घमघमाणार्‍या वासाने देवघर भरायचं. इतक्या सुंदर वासाचा तो मोगर्‍याचा गजरा मात्र मला डोक्यात घालायला अजिबात पसंतीस येत नाही. मोगर्‍याचा गजरा, मोगर्‍याची फुलं कशी घरामधे नुसती ठेवावीत.... मुंबईमधे असताना मी असाच अधून मधून गजरा विकत आणायचे आणि घरामधे ठेवायचे. ते बघून नवरा म्हणायचा हा कुठला तुझा नवीन रूम फ्रेशनर... पण तरी अख्खं घर प्रसन्न वाटायचं ते वेगळंच.
 
 
मद्रासला आल्यावर मात्र हे अधून मधून न होता रोजचंच झालंय. एक तर इथे बाहेर फिरताना केसांत गजरा न माळलेली स्त्री दिसणं अशक्यच. त्यातून इथे सर्रास मिळणार्‍या त्या मदुराई मल्लिगेचा सुगंध काय वर्णावा? नाजूक पांढरंशुभ्र टपोरं फूल, त्याला अगदी हलक्या पिस्ता रंगाचा देठ. एक एक फूल म्हणजे आकाशातला एक एक ताराच. आणि सुगंध तर सौम्य आणि हलका, तरी प्रत्येक श्वासाला त्याचं अस्तित्त्व दाखवून देणारा.
 
 
या मदुराई मल्लिगेशी माझी ओळख झाली ती रोज घरासमोर गजरे विकायला येणारीमुळे. मी तमिळनाडूत नवीनच आले होते, भाषा येत नव्हती. मुंबई आणि नंतर मंगलोरला राहून "दारासमोर विकायला येणार्‍या वस्तू" हा प्रकार विसरूनच गेले होते. पण इथे आल्यावर सकाळी सहावाजता येणार्‍या भाजीवालीपासून ते रात्री नऊनंतर येणार्‍या कुल्फीवाल्या भय्यापर्यंत सर्वांची हळूहळू सवय व्हायला लागली होती. त्यातच भेटली ही. रोज संध्याकाळी साडेतीन चारला गेटात उभं राहून "अम्मा, पू वेणमा?" असं विचारायची. पहिल्या दिवशी काय विकते म्हणून उत्सुकतेने पाहिलं तर टोपलीभर मोगरा. मग खाणाखुणा विचारून केवढ्याला दिला. दहा रूपये, मग दे वगैरे संवाद झाला आणि हा मदुराई मल्लिगे माझ्या घरामधे दरवळायला सुरूवात झाली. असं हे गजरा घेणं मग दिनकर्मच बनून गेला.  
 
 
 
तिची यायची वेळ आणि माझी चहा प्यायची वेळ एकच. एकदा सहज विचारलं, "चहा घेतेस?" (माझं तमिळ बर्‍यापैकी सुधारलं होतं तेव्हा!!) सहसा तमिळ लोकं कापी पितात, तरी ती म्हणाली, "द्या थोडा"
चहा घ्यायला म्हणून गेटातून आत येऊन पडवीत बसली. मग टोपलीतून मोगर्‍याची फुलं काढली आणि चहा घेता घेता सरसर हाताने गजरा गुंफायला लागली. अधेमधे माझं टिल्लू जाऊन फुलं खेळत होतं तर तिने टोपलीतली दहाबारा फुलं काढली आणी त्याचा एक छानसा गुच्छ विणला. सुनिधीच्या हातात तो गुच्छ दिल्यावर सुनिधी आरामात बसून तिच्याशीखेळायला लागली. चहा पितापिता मी तिला तिचं नाव विचारलं. तिने काहीतरी मला अगम्य वाटेल असं तमिळी नाव सांगितलं. दोनदा विचारून पण मला ते नाव काय ते नक्की समजलं नाही. सतत एकच प्रश्न विचारणं पण बरं दिसत नाही, म्हणून मी मनातल्या मनातच तिचं बारसं गजरा म्हणून करून टाकलं. नावं ठेवायची हौस!! दुसरं काय..
 
 
 
ही गजरा दिसायला अगदी आमच्या कोकण्या मामींसारखीच. काळीकुळकुळीत पण चमकदार चेहरा, लांबसडक केस आणि त्या केसांचा घट्ट बांधलेला अंबाडा. वापरून वापरून विटलेली पण स्वच्छ साडी, कानांत आणि नाकांत चमकते खडे, आणि तोंडभर हसू. अगदी मी "सुनिधी बाहेर जाऊ नको" एवढं जरी मराठीतून म्हटलं की तिला हसू येणारच. मी तमिळमधनं एखादं वाक्य म्हटलं की तिला हसू येणारच. गप्पा मारत बसली की अधूनंमधनं माझे तमिळ उच्चार मात्र चुकीचे असले की सांगायची.
 
एकदा तिने मला विचारलं. "रोजच्या रोज गजरा घेण्यापेक्षा महिन्याचा घेणार का?"
 
मला आधी तिचं म्हणणंच समजेना. अगम्य तमिळ्-हिन्दी-कानडी अशा मिश्रीत भाषेतून मग मी तिला नक्की काय म्हणायचंय याचा अंदाज घेतला. महिन्याभराचा गजरा एकत्र घेऊन कसं चालेल? फुलं रोज ताजी हवीत वगैरे वगैरे बोलून घेतलं. सुमारे दहापंधरा मिनिटानंतर माझ्या लक्षात आलं महिन्याचा गजरा घेणार का म्हणजे ती गजरा रोजच देणार, पण पैसे मात्र तिला महिना झाल्यावर द्यायचे.
 
 

मलापण ही पद्धत आवडली, नाहीतर रोज दहा रूपयाची चिल्लर तिला द्यावी लागायची त्यापेक्षा एकदम पैसे दिले की बरं. मग आमच्याकडे चालू झाला गजर्‍याचा रतीब.
 
 
रोज गजरा द्यायला आली की चहा घेता घेता मग सहज घरच्या गावच्या गप्पा चालू. गजरा मूळची आंध्रप्रदेशकडची. तिथल्या गरीबीमुळे कामाला म्हणून मद्रासकडे लग्नानंतर आली. आली म्हणजे नवर्‍याने आणली. इथे आल्यावर भरपूर काम मिळालं तरी गरीबी काही संपली नव्हतीच. बाकी बायांचे भोगपण होतेच वाट्याला. चार मुलं तीपण कच्चीबच्ची. नवरा दारू-गांजा करणारा. कुठेतरी हमाली करायची आणि आलेला पैसा सगळा नशापाणी करण्यात उडवायचा. मुलांना सासूकडे ठेवून ही चारघरची धुणीभांडी करणार, दुपारनंतर सावकार पेटमधे जाऊन मोगर्‍याच्या लिलावातून फुलं विकत घेणार. परत येताना बसमधेच गजरे विणायला सुरूवात करणार. आणि संध्याकाळी चारनंतर दारोदार "पू वेणमा?" करत गजरे विकणार. जेवढे पैसे सुटतील तेवढ्यावर दिवस भागणार. धुण्याभांड्यांचे पैसे सगळे मुलांच्या शाळेला खोलीच्या भाड्याला वगैरे संपणार. आणि गजर्‍याच्या पैशातून तांदूळ आणि भाज्या येणार. वयाच्या पंधराव्या वर्षी लग्न झालेली ही गजरा माझ्यापेक्षा लहानच. पण तरी माझ्यापेक्षा जास्त आयुष्याची समज असलेली. आपला फायदा नक्की कशामधे हे जाणून असणारी. मी बहुतेक रोजच्या रोज गजरा घेत होते, म्हणून तिला महिन्याचे पैसे एकदम हवे होते.
 
 
"सगळे पैसे हातात आले की काहीतरी वस्तू वगैरे घेता येते. मुलांना कपडे वगैरे..."

रोज संध्याकाळी चार वाजत आले की गजरा येते. सावकार पेटेतून फुलं घेऊन आली की सरळ माझ्याच घरी. उन्हातून आल्यामुळं अगदी दमून जीवाच्या आकांताने येते. आली की आशी थोडावेळ निवांत बसते. उन्हाळा चालू असल्याने आम्ही हल्ली चहा घेत नाही. थंड सरबतच. अधनंमधनं काही खायला दिलं तर खाते नाहीतर मुलांसाठी म्हणून बांधून घेते. आणि मग गजरे गुंफायला घेते. माझ्याशी गप्पा मारता मारता सरासर हाताने ती गजरे विणत जाते. मोगर्‍याच्या कळ्यांचा तो सुगंध अजून खुलायचा असतो. टपोर्‍या कळ्या एका दोर्‍यात मागोमाग अडकत जातात.
निघताना गजरा माझ्या हातामधे पानाच्या गुंडाळीत ठेवलेला तो ताजा गजरा देणार. अजूबाजूला खेळत असणार्‍या सुनिधीला कधी दहाबारा कळ्यांचा बूके सारखा गुच्छ बनवून देईल किंवा बोटभर गजर्‍याचा तुकडा तिच्या केसांत लावून देईल. गजरा आली की माझा अर्धा-पाऊण तास अगदी आरामात गप्पा मारत जातो. माझं तमिळपण सुधारल्यानं आता जरा ती काय म्हणते हे थोडं लवकर लक्षात येतं. पक्कं घर नसल्याची चिंता आहे, मुलांना चांगलं शिक्षण मिळत नसल्याची चिंता आहे, पैसा पुरत नाही, सासू घरामधे विनाकारण भांडते, म्हणते अजून दोन घरची कामं कर, नवर्‍याची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे इत्यादि इत्यादि.
 
 
इतक्या चिंता असूनपण गजरा कधी कातावलेली नसते. रोज चेहर्‍यावर पहिल्या दिवशी पाहिलं ते प्रसन्न हसू आजही आहे. टोपलीभर मोगर्‍याचा तो ताजा दरवळणारा सुगंध आजही आहे. दुपारच्या उन्हात तिचा चेहरा घामाने निथळत असतो, पण तरी ती कुणाकडे तरी पाणी मागते ते फुलांवर शिंपडण्यासाठी. ज्या फुलांची मला नुसती सुवास घ्यायची हौस.... तिला त्या फुलांमधे दिसतं आज रात्रीचं जेवण. माझ्याकडे गजरा दिला की ती फिरत जाते अख्खं गाव. प्रत्येक दारासमोर उभं राहून फुलं विकते, ती एकटीच नाही, तर तिच्यासारख्या कितीतरी जणी.. प्रत्येकीची कहाणी थोडीफार सारखीच.
 
 
जगाला गुलाबाचं फार कौतुक, कारण त्याला काटे असतात. पण या गजराच्या मोगर्‍यांना जे काटे असतात, ते दिसत नाहीत. आणि म्हणूनच ते काटे खुपल्याचंदेखील कुणाला लक्षातपण येत नाही.
 
(समाप्त)

No comments:

Post a Comment